(आगामी *झोडपा* या झाडीबोलीतील कथासंग्रहातून )
🌹🌹 *खरी कमाई* 🌹🌹
बन्यानीला जागोजागी भोक पडलेले , डोक्यावर फाटक्या दुपट्याचा फेटा बांधून टोंगऱ्यावरी सुतना गुंडलेला स्यामराव काड्या फोडून फोडून घामा गिरगिरा झाला . पोटात कावडे बोंबलत होते . हाताच्या सिरा कामाच्या तानाने थकून इसाव्यासाठी थडथड लवत होत्या . पन पोटासाठी घटकाभर थांबून चालणार नाही , याची जान असलेला स्यामराव दुपट्याचा सेला धरून घाम पुसत पुसत अंकीन चेव आनत कुराडीचा वार तेज करून अख्या गाडाभर लाकडाच्या झिलप्याची सूड उबी करत होता . रकरकत्या तपनीत येवडी उरक आली कसी ? डोक्याव चडलेला सुर्वे मरनाची आग वकत होता , आंगोड करताना विसन टाकूनइ सायता होनार नाइ येवढा कडलेला चरवीतील पानी घस्याची कोरड कसी घालवनार , तरी तपनीने गरम झालेला गडवा गिलास जेवढा लासून गिऱ्या पडलेल्या हाताला चरचर झोंबत होता , त्याइपेक्स्या अदीक कोनतीतरी चेतना सगऱ्या महातनीभर मनात सीतरता तयार करत होती . केलेस पायजे थांबून उपाव नाई , या येका जिद्दीने लायकवनाऱ्या तपनीला पराभूत करायला जनू युद्धातला वीरस कंबर कसून मैदान गाजवत होता .
बापजाद्यापासून मातीकाम आन लोकायची वनमजुरी करत कदी अडल्या नडल्या कामाले धावून येनारा स्यामराव पोराच्या सुकी जीवनासाठी धुंदाडीतही टिकून रायलेल्या झाडासारका गरिबीतइ साबीमानान कस्ट करायला बारा हत्तीचे बळ आनायचा . आपल्या वाट्याला आलेले भोग पोराला भोगावे लागू नये , सिकुन सवरून त्याला मोठे केले की आपले दिवस पालटले पायजे यासाठी थ्याच्या सिक्स्यनात कमी ठेवायची नोहती स्यामरावला . गरिबीच्या झडा समींदराच्या खोलीहुन अधिक रिदयात हालअपेष्टांनी भगदाड पाडत होत्या . गरिबीची खाई दिवस रात थ्याच्या कारजाले चिरे पाडायची , मनूनस पोराच्या रूपाने स्यामराव गरिबीचा उतारा शोधू लागला . घाव पडला की त्यावर मलम लावून घाव बुजतात . हरेक आजाराला उपाव असतेस ,असी धारना करूनस त्याने पोराच्या प्रतेक गरजा पुऱ्या करन्यास कोनतीस कसूर ठेवली नाई . पोरात कमीपना येऊ नये मनुन थ्याच्या परतेक गरजा सोता लक्स्य देऊन पुऱ्या कराचा .स्याडा अन अब्यास यातस पोराने गुतून रावे , मनुन स्यामराव दिवसाची रात करत होता . फक्त जन्माला घालून होत नाइ तर आयुस्याची घडन करता आली पायजे , असे तो नेहमी मनाचा . त्यात त्याचा मतलब असला तरी तो विधायक होता.
किसन मंजे कोरस्याच्या खदानीत चमकनारा हिरास मनावा लागेल . रंगारूपान गोरागोमटा , कुरडे केस आन साक्स्यात कन्हैयाची मूर्ती सोबावी असे हास्य . गोल गोबऱ्या गालाचा किसन साऱ्या गावात लाडका होता . दोस्तमित्रात त्याच्या खोड्या हव्याहव्यास्या वाटायच्या . मधूर आवाजात किसनने केलेल्या सूचना सप्पा मित्र आवडीने पुरे करायचे .कारन जेवढा खोडकर तेवढास अब्यासात अव्वल किसन नाच -गाने आन खेलात कोटीस कमी नोयता . स्यामरावच्या अपेक्स्याची जान नसलेला , साऱ्या गोस्टी हट्टानुसार भेटत गेल्याने किसन जेवढा हूस्यार तेवढा खोडकर बनत होता . हरेकांनी आपल्या मागेस रावे , आपला सबूद कोनी खाली पाडू नये मनुन किसन कदी चिडून त कदी खाजा देऊन नेता बनासाठी गुंग राहाचा . पोरानी बाकीच्या भानगडीत न पडता अब्यासात ध्यान द्यावा मनुन स्यामराव ओरडायचा . कदी कोनी तक्रार घेऊन आला तर चिंतेने थ्याचा कारज खालीवर होवाचा . पन पोरगा हरवक्ती पयला नंबर आनतो या समाधानाने तो काही येरा गापिल रावाचा . दिवसरात कस्टात बुडलेला स्यामराव पोटाला चिमटा देत अदिक जोमाने राबला पन किसनला काई कमी पडू नये मनुन आपल्या होनाऱ्या हाडाच्या काड्याकडे कानाडोरा करायचा . गरिबीत राहूनइ गरिबीची झड न लागता सारे आयते मिडत गेल्याने किसनला कस्टाची किंमत काय समजायची?
“आमचा आयुस्य दगदगीत गेला , पन पोरा तुज्या करतुतीने आमाले सुक दावजो .” या स्यब्दाचा किसनला वाडत्या वयाबरोबर वीट यायला लागला . “मले सप्पा समजते गा , लान पोरावानी उगास सिकवत जाऊ नोको . मी सगरा बरोबर करतो , बाकीच्यासारका ढ थोडास आहो .सप्पा पोर त माज्या मांग मांग रायतेत. त्याइले माज्यासीवा करमे नाई . मी सिकवीन सांगीन तेस करतात.” स्यामरावला हे आयकून बरे वाटत असले तरी पोराचा वाढलेला गर्व पाहून मनात भीतीचे अंधार दाटून यायचे . त्याला कारनइ तसेस होते . काई वर्षापूर्वी गावातील सातविवरी सिक्स्यन घेऊन मोरच्या सिक्स्यनासाठी बाहेरगावी गेलेला किसन मॅट्रिकला पयल्या नंबरने पास झाल्याचे सांगून गावी परत आला , तवा बाकीचे मित्रात हा खोटा बोलत असल्याची कुनकुन स्यामरावच्या कानावर आली होती . अडानचोट असल्याने मार्काबदल काई समजत नसले तरी आपन कस्ट करून पैसे पुरवन्याची तयारी दाकवली तरी , गरिबीचे कारन सांगत किसनने गावीस राहून सिकन्याचा घेतलेला निर्णय स्यामरावला खटकला होता . त्यापाइ मनावे की काय ग्रीस्माची कायली सरल्याव मिरगात पेरलेले हिवरे सपन स्यामरावला ढगारलेल्या आबाराखाली फुटारलेल्या भुईसारके वाटू लागले.
कोंबडा झाकून ठेवला मनुन दिस उंगवायचा थोडास रायते . काइ दिवसातस नाई नाई मनता किसनचा खरेपना साऱ्या गावभर माहीत झाला . आन स्यामरावच्या अंगातली सारी सक्ती गरून पडली . आबार फाटून ढगफुटी व्हावी यापेक्स्या मोठा आघात मेंदूला बधिर करून गेला . खतपानी घालून वाढवलेल्या झाडाला कुप न घातल्याने मोकाट ढोरांनी धडका देऊन गंडलवल्याची जानिव स्यामरावच्या अंतरात सजवलेल्या सुखद मनोऱ्याला खसवुन मातीत मिसरवुन गेली . गरिबीची कदी लाज वाटली नोवती , साबीमान मोडू न देता कस्ट करून सुखाच्यापाइ आटवलेले रकत तेलमुंग्यावानी कटाकट चावत साऱ्या पेसी बधीर करत होत्या . मनात उठलेली निष्पलतेची वाटूरली सुरकुत्या पडलेल्या चेमलेल्या आंगाला गदगदा झिनकाडत होती .
हिरोवानी दिसनारा किसन जसा सेयरात सिकायला गेला , तसा बापाच्या कस्टाचे धन त्याचे सपन चुरगाडून मुलींच्या घोडक्यात पिंगा घालू लागले . उद्याच्या उजेडासाठी पेटवलेला कंदील रगताच्या तेलाची नासाडी करत पार्ट्यांमध्ये सिगारेटी सिलगावत होता . झोपडीतून लिहिलेल्या महालाच्या पुस्तकाची पाने हॉटेलातील नाश्त्याच्या पुड्यासाठी आवरन बनू लागले होते . मनुनस स्यामरावच्या जीवनसत्राच्या आसेची बंडी किसनने वरपासची उट लावून थांबवली होती . पोरीबारीच्या नादात कंबरडे मोडेवरी लाता खाऊन किसनने स्यामरावच्या ध्येयकमानीचा गोटा वसरवुन महिरप उद्वस्त केली होती . याची सत्यता पटल्याव स्यामरावला मृगजड काय असते याची खरी वडक पटली . विचाराच्या लढाईत ‘मुलगा चांगला निगला त कमवाची गरज नाई आन मुलगा वाईट निगला त कमवून काई फायदा नाई ‘ या दुनियेतील काऱ्या दगडावरच्या रेगोटीने झोपडीतल्या काऱ्याकुट्ट अंदारात घस्याला पडलेली कोरड सारे त्राण घेऊन गेली .
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
