December 1, 2023
Home » कृष्णात खोत यांच्या रिंगाण कादंबरीस साने गुरुजी पुरस्कार
काय चाललयं अवतीभवती

कृष्णात खोत यांच्या रिंगाण कादंबरीस साने गुरुजी पुरस्कार

साने गुरूजी साहित्य पुरस्कार कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीस जाहीर झाला आहे. 25 हजार रोख, मानपत्र व शाल-श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

गडहिंग्लज येथील पालिकेच्या पूज्य साने गुरूजी सार्वजनिक मोफत वाचनालयातर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी केली. यामध्ये साने गुरूजी साहित्य पुरस्कार कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीस जाहीर झाला आहे. तर डॉ. नरेंद्र दाभोलकर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार हेरवाड (ता. शिरोळ) येथील बाबासाहेब नदाफ यांना जाहीर झाला.

नदाफ व खोत यांना प्रत्येकी 25 हजार रोख, मानपत्र व शाल-श्रीफळ, तर पाटील यांना रोख 5 हजार, मानपत्र व शाल-श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पालिका शिक्षण मंडळाच्या काळूमास्तर विद्यालयातील शिक्षिका पुष्पा पाटील यांना साने गुरूजी आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. दरवर्षी पूज्य साने गुरूजींच्या जयंतीदिनी या पुरस्कारांचे वितरण केले जाते. यावेळी वाचनालय समिती सभापती शशिकला पाटील, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, ग्रंथपाल काकासाहेब भुईंबर आदी उपस्थित होते.

या पुरस्काराने निश्चितच मला आनंद झाला. रिंगाणमध्ये विस्थापतांचे जगणं आहे. सगळ्याच बाबतीत आपण विस्थापित आहोत. विस्थापन हे केवळ भाैतिकदृष्टिने होत नाही तर मानसिकदृष्ट्या सुद्धा विस्थापन होत असते. विस्थापन हे अनेक पातळीवर चालते. त्यातून आपणाला परत निसर्गाकडे जावे लागेल आणि जर आपण याकडे दुर्लक्ष करत गेलो तर पुढच्याकाळात भयावह संकटांचा सामना आपणाला करावा लागणार आहे. हे मानवाने लक्षात घेतले पाहिजे. मानव पुन्हा निसर्गाकडे जाईल आणि निसर्गाचा एक भाग म्हणून जगायला लागला तरच हे रिंगाण व्यवस्थित चालेल.
– कृष्णात खोत

बागवान, किणी आदर्श वाचक
नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी. वाचन संस्कृतीला बळ मिळावे. या हेतुने वाचनालयातर्फे दरवर्षी दोन आदर्श वाचकांचा पुरस्काराने गौरव केला जातो. यावर्षी व्यंकटेश किणी (गिजवणे, ता. गडहिंग्लज) आणि मंजूरअहमद बागवान (उत्तूर, ता. आजरा) यांना कै. भिकाजीराव मोहिते आदर्श वाचकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. मानपत्र व शाल-श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 

“”नगरपालिकेच्या साने गुरूजी वाचनालयातर्फे 1978 पासून लोकशिक्षण व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी 18 ते 24 डिसेंबर या कालावधीत हा उपक्रम होतो. यावर्षी कोरोना संसर्गामुळे पहिल्यांदाच व्याख्यानमाला खंडीत करण्याची वेळ आली आहे. दरम्यान, 2007 पासून साने गुरूजी साहित्य, आदर्श शिक्षक आणि कै. भिकाजीराव मोहिते आदर्श वाचक पुरस्कार तर 2014 पासून सामाजिक चळवळीत काम करणाऱ्यांचा डॉ. दाभोलकर सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने गौरव केला जातो.”

– स्वाती कोरी, नगराध्यक्ष, गडहिंग्लज पालिका

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More