पळसंबे येथील अखंड पाषाणात कोरलेली रामलिंग लेणी/पांडवकालीन लेणी म्हणजे कुठल्याही शब्दात न मांडता येणारी दिव्य अनुभूती…
दुर्गकन्या गिता खुळे
गगनबावडा म्हणजे निसर्गदत्त सौंदर्याचं माहेरघर. एकीकडे मन उत्स्फुर्त करून टाकणारा रौद्र सह्याद्री आणि दुसरीकडे अंतर्मुख करून टाकणाऱ्या या लेण्यातील शांतता. सगळंच भिन्न तरी, मनाला भिडणारं. कोल्हापूर शहरापासून ४२ किलोमीटरवर तसेच गगनबावडा मार्गावर पळसंबे हे गाव आहे. या गावापासुन दक्षिणेकडे तीन किलोमीटर अंतरावर असणार हे ठिकाण.
छायाचित्रे – http://instagram.com/durg_kanya
लाल मातीच्या वाटा न तिला जोडुन उतरण्यासाठी केलेल्या पायऱ्या, गर्द झाडांची सावली आणि अस्ताव्यस्त वाढलेल्या वेली जणु वेटोळे घालुन बसलेले भुजंग, सगळीकडे पाय घट्ट रोवून बसलेला जांभा दगड, आणि आपल्या आवाजाने आपलं अस्तित्व दाखवत जंगलातून वाहत येणारा खळाळता ओढा.
समोर लक्ष वेधून घेणारं एकपाषाणी मंदिर. एका बाजूला किंचित कलल्यासारखं जांभ्या दगडात कोरलेल. मंदिराच्या गर्भगृहात कुठलीच मूर्ती नाही त्यामुळे येथे ध्यान धारणा केली जात असावी असा अंदाज आहे.
ओढ्याच्या पलिकडे झाडीत लपलेले आणखीन एक आयाताकृती पाषाणी मंदिर आहे. यात एका बाजूला गणपती बाप्पाची मूर्ती आहे. या मंदिराच्या मागच्या बाजुला गुहेकडे जाणारी वाट असून, गुहेत असणाऱ्या प्रकाशाच्या अभावामुळे कृत्रिम प्रकाशाची साथ आपल्याला घ्यावी लागते. इथे आत शिवपिंड असून वरून पडणाऱ्या झऱ्यामुळे इथे शिवाभिषेक सुरू असल्याचा भास होतो.
अभ्यासकांच्या मते सहाव्या शतकात ही लेणी कोरली असावीत. इथे असणारी झाडी, वाहणार निखळ पाणी. इथला निसर्ग तुम्हाला त्यांच्याशी सामावून घेतो. इथल्या वातावरणात गुढ आहे, शांतता आहे आणि आपल्या स्पंदनाशी जोडली जाणारी जवळीकता ही आणि ती अनुभवण्यासाठी तिथं एकदा जायला हवं…
लेणी आणि गगनबावडा व्हिडिओ…
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.