September 16, 2024
Happiness of red soil article by J D Paradkar
Home » लाल मातीचे सुख !
मुक्त संवाद

लाल मातीचे सुख !

सुख मानायला शिकलं तर , ते कोठेही प्राप्त करणे शक्य होइल. अती सुखाचाही कधीकधी उबग येतो आणि शांत मर्यादीत जीवन जगण्याची मनाला ओढ वाटू लागते. असं वाटणं म्हणजेच सुख या शब्दाच्या उचीत अर्थाची ओळख होणं.

मला सांगा , सुख म्हणजे नक्की काय असतं ?

या सुखांनो या …….. , सुखाच्या सरिंनी हे मनं बावरे !

या सारख्या अनेक गीतं आणि शिर्षक गीतांतून सुखाबाबत भाष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. सुख म्हणजे नक्की काय असतं ? असा प्रश्न आपणच आपल्याला विचारला तर , कदाचित अनुभवाअंती सुख हे मानण्यावर असतं याविषयी आपली खात्री पटेल. लेखातील प्रस्तुत छायाचित्राने मला सुख , झोपडी , घर आणि वास्तू यावर लिहायला प्रवृत्त केलं. लेखाचे छायाचित्र शब्द उमटवण्याआधीच खूप काही सांगून जातं. निवास हा प्रत्येक सजीवांच्या जिव्हाळ्याचा मुद्दा आहे. महत्वाचा फरक असा आहे की , पक्षी – प्राणी विणीच्या हंगामापूर्वी आपला निवारा शोधतात किंवा उभारतात , मानवाचा जन्मच पिढीजात निवाऱ्यात होत आलाय. आपल्याला लाभलेला निवारा सुखाचा आहे असं मानलं तरच सुखाच्या समीप पोहचता येतं. स्वतःमधील सकारात्मकता प्रत्येक गोष्टीत दडलेल्या सुखाची ओळख करुन देत असते. नकारात्मक वृत्तीला सुख अवतीभवती असतांनाही केवळ ‘ प्रवृतीमुळे ‘ सुखाच्या समीप पोहचता येत नाही. बऱ्याचदा दुसऱ्यांचे सुख आपल्या नजरेत येतं आणि नकळत त्यांच्याजवळ स्पर्धा करण्याच्या प्रयत्नात आपल्याजवळ असणारे सुख आपण हरवून बसतो. आपल्याकडे आहे तीच आपल्या सुखाची झोपडी आहे असं मानल्याने अनेक प्रश्न आपोआप सुटू शकतील.

झोपडीत जे प्राप्त होते ते , सध्याच्या काळात कदाचित उंची महालात प्राप्त होणं कठीण होइल. राहणीमान उंचावलं की , साहजिकच विवंचना वाढत जातात. याचा अर्थ सर्वसंग परित्याग करुन झोपडीत येवून राहायचं असा अजिबात नाही. सुख मानायला शिकलं तर , ते कोठेही प्राप्त करणे शक्य होइल. अती सुखाचाही कधीकधी उबग येतो आणि शांत मर्यादीत जीवन जगण्याची मनाला ओढ वाटू लागते. असं वाटणं म्हणजेच सुख या शब्दाच्या उचीत अर्थाची ओळख होणं. गवतानं शाकारलेली झोपडी, त्याला असणारा तकलादू दरवाजा , समोर असणारं सारवलेलं अंगण आणि या अंगणात आनंदी मनाने रांगोळी रेखाटणारी वृध्द स्त्री , हे सारं सुखी – समाधानी जीवनाचं चित्र आहे. झोपडीत ना खोल्या ना खण , ना गाद्या ना पलंग. जे आहे ते अगदी उघड्यावर पसरलेलं. जवळ काहीच नसलं की , काही चोरीला जाईल याची भितीच नसते. धन संचय वाढू लागला की, मनात अनेक शंका घर करु लागतात. त्यातही प्रामाणिकपणे कमावलेल्या धनाबाबत मन निर्धास्त असतं. मात्र वाममार्गाने आलेल्या धनामुळे मन आणि स्वभाव दोन्ही बेपर्वा होत जातात. प्रत्येक प्रसंगी बुध्दीच्या ताकतीऐवजी धनाची ताकद मोठी वाटू लागते.

अंथरुणात आडवे झाल्यावर शांत झोप लागणे हेच खऱ्या अर्थाने मोठे सुख आहे. ज्यांच मन स्वच्छ असतं त्यांना या सुखाचा अनुभव घेता येतो. शांत आणि पुरेशा झोपेमुळे मन शांत राहतं , स्वभाव मोकळा बनतो , संवाद साधण्यात आनंद वाटतो , काम करण्याची क्षमता वाढते आणि आपले व्यक्तीमत्व सदाबहार दिसू लागते. सुखाच्या झोपडीत हे सर्व भरभरून मिळते. आपल्या अपेक्षांना आवर घातला आणि तुलना करत स्पर्धा करण्याची प्रवृत्ती सोडली की, झोपडीतील सुखं प्रत्येकाला आपल्या घरातही मिळू लागतील. यासाठी घरातील वातावरण नेहमीच आनंदी राहील यासाठी घरातील प्रत्येक सदस्याने प्रयत्न करायला हवा. जबाबदारी झटकणे प्रत्येकाला सहजपणे जमते. मात्र जबाबदारी घेऊन ती पार पाडणे यातच खरे आव्हान असते. जो आव्हाने स्विकरतो तोच एक ना एक दिवस यशस्वी होतो. आव्हान स्विकारून यशस्वी होणे म्हणजेच सुखाची प्राप्ती होणे. सुख हे छोट्या छोट्या गोष्टीत दडलेले असते. गरज आहे ती , आपल्याकडील सकारात्मक दृष्टीची. ज्याचा स्वतःच्या मनावर ताबा असतो, त्याला सुखाची प्राप्ती लवकर होवू शकते.

फार पूर्वी ‘ खेड्याकडे चला ‘ असा संदेश देण्यात आला होता. त्याकाळात खेडी अत्यंत दुर्गम होती आणि मुलभूत सोयी सुविधा देखील उपलब्ध नव्हत्या त्यामुळे खेड्यात येवून श्रमदान करण्यासाठी असा संदेश दिला गेला होता. बदलत्या काळात खेडी दुर्गम राहिली नाहीत. मात्र खेड्यातील जीवन आनंददायी नक्कीच झालेय. शहरातील धावपळीच्या जीवनाला कंटाळलेले शहरवासीय आता खेड्यात येवून श्रमदान नव्हे तर, श्रम परिहार करतात , स्वतःमधील ताणतणाव दूर करुन घेतात आणि एक नवी उर्जा घेऊन शहरात परततात. शहरातून खेड्यात येवून काहीकाळ ताणतणाव विरहित जीवन जगणे म्हणजेच सुखाची अनुभूती घेणे होय. अती सुख देखील कधीतरी बोचरं ठरतं. यासाठी भलीभली मंडळी शांतता , एकांत मिळविण्यासाठी खेड्याकडे येत असतात. याचाच अर्थ केवळ पैसा हे सुख नसून मन आनंदी असणं आणि ते ठेवता येणं म्हणजेच खरे सुख आहे.

चरितार्थ चालवायचा आणि संसार करायचा म्हणजे धडपड ही ओघाने आलीच. यासाठी वेळप्रसंगी आपलं गांव सोडून नोकरी – व्यवसायासाठी शहराकडे जावेच लागते. शहरी जीवन कमालीचे गतीमान बनलंय, या धावपळीत स्वतःला झोकून देणं हे क्रमप्राप्त आहे. मात्र अशा धावपळ करणाऱ्या मंडळींना समजून घेत त्यांच्यापुढे आपल्या अपेक्षांचा पाढा वाचत राहणं त्यांना त्रासदायक ठरु शकतं. यासाठी मोजक्या गरजांनी जीवन जगायचं ठरवलं तर, सुखाच्या जवळ लवकर पोहचणं शक्य होवू शकेल. घरातील प्रत्येक व्यक्तीने जबाबदाऱ्या समजून वाटून घेतल्या तर, केवळ एक – दोघांवर ताण येणार नाही. स्वतःसह दुसऱ्याच्या मनावर ताण येणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली तर, जीवनप्रवासात अशक्य असे काही नाही. नशीबाने आपल्या जे प्राप्त झाले आहे ते आपले आहे असे मानता येवू लागले की, मग आपली झोपडी देखील आपल्याला सुखाची आहे असे वाटू लागते. सदर लेखातील छायाचित्रात दिसणारे लाल मातीने सारवलेलं आणि कौलारू घर, म्हणजे खरे सुख ! या घर वजा झोपडीला एकमेव दरवाजा आहे आणि त्या दरवाजात या घराचे आनंदी आणि समाधानी जोडपं शिळोप्याच्या गप्पा मारत प्रसन्न मनाने बसलंय. आनंद उपभोगायचा असेल, तर ते आपल्या मनावर अवलंबून आहे. अशा लाल मातीने सारवलेल्या आणि कौलरू घरातील वास्तव्याचा आनंद सांगून कळणार नाही, तर तो साध्या राहणीतून अनुभवावाच लागेले . या वयस्कर जोडप्याच्या चेहऱ्यावर अनेक पावासाळे अनुभवल्याचा ओलावा ताजा असल्याची अनुभूती येते. संसारात एकमेकांना दोघं देत असलेली विश्वासाची साथ हीच त्यांच्या संसारातील खरी श्रीमंती होय.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

लघु वित्त बँकांच्या सार्वत्रिक समस्या गंभीरच !

गीतारुपी गंगेत स्नान करून व्हावे पवित्र

व्यथेच्या आर्जवातून जन्मलेला कवितासंग्रह

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading