- खगोलविज्ञानाच्या क्षेत्राला ध्येयभारित संशोधकांची गरज: डॉ. आर. श्रीआनंद
- शिवाजी विद्यापीठात तीनदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेस प्रारंभ
कोल्हापूर – ध्येयभारित संशोधकांची खगोलविज्ञानाच्या क्षेत्राला गरज आहे. त्या दृष्टीने नवसंशोधकांनी तयारीला लागावे, असे आवाहन पुणे येथील इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्टॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स (आयुका)चे संचालक डॉ. आर. श्रीआनंद यांनी येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात ‘खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्रातील समकालीन समस्या-२०२४’ या विषयावरील तीनदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. श्रीआनंद यांच्या हस्ते झाले. विद्यापीठाचा भौतिकशास्त्र अधिविभाग आणि आयुका यांच्यावतीने आयोजित केलेल्या या परिषदेच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.
डॉ. श्रीआनंद म्हणाले, खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र या विषयांबाबत विद्यार्थ्यांमध्ये खूप आकर्षण असते. तथापि, केवळ तेवढ्याने भागत नाही, तर या विषयांमध्ये संशोधन करू इच्छिणाऱ्यांत प्रचंड संयम आणि तितकेच कुतूहलही असावे लागते. त्यासाठी संशोधकांनी सातत्याने स्वतःला प्रेरित करावे लागते. असा ध्येयाने भारलेला संशोधकच या क्षेत्रामध्ये काही तरी भरीव काम करू शकतो. ही गुणवैशिष्ट्ये विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये विकसित करावीत. अशा संशोधकांची ‘आयुका’ला, देशाला मोठ्या प्रमाणात गरज आहे.
भूगुरुत्वाकर्षण तरंग लहरींच्या अनुषंगाने बोलताना ते म्हणाले, या लहरी खूपच क्षीण असतात. त्यामुळे त्यांचा शोध घेणे हे कठीणातील कठीण काम असते. त्या शोधण्यासाठी वापरलेली उपकरणे, त्यांची क्षमता आणि निवडलेली ठिकाणे यानुसारही त्यांच्या मापनामध्ये फरक पडू शकतो. त्यामुळे संशोधन अधिक क्लिष्ट असते. या लहरींचे स्वरुप, अस्तित्वशोध आणि त्यांचे परिणाम यांच्याविषयी संशोधनाच्या अमाप संधी आहेत. संशोधकांना या क्षेत्रातही भरीव संशोधन करण्याच्या अमाप संधी आहेत. त्याचप्रमाणे खगोलभौतिकीच्या क्षेत्रामध्ये डाटा विश्लेषणाचे कामही खूप किचकट असते. त्यासाठी उच्च बौद्धिक क्षमता असणारे संशोधक आणि उपकरणेही आवश्यक असतात. अशा विविध उत्पादनांच्या अनुषंगाने उद्योगांशीही साहचर्य राखणे गरजेचे असते. त्यासाठीही हजारो संशोधकांची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, खगोलभौतिकशास्त्र हा खूप चित्ताकर्षक विषय असून गूढ आणि संशोधकांना सतत आव्हान देणारा, आकर्षित करणारा आहे. आकाशगंगा, कृष्णविवर, प्रकाशलहरी, विद्युतचुंबकीय लहरी यांसह अनेक क्षेत्रांत संशोधनास वाव आहे. विद्यार्थ्यांनी त्यात रस घ्यायला हवा.
कुलगुरू डॉ. शिर्के अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, या राष्ट्रीय कार्यशाळेच्या निमित्ताने ‘आयुका’शी शिवाजी विद्यापीठाच्या सहकार्यास सुरवात होणे हा उत्तम संकेत आहे. येथून पुढील काळात ‘आयुका’समवेत रितसर सामंजस्य करार, शिक्षक व विद्यार्थी संयुक्त प्रशिक्षण उपक्रम, आयुकाचे ऑनलाईन अभ्यासक्रम शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांशी संलग्नित करून विद्यार्थ्यांना ते करण्यास प्रोत्साहित करणे, ‘आयुका’मध्ये विद्यार्थ्यांना ऑन-जॉब प्रशिक्षणास प्रेरित करणे, विविध विद्याशाखांमधील शिक्षकांचे गट करून ‘आयुका’समवेत संयुक्त संशोधन प्रकल्प हाती घेणे आणि पन्हाळा येथील शिवाजी विद्यापीठाचे अवकाश संशोधन केंद्राचे आयुकाच्या सहकार्याने सक्षमीकरण करणे इत्यादी उपक्रम नजीकच्या काळात हाती घेण्याबाबत विद्यापीठ सकारात्मक आहे.
सुरवातीला डॉ. श्रीआनंद यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. भौतिकशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र सोनकवडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. एस. पी. दास यांनी परिचय करून दिला, तर डॉ. व्ही. एस. कुंभार यांनी आभार मानले. कार्यशाळेस ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सी. डी. लोखंडे यांच्यासह ‘आयुका’चे डॉ. संदीप मित्रा, डॉ. आर. एस. व्हटकर, आर. एन. घोडपागे, श्री. जे. अहंगर, आयआयजी, कोल्हापूर तसेच भौतिकशास्त्र अधिविभागातील डॉ. के. वाय. राजपुरे, डॉ. ए. व्ही. मोहोळकर, डॉ. एन. एल. तरवाळ, डॉ. एम. व्ही. टाकळे, डॉ. एम. आर. वाईकर, डॉ. ए. आर. पाटील, डॉ. एस. एस. पाटील आदींसह देशभरातील विविध शैक्षणिक संस्था व विद्यापीठांतील शंभरहून अधिक संशोधक, विद्यार्थी उपस्थित होते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.