November 21, 2024
The cities of Mumbai, Thane, Calcutta have only 31 years to live
Home » मुंबई, ठाण्यासह, कलकत्ता शहरांचे आयुष्य उरले फक्त ३१ वर्षे !
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मुंबई, ठाण्यासह, कलकत्ता शहरांचे आयुष्य उरले फक्त ३१ वर्षे !

ऐकावं ते नवल..नाही !

स्वस्तात ऊर्जा मिळवताना लाकूड, दगडी कोळसा, खनीज तेल यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. विद्युत ऊर्जा निर्मितीही कोळसा आणि डिझेलचा वापर करून केली जाते. यातून मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड वातावरणात सरळ सोडले जातात. त्याचप्रमाणे, नायट्रोजन, सल्फर यांचीही ऑक्सईडस वातावरणात मिसळतात. हे सर्व वायू मोठ्या प्रमाणात उष्णता शोषतात. त्याचा परिणाम म्हणून वातावरणाच्या तापमानात वाढ होत आहे. याचा परिणाम समग्र जीवसृष्ट‍िवर होतो.

डॉ. व्ही. एन. शिंदे,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

वाळवंटात. तेही सहारा वाळवंटात ऐन उन्हाळ्यात महापूर, उत्तराखंडमध्ये मोराचे दर्शन ६५०० फूट उंचीवर, अर्जेंटिना पोपटांशी लढाई करतोय, या बातम्या तशा न पटणाऱ्या. तसेच अपवाद म्हणून सोडाव्या अशाही नाहीत. या बातम्यांनी मन अस्वस्थ झाले. या तीन बातम्यांचे मूळ जागतिक तापमान वाढ आहे, हे लक्षात येत होते. तोपर्यंत जूनीच पण पुन्हा नव्याने आलेली बातमी कानावर पडते, मुंबई, ठाणे आणि नव्या मुंबईचे आयुष्य केवळ ३१ वर्षांचे आहे. या सर्व बातम्या आपल्या दैनंदिन जीवनात वाचून सोडून देतो, मात्र या बातम्यातून मिळणारा इशारा फार गंभीर आहे. याबाबत गांभिर्याने विचार करून उपाय योजण्याची गरज आहे. त्यालाही आता उशिर झाला आहे, मात्र कधीच नाही, यापेक्षा उशिराने सही… आता तरी जागे व्हायलाच हवे.

जगातील सर्वात मोठ्या सहारा वाळवंटामध्ये दरवर्षी सरासरी एक ते २५० मिलिमीटर इतका पाऊस पडतो. मात्र मागील आठवड्यात सलग दोन दिवस इतका पाऊस पडला की, वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा तलावात जमा झाला. वाळूच्या खालूनही पाणी वाहत आहे. चक्रीवादळ आणि पावसाने मातीची घरे पडली. मोठा विध्वंस झाला. मागील काही दिवसातील पावसाने सहारा वाळवंटाचा भाग हिरवा झाला आहे. या सातत्याने पडणाऱ्या पावसाने सर्वांनाच चकीत केले आहे.

एकिकडे इस्राईल व इराण, तसेच रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाने जोर पकडला आहे. विज्ञान, तंत्रज्ञानाच्या प्रगतीतून विकसित झालेली शस्त्रास्त्रे नव्हे तर उपकरणाच्या सहाय्याने युद्ध लढले जात आहे. पेजरचे आणि वॉकीटॉकीचे स्फोट घडवून शत्रूची ताकत कमी करण्यात येत आहे. अशा वातावरणात अर्जेंटिना पोपटांशी लढत आहे. पोपटांच्या टोळधाडीने अजेंटिनातील लोकांचे जगणे अवघड केले आहे. या युद्धात केवळ लष्कर नाही तर सर्वसामान्य जनताही सहभागी झाली आहे. कधीतरी कानावर पडणारा पोपटाचा ‘मिठू, मिठू’ आवाज गोड वाटतो. मात्र हजारो पोपटांच्या कलकलाटात लोकांचे जगणे अवघड झाले. घरांच्या खिडक्या, दरवाजे लावणेही लोकांना कठीण बनले. पोपट चक्क घरात घुसून सर्वत्र घाण करताहेत. पोपट एकेकटे नाही तर, हजारोच्या झुंडीने एकत्र फिरताहेत. विद्युत, टेलिफोन ताराही या पोपटांनी तोडल्या. पाणी पुरवठा विस्कळीत झाला. त्यातून जिवनावश्यक वस्तुंचा तुटवडा निर्माण झाला. त्यांच्यापासून संरक्षण मिळत नसल्याने लोकांचा रोष वाढला. सरकारी यंत्रणा अपूरी पडत असल्याचे लक्षात येताच, लोकांनी आता पोपटांविरूद्ध लढायला सुरुवात केली आहे. पोपटांचे असे अचानक एका देशात स्थलांतर करून विक्षिप्त वागणेही तापमान वाढ हेच कारण सांगण्यात येत आहे.

पोपटाप्रमाणेच उत्तराखंडमध्ये मोरांचे वागणे बुचकळ्यात टाकणारे आहे. मोरांचे वास्तव्य साधारण १६०० फुटापर्यंत असते. मात्र मोरांचे दर्शन आता ६५०० फुटावर होऊ लागले आहे. ही गोष्ट एखादवेळी असेल तर, चुकून मोर भरकटला, असे मानतात. मात्र वारंवार असे मोरदर्शन होत आहे. याचाच अर्थ आता मोराला खाली राहणे, असह्य होत आहे. निळा, हिरवा आणि पांढरा मोर हे फॅसिनेडी कुलातील मोर मूळचा भारतातील. आज त्याचे दर्शन अनेक देशात होत आहे. मोराचे हे एवढ्या उंचावर जाणे, जागतिक तापमान वाढीचा परिणाम असल्याचे संशोधकांचे मत आहे.

कारखाने, उद्योग, घरगुती वापर, अवैज्ञानिक पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावणे या सर्व गोष्टीतून हवा, पाणी प्रदूषीत होते. एखाद्या देशातील नागरिक प्रती व्यक्ती, प्रती दिन किती ऊर्जा वापरतो, यावर त्या देशाची प्रगती किती झाली, हे मोजले जाते. त्यामुळे प्रत्येक राष्ट्र आपल्या देशात जास्तीत जास्त ऊर्जा कमीत कमी खर्चामध्ये कशी उपलब्ध होईल, यादृष्टिने प्रयत्न करतात. स्वस्तात ऊर्जा मिळवताना लाकूड, दगडी कोळसा, खनीज तेल यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. विद्युत ऊर्जा निर्मितीही कोळसा आणि डिझेलचा वापर करून केली जाते. यातून मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड वातावरणात सरळ सोडले जातात. त्याचप्रमाणे, नायट्रोजन, सल्फर यांचीही ऑक्सईडस वातावरणात मिसळतात. हे सर्व वायू मोठ्या प्रमाणात उष्णता शोषतात. त्याचा परिणाम म्हणून वातावरणाच्या तापमानात वाढ होत आहे. याचा परिणाम समग्र जीवसृष्ट‍िवर होतो. वातावरणावर, जीवसृष्ट‍िवर याचे मोठे परिणाम होताहेत. पृथ्वीवरील पाण्याचा मोठा वाटा हा बर्फाच्या स्वरूपात आहे.

वातावरणातील बदलाचा परिणाम म्हणून तापमानातील वाढ होते. त्याचा परिणाम म्हणून बर्फ वितळत आहे. हा वितळलेला बर्फ पाण्याच्या रूपात उताराने वाहते. अखेर ते समुद्राला जाऊन मिळते. बर्फ एवढ्या मोठ्या प्रमाणात वितळतो की, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत आहे. समुद्राच्या पाण्याची पातळी एवढ्या मोठ्या वेगाने वाढत आहे की, समुद्र किनारी असणारी अनेक गावे आता निर्मनुष्य झाली आहेत. ब्रम्हपुत्रा नदी जेथे समुद्राला मिळते, त्या ठिकाणची अनेक खेडी पाण्याखाली यापूर्वीच गेली आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई या शहरात, अनेक ठिकाणी समुद्रात भराव घालून इमारती उभा करण्यात आल्या आहेत. या भरावामुळे समुद्राच्या पातळीमध्ये वाढ होते किंवा नाही याची माहिती मिळत नाही. याखेरीज समुद्रामध्ये भरला जाणारा कचरा आणि वाहून येणारा गाळ हाही समुद्राची पातळी वाढवण्याचे कारण आहे.

आपण एखाद्या शहरात नोकरी, कामधंद्यानिमित्त जातो. तेथेच राहतो. आवडेल असे घर घेतो. मात्र ते घर समुद्र किनारी भराव टाकून बांधलेले घर असू शकते. मात्र मुंबई, ठाण्यासह, कलकत्ता शहरांना थेट धोका निर्माण झाला आहे. या शहरांना केवळ ३१ वर्षांचे आयुष्य शिल्लक आहे, असे संशोधकांचे मत आहे. २०५० पर्यंत या शहरांना जलसमाधी मिळेल. गेट वे ऑफ इंडिया, नरिमन पॉईंट, कुलाबा, शिवाजी पार्क, सीएसएमटी, दादर, वांद्रा, चेंबूर ही ठिकाणे पाण्याखाली असतील. सुरत या महत्त्वाच्या व्यापारी केंद्र असणाऱ्या शहरालाही धोका निर्माण झाला आहे. एकूण दहा देशांच्या लोकसंख्येवर याचा परिणाम होणार आहे. बांग्लादेशातील २.५ कोटी, चीनच्या दोन कोटी, फिलिपाईन्सचे दीड कोटी लोकांना फटका बसणार आहे. म्हणूनच वाचायला मिळणाऱ्या बातम्या नवल नाहीत !


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading