April 17, 2024
Vadnge Bhajan tradition conservation article by Sarjerao Navle
Home » वडणगेची समृध्द भजनी पंरपरा
मुक्त संवाद

वडणगेची समृध्द भजनी पंरपरा

पूर्वी करमणुकीची साधने नव्हती (टीव्ही, फोन, रेडिओ) अशा काळात मंदीर, घरात सणांवेळी, एकादशी, तुकाराम बीज, श्रीकृष्ण जन्माष्टमी, आषाढी एकादशी, श्रावण महिन्यात धार्मिक कार्यक्रम, श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला अशावेळी ही सांप्रदायिक भजने सादर केली जायची. आजही त्या-त्या घराण्यांकडून ही सांप्रदायिक वारकरी भजनाची परंपरा आजही सुरू आहे.

सर्जेराव नावले. ८३८००९४६४२

वडणगेतील जुन्याजाणत्या बुजूर्ग लोकांनी गावाला अनेक चांगल्या परंपरा आणि प्रथाचा वारसा घालून दिला आहे. अशाच परंपरांपैकी भजनी परंपरेचा समृध्द वारसा वडणगे गावाला लाभला आहे. गावात विठ्ठल मंदिरात वारकरी सांप्रदायिक भजनाची परंपरा खूप वर्षांपासून आहे. विठ्ठल गल्लीतील चौगले, बराले, जाधव, लोहार मंडळी. आंबेगल्लीतील घाटगे, उदाळे, चौगले, पोवार मंडळी. शिवाजी गल्लीत पाटील , नरके, नाईक (वडाम), जाधव. तर माळवाडीत लोहार मंडळी. पार्वती गल्लीत शेलार मंडळी. मठगल्लीत पाटील, पोवार, चेचर मंडळींनी ही वारकरी भजनाची परंपरा समर्थपणे जपली आहे. पूर्वी करमणुकीची साधने नव्हती (टीव्ही, फोन, रेडिओ) अशा काळात मंदीर, घरात सणांवेळी, एकादशी, तुकाराम बीज, श्रीकृष्ण जन्माष्टमी, आषाढी एकादशी, श्रावण महिन्यात धार्मिक कार्यक्रम, श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला अशावेळी ही सांप्रदायिक भजने सादर केली जायची. आजही त्या-त्या घराण्यांकडून ही सांप्रदायिक वारकरी भजनाची परंपरा आजही सुरू आहे.

जाधव मंडळीचे भजनासाठी योगदान

विठ्ठल गल्लीतील (सध्या अनेक मंडळी जाधव मळ्यात स्थायिक झाले आहेत.) जाधव कुटुंबियांचे वडणगेच्या भजनी परंपरेला मोठे योगदान आहे. जाधव मंडळींचा त्याकाळी शेती हा मुख्य व्यवसाय. घरची वडिलार्जीत शेती पंचगंगा काठावर राजाराम बंधारयाजवळ. जाधव मंडळीतील अनेकजण सकाळी शेतात काम करण्यासाठी त्याकाळी जात. याच दरम्यान पंचगंगा नदीकाठावर बावड्याच्या हद्दीत दत्त मंदिरात त्यावेळी श्री. विचारे महाराज नावाचे एक महाराज होते. ते दत्त मंदिरात पहाटे एकतारी भजने म्हणायचे. पहाटेच्या निरव शांततेत त्यांच्या अभंगाचे स्वर नदीकाठावर घुमायचे. अशावेळी शेतात गेलेल्या जाधव मंडळीतील अनेकजण कामे आवरून वेळ मिळेल तसे दत्त मंदिरात विचारे महाराजांचे भजन ऐकण्यासाठी जावून बसायचे. यातूनच या मंडळींना भजनाची गोडी लागली. आणि या आवडीतून १९६५ साली श्रीपती जाधव, गोविंद जाधव, जोतीराम जाधव (हॉटेलवाले), कृष्णात जाधव, खंडेराव जाधव, भिकाजी जाधव, नारायण जाधव, वसंत जाधव, कंपनी दिनकर जाधव, पिराजी जाधव आदी ज्ञात-अज्ञात मंडळींनी भजन मंडळ काढायचे ठरवले. प्रत्येकाने जमेल तशी वर्गणी जमा करून त्यातून भजनाचे साहित्य आणले. आणि १९६५ ला ‘मेसर्स जाधव कंपनी दत्तपंथी भजनी मंडळ वडणगे‘ या नावाने गावात पहिल्यांदा सार्वजनिक भजनी मंडळ स्थापन केले. (तत्पूर्वी वारकरी भजनाची परंपरा गावात सुरू होतीच) जाधव मंडळींनी दत्तपंथी भजन सुरू करून त्याला सार्वत्रिक स्वरूप दिले. या भजनातून पारंपरिक गीते, अभंग, भारूडे, धार्मिक गीते सादर केली जावू लागली.

केशव, विश्वास जाधव, सर्जेराव जाधव, निवृत्ती जाधव, भिमराव, रंगराव, पांडूरंग, बाळासो, यशवंत जाधव, शामराव जाधव -ढोलकी वादक, दत्ता जाधव नाना – पेटीवादन-गायन, तसेच आदींचा समावेश होता. याच भजनात भजनाचे बुजूर्ग दत्तात्रय श्रीपती जाधव-नाना हे वयाच्या १५ व्या वर्षापासून पेटी आणि गायन करू लागले. त्यांनी नवनवीन संकल्पनेतून या भजनाला आधुनिक रूप दिले. गावात आणि गावाबाहेर नानांनी या जाधव भजनी मंडळाचे नाव जेष्ठ मंडळींच्या सहकार्याने सर्वदूर केले. पूर्वी करमणूक म्हणून भजने सादर केली जायची. जाधव मंडळ भजनाने १९६५ ते १९७२- ७३ पर्यत ८ ते ९ वर्ष उत्कृष्ठ भजन सादरीकरणातून पंचक्रोशीसह शहरात अनेक गावात नावलौकिक त्याकाळी मिळविला.

सोंगी भजनाची परंपरा सुरू

परंपरागत भजनाला हळूहळू आधुनिकपणा येत गेला. प्रत्येक वडणगेकराला जशी तालमीची आवड त्याकाळी लागली, तशीच भजनाची आवड गल्लोगल्ली प्रत्येकाला लागली. यातूनच तरूण भजनाकडे आकर्षित होऊ लागले. आपल्याही गल्लीत भजन असावे, असे प्रत्येकाला वाटू लागले. दरम्यान कोल्हापुरात नामवंत भजने सादर व्हायचीत, यात विविध पारंपरिक, धार्मिक सोंगे केली जायचीत. यातून प्रेरणा घेत वडणगेत सोंगी भजने सुरू झाली.

मठगल्लीत पहिले सोंगी भजन

मठगल्लीतील मठात १९७२ साली गावातील पहिले सोंगी भजन सुरू झाले. श्री कृष्णनाथ मठात कै.पंडीत शामराव पाटील, बाबुराव मोरे, दत्ता चेचर, पाटील मंडळी, सर्व चेचर मंडळी, शंकर पोवार, शंकर मोरे, खडके मंडळी, कुंभार मंडळी, तोरसे आदी ज्ञात अज्ञात मंडळींच्या पुढाकारातून ‘कृष्णनाथ भजनी मंडळ’ सुरू झाले. तेही आधुनिकतेचा बाज घेवून. मठगल्लीच्या सोंगी भजनातील सोंगांचा त्याकाळी मोठा प्रभाव राहिला. या भजनात पारंपरिक अभंग, गोंधळ, भारूड, आदी धार्मिक गीतांचे उत्कृष्ट सादरीकरण तर सुरू केलेच पण पारंपरिक सोंगांतून त्याकाळी लोकांची वाहवा मिळविली. कृष्णनाथ भजनात सुरूवातीला केरबा नावले – आण्णा उत्कृष्ट सूरपेटी वाजवायचे, अभंग गायन- पंडीत पाटील, रंगराव चेचर, शिवाजी नरदेकर, आर.के.पाटील-टेलर (सूरपेटी) ढोलकी- श्रीकांत लोहार भजनातील सोंगात बाजीराव पोवार – (शंकराचे सोंग, श्रावणबाळ ), रंगराव चेचर – (दत्ताचे सोंग), कै.विलास पाटील, जया चेचर टेलर – (गोंधळी), कै.विलास खडके ( लेडीज पात्र), जना केसरकर (धार्मिक सोंग), जया टेलर, विलास खडके हे उत्कृष्ट-लेडीज पात्र करायचेत, (पार्वती, सिता). तसेच काशिनाथ पोवार, बळीराम मोहिते यांचाही सहभाग असायचा. सोगांची वेशभूषा करण्यासाठी दिनकर चेचर, शंकर चेचर, दिनकर चौगले, विष्णू बोणे त्याकाळी कष्ट घ्यायचेत. याच श्रीकृष्ण सोंगी भजनी मंडळाने भजन सादरीकरणातून गाव, पंचक्रोशीसह थेट मुंबईपर्यत मजल मारली आहे. कोल्हापुरातील शिवाजी चौकात दसरयाला होणारया सोंगी भजन स्पर्धेत भाग घेतला होता. यावेळी गावचे प्रत्येक गल्लीतील कलाकार एकत्र येत कोल्हापुरात शिवाजी चौकात भजन सादर केले होते. याच भजनात आंबेगल्लीतील बंडोपंत बापुसो चौगले यांनी केलेल्या शिवाजी महाराजांच्या सोंगाला रसिकांची दाद तर मिळालीच आणि तिसरा क्रमांकही कृष्णनाथ भजनाला मिळाला होता.

वल्लीसो भजनी मंडळ

१९७२- ७३ दरम्यानच माळवाडीत वल्लीसो दर्ग्यात वल्लीसो सोंगी भजनी मंडळ सुरू झाले. जेष्ठ अभंग गायक आर.के.माने (पार्वती गल्ली) यांनी आपल्या पहाडी आवाजातील अभंग गायनातून वल्लीसो भजनी मंडळाची परिसरात वेगळी ओळख निर्माण केली. पेटी- श्री.कदम, अभंग गायन-आर.के.माने, सदाशिव घाटगे, सदाशिव चोपडे, ढोलकी -उत्तम ठमके, श्रीकांत लोहार, अमृत लोहार, कृष्णात पोळ, बत्तासू रणदिवे आदी मंडळींनी वल्लीसो भजनी मंडळाचा नावलौकिक वाढविला. भिमराव शिंदे- इंगळे यांचे पार्वतीचे, डी.के. पाटील शंकराचे सोंग, यशवंत जाधव-वाघवे यांचे मारूतीचे सोंग या भजनात गाजले होते. सदाशिव लोहार, रामा इंगळे हे सोंगाना आकर्षक असे सजवत होते.

नवयुग दत्तपंथी भजनी मंडळ

१९७४ ला दत्तात्रय श्रीपती जाधव-नाना यांनी वडणगे सोसायटीत कामाला असलेल्या आपल्या काही सहकारयांची मोट बांधून नवयुग दत्तपंथी सोंगी भजन सुरू केले. यावेळी सोसायटीत प्रत्येक गल्लीतील कोणी ना कोणी तरी कामाला होते. यांच्यात दत्ता नानांनी भजनाची आवड रूजवली. नाना स्वतः उत्कृष्ट अभंग, गायन आणि पेटीवादक तर होतेच पण श्री दत्ताचे ते निस्सीम भक्त होते. आपल्या दत्तभक्तीतूनच त्यांनी ‘नवयुग दत्तपंथी भजन’ स्थापन करून सोसायटीतील दत्त मंदीरात भजनांचे सादरीकरण सुरू केले. नवयुग भजनी मंडळात गावातील काही उत्कृष्ट कलाकारांचा समावेश नानांनी करून घेतला आणि त्यांच्या कलागुणांना अधिक वाव देण्याचा प्रयत्न केला. या नवयुग भजनी मंडळात दिंडे कंपनी, दुधाने मंडळींचा मोलाचा वाटा होता. या भजनात स्वतः नाना पेटी आणि गायन करायचे.

यशवंत दिंडे- ढोलकी, भजनात भगवान जाधव, सुधाकर स्वामी-जंगम हे उत्कृष्ट शंकराचे सोंग साकारायचे. तर पार्वतीचे सोंग भिमा इंगळे, जया टेलर, स्त्रीपात्र- बाबासो चौगले तर दारूड्याचे सोंग- सुरेश दुधाने, उत्तम दुधाने, गोंधळी सोंग- विलास मोरे-गोंधळी, श्रावणबाळ- मारूती गोंधळी तर बालकलाकार म्हणून रवींद्र नावले, कै.मोहन खुर्दांळे हे काम करायचे. महादेव नरदेकर, संपत गौड जना केसरकर, सदाशिव केसरकर धार्मिक सोंगात असायचेत. तानाजी केसरकर, विनायक नाईक (वडाम), बाजीराव जौंदाळ, याच भजनात गुलाब पठाण हे मुस्लीम युवक उत्कृष्ट गोंधळ सादर करायचेत.

नवनवीन कल्पनेतून भजने आकाराला

नवयुग भजनी मंडळात विठ्ठल गल्लीतील कै.भानुदास लोहार, कै.शशिकांत दुधाने, कै.सुरेश दुधाने, कै.दिनकर दिंडे हे सोंगांना आकर्षक वेशभूषा करायचेत. तर सुरेश दुधाने, शशिकांत दुधाने या बंधुनी सोंगामध्ये नवनवीन कल्पना आणल्या. जसे शंकराच्या डोक्यात लाईटची चमकणारी माळ. शंकराच्या गळ्यात डोलणारा ईलेकट्रीक नाग, शंकराच्या जटेत लाईटचा चमकणारा चंद्र, मारूतीच्या गदेवर चमकणारी लाईट. असा भन्नाट कल्पनांनी त्याकाळी दुधाने बंधुंनी भजनात आधुनिकता आणली. भजनात नावाच्या पाट्या पांढरया कापडावर पाडण्याचा प्रयोग पहिल्यांदा या भजनाने केला. यासाठी प्राचार्य बळवंत दिंडे यांनी यासाठी त्याकाळी प्रोजेक्टर देवून हा प्रयोग केला होता. तसेच प्रा. आनंदा नावले, सरदार दिंडे यांचे सहकार्य मिळायचे. या भजनातील नव्या कल्पना या पाहून त्याकाळी नवल वाटायचे, कारण डाल्बी, शार्पी लाईटचा तो जमाना नव्हता. अशा सोंगाचे लोकांना खूप अप्रुप वाटायचे सोंगे पाहायला खूप गर्दी व्हायची. नवयुग भजनी मंडळाने कोल्हापूरसह कोकण आदी भागात भजने सादर करून वाहवा मिळविली आहे.

१९८७ पर्यंत वडणगेतील भजनांचा सुवर्णकाळ

१९७२-७३ पासून सुरू झालेला सोंगी भजनाचा वडणगेतील हा यशस्वी प्रवास जिल्हासह परजिल्ह्यात, मुंबई, पुणे, निपाणी भागात वाहवा मिळवून गेला होता. साधारण ७३ ते ८७ पर्यत वडणगेतील भजनी मंडळांनी त्याकाळी सुवर्णकाळ अनुभवला. प्रत्येक गल्लीतील कलाकार तळमळीने भजनासाठी राबायचेत, आपले कौशल्य पणाला लावायचेत. ८७ -८८ नंतर मग प्रत्येकाचे व्याप वाढले, याच दरम्यान टीव्हीचे आगमन झाले. टीव्हीवर चित्रहार, रंगोलीसारखे कार्यक्रम, मराठी, हिंदी चित्रपट सुरू झाले. आणि मग सोंगी भजनाला मर्यादा येवू लागल्या. लोकांच्यात टीव्हीची आवड वाढली. गावागावात सोंगी भजनाचा प्रभाव थोडा कमी झाला. पण सांप्रदायिक भजने मात्र दरम्यानच्या काळात मंदीरात सुरूच होती.

हनुमान भजनी मंडळ

१९८७ -८८ नंतर भजनाची थोडी खंडीत झालेली परंपरा दत्ता जाधव- नानांनी पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. सोंगी भजन पंरपरेला वडणगेत पुन्हा पुनरूजीवित करण्याचे काम दत्ता नानांनी केले. चावडी गल्लीतील तरूणांना एकत्र आणत हनुमान मंदीरात १९९९ साली ‘हनुमान भजनी मंडळ’ स्थापन करून भजनाची खंडीत परंपरा नानांनी पुन्हा सुरू केली. चावडी गल्लीच्या तरूण पोरांना एकत्र करत त्याच्यांच भजनाची गोडी तर लावलीच पण या पोरांच्यात व्यसनमुक्तीचा आदर्श पायंडा दत्ता जाधव-नानांनी पाडला. भजनात व्यसनमुक्तीचे अभंग,भारूडे सादर करून तरूणांच्यात व्यसनमुक्तीचा जागर हनुमान भजनी मंडळाने सुरू केला. १९९९ पासून आजतागायत हनुमान भजनी मंडळाने अखंडीतपणे आपल्या भजनाचा वारसा सुरू ठेवला आहे. या भजनात स्वतः दत्ता जाधव-नाना पेटी वादन आणि अभंग गायन करतात. माणिक अस्वले, अकुंश कदम- ढोलकी वादन. उत्तम कदम,अरूण पाटील, विठ्ठल जाधव, सुहास अस्वले, संतोष पाटील, पिंटू पाटील-बोणे, सुरेश पाटील, संजय पाटील- डॅन, कै.डी.एस. अस्वले, पंडीत अस्वले, संजय किरूळकर, शहाजी कदम, शामराव पाटील- बोणे, पांडूरंग पाटील-बोणे, बंडा बराले, मेघराज जाधव, उलपे, अनिल पाटील, महेश राजाराम पाटील इत्यादी चावडी गल्लीतील अनेक तरूण या भजनात आपआपले कौशल्य सादर करत असतात. दत्ता जाधव नानांच्या पुढाकारातून ‘व्यसननुक्ती‘, ‘स्त्रीभृण हत्या‘ अशा अनेक वाईट प्रथांवर हनुमान भजनी मंडळाने १९९९ पासून अखंडपणे प्रबोधनाचा जागर मांडला आहे. यातूनच या भजनी मंडळाने वडणगे गावचे नाव पुणे, मंबई येथे केले आहे. पुणे येथे श्रीकृष्ण जन्मअष्टमीला गेली २२ वर्षे हनुमान भजनी मंडळ आपले भजन सादर करते. याशिवाय महाराष्ट्रातील अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी या भजनी मंडळाने भजने सादर केली आहेत. आपल्या दर्जेदार भजन

हनुमान भजनी मंडळ चित्रपटात

हनुमान भजनी मंडळाने सादरीकरणातूनच २००३ साली कुंदन सुभेदार दिग्दर्शीत ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं‘ या चित्रपटात हनुमान भजनी मंडळाला भजन सादर करण्याचा सन्मान मिळाला होता. या चित्रपटाचे शुटींग कोल्हापुरातील बिनखांबी गणेश मंदिराजवळील रंकोबा मंदिरात सलग महिनाभर सुरू होते. या चित्रपटात हनुमान भजनी मंडळ झळकले होते. ही बाब प्रत्येक वडणगेकराला अभिमानास्पद नक्कीच आहे. आजही मोबाईल, टीव्ही चॅनेलच्या जमान्यात चावडी गल्लीतील अनेक तरूण हनुमान भजनी मंडळाच्या माध्यमातून दर शनिवारी न चुकता रात्री तसेच पोर्णिमेला हनुमान मंदिरात भजन सादर करतात.

स्वामी समर्थ भजनी मंडळ

शिवाजी गल्लीत जयसिंग पाटील- महाराज हे स्वामी समर्थांचे भक्त यातूनच त्यांनी आपल्या घरी ‘स्वामी समर्थ भजनी मंडळ’ २००४ ते ५ पासून सुरू केले आहे. या भजनात प्रसिध्द गायक सीताराम जाधव, त्यांचे बंधू गंगाराम जाधव हे गायन, पेटी वादन करतात. ढोलकी वादन- सोपान पाटील, जयसिंग पाटील-महाराज, संजय पाटील, संतोष नाईक, पंडीत पाटील, सुरेश, अवधूत शिंदे, विकी शिंदे, महेश पाटील, अशोक जाधव, धनपाल जाधव, शशि जाधव -पेंटर, नरके मंडळीतील अनेक तरूण यांचा सहभाग या भजनी मंडळात असतो. तसेच काही महिलांचा या भजनात सहभाग असतो. याच बरोबर पंडीत बराले, तानाजी बराले, जनार्दन स्वामी- जंगम हे महादेव मंदीरात भजन सादर करत.

दत्ता जाधव नाना यांचे योगदान

वडणगेच्या भजनी परंपरेला दत्तात्रय जाधव- नाना यांचे विशेष योगदान लाभले आहे. वयाच्या १५ व्या वर्षापासून ते भजनात आहेत. गेली ५६ ते ५७ वर्षे त्यांनी भजनासाठी स्वतःला वाहून घेतले आहे. मेसर्स जाधव भजनी मंडळ, कृष्णनाथ, नवयुग, स्वामी समर्थ या भजनी मंडळात ही त्यांनी आपली गायन सेवा तसेच पेटी वादन सेवा केली आहे. भजनाच्या प्रेमापोटी त्यांनी अनेक अडचणीतून अनेक भजनी मंडळात सेवा करत मार्गदर्शन केले आहे. सर्वात म्हत्वाचे म्हणजे तरूण पिढीला भजनाची आवड लावून त्यांना व्यसनमुक्त करण्यात नानांचा मोलाचा वाटा आहे. तरूणांसह आता महिला भजनी मंडळ स्थापन करून महिलांत ही भजनाची आवड निर्माण करण्याची नानांची धडपड सुरू आहे.

v

वडणगेच्या या भजनी परंपरेचा वारसा पूर्वीच्या पिढीने सुरू केला असला तरी आज तिसरया, चौथ्या पिढीकडून हा भजन वारसा सुरू आहे. त्याचे प्रमाण कमी-अधिक असेल पण वडणगेची समृध्द भजनी परंपरा आजच्या पिढीने माहित करून घेण्याची गरज आहे. पूर्वी अनेक धार्मिक कार्यक्रमाबरोबरच गणपतीच्या मंडपासमोर ही भजने वडणगेच्या प्रत्येक गल्लीत सादर केली जात असत. यावेळी सारा गाव, घरातील आया-बाया ही भजने पाहायला गर्दी करत होत्या. गणपतीबरोबरच सोसायटीत दत्त जयंतीला ही भजने सादर केली जायचीत. प्रत्येक वडणगेकराला आपल्या पूर्वजांनी सुरू केलेला हा भजनाचा वारसा अभिमानस्पद असा आहे.

( लेखात काही जुन्या-नव्या लोकांची नावे माहिती मिळेल, तशी समाविष्ट केली आहेत. काहीं ज्ञात-अज्ञात लोकांची नावे राहिली असावीत).

( साभार – वडणगेच्या प्रथा आणि परंपरा. लेखक – प्रा.सर्जेराव नावले. वडणगे).

Related posts

सत्ता गाते गाणे…

Weather Forecast : आठवडा चक्रीवादळाचा व संमिश्र वातावरणाचा

विकारांच्या होळीत निर्माण झालेल्या राखेने मिळवा आत्मज्ञानाची चकाकी

Leave a Comment