ओळख : वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!
ग्रामीण कवयित्री, लेखिका, गीतकार, कथाकार, लावणीकार, आधुनिक बहिणाबाई, निसर्गकन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वांगी बु. ( ता. भूम, जि. उस्मानाबाद) च्या सातवी शिकलेल्या शशिकला गुंजाळ आता लवकरच एका कार्यक्रमानिमित्त अमेरिकेला जाणार आहेत. तसा प्रस्ताव त्यांनी केला आहे. त्या शेतीमाती, निसर्गाच्या अनुभवी कविता करतात व स्वतः गातात सुध्दा..! प्रतिभेचे वरदान लाभलेल्या शशिकला ताईंचा प्रवास मात्र अतिशय संघर्षमय पण प्रेरणादायी असाच आहे.
ॲड. शैलजा मोळक
लेखक, कवी, समुपदेशक, व्याख्याता
अध्यक्ष शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व जिजाऊ ग्रंथालय पुणे
मो. 9823627244
खामगावला जन्मलेल्या ताईंची वडिलांची परिस्थिती अत्यंत गरिबीची. ‘१९७२ च्या दुष्काळात शेत तळ्यात गेलं. घरी दहा पंधरा म्हशी होत्या त्याही दावणीला मेल्या. घरात उपासमारीची वेळ आली. वडिलांनी दुसरी बहिण सहा महिन्याची व शशीकला तीन वर्षाची असताना दोघींना घेऊन थेट गोवा गाठला. तिथे चिऱ्याच्या खाणीत काम केलं. आईच्या पोटात आठ महिन्याचे बाळ असून सुद्धा ८० पायऱ्या चढून खाणीतून डोक्यावर चिरे काढले. आम्ही रहात होतो तेथून शाळा पाच किलोमीटर होती म्हणून आई रोज घरी शिकवायची नंतर थोड्या दिवसांनी शाळेत घातलं. अक्षर ओळख झाली तेव्हापासून वाचनाची लेखनाची आवड होती. कविता तर रोजच घरी आणि शाळेतही म्हणायची. आईचं स्वप्न होतं आम्ही खूप शिकावं, नोकरी करावी पण वडील व्यसनाधीन झाले, पण आमच्याविषयी शिक्षणाच्या बाबतीत त्यांचा खूप कटाक्ष होता. जवळ बसून ते अभ्यास घ्यायचे. आम्ही झोपडीत रहायचो मला सर्व विषयात शंभर पैकी ९६/९७ मार्क मिळायचे. भाषण असो वा खेळ सगळ्यात मी पुढे असायची. कबड्डीमध्ये अव्वल होते तर मुलींची पहिली क्रिकेट मॅच १९९५ ला वेंगुर्ला हायस्कूल मध्ये खेळले.’ ताई मागील आठवणीत रमल्या होत्या.
लग्नाचे वय नव्हतं, वडिलांना लग्न करायचं नव्हतं पण समोरचे पाहुणे मुलगी द्या म्हणून आले होते. आईला वाटलं वडील दारू पितात, स्थळ चांगलं आहे म्हणून वयाच्या चौदाव्या वर्षी ताईंचे लग्न झालं. छोट्या संस्कारी कुटुंबात वाढलेली शशिकला संसार बेडीत अडकली. लहान वय पण काम येत नाही म्हणून सासरी खूप बोलणीसुद्धा सहन करावी लागायची. त्यात तीन वर्षे मूल नसल्यामुळे शेजारपाजारी, नातेवाईक सारखे बोलायचे. कालांतरान मूल झालं पण वेगळं असल्यामुळे सांभाळायला कोणी नव्हते. पती शिलाई काम करायचे. ताई दोन महिन्याचं बाळ कडेवर, हातात गाई, डोक्यावर लाकडं वैरण घेऊन रानात ये जा करायची. बाळाला झोक्यात टाकून अर्धा किलोमीटर पाणी आणायच. घरी आलं की रात्री शिलाई करायची. घर धाब्याच असल्यामुळे सारवनं चार दिवसाला कराव लागायचं. अशी पंधरा वर्षे गेली पण मनात काहीतरी करावं ही ताईंना इच्छा होती.
लहानपणापासून त्यांना अभंग वाचायची आवड होती, त्यातून कविता सुचली. पण जवळ ना वही ना पेन. सतत कवितेचा विचार डोक्यात आल्याने दोन दिवसात २५ कविता लिहिल्या. आज त्यांच्या २०० कविता तोंडपाठ आहेत. वही पेन नसल्यामुळे शेतातून घरी आल्यावरच कविता लिहून काढायची. तोपर्यंत ती पाठ होऊन जायची. एक दिवस पतीने बघितलं पण त्यांना वाटलं लेखन वाचनाची आवड आहे लिहिले असेल काहीतरी. वाचायला पुस्तक मिळत नव्हती. दुकानातले किराणा मालाचे आलेले पेपर झाकून ठेवायचे व रात्री सगळे झोपल्यावर वाचायचे. काही कथा लिहिल्या त्या पतीला आवडल्या नाही म्हणून त्यांनी ते कागद फाडून टाकले. तरी ताईंनी जिद्द सोडली नाही रात्री सगळे झोपले की चोरून लेखन करायचे. एक दिवस त्यांच्या चुलत दिरांना हे समजलं. ते प्राध्यापक असल्याने त्यांनी पतीला सांगितलं, ‘ही जे लिहिते ते खूप चांगलं लिहितेय. हिला तू प्रोत्साहन दे. कवी संमेलनाला घेऊन जा. तिला संधी मिळाली तर ती खूप मोठी होईल.’
तेव्हापासून ताई प्रथम पतीसमवेत संमेलनाला जाऊ लागल्या. ताईंचा सन्मान पाहून ते कौतुकाने लोकांना ताईंच्या साहित्याविषयी सांगू लागले पण गावातल्या काही लोकांना हे पटत नव्हतं. ते लोक म्हणायचे ही वेडी झाली. सारख कविता लिहित असते. बाहेरच जाते संसार बघत नाही, काम करत नाही. ही काय प्रगती करणार. लोकांचा खूप मानसिक त्रास व्हायचा. लेखन बंद करायची वेळ आली. पण ताईंच्या घरातून दिरांनी पाठिंबा दिला. प्रवास थांबवू नको आम्ही तुझ्या पाठीशी आहोत असं सांगितले म्हणून ताई बिनधास्तपणे लिहित राहिल्या. अशी दहा वर्ष घरात गेली. पण कवितेचा साठा वाढतच गेला.
वाऱ्या वाऱ्या होई मन हुंदडत कवा बवा कासावीस होई जीव पखरण होई तवा.. पायी रूते धसकट कळ लागे काळजाला जीव तवा व्याकुळला रूप येई ढेकळाला.. अशा असंख्य कविता ताईंच्या आज तोंडपाठ आहेत.थोडं घराबाहेर पडल्या तेव्हा काही दिवसातच कोरोना आला. पण ताईंनी कोरोना काळात खूप लेखन केलं. तेव्हा ताईंकडे मोबाईल नव्हता पण बऱ्याच कवी लोकांनी मोबाईलची गरज आहे हे सांगितल्यानंतर ताईंना पतीने मोबाईल घेतला. कोरोना काळात बरेच साहित्यिक ग्रुप जोडले गेले. कविता स्पर्धेत सहभाग नोंदवला. बऱ्याच स्पर्धेमध्ये ताईंना नंबर मिळाले. ऑनलाईन ८०० प्रमाणपत्र मिळवली. ५० पेक्षा जास्त राज्यस्तरीय सन्मान पुरस्कार मिळाले. लोक प्रमुख पाहुणे उद्घाटक अध्यक्ष म्हणून बोलावू लागले. २०१८ ला अमृतवाणी हा काव्यसंग्रह दिर व पुतणे यांनी प्रकाशित केला. २०२५ पर्यंत दुसरा काव्यसंग्रह हुंकार मातीचा प्रकाशित होईल व इतर दहा पुस्तक होतील एवढे लेखन आज तयार आहे. यामध्ये जात्यावरच्या ओव्या, ९० ओव्यांचा पांडवांचा राजसुर्य यज्ञ, लेख, कथा, कादंबरीचही बरंच लेखन झालं आहे. ८०० चारोळी, कविता, पोवाडा, गीत, लावणी असं लेखन झाले आहे. बऱ्याच संस्थांनी मान्यवरांनी सन्मानित केलं.
आज संपूर्ण महाराष्ट्र ‘बहिणाबाई’ या नावाने ओळखू लागला तर ताई शेतकरी असल्यामुळे कोणी ‘निसर्गकन्या’ नावाने ओळखू लागले. ‘बहिणाबाई ही उपमा लोकांनी स्वतःहून दिली त्यांच्या यशाचे श्रेय माझे दिर व पतीला जाते. त्यांनी प्रोत्साहन दिल नसतं तर ताई आज इथपर्यंत पोहोचल्या नसत्या असे ताई सांगतात. गावात मोळा ( रित )असल्यामुळे महिलांना बाहेर पडू दिलं जात नव्हतं पण माझ्या कुटुंबाने पाठिंबा दिल्याने आज माझ्या डोक्यावरल्या पदराचा सन्मान वाढला. महाराष्ट्रातले नामवंत ४०० पेक्षा जास्त कवींनी माझे साहित्य पाहिले आहे. याचा आनंद शब्दातीत आहे.’ असे ताई आनंद व अभिनानाने सांगतात.
ताई आज कवीसंमेलन व पुरस्काराच्या निमित्ताने महाराष्ट्रभर जातात. इतकेच नव्हे तर त्यांना दिल्लीतील महाराष्ट्र सदनातही डॅा. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. अनेक साहित्य संमेलनात कवी संमेलनाच्या अध्यक्ष वा प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना सन्मान मिळाला आहे. लवकरच ताईंची कविता ही सातासमुद्रपार जाणार आहे. शिक्षण कमी असतानाही चोरून वाचन व लेखन केल्यामुळे आज ताई एका यशस्वी टप्प्यावर आहेत याचा आनंद आज त्यांचे कुटुंबीय घेत आहेत. त्यांच्या कविता काही सिनेमात गीत बनली आहेत.
साहित्यिक सेवेबरोबरच ताई विविध सामाजिक कामेही करतात. आदर्श स्वयंसहायता महिला बचतगटाच्या त्या अध्यक्ष आहेत. प्रेरणा ग्राम संघ, उन्नती प्रभाग संघ, अंधश्रध्दा निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य, मसाप बार्शी, वृध्द कलावंत मानधन योजना जिल्हा सदस्य अशा विविध सेवासंघटनात त्या सक्रिय आहेत. आकाशवाणी केंद्र, विविध यूट्यूब चॅनेलवर कविता सादरीकरण व मुलाखती झाल्या आहेत. अशा केवळ कविताच नव्हे तर शेती मातीत राबणारे हात दुग्धव्यवसाय, शिलाईकाम, गायपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन करणाऱ्या शशिकलाताई या खऱ्या अर्थाने आधुनिक नवदुर्गा आहेत. त्यांना मानाचा मुजरा..!
शशिकला गुंजाळ – 91302 72216
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.