सौंदर्य सुद्धा टिकून राहात नाही. तारुण्यातले सौंदर्य म्हातारपणापर्यंत तसेच टिकून राहात नाही. यासाठी या सौंदर्याचा गर्व असणेही योग्य नाही. जे टिकत नाही ते टिकवून ठेवण्यात सध्या माणसाची खटपट सुरू आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६
या देहाची हे दशा । आणि आत्मा तो एथ ऐसा ।
पैं नित्य सिद्ध आपैसा । अनादिपणें ।।११०६।। ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा
ओवीचा अर्थ – या देहाची अशी अवस्था आहे आणि आत्मा तर असा आहे की अनादिपणामुळे तो आत्मा स्वभावता नित्य व सिद्ध आहे.
देहात आत्मा आला आहे, पण तो देहापासून अलिप्त आहे. देह हा पंचमहाभूतापासून बनलेला आहे. यामुळे तो क्षणात नाशही पावणारा आहे. मृत्यूनंतर देहाला अग्नी दिला तर त्याची राख होते आणि उघड्यावर पडला तर तो सडून जाईल किंवा कुत्री, मांजरे, गिधाडे यांचे भक्ष्य होईल. किड्यांचा ढीगही साचेल इतकी वाईट अवस्था या देहाची आहे. यासाठी या देहाचा मोह नको.
सौंदर्य सुद्धा टिकून राहात नाही. तारुण्यातले सौंदर्य म्हातारपणापर्यंत तसेच टिकून राहात नाही. यासाठी या सौंदर्याचा गर्व असणेही योग्य नाही. जे टिकत नाही ते टिकवून ठेवण्यात सध्या माणसाची खटपट सुरू आहे. सौंदर्यप्रसाधनावर किती मोठा खर्च होतो, हे सांगण्याची मला गरज वाटत नाही. साबणाच्याच किती जाहिराती दूरदर्शनवर झळकतात ! अमूक एक साबण वापरला तर तुमचा चेहरा अधिक उजळेल. तजेलदार होईल, अशा या जाहिरातींचा प्रचार सुरू असतो. साबणाचा वापर शरीरावरील कीटक, घाण घालवण्यासाठी होतो, ही सांगणारी अपवादाने एखादीच जाहिरात असते. अशा साबणाला मागणीही तितकी कमी असते. खरे तर साबणाचा वापर हा स्वच्छतेसाठी केला जातो. त्याने सौंदर्य क्षणिकच वाढवले जाते, पण आपण त्याच्याकडेच आकर्षित होतो.
क्षणिक सुखाच्या मागे माणसे धावत आहेत. देहाचा मोह त्यांना असतो. अशा या देहाचा नाश व्हायला क्षणही लागत नाही, पण या देहात आलेला आत्मा हा अमर आहे. त्याचा नाश होत नाही. त्याला देहाप्रमाणे आकार नाही. त्याचे देहाप्रमाणे प्रकारही नाहीत. काळा, गोरा असा भेदभाव त्यामध्ये नाही. देहात आल्यामुळे तो युक्त नाही, पण तो बद्धही नाही. सृष्टीच्या निर्मितीमुळे तो तयार झाला, असेही नाही किंवा सृष्टीचा विनाश झाला तर तो नाश पावणाराही नाही. त्याचे मोजमापही करता येत नाही. इतका मोठा, इतका लहान, असे वर्णनही करता येत नाही. देहाच्या ठिकाणी असून तो देहापासून अलिप्त आहे. अशा या आत्म्याला ओळखणे म्हणजेच आत्मज्ञानी होणे.
क्षणिक सुखाच्या मागे न धावता, खरे सुख कशात आहे. हे सत्य जाणून घेऊन खऱ्या सुखासाठी वेळ द्यायला हवा. खरे सुख नित्य समाधानी ठेवते. कारण ते सत्य असते. शाश्वत असते. अशा शाश्वत सुखात मन गुंतवून त्याची अनुभुती घेणे गरजेचे आहे. अनुभुतीतूनच मग आपोआप आत्मज्ञानाची प्राप्ती होते. पण यासाठी अवधान हे महत्त्वाचे असते. आत्मस्वरुपाच्या ठिकाणी आपले अवधान असणे. ही अनुभुतीतच आपणास ब्रह्मसंपन्न करते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.