November 21, 2024
eknath-patil-poem-zhanzhavat
Home » झंझावात
कविता

झंझावात

झंझावात 

वडाच्या झाडासारखे खोल खोल 
तितकेच सभोवार खूप विशाल पसरलेली तुम्ही 
कुणीही यावे आणि हक्काने 
निर्धास्त तुमच्या सावलीत विसावावे 
आता तेजस्वी, प्रखर, निर्मळ आणि शुभ्रधवल 
असे खूप काही हरवले आमच्या जगण्यातून 
जणू निसटावे पाणी ओंजळीतून 
आणि नुसते हातच ओले 
तसे काहीसे भांबावलेपण 
आजवर कधी कुणालाच 
तुम्हाला पकडता आले नाही शब्दात 
तुमची आभाळउंची 
कुणी कशी मोजावी कोणत्या निकषात? 
इतक्या वर्षांच्या दीर्घ प्रवासात 
जाणीवपूर्वक नवी वाट मळवलात 
काटेकुटे टोचले असतील 
पाय रक्तबंबाळ झाले असतील 
किती वेदना सहन कराव्या लागल्या असतील 
त्याची कधीही केला नाही फिकीर 
किती सहज जाता आले असते मळलेल्या वाटेने 
सुखवस्तू मार्गाने 
मळलेल्या सोप्या रस्त्याने जाणारे 
आजूबाजूला खूप होते लोक 
गेला असता अशा वाटेने 
तर काट्याकुट्यांचा कधी झाला नसता त्रास 
पाय रक्तबंबाळ झाले नसते 
वेदना सहन कराव्या लागल्या नसत्या 
शीणही जाणवला नसता प्रवासाचा 
परंतु मळलेल्या वाटेने जाणाऱ्यांना 
जिकडे नेईल ती वाट तिकडेच जावे लागते 
जिकडे जायचे असेल चालणाऱ्याला 
तिकडे ती जात नसते 
कुठे जायचे... 
तुम्हाला पक्के होते ठाऊक 
तिथेच पोहोचण्यासाठी मग 
खाचखळग्यातून, वळणावळणातून, डोंगरदऱ्यातून 
चढउतारातून नवी वाट मळवलात तुम्ही 
अहोरात्र उपसलात कष्ट 
आणि आजच्या आत्मकेंद्री पिढीला 
आता पटेल का 
तुमच्या संघर्षाची ही गोष्ट...
पायाखाली घातलात दऱ्याखोऱ्या - कडेकपाऱ्या 
आणि तुडवलात उजाड माळरानं 
थकला नाहीत 
की, अजिबात दमला नाहीत 
चालत राहिलात अथक 
सहन केलात ऊनपाऊसथंडीवारा 
सहन केलात काटेकुटे 
सहन केलात ठेचा 
रक्तबंबाळ झाले पाय 
खोलवर जखमा झाल्या पायांना 
आयुष्यावर उमटले अशा जखमांचे ठसे 
असे ठसे अभिमानाने मिरवलात 
आणि शोषितांच्या लढाईतून 
लढणारा नवा माणूस 
नवा समाज - नवं जग घडवलात 
आणि सारे रस्तेच उखडले जाण्याच्या 
संभ्रमाच्या या सैरभैर काळात 
आता खूप खूप दूरवर जाऊन उभारलात...
तुम्ही गेलात
आणि आकाश काळवंडले 
पाना फुलांचे रंग उडाले 
एक उदास कळा पसरली आहे गावशिवारात
आणि लोक विसरुच शकत नाहीत तुमचा झंझावात 
तुमच्या जाण्याने 
खूप काही एकाएकी वजा झाले आमच्या आयुष्यातून 
जे भरून निघणे अशक्य आहे आता कशातून... 
वैचारिक दुष्काळाच्या या कठीण काळात 
कार्यकर्त्यांना बजावून सांगत होता तुम्ही,
'जोपर्यंत चळवळीची हत्यारं बोथट झाली नाहीत 
तोपर्यंत नामोहरम होण्याचे कारण नाही 
संख्येनं नेहमीच आपण कमी असू 
म्हणून हताश होऊ नका बसू 
खचून तर अजिबात जाऊ नका 
तत्त्वनिष्ठेचं बीज प्राणपणाने जतन करा 
कधीतरी आभाळ येईलच भरून 
आणि जेव्हा पाऊस जाईल पडून 
जमिनीला वाफसा येईल 
तेव्हा बी पेरायला विसरु नका 
कष्टकऱ्यांची कधीही संपत नसते लढाई.'
लोकचळवळींच्या यशाचे शास्त्र आणि शस्त्रं 
कृती आणि युक्तीतून करीत आलात विकसित 
शोषक शक्तींचा आज वाढला आहे जोर 
सामान्य माणसांच्या जीवाला घोर 
जात आणि धर्माच्या लोक उभे आहेत जाळात 
अशा कठीण काळात 
लोकांसाठी तुमचे दीपस्तंभासारखे कार्य 
तुमच्या माघारी आता तर ते खूपच अनिवार्य 
संभ्रम, संशय आणि 
अस्वस्थतेच्या या महाकठीण काळात 
दीपस्तंभासारखे आमच्या समोरच असाल तुम्ही 
तुमच्याच उजेडात वावरू 
आणि पडत्या काळाला सावरु 
आमच्यासाठी संघर्षाचे पर्यायी नाव : एनडी
खाचखळग्यांची, काट्याकुट्यांची तुमची खडतर वाट 
किती अवघड चढणीचे हे जीवघेणे घाट 
समोर दात विचकून उभा हा घनदाट काळोख 
दिसत तर काहीच नाही 
संभ्रमाचा सैरभैर भोवताल 
आणि वाट तर शोधायची आहे 
कष्टकऱ्यांच्या राज्याप्रत पोहोचायचे आहे 
आता उठवू सारे रान...
मग, तुम्ही दिलेला उजेड घेऊनच चालावे लागेल 
संकटांना तोंड देण्याची तयारी ठेवावी लागेल 
आम्ही ती तयारी ठेऊ 
एकमेकांचे हात हातात घेऊ 
ठामपणे पाय रोवून उभे राहू 
तुम्ही दाखवलेल्या वाटेवरुनच चालत राहू 
लढत राहू - लढत राहू 
संकटांचे डोंगर अथकपणे चढत राहू 
अगदी अथकपणे चढत राहू 
समतेचे निशाण हाती घेऊ 
माणुसकीचे गीत गाऊ 
या काळ्याकभिन्न काळोखातही उजेडाचे दीप लावू ...


कवी - एकनाथ पाटील 
इस्लामपूर 
( 'आरपार झुंजार' या आगामी दीर्घकवितासंग्रहातील 
निवडक अंश.) 
पूर्वप्रसिध्दी : 
अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका, फेब्रुवारी - मार्च २०२२

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading