उत्सव नव्हे गरज !
डॉ. व्ही. एन. शिंदे,
मागील काही वर्षांपासून तापमानवाढ टाळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज सर्वच देश व्यक्त करतात. ठोस पावले मात्र छोट्या देशांनी उचलली. यासाठी जल, जंगल आणि जमीन यांचा समतोल हवा. यासाठी झाडे लावायला हवीत. आपणही पर्यावरण चांगले राहावे म्हणून झाडे लावतो. मात्र ती उत्सवासारखी न लावता, गरज म्हणून लावायला हवीत!
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
जागतिक तापमानवाढ हा आज सर्वत्र चर्चेचा विषय आहे. पूर्वीही तापमानवाढ होत असे. मात्र ही तापमानवाढ स्थानिक आणि तत्कालीन असे. पुन्हा काही दिवसात तापमान पूर्वपदावर येत असे. प्रामुख्याने ऋतूमानाप्रमाणे हे बदल असत. परिणाम तत्कालीन असत. त्यामुळे जागतिक पातळीवरील सरासरी तापमानात फारसा बदल नसायचा. सध्या जागतिक पातळीवर तापमानवाढ वेगाने होत आहे. विशेष हे की मानवनिर्मित कारणांपेक्षा निसर्गातील विविध प्रक्रियांमुळे होणारी तापमानवाढ जास्त आहे. हा नेमका प्रकार होतो तो हरित वायुंमुळे वातावरणातील बाष्प, कार्बन डायऑक्साईड, मिथेन, आणि इतर घटकांमुळे सूर्य किरणे शोषली जातात. परिणामी उष्णता वातावरणात धरून ठेवली जाते. शेवटी याचा परिणाम वातावरणाच्या तापमान वाढीमध्ये होतो. यालाच हरितगृह परिणाम म्हणतात. तर, पृथ्वीवरील वातावरणाच्या तापमान वाढीस कारण असणाऱ्या या वायूंना हरित वायू म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडणारी सूर्य किरणे पृष्ठभाग शोषून घेतो आणि रात्री त्यामुळे प्राप्त ऊर्जा उत्सर्जीत करतो. उत्सर्जीत झालेले उष्मा कण हरित वायू शोषून घेतात आणि पृथ्वीचे तापमान रात्री जितके कमी होणे आवश्यक असते, तितके होत नाही. ही प्रक्रिया आवश्यक असते. जर हे घडले नाही तर पृथ्वीचे सरासरी तापमान तीस डिग्री सेल्सियसने कमी राहिल. हेसुद्धा जीवसृष्टीला घातक ठरले असते.
पृथ्वीच्या वातावरणाची तापमानवाढ प्रामुख्याने वाफेमुळे होते. वनस्पती आणि कृषी क्षेत्रातून वाफेचे प्रमाण वाढते. मात्र त्याचबरोबर कारखाने, नागरी वस्त्यांमधून मानवाच्या सुखकर जीवनासाठी इंधन जाळण्यातून मोठ्या प्रमाणात हरित वायू म्हणजेच कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड इत्यादी वायू वातावरणात मिसळतात. त्यामुळे पृथ्वीच्या तापमानात सातत्याने वाढ होत असते. यालाच जागतिक तापमानवाढ म्हणतात. याचा सर्वात पहिला परिणाम जलचक्रावर होतो. समुद्रातील पाण्याची वाफ होणे, बर्फाची शिखरे आणि समुद्र वितळणे हे सर्व तापमान वाढीसोबत घडते. जलचक्र बदलत असताना त्यामध्ये अचानक बदल होतात. यालाच आपण हवामान बदल असे म्हणतो. ही तापमानवाढ आणि त्यामुळे होणारे बदल हे आता पृथ्वीवरील जीवसृष्टीला घातक ठरत आहेत.
मागील काही वर्षात याची तिव्रता वाढली आहे. अनेक ठिकाणी भरपूर पाऊस पडतो. ज्या भागात ढगफूटी हा शब्द ऐकावयास मिळत नसे, त्या भागात वारंवार ढगफुटीच्या घटना घडत आहेत. पूर आणि महापूर ही दरवर्षी अनेक भागात समस्या बनली आहे. काही भागात तापमान हे पूर्वीचे सर्व उच्चांक मोडून नवा उच्चांक करत आहे. तर ज्या भागात पूर्वी उन्हाळा असह्य व्हायचा, त्या भागात उन्हाळा एवढा तीव्र होईनासा झाला आहे. जो भाग इतर भागांच्या तुलनेने शांत मानला जातो, त्या भागात वारंवार वादळे तयार होत आहेत. ज्या अरबी समुद्रात कधीतरी एखादे वादळ यायचे, त्याच समुद्रात आता वारंवार वादळे येतात. या वर्षी बिपरजॉय वादळाने तर कहर केला. त्याने गुजरात आणि पाकिस्तानात केलेले नुकसान अब्जावधींचे आहे. या बदलांमागे हवामान बदल आणि हवामान बदलांमागे हरितगृह वायू आहे.
हरितगृह परिणामामध्ये सर्वात जास्त योगदान हे पाण्याच्या वाफेचे आहे. मात्र वाफेमुळे होणारी तापमानवाढ तात्पुरती असते. वातावरणात येणारा कार्बन डायऑक्साईड आणि इतर वायू हे तापमानवाढीचा परिणाम दिर्घकाळ टिकून राहतात. कारखाने, वाहनांचा वापर यातून बाहेर पडणाऱ्या वायूंचा प्रभाव जाण्यासाठी आणि औद्योगिक क्रांतीपूर्व पर्यावरण निर्मितीसाठी संपूर्ण औद्योगिक यंत्रणा आणि या वायूंना वातावरणात सोडणाऱ्या यंत्रणा बंद ठेवाव्या लागतील. १७५० मध्ये औद्योगिक क्रांती झाल्यापासून वातावरणातील कार्बन डायऑक्साईउचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढले आहे. मिथेनचे प्रमाण १४० टक्के वाढले आहे. याचा परिणाम म्हणून मागील १०० वर्षांत पृथ्वीचे सरासरी तापमान ०.६ डिग्री सेल्सियसने वाढले आहे. गेल्या तीस वर्षांतील ही वाढ ०.६ डिग्री सेल्सियसने वाढले आहे. समुद्राच्या पाण्याच्या पातळीमध्ये ३ मिलीमीटरने वाढले आहे.
वातावरणाचे तापमान वाढले की त्याचा परिणाम सर्वच गोष्टीवर होतो. तापमान वाढीचा परिणाम म्हणून बर्फाचे थर वितळण्यास सुरुवात होते. हवा प्रसरण पावते. पाणी प्रसरण पावते. त्यामुळे पाण्याची एकूण पातळी वाढते. १९७९ पासून अंटार्क्टिका भागातील बर्फाचे क्षेत्र कमी होत आहे. पृथ्वीवर एकूण बर्फ २८ कोटी चौरस किलोमीटर आहे. यातील केवळ २.८ दशलक्ष चौरस किलोमीटर एवढे बर्फ वितळले तर पाण्याची पातळी सहा मीटरने वाढेल. त्यामुळे अनेक गावे आणि शहरे पाण्याखाली जाणार आहेत.
याचा परिणाम वनस्पतीवरही मोठ्या प्रमाणात पडत आहे. वनस्पतींना फुले लवकर येऊ लागली आहेत. फळेही लवकर येऊ लागली आहेत. प्राण्यांचे क्षेत्र मर्यादित असते. वाघ, चित्ते यांचे क्षेत्र आखून घेतलेले असते. हे क्षेत्र कमी होत आहे. एकविसाव्या शतकाच्या अखेरीस पृथ्वीचे तापमान १.५ डिग्री सेल्सियसने वाढेल असे संशोधकांचे मत आहे. जागतिक तापमानवाढ जर दोन डिग्री सेल्सियसने झाली तर पृथ्वीवरील संपूर्ण जीवसृष्टी नष्ट पावेल. त्यामुळे संशोधक १.५ डिग्री सेल्सियसपेक्षा तापमान कमी ठेवण्यासंदर्भात वारंवार सांगत आहेत.
याचे परिणाम काय होतील हे नेमके सांगता येणार नाही असे संशोधक सांगत असले तरी अनेक परिणाम आता दिसू लागले आहेत. पर्जन्यमान बदलले आहे. पावसाळ्यात पाऊस भरपूर पडला, पावसाळ्यात धरणे भरून वाहिली तरी, पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. पूर, वादळे, उष्ण वारे, दुष्काळ अशा नेसर्गिक आपत्तीमध्ये होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढेल. शेतीमधून मिळणारे उत्पादन घटल्याने अन्नटंचाई होईल. वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढल्याने पाणी आम्लधर्मी बनेल. त्यामुळे कोरल रीफ प्रवाळांना कॅल्शियमयुक्त आसरा मिळत नाही. परिणामी हे प्रवाळ भविष्यात नष्ट होऊ शकते. वनस्पती आणि प्राण्यांना या वातावरणातील बदलांशी जुळवून घेणे कठीण जाईल. अनेक प्रजातीना अनुकूल वातावरण न मिळाल्यास त्या नष्ट होतील. कोणतीही घटना हवामान बदलामुळे घडली, असा सहसंबंध सहज जोडता येत नाही. मात्र निसर्गचक्राच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेत सर्वांना त्रासदायक ठरणारी गोष्ट तापमानवाढ आहे. एकूणच तापमानवाढ आणि त्यातून होणाऱ्या बदलांमध्ये, जीवसृष्टी धोक्यात येत आहे.
मागील काही वर्षांपासून तापमानवाढ टाळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज सर्वच देश व्यक्त करतात. ठोस पावले मात्र छोट्या देशांनी उचलली. यासाठी जल, जंगल आणि जमीन यांचा समतोल हवा. यासाठी झाडे लावायला हवीत. आपणही पर्यावरण चांगले राहावे म्हणून झाडे लावतो. मात्र ती उत्सवासारखी न लावता, गरज म्हणून लावायला हवीत!
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.