विद्या विनयाने शोभते. विद्वत्ता आहे, पण विनय नसेल तर त्या विद्वतेचा उपयोग नाही. वारकरी यासाठीच श्रेष्ठ आहे. तो त्याच्या विद्वत्तेचे प्रदर्शन कधी मांडत नाही. आपणाला मिळालेले हे तत्त्वज्ञान हे गुरुकृपेमुळे आहे याची जाणीव त्याला असते. ज्ञानेश्वरांकडून मिळालेला हा प्रसाद आहे असे समजून तो स्वतः बरोबरच तो इतरांनाही हा ज्ञानाचा प्रसाद वाटून तृप्त करत असतो.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
शेवंतीये अरसिकांही । आंग पाहतां विशेषु तरी नाही ।
परी सौरभ्य नेलें तिहीं । भ्रमरी जाणिजें ।। ५९४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा
ओवीचा अर्थ – अरसिकांनी शेवंतीच्या झाडाकडे पाहिले तर त्यात त्यांना काही विशेष महत्त्व दिसत नाही, परंतु त्याच झाडास आलेल्या फुलांतील सुगंधावर नजर ठेवून, जे भ्रमर त्यातील पराग घेऊन जातात, तेच त्यातील सार जाणतात.
अनेक असामान्य व्यक्तींचे राहाणीमान सर्वसामान्य असते. साधी राहाणी आणि उच्च विचार त्यांच्याजवळ असतो. वरवर पाहीले तर इतके मोठे व्यक्तीमत्व त्यांच्यात दडलेले आहे याची जाणीव होत नाही. पण त्यांच्यातील विचारांनी ते उच्च असतात. वारकरी हे सर्वसामान्य वाटतात पण त्यांच्याजवळ असणारे विचारांचे, ज्ञानाचे भांडार विद्वान पंडीतांनाही लाजवेल असे असते. हे वरवर पाहाता जाणवत नाही. पण वारकऱ्यांच्या सहवासात जेव्हा आपण जाऊ तेव्हा याचा अनुभव जरूर येतो. अडाणी, अशिक्षित वाटणारे वारकरी विद्वांनाच्यापेक्षाही उच्च दर्जाचे व्याख्यान देऊ शकतात. हे अनुभवानंतरच, त्यांच्या सहवासात गेल्यानंतरच समजू शकते.
विद्या विनयाने शोभते. विद्वत्ता आहे, पण विनय नसेल तर त्या विद्वतेचा उपयोग नाही. वारकरी यासाठीच श्रेष्ठ आहे. तो त्याच्या विद्वत्तेचे प्रदर्शन कधी मांडत नाही. आपणाला मिळालेले हे तत्त्वज्ञान हे गुरुकृपेमुळे आहे याची जाणीव त्याला असते. ज्ञानेश्वरांकडून मिळालेला हा प्रसाद आहे असे समजून तो स्वतः बरोबरच तो इतरांनाही हा ज्ञानाचा प्रसाद वाटून तृप्त करत असतो. इतरांच्या तृप्तीमध्येच तो स्वतःची तृप्ती पाहात असतो. पण आजकालचे विद्वान प्रवचनकार अशा विचाऱ्याचे असतीलच असे नाही. प्रवचनाचे दर ठरलेले असतात. जसा दर मिळेल त्या दर्जाचे प्रवचन ते देत असतात. ज्ञान पैशाने मोजतात. मग खरा परमसेवक कोण ? वारकरी की विद्वान प्रवचनकार. साध्याभोळ्या वारकऱ्याकडे असणारे अध्यात्माचे ज्ञान हे विद्वान प्रवचनकारापेक्षा उच्च कोटींनी श्रेष्ठ असते कारण ते त्याच्या अनुभुतीतून, अनुभवातून आलेले असते. वरवर साध्या दिसणाऱ्या वारकऱ्याच्या ज्ञानास आत्मज्ञानाचा गंध असतो.
पूर्वीच्याकाळी स्त्रियांचे शिक्षण शुन्य होते. पण त्याच्याकडे ज्ञानाचे भांडार असायचे. आजीचा बटवा म्हणजे ज्ञानाची पोथीच असायची. हे इतके ज्ञान तिच्याकडे आले कोठूण ? वरवर साधी दिसणारी आजी तिच्या अनुभवातून उच्च कोटीचे ज्ञान इतरांना देत असायची. बाळंतपण करणारी सुईन साधीच असायची. पण तिच्या हाताच्या कौशल्याने ती सर्वांना परिचयाची असायची. दिसायला ती सर्वसामान्य वाटत असली तरी तिचे कर्तृत्व असामान्य असेच होते.
अशा या असामान्य व्यक्तिमत्वांचा परिचय हा त्यांच्याकडे असलेल्या ज्ञानाच्या अनुभवातूनच होत असतो. सर्वच व्यवहार हे पैशात मोजता येत नसतात. माणूसकी ही बाजारात विकत मिळत नाही. तर ती आपल्यामध्ये अंगभूत असायला हवी. अनुभवातून तिचे दर्शन व्हायला हवे. हा अनुभव ज्यांना होतो तेच त्यावर बोलू शकतात. ज्यांना या अनुभवाची अनुभूती येत नाही ते त्या व्यक्तिमत्वाला कधीच ओळखू शकत नाहीत. त्यांच्यादृष्टीला ते सर्वसामान्यच वाटतात.
राजा हा त्याच्या वेशभुषेवरून ठरत नसतो. त्याच्या कर्तृत्त्वावरून तो राजा ठरत असतो. त्याच्यातील अंगभूत गुणांचे दर्शन ज्याला होते तो त्याला राजाच मानतो. संत हे सर्वसामान्यासारखेच वागतात. पण ते त्याच्याकडील ज्ञानाने असामान्य असतात. मावळे हे त्यांच्या वेशभूषेवरून, दिसण्यावरून ठरवले गेले नाहीत तर त्यांच्यात असणाऱ्या असामान्य कर्तृत्त्वावरून ठरले गेले. त्यांनी केलेल्या महान कार्यातून ते मावळे झाले. सर्वसामान्यासोबत सर्वसामान्यासारखा वावरणारा राजा इतरांच्यात त्याच्या गुणांनी ओळखता येतो. त्याच्या व्यक्तीमत्त्वातील सुगंधाने त्याची ओळख होत असते. ही ओळख ज्याला होते तोच त्यांना मानतो. अन्यथा ते इतरासारखेच सामान्य वाटतात. फुल किती सुंदर आहे यावर त्या फुलाचे महत्त्व भुंगा ठरवत नाही तर त्याच्यात असणाऱ्या अप्रतिम सुगंधी द्रव्यावर तो ठरवतो. अनुभवातूनच ज्ञानेश्वरीचे खरे सार समजू शकते. यासाठी पदाची, विद्वत्तेची गरज नाही.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.