- मनीषा शिरटावले लिखित कणकवली येथील प्रभा प्रकाशन प्रकाशित ‘जीवन रंग’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मान्यवरांकडून कौतुक
- साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
सातारा – मनीषा शिरटावले या गुणवंत शिक्षिका असल्या तरी त्यांचे साहित्य लेखन हे जीवनाला दिशादर्शन देणारे असते. कणकवली येथील प्रभा प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या त्यांच्या ‘जीवन रंग ‘ या ग्रंथातून त्यांनी जीवनाचे तत्त्वज्ञानच मांडले आहे. एकेक शब्द घेऊन त्याचा भावार्थ स्पष्ट करताना माणसाने कोणत्या प्रकारे, कोणत्या मर्यादेत जगावं ? आणि आपलं आयुष्य कसं समृद्ध करावं ? याचं चिंतनच या लेखनात त्या मांडतात. त्यामुळेच ‘जीवन रंग’ मधील लेखनाला वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल, असे प्रतिपादन विविध मान्यवरांनी केले.
लेखिका मनीषा शिरटावले याच्या ‘जीवन रंग’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सातारा नगरवाचनालयाच्या सभागृहात झाला. सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर या अध्यक्षस्थानी होत्या.
यावेळी बोलताना मुजावर यांनी शिक्षकांनी वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न करावा आणि मनीषा शिरटावले यांच्यासारखी गुणवंत शिक्षिका आमच्या प्राथमिक शिक्षण विभागात आहे, याचा मला अभिमान वाटतो असेही आग्रहाने सांगितले.
विचारदीप प्रतिष्ठान आणि प्रभा प्रकाशनाने आयोजित केलेल्या या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मसाप, पुणेच्या कोषाध्यक्षा, प्रमुख कार्यवाह तथा लेखिका सुनीताराजे पवार, कवी अजय कांडर, कवयित्री तथा उपायुक्त अंजली ढमाळ, लेखक डॉ. राजेंद्र माने, लेखक – व्याख्याते प्रदीप कांबळे आदी उपस्थित होते.
सुनिताराजे पवार(माई) म्हणाल्या, “जीवन रंग- स्फुट लेखन पुस्तकातून मनीषा यानी जगण्याच्या विविध अंगाना स्पर्श केला आहे. अल्प अक्षरी हे लेखन चिंतनशील असून हे लेखन म्हणजे मनीषा यांच्या पुढील मोठ्या साहित्य लेखन प्रगतीची साक्ष आहे”.
“ललित लेखन आणि स्फुट लेखन यात फरक असतो. ‘जीवन रंग’ मधील लेखन हे ललित अंगाने लिहिलेले असेल तरी प्रामुख्याने ते स्फुट लेखन आहे. स्फुट लेखनाला शब्द मर्यादा असते. त्यामुळे ‘जीवन रंग’ मधील लेखनाला शब्द मर्यादा असली तरी त्याच्या आशयाची व्याप्ती, खोली मोठी आहे”.
अजय कांडर
कवयित्री अंजली ढमाळ म्हणाल्या,” मनीषा यांनी रोजच्या जगण्यातील अनेक स्पंदने, अनेक पदर, अनेक ताणे – बाणे अतिशय साधेपणाने आर्ततेने आणि पोटतिडकीने आपल्या या स्फूट लेखनातून वाचकांसमोर उलगडून दाखवले आहेत”.
संयम, मोह, दमन, न्यूनगंड, अपयश, त्याग असे शब्द घेऊन केले गेलेले हे लेखन आहे. या शब्दांच आपल्या जीवनात काय स्थान आहे. याची उत्तम मांडणी या लेखनात करण्यात आली आहे.
डॉ. राजेंद्र माने
श्री. कांबळे म्हणाले, “मनीषा यांच्या लेखनाची वाटचाल मी जवळून बघितली आहे. त्यांचे ‘ जीवन रंग ‘ हे पुस्तक त्यांना साहित्य क्षेत्रात मोठे नावलौकिक मिळवून देईल असा विश्वास वाटतो”.
जयमाला चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. कादंबरी देवकर यांनी प्रास्तावक केले. तर सविता पवार यांनी आभार मानले. यावेळी ज्येष्ठ विचारवंत श्रीधर साळुंखे, उपशिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे, वरिष्ठ पत्रकार दीपक शिंदे, कवयित्री डॉ. योगिता राजकर, माजी केंद्रप्रमुख हरिश्चंद्र दळवी, राजेंद्र कणसे, कांता भोसले, आनंदा ननावरे, जितेंद्र देवकर, सुभाष चव्हाण, राहुल पवार, लता चव्हाण, अश्विनी कोठावळे, विजय वर्षा पवार, चित्रकार सागर गायकवाड ,अरविंद राजकर, अंजली गोडसे, रेखा शिर्के, किरण घाडगे, संदीप पाटील, अनिता पवार, सुनीता कांबळे, पौर्णिमा ढाणे, अविनाश सोनवलकर, श्री शिर्के अशोक भोसले, सय्यद समीर, सारिका भोसले, नरेंद्र कारंडे, अमोल जाधव, दिनेश फडतरे, रणजित निकम, बळवंत पवार, साधना जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.