कठीण प्रसंग येऊ नयेत यासाठी आपणच जागरूक राहायला हवे. योग्य प्रकारे परिस्थिती हाताळण्यासाठी आपणच सावध असायला हवे. यासाठीच चांगल्या विचारांची संगत आपण लावून घ्यायला हवी. ज्ञानेश्वरी आणि गीता आपणास चांगले विचार शिकवतात.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६
म्हणौनि मने कायें वाचा । जो सेवक होईल इयेचा ।
तो स्वानंदसाम्राज्याचा । चक्रवर्ती ।। १६६७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा
ओवीचा अर्थ – म्हणून जो मनाने, शरीराने व वाचेने गीतारुपी देवीचा सेवक होईल त्याला ही गीता स्वानंदरुपी साम्राज्याचा सार्वभौम राजा करील.
गीता किंवा ज्ञानेश्वरी का वाचायची ? याचे हे उत्तर आहे. गीतेतून, ज्ञानेश्वरीतून आपणास काय मिळते ? याचेही उत्तर यात आहे. गीतेतील एखादा श्लोक किंवा ज्ञानेश्वरीतील एकतरी ओवी आपण अनुभवायला हवी. मनाने, शरीराने, वाचेने या ओवीची अनुभुती यायला हवी. जीवनातील सर्व गुपीते सांगण्याचे सामर्थ्य या गीतेत अन् ज्ञानेश्वरीतील आहे. यासाठीच हे शास्त्र अभ्यासायला हवे. कारण हे शास्त्र आपणास शाश्वत आनंद देणारे आहे. आपल्या जीवनात अनेक कठीण प्रसंग येत असतात. पण हे प्रसंग येण्यासाठी बऱ्याचदा आपणच कारणीभूत असतो. कारण आपल्याच चुकांमुळे ही परिस्थिती ओढवलेली असते. चुका ह्या होत असतात. पण त्या कमी कशा करता येईल हे आपण पाहायला हवे. तरच कठीण परिस्थिती ओढवण्याचे प्रमाण कमी होईल.
कठीण प्रसंग येऊ नयेत यासाठी आपणच जागरूक राहायला हवे. योग्य प्रकारे परिस्थिती हाताळण्यासाठी आपणच सावध असायला हवे. यासाठीच चांगल्या विचारांची संगत आपण लावून घ्यायला हवी. ज्ञानेश्वरी आणि गीता आपणास चांगले विचार शिकवतात. आपल्या जीवनात सर्वच गोष्टी चांगल्या घडतात असे नाही. आपल्या मनासारखे घडले नाही तर आपणास राग येतो. मन अस्वस्थ होते. अशा परिस्थितीत आपण स्वतःवरीलच नियंत्रण गमावून बसतो. अशी परिस्थिती हाताळायची कशी ? गीतेतून, ज्ञानेश्वरीतून या प्रश्नांची उत्तरे मिळतात. यासाठीच याचे पारायण गरजेचे आहे.
आपण कितीही चांगले करण्याचा प्रयत्न केला तरी समोरच्यांना, सहकाऱ्यांना ते रुचेलच असे नाही. आपले सहकारी बऱ्याचदा आपले वाईटच चिंततात. कारण त्यांना त्यांचा कार्यभाग साधायचा असतो. अशा परिस्थितीत आपण आपले कार्य सुरुच ठेवून चांगल्याला प्राधान्य द्यायला हवे. ही नितीमत्ता आपणास या पारायणातून येते. जीवनात सजगता, सावधानता ही या विचारातून येते. गीतेचे, ज्ञानेश्वरीचे तत्त्वज्ञान आपल्या जीवनात आपणास सावध करणारे, सजगता आणणारे आहे. यासाठीच या ग्रंथांची पारायण सेवा आहे. एकतरी ओवी अनुभवून जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. जीवन आनंदी करणारे हे तत्त्वज्ञान आत्मसात करून स्वानंदरुपी साम्राज्याचा उपभोग घ्यायला हवा.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.