September 8, 2024
vishwas-patil-comment-on-mahasmrat-rankhaindal-novel
Home » रणखैंदळमध्ये काळीज गोठवणारा अनुभव
गप्पा-टप्पा

रणखैंदळमध्ये काळीज गोठवणारा अनुभव

शिवरायांचे मृत्यूच्या जबड्यातून बाहेर पडून, डोक्यावर कोसळता आषाढ घेत भरारी मारणे. पन्हाळगड ते विशाळगड असे सुमारे 60 किलोमीटरचे अंतर अवघ्या 18 तासात गाठणे. तेही काटेरी अशा भयाण जंगलातून जिथे सोबतीला ना घोडा न पालखी !

विश्वास पाटील

सिद्धी जोहारच्या वेढ्यातली शिवरायांची पन्हाळ्यावरची ती 133 वी रात्र होती. गडाभोवती सुडाने पेटलेल्या दुश्मनाच्या सुमारे 30 हजार फौजेचा वेढा पडला होता. तेथून खाली येणारी प्रत्येक वाट सोडाच, पण गडावरून खाली वाहणाऱ्या प्रत्येक ओढ्याकाठी दुश्मनांचे गस्तीचे फौजी अहोरात्र पहारा देत खडे होते. अशा परिस्थितीत राजांनी ओढ्याच्या वाहत्या प्रचंड प्रवाहातून सुद्धा सुटकेचा उमाळा कसा शोधला हे आपण मुळातूनच वाचायला हवे.

तेव्हा मरणाच्या मांडीवरून आगेकूच करण्यापूर्वी राजांनी पन्हाळ्यावरच्या शेवटच्या बैठकीत आपल्या बहाद्दर मावळ्यांना मोठ्या खात्रीने सांगितले होते, आम्ही अशा भयानक मार्गाने शत्रूला गुंगारा देऊन येथून बाहेर पडतो आहोत की, आम्ही नेमके कोणत्या दिशेला गेलो हे कळायला सुद्धा वैऱ्याला किमान पाच ते सहा दिवस लागतील. येथून ह्या अचाट जंगलातून पांढरपण्याकडे सरकणाऱ्या फक्त सात रानवाटा आहेत, त्या माहीत आहेत या जंगलातून फिरणाऱ्या शिकाऱ्यांना, गुराख्यांना आणि कष्टकऱ्यांना.

दुश्मनांचे घोडं इकडे सरकुच शकत नाही. उद्या सकाळी दिवस उजाडता उजाडता आपण घोडखिंडी जवळ – पांढऱ्या पाण्या जवळ पोहोचताना आमची भरारी कळेल ती फक्त उगवत्या सूर्यकिरणांना. मात्र त्या दरम्यान यदाकदाचीत घोडखिंडीजवळ जर दुश्मन पोहोचण्यात कामयाब झाला, तर मात्र इथे बैठकीत उपस्थित असलेल्या आपल्यातल्या कोणाकडून तरी दगाफटका झाला आहे हे निश्चित समजावे ! “

हिंदवी स्वराज्यासाठी शिवा काशीद आणि इस्लामी सिद्धी वाहवाह अशा हुतात्म्यांनी मरणाला मिठ्या मारल्या तरी कशा ? रानपाखरासारखी राजांनी भरारी घेतली तरी कशी ? घोडखिंडीजवळ राजांच्या पाठोपाठ उजाडतानाच दुश्मन पोहोचला कसा आणि कोणामुळे ? नेमकी राजांशी दगाफटका केला कोणी ? बाजी, फुलाजी, रायाजी बांदल आणि प्रसिद्ध धनाजी जाधव यांचे पिताजी शंभूजी जाधव याशिवाय राजांच्या सोबत त्या भयानक रात्री आणखी कोण कोण होते ? जंगलातून एखाद्या हरणीच्या पावलासारखी धावणारी ८० वर्षाची काटक म्हातारी गवळ्याची गुणामावशी कोण होती ?

गेली अनेक वर्ष पन्हाळा ते विशाळगड या वाटेवरून आषाढाच्या पावसात त्याच तिथीला घनदाट अरण्यातून व चिखलवाटातून मी स्वतः चिंब भिजत प्रवास करतो आहे. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरून पुढे नेणारा महाराष्ट्रात असा विलक्षण ट्रेक दुसरा कोणता नाही. पन्हाळा सोडल्यावर एखाद्या विमानाच्या सपाट धावपट्टीसारखे लागते ते मसाई पठार. थोडेथोडके नव्हे सलग अठरा-एकोणीस किलोमीटर लांब. ते उतरता उतरता लागती कुंवारखांबीची खिंड. लोककथेनुसार कोण्या काळी एका कुमारीकेचे लग्नाचे अक्के वऱ्हाड इथे गुडूप झाले होते. त्यामुळे आजही तिथल्या पहाडाला मानवी आकृत्यांसारखा आकार आलेला दिसतो.

त्यानंतर हिरव्या गवतांची कुरणे आणि लुसलुशीत भातखाचरे पार करत दुसऱ्या दिवशी लागतात ती भिन्न प्रकृतीची अशी तीन भयाण जंगले..तेव्हा मराठ्यांचा हा राजराजेश्वर दहा तासाचा उपाशी होता. म्हणून इथेच ह्या जंगलपट्ट्यातल्या माताभगिनी आपल्या बुट्टीतल्या नाचणीच्या भाकरी आणि चटणीकांदा घेऊन धावल्या होत्या.

अगदी आज सुद्धा या मूळ वाटेने मोकळा घोडाही चालू शकत नाही. त्यामुळे पालखी घेऊन जाण्याचा प्रश्नच नव्हता. डोईला टापर बांधून शेतकऱ्याच्या वेषामध्ये बाहेर पडलेल्या राजांनी मैलोन मैल चिखल तुडवत काट्यासराट्यातून पायी प्रवास केला होता. पालखी वापरायला दिली होती ती फक्त शिवा काशिदाना. राजा बाहेर पडल्याचे ते धूळनाट्य रंगवण्यासाठी.

जगाच्या इतिहासामध्ये ग्रेट एस्केप Great Escape म्हणून अनेक घटना गाजल्या असतील. पण राजांची ही भरारी खूपच अपूर्व अशी होती. त्या भयाण वाटेवरचे ते सारे पुरातन साक्षीदार अजूनही शाबूत आहेत. मैलोन मैल पसरलेले ते सुमारे १८ किलोमीटर मसाईचे पठार. ती कुवारखांबीची खिंड, त्या भयानक खोलगट दऱ्या. शिवरायांच्या ह्या अपूर्व व अलौकिक साहसाची कहाणी इथल्या रानातल्या पुढच्या पिढ्यांनी, इथल्या झऱ्याने, भिरभिरत्या वाऱ्याने मला अनेकदा ऐकवली आहे.

तोच काळीज गोठवणारा अनुभव मी माझ्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे, माझ्या “महासम्राट” कादंबरीच्या “रणखैंदळ” या दुसऱ्या खंडातील संबंधित प्रकरण जरूर वाचा.

रणखैंदळ खरेदी करण्यासाठी करा लिंकवर क्लिक – https://amzn.to/4bIvDWw

विश्वास पाटील


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

माझ्या जगण्याचे पुस्तक – प्रांजळ आत्मकथन

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे पुरस्कार जाहीर

महापुर नियंत्रणासाठी पारंपारिक अभ्यास अन् शास्रीय उपाय

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading