November 21, 2024
local-trees-should-be-planted-but-what-is-local
Home » स्थानिक झाडे लावावीत ! पण स्थानिक म्हणजे कोणती ?
विशेष संपादकीय

स्थानिक झाडे लावावीत ! पण स्थानिक म्हणजे कोणती ?

उन्हाळ्यात उन्हाने भाजून काढले की झाडांचे महत्त्व लक्षात येते. पाणी टंचाईचा चांगलाच त्रास झालेला असतो. त्यानंतर पावसाळा आला की शासन पातळीवरून झाडे लावण्याचे आदेश यायला सुरुवात होते. झाडे लावून त्याचे छायाचित्र दिलेल्या संकेतस्थळावर अपलोड करावे लागते. हे एक उत्सव असल्यासारखे साजरे होते. यामध्ये गांभिर्याचा अभाव अनेकदा दिसून येत नाही. एक उपक्रम पार पाडल्याचे समाधान पदरी पाडून घेतले जाते. पु. शि. रेगे यांच्या ‘सावित्री’ कादंबरीत पाउणशे वर्षांपूर्वी याचे नितांतसुंदर वर्णन आले आहे. अगदी तसेच शाळांपासून महाविद्यालयांपर्यंत आणि पोलिस कार्यालयांपासून ते खाजगी उद्योगांपर्यंत सर्वत्र पार पडते. यातील किती झाडे जगतात, किती मरतात, याची पाहणी करायला अनेक संस्थांचे किंवा संघटनांचे प्रमुख फिरकत नाहीत. अशीच एका जागतिक पातळीवरील संघटना. एका शहरात अशीच वृक्ष लागवड करत असे. त्या ठिकाणी दरवर्षी आग लागून झाडे जळून जात. त्याच ठिकाणी पुढच्या वर्षी वृक्ष लागवड करून ते अहवाल पाठवत. तेथील झाडांची वीसेक वर्षात कसलीच वाढ होत नव्हती. संस्थेचा फलक मात्र दरवर्षी नव्याने लावला जायचा. अखेर ज्यांचा त्या संघटनेशी संबंध नव्हता, अशा सुजाण नागरिकानी तेथे आग लागू नये, म्हणून गवत काढून टाकण्यास सुरुवात केली आणि ती झाडे वाढली.

असे घडू नये, लावलेली झाडे चांगली वाढावीत, जमिनीवर हरित आवरण वाढावे, यासाठी झाडे लावताना वैज्ञानिक माहिती घेऊन, शास्त्रशुद्ध पद्धतीने लागवड केल्यास झाडे फार कष्ट न घेता चांगली वाढतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सर्वच वनस्पती निसर्गातील जैवविविधता आणि संतुलन राखण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. कोणतीही वनस्पती उपयोगाची नाही, असे नाही. मानवाने निसर्गात हस्तक्षेप केला नाही, तर झाडे आपोआप वाढतात. यातील अनेक बाभळीची, बोरीची, हिवराची झाडे केवळ त्यांना काटे आहेत म्हणून तोडली जातात. मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे वनस्पतींचे, पर्यावरणाचे, जैवविविधतेचे नुकसान होत असते,

त्याची थोडीफार भरपाई होण्यासाठी, वृक्ष लागवड करण्यात येते. काही उत्साहाने, काही सक्तीने, काही मनाने यात सहभागी होतात. यातील मनाने सहभागी होणारेही केवळ झाड लावायचे हेच एक उद्द‍िष्ट अनेकदा ठेवतात. त्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन वृक्ष लागवड केल्यास ती खऱ्या अर्थाने सत्कार्य ठरेल. मात्र वनस्पतींची लागवड करताना जमिनीचा पोत लक्षात घेणे महत्त्वाचे असते. मुरमाड माळावर आंब्याची बाग फुलवणे सोपे नसते. त्यामुळे माती कोणत्या प्रकारची आहे यावर झाडांची रोपे निवडताना लक्ष द्यायला हवे. मातीचा पोत पाहून झाडे लावल्यास त्यांची फार काळजी करण्याची गरज भासत नाही.

झाडे लावताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्थानिक वृक्षांची निवड करणे आवश्यक आहे. देशी झाडे म्हणजे स्थानिक झाडे नव्हेत. भारतासारख्या देशामध्ये जम्मू-कश्म‍िरच्या थंड प्रदेशात वाढणारी झाडे महाराष्ट्र किंवा राजस्थान, गुजरातमध्ये लावू नयेत. आपल्या आजूबाजूच्या पंधरा कोस परिसरात नैसर्ग‍िकरित्या वाढणारी झाडे स्थानिक झाडांमध्ये समाविष्ट होतात. त्यादृष्टिने झाडांची निवड करावी. विशेषत: महाराष्ट्रात एरवी सर्वत्र आढळणारा कडुनिंब कोकणात मात्र चांगला वाढत नाही. अशा वृक्षांची नैसर्ग‍िक वाढ लक्षात घेऊन लागवड करावी. मुरमाड जमिनीत झाडे लावताना तेथे कडूनिंब, चिंच, आवळा, शमी, खैर, सिसम, बिबा, बारतोंडी, आपटा, बोर, सिताफळ, काटेसावर, कांचन, हिरडा, बेहडा, अशी झाडे लावल्यास ती पाणी कमीजास्त मिळाले तरी चांगली वाढतात.

काळी कसदार जमीन असेल तर आंबा, वड, पिंपळ, पिंपरण, उंबर, अर्जुन, फणस, नारळ, बेल, बकुळ, ताम्हण, चंपक, पारिजात, कवठ, कदंब अशी झाडे आवर्जून लावावीत. पाण्याची सोय करता असेल तर जांभूळ, वड, पिंपळ, पिंपरण, उंबर फणस, बेल, ताम्हण अशी झाडे कोणत्याही जमिनीत चांगली वाढतात. शेताच्या बांधावर वड, पिंपळ, पिंपरण, सिसम अशी जास्त विस्तारणारी किंवा मुळांपासून फुटवा येणारी झाडे लावू नयेत. त्याऐवजी बांधावर साग लावला आणि पावसाळा संपताच त्याची छाटणी केल्यास पिकाचे नुकसानही होत नाही आणि भविष्यात मोठी किंमतही मिळते. झाडे लावताना बाहेरून माती आणून, झाडे लावण्याऐवजी आजूबाजूचीच माती वापरल्यास झाडे लवकर चिकटतात. ती वाढ पकडतात. तसेच झाडे लावताना खूप मोठी झाडे लावण्याचा प्रयत्न अनेकदा होतो. जितके रोप मोठे असेल तितके जास्त त्या रोपाला जपणे आवश्यक असते. त्यामुळे हलक्या जमिनीत, मुरमाड रानात मोठी रोपे लावणे टाळायला हवे.

विदेशी जातीची झाडे लावू नयेत. त्यांना येथील परिसंस्था अपरिचित असते. अशी झाडे लावल्यास त्यांच्या बियांपासून अमर्याद वाढ होते. गुलमोहोरासारखे झाडही अपवादाने लावावे. एकाच प्रकारची झाडे जास्त प्रमाणात लावू नयेत. शेकडो वर्षांनंतरही गुलमोहोराला परिसंस्थेने आपलेसे केलेले नाही. त्यावर अजूनही पक्षी घरटी बांधत नाहीत. तसेच आफ्र‍िकन ट्युलिप किंवा पॅथोडियाची फुले येथील मधमाशाना घातक आहेत. ग्लिरिसिडीयांने तर येथील गवतालाही बाजूला केले. घाणेरीने हरीण, काळविट, हत्ती अशा जंगलातील प्राण्यांचे खाद्य असणारे गवताचे क्षेत्र संकुचित केले. परिणामी हे प्राणी शेतामध्ये येऊन शेतकऱ्याचे नुकसान करतात. त्यामुळे सुबाभूळ, ग्लिरिसिडीया, पॅथोडिया, गुलमोहोर अशा झाडांची लागवड बंद करायला हवी.

काही विदेशी झाडांचे चांगले फायदे आहेत, मात्र ते समजून घेऊन त्यांची लागवड आणि वापर करायला हवा. ग्लिरिसिडियाचा वापर मातीचा पोत सुधारण्यासाठी करता येतो. त्यासाठी त्याची लागवड करून वेळीच छाटणी केली तर काही वर्षात माती सुपीक बनते. त्याचे झाडात रूपांतर होऊ देऊ नये. सुबाभूळ ज्यांना जनावरांना खाद्य म्हणून वापरायचे आहे, त्यांनी अवश्य लावावे. छाटणी करून पाने पशुखाद्य म्हणून जरूर वापरावीत. काजूसारखे एखादेच विदेशी झाड, येथील परिसंस्थेशी लवकर जुळवून घेते, अन्य झाडे तणासारखी वाढत जातात.

झाडे लावायलाच हवीत, ती जगवलीच पाहिजेत. अन्यथा पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. मात्र ही झाडे मानवासह निसर्गातील सर्व घटकांना उपयुक्त ठरतील अशी, फळांची, पक्ष्यांच्या घरट्यासाठी सुयोग्य, जनावरांना चारा देणारी, अशी लावायला आणि जगवायला हवीत.

डॉ. व्ही. एन. शिंदे
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading