November 21, 2024
Home » ठिबकनंतर आता कारभारवाडी सेंद्रिय शेतीकडे…
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

ठिबकनंतर आता कारभारवाडी सेंद्रिय शेतीकडे…

जैसें मूळसिंचनें सहजें । शाखापल्लव संतोषती ।।

श्री ज्ञानेश्‍वरीतील पहिल्या अध्यायातील ही ओंवी असे सांगते की झाडांच्या मुळांना पाणी घातले असता अनायासें फांद्या व पाने यांना टवटवी येते. हाच विचार कोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी येथील शेतकऱ्यांनी जोपासला आहे. संपूर्ण गावावे ठिबक सिंचनला एकमुखाने साथ देली. आता कारभारवाडी ठिबकनंतर सेंद्रीय शेतीकडे वळली आहे.  कसा केला आहे गावाने विकास ? याबद्दल सविस्तर

राजेंद्र घोरपडे, मोबाईल 9011087406

कोल्हापूर जिल्हा शेतीच्या बाबतीतीत सधन मानला जातो. याचे मुख्य कारण म्हणजे या जिल्ह्यात सर्वत्र बाराही महिने पाण्याची उपलब्धता असते.  जिल्ह्याच्या पश्चिम भागात नदीच्या उगमस्थानी मोठाली धरणे आहेत. तर जिल्ह्यात लघु प्रकल्पांचीही संख्या अधिक आहे. पावसाचे पाणी साठवूण ठेऊन उन्हाळ्यात टंचाई भासणार नाही याचे नियोजन केले जाते. पाणी मुबलक असले की त्याचा कसाही वापर होतो. पण आता पाण्याच्या योग्य वापराच्या नियोजनातही हा जिल्हा आघाडी घेण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत आहे. यातूनच जिल्ह्यातील कारभारवाडी हे संपूर्ण गाव ठिबक सिंचनाखाली आणले. यातून गावातील अल्पभूधारकापासून मोठ्या बागायतारापर्यंत सर्वांनाच याचा लाभ झाला आहे. गावातील ऐक्याने हे साध्य करून दाखवले आहे. गेल्या एक दोन वर्षात या गावातील पिकपध्दतीमध्येही मोठा बदल झाला आहे.  कै. शिवा रामा पाटील सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या माध्यमातून गावातील 102 एकर क्षेत्रावर ठिबक सिंचन केले आहे.  पाणी आणि खताचे व्यवस्थापन राखत गावाने गेल्या काही वर्षात शेतीचे चित्रच पालटवले आहे. केवळ ठिबकमुळे या गावातील पिक पद्धतीतही मोठा बदल झाला आहे.  अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही यामध्ये मोठा लाभ झाला आहे.  पिकांच्या उत्पादनातही मोठी वाढ झाली आहे.

कारभारवाडी (ता. करवीर) या गावाला भोगावतीचे पाणी मुबलक आहे. यातूनच या गावात ऊसाचे क्षेत्र वाढले. पण पाटपाण्याचा अतोनात वापराने  गावातील जमिनीचा पोत बिघडत चालला होता. साहजिकच याचा परिणाम उसाच्या उत्पादनावर झाला. एकरी केवळ २७ ते ३० टन ऊस उत्पादन मिळायचे.

डाॅ. नेताजी पाटील,
चेअरमन, कै. शिवा रामा पाटील सहकारी पाणीपुरवठा संस्था मर्यादित, कारभारवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर

पाण्याच्या अतीवापराने शेतीची स्थिती बिघडत चालल्याचे कृषी विभागाच्या लक्षात आले. त्यांनी  पारंपरिक पद्धती बदलल्याशिवाय शेती फायद्यात येणार नसल्याची बाब स्पष्ट केली. तत्कालिन करवीर तालुका कृषी अधिकारी डी. बी. पाटील, तालुका कृषी अधिकारी हरिदास हावळे, कृषी सहायक सतीश वर्मा यांनी ठिबक सिंचनाचा पर्याय सुचवला. पण गावात हा विचार रुजवणे तितके सोपे नव्हते. हे आव्हान कृषी विभागाने स्वीकारत गावकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले. ठिबक सिंचन केवळ पाणी वाचवण्यासाठी करायचे अशी मानसिकता असलेल्या शेतकऱ्यांना समजवण्यासाठी सांगली जिल्ह्यातील अहिरवाडी आणि गोटखिंडी या गावांना भेट देण्यात आली.

हसूर दुमाला येथील शेतकरी संतोष पाटील यांचा ठिबकचा प्रकल्पाचीही प्रत्यक्ष पाहणी करून ग्रामस्थांना त्यांचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्याशी बोलण्यानंतर, प्रगती पाहिल्यानंतर शेतकऱ्यांना विश्‍वास आला. त्यातून २०१५ मध्ये गावात स्वयंचलित ठिबक सिंचन प्रकल्प उभा राहीला. या प्रकल्पानंतर गावच्या शेतीचे स्वरूपच बदलून गाव अधिक एकसंध झाला आहे. शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनात दुप्पटी, तिपटीने वाढ झाली. ते आंतरपीकही घेऊ लागले. यातून पैसा खेळता राहू लागला.

पाणी व खत व्यवस्थापनातून या परिसरातील शेतीचे चित्रच पालटले आहे. विशेष म्हणजे या योजनेत एक ते पाच गुठा क्षेत्र असणारे 16 अल्पभूधारक शेतकरीही आता उत्पन्न घेऊ लागले आहेत. पट्टा पद्धत, एक डोळा बेणे, रोप लागवड, काटेकोर पाणी व खत व्यवस्थापन अशा नव्या तंत्राकडे शेतकरी वळल्याने केवळ ५५ लाख लिटर पाण्यामध्ये उसाची उत्पादकताही अधिक वाढली आहे.

गट शेतीच्या माध्यमातून आता गावात ग्रीन हाऊस उभारण्याचे काम सुरु आहे.  लवकरच याचे काम पूर्ण होईल. भाजीपाला विक्रीसाठी संघाची निर्मितीही करण्यात येत आहे. गावासाठी कोल्ड स्टोअर व भाजीपाला वाहतूकीसाठी कोल्ड व्हॅनही मंजूर झाली आहे.  म्हणजे गावचा भाजीपाला आता मुंबई, पुणे आदी शहरांमध्येही जाऊ शकणार आहे. भाजीपाला संघासाठी ३५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. एकदोन वर्षात आता हा प्रकल्पही गावात उभा राहील.

– सतिष वर्मा, कृषी सहाय्यक, करवीर तालुका, मोबाईल – 7588185950

कारभारवाडी दृष्टिक्षेपात …

गावाचे भौगोलिक क्षेत्र – ६९ हेक्‍टर

पिकांखालील क्षेत्र – ६२ हेक्‍टर

ठिबक खाली आलेले क्षेत्र – १०२ एकर

ठिबक योजनेत सहभागी शेतकरी – १३१

एक हेक्‍टरपेक्षा कमी क्षेत्र असणारे शेतकरी – १०६

एक ते दोन हेक्‍टर क्षेत्र असणारे शेतकरी – २२

दोन हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्र असणारे शेतकरी – ३

ठिबक सिंचनापूर्वीची स्थिती :

पारंपरिक पद्धतीने ऊस व भाताची लागवड.

तीन फुटाची सरी, आंतरपीक म्हणून फार तर मका.

पाटपाण्याद्वारे नियोजन. अनिश्चित पाणी दिले जाई.

भारनियमनामुळे पाणी नियोजनात अडचणी. वेळी अवेळी पाणी देण्यासाठी शेतावर जावे लागे.

एकाच वेळी अधिक पाणी देण्याची मानसिकता. अतिपाणी वापरामुळे जमिनीची प्रत खालावलेली.

पाटपाण्यामध्ये १५ ते २० एकरासाठी एक ‘टी’ असायची. यामुळे पाटातील तणांचे बी शेतात येऊन तणांचा प्रादुर्भाव वाढत असे. भांगलणीचा खर्च वाढे.

एकरी ऊसउत्पादन केवळ २५ ते ३० टन.

गावात एक ते पाच गुंठे क्षेत्र असणारे १६ शेतकरी आहेत. पूर्वी शेतातून फायदा नसल्याने शेतीविषयी अनास्था वाढली होती. गावात एकसंधपणा राहिला नव्हता.

ठिबक झाल्यानंतरची स्थिती

ऊस लागवडीसाठी पट्टा पद्धतीचा अवलंब. साडेचार फुटाच्या पट्ट्यामध्ये भाजीपाला पिके, झेंडू, कांदा, हरभरा, भुईमूग अशी पिके घेतली जातात.

एक डोळा किंवा रोप पद्धतीने ऊस लागवड. बेण्यात बचत.

तणाचा प्रादुर्भाव कमी. परिणामी भांगलणीचा खर्च ८० टक्क्यांनी कमी झाला.

स्वयंचलित ठिबक सिंचन, खतांचे नियोजन यामुळे उसाचे उत्पादन एकरी २७ टनावरून ५० ते ८० टनावर पोहोचले.

एकूण उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादनामध्ये वाढ. एकरी ५५ ते ८० टनापर्यंत ऊस उत्पादन मिळत आहे.

वेळी अवेळी शेतात पाणी देण्याचे कष्ट वाचले. नफा वाढल्याने शेतकऱ्यांत समाधान दिसत आहे.

आता होतेय बचतच बचत

पाटपाण्यावर लागवड करताना एकरी २४०० ऊस बेणे (म्हणजे ३ टन ऊस) लागत असे. अलीकडे एक डोळा पद्धतीने, रोपांची लागवड केली जात असल्याने केवळ ४०० उसांत एक एकर लागवड होते. प्रतिएकर अंदाजे अडीच टन ऊस बेणे व खर्च वाचतो.

पाटपाणी पद्धतीत उसाला एकरी १ कोटी दहा लाख लिटर पाणी लागे. आता ठिबकनंतर एकरी केवळ ५५ लाख लिटर पाणी पुरेसे होते. ५० टक्के पाणी वाचले.

पाटपाण्यासाठी वार्षिक ७८,३०० युनिट वीज वापरली जाई. आता केवळ ५३ हजार युनिट वीज पुरेशी होते. ३२ टक्के वीजबचत झाली.

स्वयंचलित ठिबक सिंचन पद्धतीतील दुहेरी गाळण यंत्रणातून तणांचे बी येणे रोखले गेल्याने तणांचे प्रमाण अत्यल्प राहते. भांगलणीचा खर्च कमी झाला.

विद्राव्य खतांच्या वापरामुळे ऊस उत्पादकतेत दुप्पट, तिपटीने वाढ.

प्रत्येक शेतकरी खताचे नियोजन पीकनिहाय वेगवेगळे करतो. त्यासाठी ठिबकद्वारे खते देण्यासाठी बॅटरी पंपाचा वापर केला जातो.

असंतुलित खत व पाणी वापर थांबल्याने जमिनीची कार्यक्षमता वाढली.

उसाबरोबरच भाजीपाला आंतरपिके घेतली गेल्याने खेळता पैसा उपलब्ध झाला.

१ टन ऊस उत्पादनासाठी पाट पाणी पद्धतीत ४०० टन पाणी लागे, ते आता केवळ १२० टन पाण्यातही चांगले उत्पादन मिळत आहे.

पूर्वी पाटपाणी पद्धतीत एकूण उत्पादनखर्च एकरी ६३९०० रु. होत असे, तो आता सुधारीत लागवड पद्धती व ठिबक सिंचनमुळे ४०८०० रु. पर्यंत कमी झाला आहे.

अल्पभूधारकांना फायदा

गावात तीन शेतकरी सोडले तर सर्व शेतकरी अल्पभूधारक आहेत. एक हेक्टरपेक्षा कमी म्हणजे अगदी दहा ते वीस गुंठ्यांमध्ये ऊस किंवा अन्य पिके घेऊन चरितार्थ कसा चालणार, ही विवंचना होती. मात्र, ठिबक सिंचनमुळे एक ते पाच गुंठे क्षेत्र असणारे १६ शेतकरी चांगले ऊस व भाजीपाला उत्पादन घेत आहेत. ही समाधानाची बाब आहे.

गावात पंचविस हायड्रोफोनीक युनिट उभारण्यात आले आहेत. यातून गावातील चाऱ्याचा प्रश्न सुटला आहे. एका युनिटमधून किमान पाच जनावरांना लागणारा चारा मिळतो आहे. भाजीपाला संघासाठीची इमारत ( इंटिग्रेटेट पॅक हाऊस), ऱेफर व्हॅन, दोन एकरावर ग्रीन हाऊस, दहा हजार पक्षाचे कुकुटपालन, महिला गृह उद्योग यामध्ये मिरची कांडप, आॅईल मिल, शेवया मशिन, मसाला मिक्स करण्याचे यंत्र त्यासाठीची इमारत हे महिला गृह उद्योगाअंतर्गत उभारण्यात येत आहे. ३० लाखाची अवजार बॅंक गावात उभारण्यात आली आहेत.

डाॅ. नेताजी पाटील, चेअरमन, कै. शिवा रामा पाटील सहकारी पाणीपुरवठा संस्था मर्यादित, कारभारवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर मोबाईल 9421113233

अशी होती ऊस उत्पादनातील वाढ

ऊस उत्पादनातील वाढ शेतकरी (एकूण १३१ पैकी)

०-२५ टक्के वाढ ९ शेतकरी

२५-५० टक्के वाढ १७ शेतकरी

५०- ७५ टक्के वाढ ७५ शेतकरी

७५- १०० टक्के वाढ ३० शेतकरी

शेतकऱ्यांना व्हाॅट्सअप ग्रुपमधून मार्गदर्शन

१३१ शेतकऱ्यांचा व्हॉट्‌सअप ग्रुप तयार केला असून, त्यावर दररोज पाण्याची वेळ निश्‍चित केलला तक्ता पाठवला जातो. त्यानुसार आपल्या शेतात जाऊन निश्चित झालेल्या वेळी केवळ व्हॉल्व सुरू-बंद करावा लागतो. यात कष्ट आणि वेळ दोन्ही वाचले आहेत. नियमित वेळ माहित असल्याने अन्य कामांकडे लक्ष देणे शक्य होते. शेतीसह शेतकरी अन्य कामे, उद्योग, नोकरी यावर निर्धास्त जाऊ शकतात.

घराघरात गांडूळ खताची निर्मिती

संपूर्ण गाव ठिबक सिंचनखाली आल्यानंतर आता संपूर्ण गाव सेंद्रिय शेतीखाली आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कृषी विभागाच्या वतीने शेतीशाळा घेत गांडूळखत व दशपर्णी अर्क निर्मितीचे प्रात्यक्षिके घेतली जात आहेत. त्यातून गावात 65 गांडूळ खतनिर्मिती युनिट (बांधीव बेड) उभे राहिले आहेत. आता टप्प्याटप्प्याने प्रत्येक घरात गांडूळ खत तयार करण्यात येत आहे. दशपर्णी अर्क निर्मितीसाठी घरटी तीन बॅरेल देण्यात आली आहेत. दशपर्णी अर्क निर्मिती, जीवमृत्र, सेंद्रिय शेती ओषधे तयार करण्यात येत आहेत. यातून आता ठिबकनंतर गाव आता सेंद्रिय शेतीकडे वळला आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading