तुकारामांना संन्यास, वैराग्य या विषयी मांडलेल्या विचारांचा मागोवा घेता असे लक्षात येते की, संन्यास घेतल्याचे नाटक करू नये, विकार जिंकले तर खरा संन्यास अशी त्यांची भूमिका होती. एवढेच नव्हे तर ज्याने विकार जिंकलेले असतील, त्याने संसार करीत असूनही, भोग भोगत असूनही संन्यास घेतल्यासारखे होते असे त्यांना म्हणायचे आहे.
डॉ. लीला पाटील, कोल्हापूर
आशा समूळ खणोनी काढावी । तेव्हाच गोसावी व्हावे तेणे ॥१॥
नाही तरी सुखे असावे संसारी । फजिती दुसरी करू नये ॥२॥
आशा मारूनिया जयवंत व्हावे । तेव्हाच निघावे सर्वांतूनि ॥३॥
तुका म्हणे जरी योगाची तातडी । आशेची बीबुडी करी आधी ॥४॥ तुकाराम गाथा (८८४)
भक्तीमार्गात संसारातील ऐहिक सुखभोगांच्या भौतिक ध्येय प्राप्त करून घेण्याच्या आशा नाहीशा व्हाव्या लागतात. त्याचा पाठलाग करीत राहिल्यास मोह वाढत जातो. साधू, गोसावी खऱ्या अर्थाने साधुत्वाकडे कसे जातील ? त्यांनी ऐहिक सुखभोगाच्या त्याग करण्याची तयारी ठेवली तरच साधुत्व प्राप्त होईल. जर तशी इच्छा, क्षमता व तयारी नसेल त्यांनी त्या मार्गाचा स्वीकार करू नये. योगी होणे, संन्यास घेणे, गोसावी होणे म्हणजे केवळ माथी टिळा, गळ्यात माळा, भगवी वस्त्रे, केसांच्या जटा वाढविणे नव्हे असे तुकारामांना वाटते. सुख, मान्यता, मोठेपणा मिरविण्यासाठी केवळ साधूचा वेश व राहणी उपयोगी नाही. आशा समूळ खणून काढावी, मगच साधू व्हावे नाहीतर सुखाने संसारी व्हावे. उगाच फजिती करून घेऊ नये. संसार करून भक्तीमार्गाने ईश्वराची सेवा करता येते. पण साधूचा वेश घेऊन भोंदू, ढोंगीपणा करू नये. आशेला मारून जयवंत व कीर्तिमान व्हावे. ‘मी योगी आहे, माझा योगाचा अभ्यास आहे’, ‘माझी त्यागाची तयारी आहे’ असे म्हणून मी पणाची भूमिका स्वीकारू नये. ‘मोक्ष हवा व तो मला हवा’ अशी अहंभावाची भूमिका घेण्यातून तो साध्य होणार काय?
तुकाराम म्हणतात, अध्यात्म पंथाची साधना करणारा मग तो योगाभ्यासी असो की भक्तीमार्गी असो, आशाविरहित असला पाहिजे. अनपेक्ष: स्थिरमति: असा भक्तिमान नर मला प्रिय असतो असे भगवंताचे वचन आहे. गीतेत सांगितल्याप्रमाणे त्याचे सर्व कार्याचे आरंभ इच्छेच्या संकल्पनेने होता कामा नये. निष्काम कर्मयोग हेच तत्त्व महत्त्वाचे आहे. तुकारामांचा तोच उपदेश आहे. प्रथम आशा जिंकावी. मगच बाह्य त्याग करावा. खरी साधना बाह्य त्यागात नसून अंतरंगातून वासनांचे निर्मूलन करण्यातच आहे. ज्यांना ते करता येत नसेल त्यांनी परमार्थाच्या, गोसावी होण्याच्या मार्गाकडे जाऊ नये. संसारी राहण्याचे ठरवावे. वासनेला विषय राहू न देणे आणि व्यवहारापुरते विधी करीत राहणे हाच खरा त्यागी होय. वैरागी होणे ही सोपी गोष्ट नाही.
तुकारामांना संन्यास, वैराग्य या विषयी मांडलेल्या विचारांचा मागोवा घेता असे लक्षात येते की, संन्यास घेतल्याचे नाटक करू नये, विकार जिंकले तर खरा संन्यास अशी त्यांची भूमिका होती. एवढेच नव्हे तर ज्याने विकार जिंकलेले असतील, त्याने संसार करीत असूनही, भोग भोगत असूनही संन्यास घेतल्यासारखे होते असे त्यांना म्हणायचे आहे. घरदार सोडून रानावनात, गुहेत जाऊन राहण्याची गरज नाही. तसा वैराग्याचा अर्थ नाही. लोभ, हाव, मोह, मत्सर यासरखे विकार जिंकणे हे खरे वैराग्य अशी त्यांची भूमिका होती. ढोंगी मनाने, विकारग्रस्त अंत:करणाने वैराग्य प्राप्त करून घेणे शक्य नाही. अशा लोकांनी ज्यांना विकारावर विजय मिळविता येत नाही त्यांनी वैराग्याकडे वळूच नये. योगी, बैरागी, साधू म्हणवून घ्यायचे व लबाडी, लोभीपणा, मोहमाया यांचीच कास धरायची अशी भोंदू मंडळी तुकारामांनी पाहिलेली म्हणून त्यांनी अशा ढोंगी वैरागी, साधू यांनाच त्यादृष्टीने जोखून नाटकीपणा नको असा इशारा अभंगातून दिला.
तुकारामांनी आशा सोडून द्यावी मगच वैराग्याकडे वळावे असे सांगताना मोह, लोभ आणि हव्यास यादृष्टीने तो विचार मांडला. आशा आणि आशावाद यातील फरक त्यांनी ओळखला होता. आशावादी राहावे तरच ईश्वर प्राप्तीचा मार्गाचा ध्यास घेता येईल. चिकाटी ठेवावी तरच ध्येय साध्य होईल. मीपणा, अहंकार, मान्यतेच्या हव्यास, आत्मप्रौढी अशा आशा बाळगून भक्तीमध्ये रमता येत नाही. अध्यात्मपंथाची साधना करणाऱ्यांना संयम, त्याग आणि सोशिकता अंगी बानयला हवी.
ऐषाराम, श्रीमंती चोचले, विषयवासनेची विकृती आणि भोगलालसा या वृत्ती साधनेत अडथळे आणतात. खरे तर ध्येय प्राप्त करून घेण्यासाठी उंच उद्दिष्टातून प्रयत्नवादी बनायला हवे. पण ध्येय ज्यांचे ईश्वर दर्शन व अध्यात्म आहे त्यांनी संयमित वर्तनाची कास धरायला हवी. मात्र आज आपण कोणत्या स्थितीत साधक महाराज, अध्यात्मवादी पाहात आहोत ? कोट्यवधीची मालमत्ता सात्विक नव्हे तर खमंग जिभेचे चोचले भागविणारा आहार, वातानुकूल वाहन व वास्तव्याचे ठिकाण, परदेशी दौरे व तितकीच लठ्ठ बिदागी, राजकीय नेत्याशी संधान, भक्तांचे ब्लॅकमेलिंग, ट्रस्ट स्थापन दिखावा करून एकाधिकारशाही, आश्रम भव्यता व सुखसोईची रेलचेल असलेले, राहणीही अगदी श्रीमंती थाटाची अशांना साधक म्हणायचे की ईश्वर भक्तीच्या संकल्पनेला काळिमा फासून समाज विघातक पायंडे पाडणारे म्हणायचे? हे उच्चभ्रू गोसावी महाराज असे. इतरही त्यांच्यातील मधली फळी साधूंची. त्यांची आशा अपेक्षा उंचावलेली. शिष्यांमध्ये स्त्रियांचा भरणा अधिक, ध्यानासाठी कुटी, फिरण्यासाठी वाहन आणि जेवण्यासाठी शेलके खाद्यपदार्थ, झोपणेही डनलप समकक्ष गादी वा गोधडीचा दिखावा असलेली मऊशार व्यवस्था. ही कशातून स्थिती प्राप्त करून घेतली जाते तर ऐहिक सुखाची आशा व वाढत जाणारी भौतिक ध्येये. असे गोसावी झाकून पाकून ऐषाराम उपभोगतात. मग त्यांनी स्वतःला योगी का समजावे?
आशारहित राहणे म्हणजे मनावर संयम ठेवणे, नैतिक वर्तनाचा ध्यास आणि ईश्वर सेवेची कास धरणे, प्रवचन – कीर्तनासाठी मनन, चिंतन व आत्ममग्नतेतून एक प्रकारची साधकावस्था प्राप्त करून घेण्याकडे वळण होय. जसजशा आशा वाढत जातील तसतसे लोभ, माया, मोह, मत्सर, तुलना यांच्याच व्यक्तिमत्त्वात शिरगाव होत राहील. मग साधू – बैरागीपण कसले ? तुकारामांना वैराग्य न स्वीकारता, संन्यास न घेता, संसार त्याग न करता सुद्धा ईश्वर भक्ती अभिप्रेत आहे. आशा सोडून लोकांनी चित्तशुद्धीच्या मार्गाला लागावे असे तुकाराम सांगतात. त्यांचा आदर अनुकरण आजही अपेक्षित आहे.
डॉ. लीला पाटील, कोल्हापूर
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.