ग्रामविकास संस्थेतर्फे शुक्रवारी 21 मे रोजी सकाळी 10 वाजता पोपटराव पवार यांच्या शुभहस्ते सर्वांसाठी पाणी व चित्ते नदी पुनरूज्जीवन अभियान - एक शोधयात्रा या जलविषयक महत्त्वपूर्ण दोन पुस्तकांचे प्रकाशन होत आहे, या निमित्त… प्रकाशन सोहळा पाहण्यासाठी करा लिंकवर क्लिक... https://www.facebook.com/gramvikas.sanstha
इस्त्राईल, सिंगापूर, सौदी अरेबिया आदी देशांनी जलव्यवस्थापनाचा प्रभावी वापर करून त्यांच्याकडील विषम परिस्थितीवर कशी मात केली. जलसमृद्धी कशी प्राप्त केली, याबाबतची यशोगाथा पुस्तकात थोडक्यात विषद केली आहे.
राजेश प्र. लेहेकर
‘क्रियेवीन वाचाळता व्यर्थ आहे हे संतवचन आहे. अनेक विद्वान वेगवेगळ्या विषयांवर पांडित्यपूर्ण विवेचन करत असतांना आपण बघत असतो. परंतु विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड असेल तरच तो विषय खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांच्या हृदयाला हात घालू शकतो. त्यांना कार्य करण्यास प्रवृत्त करू शकतो. असाच एक प्रयत्न ग्रामविकास संस्थेचे सचिव नरहरी शिवपुरे यांनी पाणी व्यवस्थापन या विषयावर आधारित ‘सर्वांसाठी पाणी – वेध पाणी प्रश्नांचा’ व ‘चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियान- एक शोधयात्रा’ या दोन पुस्तकांच्या प्रकाशनाच्या माध्यमातून केला आहे. शिवपुरे यांनी ग्रामविकास संस्थेच्या माध्यमातून पाणीप्रश्नावर लोकचळवळ उभी केली. त्याद्वारे गेल्या 24 वर्षात प्रामुख्याने औरंगाबाद जिल्हा तसेच जालना, लातूर, नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात जलसंधारण व्यवस्थापनाच्या माध्यमातून मोठे काम उभे केले. ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीनुसार स्वानुभवाच्या आधारावर पाणी प्रश्नांच्या सर्वंकष आढावा घेऊन त्या वरील समस्या, आव्हाने व उपाय या अंगाने पुस्तकांचे लिखाण केले आहे.
नरहरी शिवपुरे यांनी साध्या, सोप्या, ओघवत्या भाषेत सर्वसामान्यांना कार्यप्रवृत्त करणारी ही कृतीपुस्तिका वाचकांसमोर प्रस्तुत केली आहे. या पुस्तकाची एकूण बारा प्रकरणांमध्ये विभागणी केली आहे. जलसाक्षरता या प्रकरणात, भारतातील पाणी उपलब्धतेची स्थिती, पाण्याचे स्तोत्र, पाणी वापर व त्याची विविध क्षेत्रांसाठीची विभागणी, पाणीटंचाईची सद्यस्थिती व त्यावरील उपाय योजनेसाठी जलसाक्षरता ही लोक चळवळ होण्याची गरज, जलसाक्षरतेचे विविध आयाम व सर्वसामान्यांना अंमलात आणता येतील अशा छोट्याा-छोट्याा उपाययोजनांची माहिती यात समावेश आहे.
‘पारंपरिक जलव्यवस्थापन व जलफेरभरण’ या प्रकरणात विविध पारंपरिक जलफेरभरण व जलसंवर्धनाच्या पद्धतीचे विवेचन केले आहे. यात महाराष्ट्रातील फड पद्धत, मालगुजारी तलाव, खजाना विहीर, राजस्थानातील जोहड, हिमाचलमधील कूल पद्धती, अपारंपारिक जलफेरभरण पद्धती रेन वॉटर हार्वेस्टिंग, विहीर फेरभरण, रिचार्ज पिट, वनराई बंधारा तसेच आधुनिक पद्धतीत जॅकेट वेल ब्लास्टिंग, नाला तळ विस्फोट तंत्र, विंधन विहीर विस्फोट तंत्र, रिचार्ज शाफ्ट, आदींचा समावेश आहे. विशेष म्हणजे या सर्व पद्धतींची सुस्पष्ट तांत्रिक माहिती आकृतीच्या सहाय्याने या प्रकरणात देण्यात आली आहे. सामान्य नागरिकांना सहजतेने प्रत्यक्षात उतरवता येतील असे जलसंवर्धनाचे विविध प्रयोग खूपच उपयुक्त आहेत.
पाण्याचा ताळेबंद मांडून त्यानुसार पाणी वापराचे नियोजन या संदर्भातील माहिती ‘पाण्याचा कार्यक्षम वापर’ या प्रकरणात नमूद केला आहे. उद्योगक्षेत्र, घरगुती पाणी वापर हे कार्यक्षमतेने कसे करता येईल ? तसेच पाण्याचा फेरवापर, बाष्पीभवन रोखणे या पद्धतींचा वापर करावा, पाणी बचत व पाण्याचे नियोजन कसे करता येईल या संबंधीची माहिती यात देण्यात आली आहे. तर ‘जलप्रदूषण’ या प्रकरणात प्रदूषणाचे कारणे. त्यामुळे होणारे अपाय व त्यावरील उपाय यासंबंधीची माहिती आली आहे.
पाण्याच्या विविध स्त्रोतांपैकी खाऱ्या पाण्याचे निःक्षारीकरण हा देखील एक महत्त्वपूर्ण स्त्रोत उपलब्ध आहे. खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करण्याच्या विविध पद्धतींचा उहापोह या पुस्तकात केला आहे. मात्र सद्यस्थितीत हे तंत्रज्ञान खर्चिक असल्याने आपल्या देशाला परवडणारे नाही, असा अभिप्राय नोंदविला आहे.
पुस्तकात महाराष्ट्रातील पाणी पुरवठा योजनांचा आढावा घेण्यात आला असून अपुरा पाणीपुरवठा, तंत्रज्ञानाचा अभाव, देखभाल दुरूस्तीत लोकसहभागाची आवश्यकता, जलप्रदूषण, स्थानिक स्वराज्य संस्थांचे समक्षीकरण आदी मुद्द्यांवर चर्चा केली आहे. तसेच दूषित पाणी शुद्धीकरणाच्या विविध पद्धतींची उपयुक्त माहितीही दिली आहे.
भारतीय उपखंडासाठी माॅन्सून हा आज पाण्याचा मुख्य स्तोत्र आहे. बहुसंख्य नद्यांच्या जलप्रवाहाचे कारण ही माॅन्सूनच आहे. त्यामुळे पाणी विषयाचा अभ्यास करताना माॅन्सूनला वगळून पुढे जाताच येत नाही. या प्रकरणात महाराष्ट्रातील अंतरजिल्हा नदीजोड प्रकल्पाची चर्चा केली असून देशातील प्रमुख राज्यांमध्ये व महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये पडणाऱ्या पर्जन्यमानाची सरासरी देण्यात आली आहे.
पाणी प्रश्नांवर उपाय शोधताना लोकसहभाग हा कळीचा मुद्दा असल्याचे दिसून आले आहे. लोकसहभागातून जलव्यवस्थापनाचे काम झाले तर ते शाश्वत व टिकाऊ स्वरूपाचे असते असा अनुभव आहे. शिवपुरे यांनीही असे अनेक उपक्रम ग्रामीण भागात राबविले आहेत. महाराष्ट्र शासनाने लोकसहभागातून राबवलेली जलयुक्त शिवार, तसेच गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजना असेल किंवा महाराष्ट्रात विविध स्वयंसेवी संस्था संघटनांच्या माध्यमातून लोकसहभागातून झालेले जलसंधारणाचे काम असून याचा प्रभाव व परिणाम हा खूपच व्यापक व लक्षणीय परिवर्तन घडविणारा आहे. याचा प्रत्यय आलेला आहे. पुस्तकात या विषयी सविस्तर माहिती दिली आहे.
इस्त्राईल सारख्या वाळवंटी क्षेत्र व अत्यल्प पर्जन्यमान असलेल्या देशाने जल व्यवस्थापनाच्या कार्यक्षम वापरातून नंदनवन फुलवले असल्याचे आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. भारतासाठी हा एक प्रेरणा स्तोत्र आहे. इस्त्राईल, सिंगापूर, सौदी अरेबिया आदी देशांनी जलव्यवस्थापनाचा प्रभावी वापर करून त्यांच्याकडील विषम परिस्थितीवर कशी मात केली. जलसमृद्धी कशी प्राप्त केली, याबाबतची यशोगाथा पुस्तकात थोडक्यात विषद केली आहे. पुस्तकात जिज्ञासूंसाठी जलविषयक धोरणे व कायदे, शासनाच्या जलविषयक प्रमुख योजनांची माहिती, जलविषयक काम करणाऱ्या प्रमुख संस्थांची उपयुक्त माहितीही दिली आहे.
पाणी प्रश्नांचा मुळापासून शोध घेणारे, जिज्ञासापूर्ती करणारे व प्रत्यक्ष कृती आराखड्यााची मांडणी करणारे हे पुस्तक सर्वसामान्यांनी या विषयात नेमके काय केले पाहिजे याचा वस्तुपाठ घालून देणारे आहे. मुख्य म्हणजे या पुस्तकात प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी ‘‘महत्त्वपूर्ण’’ या मथळ्याखाली त्या त्या प्रकारांच्या सारांश सांगणारे थोडक्यात मुद्दे उद्घृत केलेले आहेत. तसेच ‘‘आपण हे करू शकता’’ याअंतर्गत सर्वसामान्यांनी नेमकी काय कृती करावी याची माहिती दिली आहे. प्रत्येक प्रकरणासोबत त्या विषयावरील तज्ञ व्यक्तीचे मत नोंदविले आहे. त्यामुळे लिखाणास वस्तुनिष्ठता आणि शास्त्रीय बैठक प्राप्त झालेली आहे. त्यात नेमकेपणा आला आहे. ज्यामुळे हा काहीसा क्लिष्ट असलेला विषय सर्वसामान्यांना समजण्यास व त्यानुसार कार्य करण्यास सोपा झाला आहे.
पुस्तकाचे नाव: सर्वांसाठी पाणी वेध पाणी प्रश्नांचा
लेखक: नरहरी शिवपुरे
प्रकाशक: ग्रामविकास संस्था
पृष्ठे: 144, किंमत: 125
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.