‘सावळे सुंदर रूप मनोहर’
देव पुंडलिकाच्या भेटीसाठी आला असताना पुंडलिकांनी तीच वीट दारी आलेल्या देवाला उभे राहण्यासाठी दिली. आणि देवाच्या पदस्पर्शाने इंद्राचा उद्धार झाला. विटेखाली उलटे कमळ आहे. विठ्ठलाची मूर्ती समचरण आहे.
मीरा उत्पात-ताशी, 9403554167
सुंदर, मनोहर असा आनंद कंद परमात्मा पांडुरंग भक्तांसाठी गेली हजारो वर्षे त्यांची वाट पाहात उभा आहे. ऋषी, मुनी, संत महात्मे, तुमच्या आमच्या सारखी साधी माणसे,नित्य वारी करणारे वारकरी यांच्या पासून ते देशी विदेशी संशोधक,भक्तांपर्यंत साऱ्यांनाच वेड लावणारे हे त्याचे साकार सगुण सुंदर रूप अतिशय मनोहारी आहे.
आळंदी पासून शेकडो मैलांचा प्रवास करत ऊन वारा पाऊस झेलत वारकरी पंढरपूरला येतात.. आणि सुखाचे हे सुख श्रीहरी मुख पाहून जन्माचे सार्थक करतात.. सर्वांना वेड लावणारा चित्त चोरणारा चित्तचौर्यचतुर आहे तरी कसा?
विठ्ठल मूर्ती
विठ्ठलाची मूर्ती अत्यंत साजिरी आहे.
सकल वैष्णवजनांचा आनंदनिधान असलेला विठ्ठल पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर उभा आहे.
पुंडलिक हा पूर्वाश्रमी मात्यापित्याचा द्रोह करीत असे. पत्नीने हट्ट केला म्हणून तो काशी यात्रेला निघाला. वाटेत कुक्कुटमुनींचा आश्रम लागला. त्या आश्रमात वस्तीस राहिल्यावर त्याला तीन सुकुमार परंतू मलीन, काळ्या स्त्रिया आश्रमाची झाडलोट करत असलेल्या दिसल्या. आश्रमात सेवा करून त्या तेजस्वी होऊन जाताना त्याने पाहिले. चौकशी केल्यावर त्याला कळाले की या गंगा यमुना आणि सरस्वती या पवित्र नद्या आहेत. पापी दुराचारी माणसे पापक्षालनासाठी त्यांच्यामध्ये स्नान करत असल्यामुळे त्या मलीन झाल्या होत्या. कुक्कुटमुनी माता-पित्यांची अखंड सेवा करत असल्यामुळे त्यांना अलौकिक सामर्थ्य प्राप्त झाले होते. त्यांचा पवित्र आश्रम झाडण्याचे काम या तीन नद्या करत होत्या त्यामुळे त्या नद्यांचे मलीनत्व जाऊन तेज प्राप्त होत असे. त्यांनी पुंडलिकाला उपदेश केला. त्यामुळे पुंडलिकाचे डोळे उघडले आणि तो परत येऊन माता-पित्याची निस्सीम सेवा करत राहिला. इतकी की जेव्हा प्रत्यक्ष श्रीकृष्ण त्याच्या दर्शनाला आले तरीही त्याने त्यास थांबण्यास सांगितले आणि उभे राहण्यासाठी समोर पडलेली वीट फेकली. ही वीट म्हणजे शापित इंद्र आहे. वृत्रासुराच्या शापामुळे तो वीट झाला. आणि विष्णूस्मरण करत उद्धाराची वाट पाहत चंद्रभागेच्या तीरी पडला. देव पुंडलिकाच्या भेटीसाठी आला असताना पुंडलिकांनी तीच वीट दारी आलेल्या देवाला उभे राहण्यासाठी दिली. आणि देवाच्या पदस्पर्शाने इंद्राचा उद्धार झाला. विटेखाली उलटे कमळ आहे.
विठ्ठलाची मूर्ती समचरण आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.