बा. स.जठार, गारगोटी (वाघापूरकर) यांच्या भाकरीची शपथ या कथासंग्रहाला मिळाला तिसरा सन्मान.
सातारा : येथील ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये अँड.राज कुलकर्णी (उस्मानाबाद ), डॉ. प्रा. राजेंद्र खैरनार (पुणे), बा. स. जठार ( गारगोटी ) यांच्या साहित्यकृतींचा समावेश आहे.
सातारा येथील ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयातर्फे दरवर्षी दोन ग्रंथाना ‘ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण’ आणि ‘सौ सुमन चव्हाण’ उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार देण्यात येतात. यंदा जानेवारी 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत प्रकाशित झालेल्या साहित्यकृतींचा सन्मान करण्यात आला आहे.
प्रसिध्द वक्ते, लेखक अँड. राज कुलकर्णी (उस्मानाबाद ) यांच्या ” दक्षिणेची मथुरा तेर ” या पुस्तकाला ‘ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण’ उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार तर डॉ. प्रा. राजेंद्र खैरनार (पुणे) यांच्या ” त्रिकोणातील बिंदू ” या कथासंग्रहाला ‘ सौ सुमन चव्हाण ‘ उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार देण्यात आला आहे. प्रत्येकी 2500 रुपये रोख, शाल, सन्मानचिन्ह असे या उकृष्ट ग्रंथ पुरस्काराचे स्वरुप आहे. तसेच बा. स. जठार ( गारगोटी ) यांच्या ” भाकरीची शपथ ” या कथासंग्रहाला विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे. या उत्तेजनार्थ पुरस्काराचे स्वरुप 1000 रुपये रोख रक्कम, शाल, सन्मानचिन्ह असे आहे.
19 फेब्रुवारी 2021 रोजी या पुरस्काराचे वितरण सातारा येथे करण्यात येईल. अशी माहिती ग्रंथमित्र डॉ. शिवाजीराव चव्हाण ग्रंथालयाच्यावतीने देण्यात आली आहे.
गावरान खेळांचा लिखीत प्रवास म्हणजे – भाकरीची शपथ
'भाकरीची शपथ
‘ या शिर्षकाची कथा ही ग्रामीण भागातील लोकांच्या शोषणाचे प्रतिक ठरते. जुन्या रिती, परंपरांना चिकटून स्वतःचा घात करून घेणारी माणसं चित्रित करणारी ‘कागावळ’ ही कथा वाचकाची उत्कंठा वाढवत त्याला वाचनात खिळवत ठेवते.
‘गोमच्याळ’ कथेतून माणसाच्या संधीसाधू वृतीवर प्रकाश टाकण्याचा लेखकाचा प्रयत्न यशस्वी झाल्याचे दिसून येते. समज गैरसमजातून रक्ताच्या नात्यातील वैरभाव व्यक्त करणारी ‘डूक’ कथा बरेच काही सांगून जाते. ‘मोडा’ ही कथा तर हपापलेल्या मानवी वृतीचा अविष्कारच म्हणावा लागेल. सारं आयुष्य मुलांच्यासाठी खर्ची घालायचं आणि शेवटी एकलकोंड्या जीवनाला मिठ्ठी मारायची.
जगणं अनुभवताना शरीराचं मोलही कसं फिकं पडतं याचं दुःखद चित्रण ‘इच्छामरण’ या कथेत अनुभवायला येते. स्वतःच्या डोक्याचा वापर न करता दुस-याच्या डोक्याने चालणारी माणसं स्वतःसाठी खड्डा खणताना दिसतात. अशा अवस्थेत पाप पुण्याची भाषा करणारं मन कचखाऊ वृतीचे बनते याचा लेखाजोखा पापमुक्त पावती या कथेत अनुभवायला मिळतो.
विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माणूस आत्मकेंद्री बनत चालला आहे. त्याचा भविष्यकाळ ‘माणसं मिळवा’ या कथेतून लेखकाने चित्रित केलेला आहे. त्यावर प्रत्येकाने विचार करावाच लागेल असे लेखकाला यातून सुचित करायचे आहे. ‘साटंलोटं’ ही कथा तर माणसाची रंगेल वृती उलगडणारी कथा आहे. शेरास सव्वाशेर वृत्तीची माणसं या कथेत भेटतात.
‘कातोर’ कथा तर ग्रामीण जीवनाच वास्तव चित्रण करते. कातरातील काणग्याप्रमाणे मानवी जीवन कसे खिळखीळं होतं हे कथा वाचताना सहजपणे समजत जाते. ‘चांडाळचौकडी’ या कथेत समाजाच्या नजरेतून उतरलेल्या मानवी वृतीला पुन्हा मानाचे स्थान मिळवण्यासाठी कराव्या लागणा-या आटापिटा सुंदरपणे रेखाटल्या आहेत. अडाणी, अशिक्षित आई सुशिक्षित आणि जबाबदार मुलानं कसं वागले पाहिजे याचा उत्तम नमुना म्हणजे ‘सरसू” कथा होय. सासू सून हा संघर्ष काही नवीन नाही. यात कोण वरचढ होतेय याची जणू ती शर्यतच ठरते.
ग्रामीण भागात गरजेपुरत्या वापरल्या जाणा-या पोतीऱ्याच्या समर्पक वापराने ‘पोतिरा’ ही कथा मानवी मनाचा ठाव घेते. ‘डबरा’ या कथेत इच्छित साध्य करण्याची माणसाची चाललेली धडपड यथायोग्य शब्दात मांडलेली आहे. साध्या सोप्या गावरान शब्दांची मांडणी, अनुकरणाचा अभाव, सहजता, सूक्ष्मता या सर्वांमुळे या कथा -हदयाला भिडतात.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
1 comment
अथर्व प्रकाशन मराठी राज्यातील सर्वस्पर्शी साहित्य वाग्मय चळवळीचे नवपर्व आहे.हा मराठीचा गर्व आहे. सदैव अप्रतिम साहित्य निर्मितीचा खळाळता झरा वहाता रहावा …….प्रमोद लांडगे…सोलापूर..413 003. शुभेच्छा…..🔥🌻💐🌺🏵💡✏✒📚 ….