बोली भाषेच्या संवर्धनासाठी आता विविध पातळ्यावर प्रयत्न होताना दिसून येत आहे. मराठी भाषेचे अस्तित्व कायम राखण्यासाठी या भाषेतील बोलीभाषाही जिवंत राहायला हव्यात. भाषेमुळे संस्कृतीचे संवर्धन होत असते. हे विचारात घेऊन संवर्धनासाठी विविध प्रयोगही केले जात आहेत. याच संदर्भात हा घेतलेला एक आढावा…
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
मराठी भाषेतील बोलींची संख्या शंभरहून अधिक असण्याची शक्यता आहे. बोलीचे प्रदेशवार, जिल्हावार भेद आढळून येतात. इतकचे नव्हे तर काही भेद जात तत्त्वावरही असल्याचे आढळते. अहिराणी, वऱ्हाडी, हळवी, पोवारी, नागपुरी, कोकणी, मालवणी, ठाकरी, वारली, डांगी, कादोडी-सामदेवी, नगरी, कोल्हापुरी, सोलापुरी, पुणेरी, नारायणपेठी, चित्पावनी, चंदगडी, कारवारी, कातकरी, बनारसी, बंजारा गोर, कोरकू, खानदेशी लेवा, गोंडी, संगमेश्वरी, निहाली, तावडी, पारपट्टी, मराठवाडी, ढिवरी, आंधी, आगरी, आदिवासी कोकणा, आदिवासी पावरी, करपल्लवी, कुडाळी, कुणबाऊ, कुरमुडे जोशी (भटकी), क्षात्र-खत्री, खिवारी, गवळी, गुर्जरी, चांभारी, जालनी. डांगी, तंजावरी-दक्षिणी मराठी, तडवी भिल, तिलोरी, त्र्यंबकेश्वरी महादेव कोळी, दखनी-बागवानी, देहवाली-भिली, नगरी, निहाली, पद्यांची, परदेशी राजपूत, बलाई, बागलणी, भिली-भिलोरी-कोठली, भीलाऊ, मथवाडी, मराठवाडी, महाराऊ, मानकरी, मावळी, लेवा गणबोली, लोहारी-धेडगुजरी, वडार, वाघरी-पारधी, वाडवळी, वाणी अशा विविध बोली मराठीमध्ये आढळतात.
डॉ. मोनिका ठक्कर यांनी माझी बोली माझी कथा या पुस्तकात मराठीच्या विविध बोलींतील ५७ कथांचे संकलन केले आहे. बोलीच्या संवर्धनासाठी झालेला हा प्रयोग निश्चितच प्रशंसनिय आहे. बोलीच्या संवर्धनासाठी त्या भाषेत साहित्याची निर्मिती होणे तितकेच गरजेचे आहे. डॉ. ठक्कर यांनी केलेला प्रयत्न बोली अभ्यासकांना, संवर्धनाचे कार्य करणाऱ्यांना प्रेरणादायी असाच आहे असे म्हणावे लागेल.
बोलीच्या संवर्धनासाठी साहित्य संमेलनांचेही आयोजन करण्यात येते. ज्येष्ठ लेखिका प्रतिमा इंगोले, डॉ. हरिश्चंद्र बोरकर, आचार्य ना. गो. थुटे, बंडोपंत बोढेकर, बाळकृष्ण लळीत यांच्या प्रयत्नातून आत्तापर्यंत बोलीची आठ साहित्य संमेलने झाली आहेत. या संमेलनातून बोलीचा जागर केला जात आहे. बोली भाषेचा वापर न झाल्याने मराठीतील अनेक बोली भाषा अस्तगत झाल्या आहेत व अजूनही काही मृत होण्याच्या अवस्थेत आहेत. या संमेलनाच्या माध्यमातून भाषेचे-बोलीचे अस्तित्व टिकवण्यासाठी लोकव्यवहारात त्याची उपयोगिता वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. इतकेच नव्हेतर पोवारी, झाडीबोली, मालवणी, वऱ्हाडी, अहिराणी, बंजारा गोर आदी बोली भाषांचीही स्वतंत्र संमेलने होत आहेत. एकंदरीत बोलीच्या संवर्धनासाठी प्रयत्न होताना पाहायला मिळत आहे. याची दखल शासकिय पातळीवर होणे तितकेच गरजेचे आहे.
आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना मराठी शिकवताना येणारी अडचण किंवा प्राथमिक शाळेतील शिक्षकांना कोरकू विद्यार्थ्यांना शिकवताना येणारी अडचण या दोन्ही बाबी लक्षात घेऊन मुंबईतील उन्नती संस्थेने कोरकू भाषेत विशेष अभ्यासक्रम तयार केला आहे. या संस्थेने पाठ्यक्रमच कोरकूमध्ये रुपांतरित केला आहे. विविध गोष्टींची पुस्तके, वाचनपाठ, शैक्षणिक साहित्य, कविता या संस्थेने कोरकू भाषेमध्ये रुपांतरित केली आहेत. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात उन्नती ही संस्था कार्यरत असून चिंचपाणी, खिरकुंड, डांगरखेड, जनुना या चार गावामध्ये या संस्थेचे याबाबत विशेष काम सुरू आहे. या संस्थेने कोरकू भाषेच्या संवर्धनासाठी अभ्यासवर्गही सुरू केले आहेत. २४ दिवसाचा अभ्यासक्रमही तयार केला आहे. असेही प्रयत्न बोली भाषेबाबत होत आहेत.
झाडीबोली भाषेच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न होताना पाहायला मिळत आहेत. झाडीबोली साहित्य मंडळाच्या माध्यमातून त्या भाषेत लिहीणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष पुरस्कारांचे आयोजन केले जाते. बोलीचा वापर साहित्यात वाढावा यासाठी त्यांचा सुरु असलेला हा प्रयत्न निश्चितच प्रशंसनिय आहे. याबाबत लखनसिंग कटरे, लक्ष्मण खोब्रागडे, अरुण झगडकर असे अनेक अभ्यासक विशेष प्रयत्न करताना पाहायला मिळते. झाडीबोली साहित्य मंडळाच्यावतीने शब्दसाधक हा पुरस्कार देण्यात येतो. शब्दसाधक म्हणजे बोली भाषेतील शब्दांचा जास्तीत जास्त अन् प्रभावी वापर साहित्यांत करणाऱ्या लेखक-कवी, साहित्यिकांना गौरवण्यात येते. नुकत्याच या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात कवी सुनील बावणे यांना त्यांच्या “माजी झाडी” या कवितेसाठी गौरवण्यात आले आहे.
संकर पटाची गा देनं
दंडार रातीचं रंजन
लइ हवसी गा झाडप्या
येतो बारा कोसाउन !!
झाडीबोलीतील शब्दांचा वापर त्यांनी त्यांच्या कवितेतून केला आहे. तसेच कवयित्री शितल कर्णेवार यांनी राजुरा “झाडीची माया” या कवितेत
जर ताप आला जेवा
सेजारपाजाराचा धावा
माया बसतेत उसी
आबाराला वाटे हेवा
तर “पदरमोड” या कवितेत कवयित्री वृंदा पगडपल्लीवार म्हणतात
पदरमोड करून स्यानं
जिनगानी माजी सरली
सुकाचे दिस येईन मनून
आस मनी मी धरली…
“माजी माय” या कवितेत कवयित्री मंगल गोंगले लिहितात
माज्या मायेचा पीरम
दुनियेत लय भारी
सर काय सांगू दादा
तिची नाही बरोबरी…
कवी जयंत लेंजे कोटा या कवितेत लिहितात
यंतराने सोपा झाला
काम उल्लउस्यआ येरात
दावनीचा दावा आता
येकटाच रायते कोट्यात..
कवी सुजित हुलके “मायबोली -भाषा ” या कवितेत लिहितात
असेल झाडीच्या कवीची साथ
करूया आपल्या भासेवर मात
इतिहासात पयलं चला नोंदूया
कविता झाडीच्या लिवू जोमात
झाडीबोलीतील कादंबरीकार धनंजय पोटे यांनीही “बेवारस” कादंबरीत झाडीबोलीचा वापर केला आहे. असली गिधाडे टोचतील याचा भेव गन्याले वाटे, मनुन गन्या जितून आला. त्याच पांदिन निगनार…तई गिधाडाची नजर गण्यावर पडली. अन् गिधाडाने गन्याची टालकी फोडली… अशी वाक्ये वापरून झाडीबोलीला जीवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
बोलीचा जास्तीत जास्त वापर झाल्यास बोलीच्या संवर्धनाबरोबरच मराठी भाषेच्या संवर्धनासही प्रोत्साहन मिळू शकते हे विचारात घेऊ असे प्रयत्न आता अन्य मराठी बोलीभाषेमध्येही होणे गरजेचे आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.