November 23, 2024
Old and Modern family special article by Sunetra Joshi
Home » अवघाची संसार…
मुक्त संवाद

अवघाची संसार…

सगळी कामे पैशाने होत नाहीत. काही ठिकाणी माणसाला माणुस हवा. आणि क्वचित मग मानसोपचार तज्ञांची मदतही भरमसाठ फी देवून घेतली जाते. जो सल्ला आईवडील किंवा घरातले मोठे बहीण भाऊ देऊ शकतात तोच सल्ला घेऊन परत येतात. शेवटी भौतिक सुखे कितीही असली तरी जगण्यासाठी मनःशांती तसेच आत्मिक सुख हे लागतेच.

सौ सुनेत्रा विजय जोशी

रत्नागिरी
मोबाईल 9860049826

लग्न झाले की सुरू होतो तो संसार… मग एकट्या नवर्‍याशी नाते जुळत नाही तर त्याचे आईवडील बहीणभाऊ आणि त्याचे सगळे आते मामे चुलत मावस सगळ्या नातेवाईकांशी नाते निर्माण होते. पुर्वी तर एकत्र कुटूंब म्हणून मग चुलत सासवांशी पण तेवढेच संबंध यायचे. कालांतराने वेगळ्या चुली झाल्या मग फक्त सख्खे नातेवाईक संबंध राहिले. नंतर मग आई वडील जवळ राहायचे भाऊ नोकरीनिमित्त बाहेरगावी वगैरे. आणि आता क्वचित् सासुसासरे सोबत असतात. पण तरीही नोकरी करून वाणसामान आणणे भरणे दळण दळायला टाकणे. आठवडाभरात वापरलेले कपडे धुणे घर आवरणे वगैरे तसेच वाळवण ही कामे मागच्या पिढीने केलीच. आला गेला पै पाहुणा त्यात होताच. मुलं व्हायची. आणि हे सगळे करणे म्हणजे संसार करणे असायचे. त्यात भरीला कितीही केले तरी सासुचे नणंदेचे किंवा सासरच्या एखाद्या नातेवाईकांचे टोमणे लेकी बोले सुने लागे या प्रमाणे असायचेच.

आता मात्र चित्र बदलले आहे. पुर्वी नोकरी ही घरातले सगळे सांभाळून करावी लागायची. आता नोकरी असेल तर घरातले सगळे सांभाळून घेतात. प्रत्येक कामाला बायका मिळतात. तसेच भाजी पोळी पासून ते पुरणपोळीपर्यंत सगळे पदार्थ रेडीमेड मिळतात. तसेच या सगळ्यासाठी लागणारा पैसा हाताशी असतो आणि तो खर्च करण्याचा अधिकार सुध्दा. त्यामुळे आता संसार तर घर सांभाळणारी कामवाली बाईच करते. काय संपले आहे इथपासून ते मुलं सांभाळण्यापर्यंत. अर्थात ही काळाची गरज आहे त्यात वावगे काही नाही.

एकीला त्रास झाला तसा दुसरीला नको याच भावनेने हे बदल होत आलेत आणि होत राहतीलही. अजुनही गृहिणी असलेल्या बायका ही सगळी कामे करतातच. पण यात अजून एक बदल होतोय. आपुलकी आस्था संपत चालली आहे का ? कुणी नातेवाईक अगदीच खूप आजारी असेल तरच भेटायला जाणे होते. किंबहुना फोनवरच चौकशी होते. डाॅक्टर काय म्हणाले ? आणि ती व्यक्ती गेल्यावरच भेटायला जाणे.

मित्रमैत्रीणी घरी येऊन धुडगूस घालण्याऐवजी बाहेर हाॅटेलमधेच भेटतात खाऊन पिऊन आपापल्या घरी जातात. त्यामुळे ते घरी येणार म्हणून आवरा आवर नाही की एखादा पदार्थ निगुतीने करून घालणे नाही. घरापर्यंत काही नाहीच. सगळे बाहेरच्या बाहेर परस्पर. त्यामुळे घरगुती संबंधही जुळत नाहीत. नाती हाय हॅलो पर्यंतच राहतात. मग मनमोकळे करणे दुरच. कुणाला कुणाच्या अडी अडचणी, समस्या कळणे तर खूप दुरची गोष्ट. उलट तो कळूच नाही व सगळे कसे आलबेल आहे हे दाखवण्याची धडपड जास्त असते. अर्थात इतरांना समस्या कळल्यावर त्यात मदत होण्याऐवजी मजा बघणारे जास्त असतात म्हणुनही असेल. पण मग हळूहळू एकटे पडत जातात सारेच.

तरुणपणात किंवा सगळे नीट चालू असते तोपर्यंत हे जाणवत नाही, पण मग जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र पंचाईत होते. कुणाची मदत घ्यायची लाज वाटते. कारण आपण भलेही वेळेअभावी असेल पण कुणाला मदत केलेली नसते. पैसे दिले की झाले.. पण शेवटी सगळी कामे पैशाने होत नाहीत. काही ठिकाणी माणसाला माणुस हवा. आणि क्वचित मग मानसोपचार तज्ञांची मदतही भरमसाठ फी देवून घेतली जाते. जो सल्ला आईवडील किंवा घरातले मोठे बहीण भाऊ देऊ शकतात तोच सल्ला घेऊन परत येतात. शेवटी भौतिक सुखे कितीही असली तरी जगण्यासाठी मनःशांती तसेच आत्मिक सुख हे लागतेच.

किंबहुना ते नसले की आपण जास्तच भौतिक सुखामागे धावत राहतो. आणि अजून अजून अशांतच होत राहतो. त्यामुळे नुसतेच फोनवरून कनेक्ट राहू नका संपर्कात पण रहा.आणि खऱ्या अर्थाने संसार करा. कधीतरी घरावरून तुमचाही हात फिरू द्या. वास्तू आणि वस्तुही तुमच्याशी बोलत असतात. एखाद्या वस्तू वरची धूळ तुम्हाला सांगते की इतक्या हौसेने मला घरी आणलेस पण लक्ष मात्र नाही. सगळेच नातेवाईक तुमचा गैरफायदा घेणारे नसतात. काही खरेच मायेची असतात. सुखात आनंद आणि दुःखात सोबत निभावणारे. काहींची वेळप्रसंगी मदत होतेच. मानसिक आधार मिळतो.

मोठ्यांना मान दिल्याने तुमचा मान कमी होत नाही. त्यांच्याकडे अनुभव असतो. तुमच्याकडे उमेद असेल तर ती जेष्ठांना द्या त्यांचा अनुभव तुम्ही घ्या. शेवटी अनुभव हीच खात्री… आणि अवघाची संसार खऱ्या अर्थाने सुखाचा करा.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading