दोन डोंगरांच्या मध्यभागी आमचं घर असल्याने, हा दोन डोंगरांच्या मधील भाग म्हणजे चिमटा ! त्या घळीत आमचं घर म्हणून आम्ही चिमट्यातले पराडकर. ज्यावेळी मला चिमटा या शब्दातील, हे स्पष्टीकरण समजले त्यावेळी पूर्वीच्या लोकां जवळ असणाऱ्या कल्पकतेबद्दल मोठे कौतुक वाटले.
जे. डी. पराडकर 9890086086
दोन बोटांच्या चिमटीत एखाद्याची कातडी धरून ती जोराने पिळवटणे , म्हणजे चिमटा काढणे. सध्याच्या काळात चिमटा हा फक्त बोटानेच काढला जातो असे नव्हे, तर शाब्दिक चिमटे काढण्याचीही स्पर्धा लागलेली पाहायला मिळते. एखाद्या वेळी समोरच्याला जागरूक करण्यासाठी देखील हळूच चिमटा काढला जातो. चिमटा काढण्याची कारण वेगवेगळी असतात, तशा त्याच्या वेदनादेखील भिन्न स्वरूपाच्या असतात. चिमटा काढायला एखादं कारणच लागते असे नव्हे, त्रास देण्याच्या हेतूने देखील सर्रास चिमटा काढला जातो. पूर्वीच्या काळी छडीचा वापर करणारे गुरुजी होते त्यावेळी अनेकांनी पोटाला कळ जाणाऱ्या चिमट्यांची वेदना अनेक वेळा सहन केलेली आहे. मराठी शाळेत शिकताना गुरुजींकडून पोटाला काढला जाणारा हा चिमटा, भविष्यात याच पोटाची भूक भागवण्यासाठी एक नवी दिशा देण्यासाठी कारणीभूत ठरायचा.
पूर्वीच्या शिक्षण पद्धतीत बदल झाला आणि चिमटे, छडी याचा वापर करणे कायद्यानेच बंद झाला. परिणामी आता अनेकदा कठोर संस्कारांअभावी पोटाला चिमटा काढून बसण्याची वेळ काही जणांवर येऊन ठेपते. पोटाला चिमटा बसल्याशिवाय कष्टाची किंमत कळत नाही, असं म्हटलं जातं. याचाच अर्थ प्रसंग आणि वेळ आल्याशिवाय मार्ग दिसत नाही.
चिमट्याचं हे सार पुराण सांगण्यामागचा माझा हेतू मात्र वेगळा आहे. खरंतर दोन बोटांच्या चिमटीत धरून काढल्या जाणाऱ्या चिमट्या विषयी मला काही विशेष सांगायचं नसून, ‘ चिमटा ’ म्हणजे आमचे आंबेड खुर्दच्या घराचा परिसर ! स्वातंत्र्य पूर्वीच्या काळातील लोक आम्हाला ‘ चिमट्यातले पराडकर ’ याच नावाने ओळखत होते. आम्हालाही या चिमटा नावाविषयी फारशी माहिती नव्हती. बालपणी आंबेडखुर्दच्या घरी बसून आम्ही भावंड ‘ आड चिमटा – काढ चिमटा ’ हा खेळ खेळल्याचं आजही आठवतंय. मग चिमट्यातले पराडकर, हे काय प्रकरण असावे ? याविषयी मला नेहमीच उत्सुकता असे. दोन डोंगरांच्या मध्यभागी आमचं घर असल्याने, हा दोन डोंगरांच्या मधील भाग म्हणजे चिमटा ! त्या घळीत आमचं घर म्हणून आम्ही चिमट्यातले पराडकर. ज्यावेळी मला चिमटा या शब्दातील, हे स्पष्टीकरण समजले त्यावेळी पूर्वीच्या लोकां जवळ असणाऱ्या कल्पकतेबद्दल मोठे कौतुक वाटले. आम्हाला दिल्या गेलेल्या या नावाला शेकडो वर्षे उलटून गेली असली तरी, अजूनही काही जुने लोक ‘ तुम्ही चिमट्यातले पराडकर ना ’ ? असंच विचारतात. पिढ्या सरल्या, वर्षे उलटली, तरी चिमट्यातील आठवणी मात्र आजही कायम आहेत.
चिमट्यात जाण्यासाठी पूर्वी मुंबई गोवा महामार्गावरील आंबेडखुर्द या बस थांब्यावर उतरल्यानंतर किमान पाऊण तासाचे अंतर दोन घाट्या चढून पार करावे लागे . बस मधून उतरल्यानंतर रस्त्याच्या लगतच ‘ बाळू तात्या ’ यांच्या बागेतील लाल रंगाची असंख्य जास्वंदीची फुले येणाऱ्यांच्या स्वागताला सज्ज असत. या फुलांकडे पाहिल्यानंतर अंगातील क्षीण कुठच्या कुठे पळून जायचा. चिमट्यात पोहोचण्यासाठी दोन घाट्या पार कराव्या लागत असल्याने, बाळू तात्यांच्या घराकडे वाहत येणारे पाटाचे नैसर्गिक पाणी पिण्याचा मोह कोणालाही टाळता यायचा नाही. जो एकदा हे पाटाचे पाणी प्यायला, तो त्याची मधुर चव कधीही विसरू शकला नाही.
झुळझुळ वाहत असणारे हे पाटाचे पाणी चिमट्यात येणाऱ्या प्रत्येकासाठी एक मोठा आधार होते . एक घाटी चढून काही अंतर पार केल्यानंतर लागणारी थोडीशी सपाटी, म्हणजे थोडा वेळ थांबण्यासाठी असणारे सुंदर ठिकाण होते. या सपाटीलाच मध्यभागी नेहमीच पानांचा सळसळ असा आवाज करत येणाजाणाऱ्या पांथस्थाना शितल छाया देणारे पायरीचे एक विशाल झाड होते. या झाडाच्या जवळच असणाऱ्या काळ्या पाषाणांना टेकून थोडी विश्रांती घेतल्यानंतर दुसऱ्या घाटीचा प्रवास सुरू व्हायचा. दुसरी घाटी, पहिल्या घाटीच्या तुलनेत छोटी होती. त्यानंतर परत जी सपाटी लागायची, ती घराजवळ असणाऱ्या ओढ्यापर्यंत. वाटेत एक कमी उंचीचे आंब्याचे झाड लागायचं. या झाडा जवळ दगडी असल्याने त्याला धोंडीतला आंबा असे नांव दिले गेले होते.
धोंडितल्या आंब्यांचे एक वैशिष्ट्य होते, या आंब्या जवळ गेल्यानंतर दोन पक्षी पंखाची फडफड करत वेगाने उडून जात. असा प्रकार अनेकदा घडायचा. बालवयात आम्हाला या प्रकाराची मात्र खूप भीती वाटत असे. हा आंबा उंचीने खुजा होता आणि तो कधीही मोहरल्याचे मी पाहिलेले नाही. अशा झाडावर त्या दोन पक्षांचा संसार तरी फुलला असेल कां ? असा प्रश्न मला नेहमी पडायचा. या आंब्याच्या पुढे गेल्यानंतर दोन्ही बाजूला जांभ्या दगडाचे बांध आणि त्यावर मोठया उंचीचे निवडुंग होते. या बांधाच्या मधून एक छोटी पायवाट होती. सायंकाळी उशिरा या पायवाटेवरून जाताना बांधावरील काटेरी निवडुंग अक्राळवीक्राळ आणि विद्रुप दिसायचा.
कधीतरी तर यातून वेगवेगळे आकार दिसायला लागत आणि मनात भीती उत्पन्न होवून या वाटेवरून जातानाची पावले नेहमीच वेगाने पडत. थोडं पुढे गेल्यानंतर दोन्ही बाजुंना काजूची मोठी झाडे आणि उताराची वाट होती. या ठिकाणी पोहचल्यानंतर घरातील माणसांचे आवाज ऐकू यायचे आणि मोठा आधार वाटू लागायचा. काजूच्या झाडांपासुन काही अंतरावर पाण्याचा खळखळ आवाज करत वाहणारा ओढा असल्याने त्याचा खूप मोठा आधार वाटे. या ओढ्या जवळ पोहचल्यानंतर वरील बाजूला घर दिसू लागायचे आणि अंगात शक्ती येत घाटी चढून आल्याचा क्षीण निघून जायचा. दोन डोंगरांच्या मध्ये वाहाणाऱ्या या ओढ्याच्या घळी लगत आमचं घर म्हणून त्याचे नांव ‘ चिमटा ’ असे ठेवले गेले. या चिमट्याचा सारा परिसर आणि पकड अशी होती की, एकदा कोणी त्या पकडीत आले की, सहजासहजी कधीही सुटले नाही. या चिमट्यात वेदना नव्हती तर माया होती. या चिमट्यामुळे क्लेश होत नव्हते, तर आपलेपणा मिळत होता. या चिमट्यात वेदनेची पकड नव्हती, तर आलिंगन होते. हा चिमटा सावज हेरण्याचा प्रयत्न करत नसे तर आलेल्या प्रत्येकाला आनंद देण्यात धन्यता मानत असे. या चिमट्याने आपल्या पकडीत अनेकांना घेतलं आणि नेहमीच आपलेपणा देण्याचा प्रयत्न केला.
खरंतर चिमट्याचे वर्णन करायला माझी लेखणी, शब्द आणि अगदी बुद्धी देखील तोकडी पडेल. चिमटा म्हणजे, निसर्गदेवतेला पडलेले एक सुंदर स्वप्न ! जिकडे पहाल तिकडे सुख आणि समाधान पसरलेलं. घराच्या तीन बाजूने सतत वाहत असणारे पाटाचे पाणी, ही चिमट्याची खरी समृद्धी. विस्तीर्ण पसरलेल्या दाट जंगलात चिमट्यातील आमचं एकमेव घर म्हणजे , जणू राजवाडाच म्हणा ना ! असंख्य पक्षांचा मधुर किलबिलाट, रंगीबेरंगी फुलपाखरांचा नेत्रदिपक विहार, गायी – गुरांचे हंबरणे, तुळशीच्या अंगणात पडणारा नागचाफ्याचा सुंदर गंधीत सडा , सूर्यप्रकाश मिळावा यासाठी एकमेकांजवळ उंचीची स्पर्धा करत वाढलेली सुपारीची झाडं, विस्तीर्ण अंगण, भला मोठा मंडप, सारवण घातलेलं अंगण, सोनचाफ्या सह गंध देणारी असंख्य फुलझाडं, अंगणात वाळत घातलेली केशरी रंगाची पोफळं, गडीमाणसांची लगबग, झोपळ्यावर बसून गाणी म्हणत आनंदाने झोका घेणारी घरातील मुलं, आपल्या विविध कामात दंग असणारा घरातील महिलावर्ग, स्वयंपाक घरासह पाणछपरातील चुलीचा कौलातून अलगदपणे बाहेर पडणारा आणि आकाशाकडे झेपावणारा धूर, मधूनच ऐकू येणारे रानातील प्राण्यांचे आवाज, घराजवळ असणाऱ्या ओढ्यातील वाहत्या पाण्याच्या खळखळ आवाजाचे सतत ऐकू येणारे सुमधुर पार्श्वसंगीत, शांतवेळी घरापासून काही अंतरावर असणाऱ्या ग्रामदेवता मंदिरातील घंटेचा ऐकू येणारा आवाज, घरातील पूजे दरम्यान ऐकू येणारी घंटेची मंद किणकीण, पाठोपाठ येणारा उदबत्ती आणि धुपाचा गंध, चिमट्यातील वातावरणात आल्हाद निर्माण करत असे.
चिमट्यातील घर जवळ आले की, छोट्या २० – २५ पायऱ्या चढाव्या लागत. या ठिकाणी असणाऱ्या जांभ्या कातळातच या पायऱ्या घडवण्यात आल्या होत्या. या पायऱ्यांवरून जाताना डाव्या बाजूला शेजारच्या मधुअप्पांचा गोठा दिसायचा. पूर्वी गोठे हे गवताने शिवले जात. गवताने शिवलेल्या गोठ्यांना केमळ्याचा गोठा असेही म्हटले जायचे. छपराच्या या गवतावर पावसाळ्यात भोपळ्याचे वेल सोडले जात. या वेलांना फुलं येऊन छोटे भोपळे धरले, की त्यांचा रंग आणि तो नजारा नेत्रदीपक दिसे. गावठी भाज्या, फळं यांची सुबत्ता किती आणि कशी होती, हे असे भोपळ्याचे वेल पाहिल्यानंतर लक्षात यायचे. घराच्या जवळून ग्रामदेवतेच्या मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर ‘ तळी ’ चा हिरवा गार भाग होता. अखंड वाहणाऱ्या या पाण्याजवळ केवड्याचं दाट बन होतं. जवळच एक जांभळाचं छोटसं परंतु चवीला अप्रतिम असणार एक झाड होतं. काळ्या कातळातून अखंडपणे वाहणार तळी जवळच पाणी चवीला मधुर आणि नेहमी थंडगार असे. वाडीतील सर्व माणसांना त्याकाळी याच पाण्याचा एकमेव आधार होता. परिणामी तळीवर महिला वर्गाची सतत ये – जा सुरू असायची. वाडीतून आमच्या घरी कामाला येणाऱ्या महिला येताना पाण्यासाठी रिकामी भांडी घेऊन येत. काम आटोपल्यानंतर घरी परतताना कितीही दमलेल्या असल्या तरी, तळीवरून जाताना या महिलांच्या डोक्यावर पाण्याच्या भरलेल्या कळशा आणि हांडे पाहायला मिळत.
तळी जवळचा सारा परिसर समृद्ध होता. जवळच असणाऱ्या केवड्याच्या बनातून कोणी ना कोणी एखादं तरी कणीस आमच्या घरी आणून देत असे. मग पुढे चार-पाच दिवस आमच्या घरात केवड्याच्या कणसाचा सुगंध पसरलेला असे. आमचे काका, तर केवड्याचं एखादं पान तंबाखूच्या डब्यात टाकत. तळीला लागूनच असणाऱ्या आमच्या भातशेतीला ‘ तळीवरील शेती ’ असे म्हटले जायचे. या शेतीच्या जवळच गावचा पौर्णिमेचा शिमगा संपन्न होतो. पौर्णिमेच्या रात्री टिपूर चांदण्यात संपन्न होणारा हा शिमगोत्सवाचा सोहळा नयनरम्य असतो. या सोहळ्याचे वैशिष्ट्य असे की, जेथे रात्रीचा हा सारा सोहळा संपन्न होतो त्या परिसरात कोणीही मद्यपान करून आलेले चालत नाही. देवावर असणाऱ्या कोकणातील माणसांच्या या श्रद्धा आजही जशाच्या तशा कायम आहेत. पौर्णिमेच्या चांदण्यात शिमगोत्सव संपन्न होणारी गावे फारच मोजकी आहेत, त्यात आमच्या चिमट्याच्या परिसराचा समावेश होतो. रात्रीच्या वेळी येथील शिमगोत्सव संपन्न झाला, की पालखी या ठिकाणापासून जवळच असणाऱ्या आणि सद्यस्थितीत भग्नावस्थेत असलेल्या पूर्वीच्या काही चौथऱ्यांच्याजवळ नेण्याची प्रथा आजही जपली जातेय . या परिसरात पूर्वी अनेक घरे होती, कालांतराने येथील एक एक कुटुंब स्थलांतरित झाले आणि येथील काही चौथरे कायमचे ओस पडले. एकेकाळी वैभवशाली असणाऱ्या या परिसरातील या मुकं चौथर्यांचा इतिहास आज फारसा कोणाला माहितही नाही.
या भग्न चौथर्यांच्या जवळच ‘ गंगोबा ’ हे देवाचे ठिकाण आहे. ग्रामदेवता मंदिरामध्ये असणाऱ्या देवतांमध्ये गंगोबा या देवाचा समावेश असल्याने या परिसरात असणाऱ्या आमच्या शेतीला ‘ गांगोबाची शेती ’ असे नाव दिले गेले . येथील सारी शेती डोंगर उताराची. एका ठिकाणी मधुर चवीच्या पेरूचे झाड आणि जवळच गांगोबा देवाचे ठिकाण. चिमट्याच्या डाव्या बाजूला ‘ तळी ’ चे पाणी , तर उजव्या बाजूला ‘ गांगोबा ’ चे अखंड वाहणारे पाणी. या दोन्ही ठिकाणचे वाहते पाणी नैसर्गिक डोंगर उताराने आमच्या घराजवळ यायचे. गांगोबाचा सारा परिसर देवाच्या वास्तव्यामुळे चैतन्यमय भासायचा . भात शेतीच्या परिसरात एका पेरू व्यतिरिक्त अन्य कोणतेही झाड नव्हते. शेतीचा सारा मोकळा भाग विस्तीर्ण होता. बालपणी आम्ही गांगोबाच्या परिसरात शेती हंगामात लावणी लावल्याचे आजही मला चांगले आठवतेय . कसबा गावातील देवपाट वाडी मधील गोविंदा नावाचा एक गडी अनेक वर्षे आमच्याकडे कामाला होता. या गोविंदा सोबत ढोपरभर चिखलामध्ये आम्ही गंगोबाच्या सर्व शेतांमध्ये मनसोक्त लावणी लावून चिखलात माखण्याचा आनंद लुटला आहे. गांगोबा या ठिकाणापासून खाली उतरताना चिमट्यातील आमच्या मुख्य बागेचा सारा परिसर लागतो. गांगोबा येथून आलेले पाटाचे पाणी बागेला लावण्यासाठी उंचावर एका मोठ्या हौदात साठवले जायचे. उन्हाळ्यात सकाळच्या वेळी या हौदातील रात्रभर साठलेले पाणी पाटानेच बागेला लावले जाई. पाणी लावल्यानंतर तृप्त झालेल्या बागेचा टवटवीत पणा झाडांच्या पानांतून दिसून यायचा.
या बागेत असंख्य प्रकारची झाडं होती. आंबा, फणस, पोफळं, पपनस, पेरु, साखरजांभ, शिसम, सागवान, करमलं, अननस, केळी, काजू, कवंडल, बेल, विविध प्रकारची फुलझाडं असे अनेक प्रकार होते. बागेमध्ये काय नाही असं नव्हतच. ऐन उन्हाळ्यात देखील सकाळच्या वेळी बागेला लावल्या जाणाऱ्या पाटाच्या पाण्यामुळे बागेतील सारे वातावरण थंड असे. बागेतील आंबा फणसाची झाडे खूप जुनी असल्यामुळे उंच होती. परिणामी बागेत दिवसभर शितल छाया पसरलेली असायची. चिमट्यात दिवसभर कामासाठी येणारी गडी माणसं दुपारच्या वेळची वामकुक्षी शितल छायेच्या या बागेतच घेत . बागेच्या दुसऱ्या भागात आणखी एक पाण्याचा मोठा हौद होता. या हौदातही रात्रभर पाणी साठवले जायचे. बागेतील या भागाला ‘ पन्हळी ’ चा परिसर असे म्हटले जाई. उन्हाळ्यात घरातील पुरुष आणि सर्व मुले सकाळ – सायंकाळ आंघोळ साठी या पन्हळीवरच जात असत. या भागाच्या जवळच ‘ भटाच्या ’ परसावाकडे जाण्यासाठी एक छोटी पायवाट होती. या पायवाटेला लागून असणाऱ्या भागाला ‘ कडा ’ असं म्हटलं जायचं. हा सारा परिसर देखील पूर्णता उताराचा होता. या भागाच्या टोकाला बारमाही वाहणारे पाणी आजही खळखळत असते . कड्याचा सारा भाग देखील भात शेतीचा. शेताच्या शेवटच्या मळीच्या खालच्या बाजूस खोल दरी असल्याने या परिसराला ‘ कडा ’ असे नाव दिले गेले. या ठिकाणी आंब्याची तीन झाडे आहेत. यातील दोन उत्तम चवीची हापूस कलमे तर एक बाटली हापूसचे अविट चवीचे झाड आजही आपल्या जागेवर उभे आहे.
चिमट्याचा सारा परिसर अद्भुत असल्याने येथे एकदा आलेला माणूस परत परत येत राहिला. अमावस्ये दरम्यान अथवा मे महिन्याच्या कालावधीत अंगणात जाजम टाकून त्यावर आडवं झाल्यानंतर समोरच्या डोंगरात दिसणारा ‘ छबिना ’ हा आमच्या बालपणी एक मोठा रहस्यमय प्रकार होता. चिमट्याच्या बरोबर समोर असणाऱ्या डोंगरात अमावस्ये दरम्यानच्या अंधारात अचानक काही दिवे दिसू लागत. एका रांगेत दिसणारे हे दिवे काही क्षणात खाली येत, तर काही क्षणात परत वर जात. हा सारा प्रकार म्हणजे ‘ छबिना ’ असल्याचे आम्हाला सांगितले गेले होते. या विषयाच्या अधिक खोलात न जाता अथवा याबाबतचे रहस्य अधिक न उलगडता आम्ही कुतूहल म्हणून हा छबीना अनेकदा पाहिला आहे. अंगणात आम्ही सर्वच एकत्र असल्याने समोरच्या डोंगरातील छबिना पाहून मनात कधीही भीती उत्पन्न झाली नाही. याच अंगणातून आम्हाला मुंबई गोवा महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांचा आवाज ऐकू यायचा. निरव शांततेत हा आवाज आम्हाला आधार देण्याचे देखील काम करे . त्यावेळी चिमट्यात वीज देखील नव्हती. अंधार हा चिमट्याच्या परिसराचा एक सोबतीच होता. जंगलात राहणाऱ्याला अंधाराचे भय ते कसले ? अशीच आमची सर्वांची स्थिती होती. परिणामी चिमट्यात लहानाचा मोठा झालेला प्रत्येक जण जीवनात धाडसी बनला. अंधार भेदून पुढे जाण्याचे साहस त्याच्यात बालपणीच निर्माण झाले. जंगलातील ही एक पर्णकुटीच होती, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. चिमट्यात प्रत्येकावर झालेले संस्कार हे गुरुकुलातील संस्काराप्रमाणे होते. या संस्कारांच्या जोरावरच चिमट्यात लहानाचा मोठा झालेला प्रत्येक जण आज सुस्थितीत आणि समाधानी आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.