संशय घेऊन आपण स्वतःच स्वतःला त्रास करून घेतो. यामुळे आपले मानसिक संतुलन ढासळते. याचा परिणाम आपल्या शरीरावरही होतो.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
म्हणऊनि संशयाहूनि थोर । आणिक नाहीं पाप घोर ।
हा विनाशाची वागुर । प्राणियांसी ।। 203 ।। श्री ज्ञानेश्वरी अध्याय ४ था
ओवीचा अर्थ – म्हणून संशयापेक्षां मोठें असे दुसरें थोर पातक कोणतेच नाही. हा संशय प्राण्याला एक विनाशाचे जाळेच आहे.
संशयामुळे मनाची स्थिरता विचलित होते. घरात शांती नांदायची असेल. दोघांचा संसार चागला चालावा, असे वाटत असेल तर संशयास थारा देता कामा नये. काही नसले तरी मनात संशयाची पाल चुकचुकतेच. पण याकडे दुर्लक्ष करून त्यावर मात करता येते. घरातच आपण अनेक गोष्टीवर संशय व्यक्त करतो. याचा आपल्या जीवनावरही परिणाम होतो.
खिशातले पैसे कमी झाले असे वाटले की लगेच, जोडीदाराने खिशातील पैसे हळूच काढून घेतले आहेत का ? असा अनेकदा संशय व्यक्त केला जातो. त्यातून चिडचिड होते. दोघांमध्ये कडाक्याचे भांडणही होते. नंतर आठवते की पैसे वेगळ्याच गोष्टीवर खर्च केले होते. मग काय माफीनामा. पण मन तेही करायला तयार होत नाही. चूक मान्य करण्यात आपणास लाज वाटते. कमीपणा वाटतो. पण अशाने नाते संबंध ताणत जातात. याचा विचारला करायला नको का ? काही वेळेला तर अशाने घटस्फोटापर्यंत प्रकरणे जातात. संशयामुळे इतकी मोठी समस्या निर्माण होऊ शकते.
संशयच व्यक्त केला नाही तर, हा प्रसंग उद्भवणारही नाही. पोलिसांची वृत्ती ही संशयी असते. प्रत्येक गोष्टीकडे ते याच दृष्टीने पाहतात. एखाद्याने चोरी केलेली नसली, तरी त्याला संशयाने पकडून बेधम मारहाण करून त्याला चोरी केली असल्याचा जबाबही नोंदवितात. संशयामुळे अशा चुका अनेकदा घडतात. खून न केलेल्या व्यक्तीसही तुरुंगवास भोगावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. संशयाने शिक्षा कधी दिली जाऊ नये. नंतर पश्चात्ताप करावा लागतो. गुन्हा न करणारी व्यक्तीही नंतर मोठा गुन्हा करू शकते.
संशयावर मात करायची असेल तर, सत्य जाणून घ्यायला हवे. सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करायला हवा. पैसे जोडीदाराने घेतल्याचा संशय घेण्याऐवजी आपण कोठे खर्च केलेत का ? कोठे ठेवले होते ? कोठे पडले का ? याचा विचार प्रथम करायला हवा. पण तसे होत नाही. संशय घेऊन आपण स्वतःच स्वतःला त्रास करून घेतो. यामुळे आपले मानसिक संतुलन ढासळते. याचा परिणाम आपल्या शरीरावरही होतो.
मानसिक विचारांमुळे आपल्या शरीरात विविध रसायने उत्पन्न होत असतात. पीत्त म्हणजे हे रसायनच आहे. रागामुळे पीत्त उसळते. यासाठी मानसिक संतुलन ठेवणे खूप गरजेचे आहे. शांत मनामुळे शरीरास आवश्यक रसायनांचीच निर्मिती होते. साधनेमुळे मनातील राग नियंत्रित करता येतो. साहजिकच जहाल, शरीराला मारक ठरणाऱ्या अशा रसायनांची निर्मिती यामुळे कमी होते. याचा परिणाम शरीरावर निश्चितच दिसून येतो. शांत माणसांना आजारही कमी होतात. यासाठीच संशयाने मनास पिडा देणे योग्य नाही.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.