क्रांती दिनाचे निमित्त…
8 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधीजींनी चले जावची घोषणा केली. ब्रिटिशांनी 9 ऑगस्ट रोजी महात्मा गांधी, पंडित नेहरू, मौलाना आझाद आदी पुढाऱ्यांना अटक करून गजाआड केले. त्यानंतर सारा भारत चळवळीने भडकला. कोल्हापूर संस्थानात याचे लोन पसरले.
मग..सुरू झाला ब्रिटिशा विरोधी थरार. ब्रिटिशांनी अनेक ठिकाणी गोळीबार केले. क्रांतिकारकांची धरपकड केली.
गारगोटी कचेरीवर झालेल्या 13 डिसेंबर 1942 च्या गोळीबारात करवीरय्या स्वामी, नारायण वारके, तुकाराम भारमल, शंकरराव इंगळे, मल्लू चौगले, बळवंत जबडे, परशुराम साळोखे हे सात वीर हुतात्मे झाले. 13 डिसेंबर 1942 ची ही घटना अगदी आपल्या नजीक गारगोटी या ठिकाणी घडलेली आहे.
गारगोटी कचेरी, पोलिसांनी गोळीबार केलेली ती खिडकी, कुरचा पूल, पालीची गुहा, वाघ्या-बुवाचा मठ, इंजूबाईचे मंदिर, सेनापती कापशीतील तो चौक ही सर्व ठिकाणे आजही त्या घटनेची साक्ष देतात.
पण.. ते समजून घेणारे कोणीतरी पाहिजे. गारगोटी लढा ही ब्रिटिश राजवटीतील सत्य वस्तुस्थिती होती. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी आत्मबलिदान केले त्या स्वातंत्र्यवीरांचा हा वास्तववादी इतिहास आज भावी पिढीपासून दुर्लक्षित राहिला जावा ही खेदाची बाब आहे.
याला नेमके जबाबदार कोण ? असा प्रश्न या निमित्ताने आपल्यासमोर उभा राहतो. या हल्यात अभावितपणे पडलेल्या सात बळींची ही करुण कर्मकहाणी अजरामर झालेली आहे.
9 ऑगस्ट क्रांती दिन ! या निमित्ताने स्वातंत्र्य लढ्यातील या क्रांतिकारक आणि क्रांतीचा इतिहास सर्वांसमोर यावा यासाठी रमेश वारके यांनी लिहिलेल्या “बलिदान हे स्वातंत्र्यासाठी”या पुस्तकावर आधारित मालिका बनवण्याची कल्पना गावशिवार यू ट्यूब चॅनलचे गोविंद पाटील यांनी मांडली… निवेदक रवींद्र शिवाजी गुरव ..गायक संगीतकार शिवराज पाटील यांनी परिश्रम घेऊन सात भागात ही मालिका बनवली आहे…..
या सात भागांच्या लिंक वापरून ही मालिका अवश्य ऐका….
भाग -१
भाग २
भाग – ३
भाग-४
भाग-५
भाग-६
भाग – ७
हुतात्मा करविरय्या स्वामी
बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर जवळील हरगापूर हे हुतात्मा करविरय्या स्वामी यांचे जन्मगाव. दत्तक म्हणून कापशीला आलेल्या स्वामींचे मुळचे गाव गुरूसिद्धय्या आप्पय्या हिरेमठ असे होते. दत्तक गेल्यानंतर करविरय्या सिद्धय्या स्वामी असे त्यांचे नामकरण करण्यात आले. माझ्या रक्ताची शपथ आहे. पोलिसांना मारू नका ते जरी इंग्रजांचे असले तरी आपले देशबांधव आहेत. त्यांच्यापैकी कुणाच्याही जीवाला धक्का लागता कामा नये. पोलिसांचीच गोळी छातीवर झेलून रक्ताच्या थारोळ्यात शेवटची घटका मोजताना सुद्धा पोलिसांच्या जीवाची काळजी करणारे स्वामी खऱ्या अर्थाने महात्मा गांधींजींच्या अहिंसा तत्वाचे पायिक होते.
हुतात्मा नारायण वारके
भुदरगड तालुक्यातील कलनाकवाडी या छोट्याशा गावात 1920 मध्ये नारायण वारके यांचा जन्म झाला. कोल्हापूरच्या प्रिन्स शिवाजी बोर्डिंगमध्ये रहात असतानाच त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. 9 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींना अटक झाली आणि क्रांतीकारक भूमिगत होऊ लागले. नारायणराव वारके देखील भूमिगत झाले. कोल्हापूर संस्थांनांचे त्यांच्यावर पकड वॉरंट काढून त्यांना कमरेच्या खाली गोळी घालण्याचा आदेश काढला. पकड वॉरंट आणि गोळी घालण्याचा हुकूम असतानाही नारायण वारकेंनी गारगोटी कचेरीसमोर स्वातंत्र्याची जाहिररित्या प्रतिज्ञा करून ब्रिटीश साम्राज्यशाहीला आव्हान दिले. पोलीस अधिकारी बाजूला असतानाही निमूटपणे पहात राहिले. पण या सिंहाच्या छाव्याला गोळी घालण्याची हिंमत कोणाचीही झाली नाही.
भूमिगत असताना दसऱ्याच्या सणादिवशी नारायणरावांनी गुलामगिरीतील पुरणपोळीपेक्षा ही नाचण्याची कणसे आणि ओल्या मिरच्या अधिक रूचकर आहेत असे उद्दगार आईसमोर काढले होते. 13 डिसेंबर 1942 च्या रात्री गारगोटी खजिना लुटताना स्वामीनंतरचे हे दुसरे हुतात्मे होय.
हुतात्मा शंकरराव इंगळे
कापशी (ता. कागल) या जहांगिरीच्या गावी 22 जून 1918 रोजी शंकररावांचा जन्म झाला. 5 वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर हे जहांगिरीत नोकरीसाठी रूजू झाले. समाजसेवेची परंपरा त्यांच्या वडिलांनी अधिक सुरू करून कापशी भागात प्राथमिक शाळा चालू केल्या होत्या. 1942 च्या स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतल्यानंतर शंकरराव एक दिवस घरी आले. आणि आईला म्हणाले, आई मला आज तू अंघोळ घाल, जेऊ घाल, आता तुम्ही मला विसरून जा आशिर्वाद दे अन् नंतर शंकरराव बाहेर पडले. अन गारगोटीच्या स्वातंत्र्य संग्रामात हुतात्मा झाले.
हुतात्मा तुकाराम भारमल
कागल तालुक्यातील मुरगूडचे रहिवाशी असलेल्या तुकारामांनी वयाच्या 19-20 व्या वर्षीच स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात पडू नये म्हणून समजविणाऱ्या क्रांती नेत्यामना मी जरी लहान असलो तरी तानाजीच्या घोरपडीप्रमाणे तुमच्या उपयोगी पडेन असे त्यांनी उत्तर दिले. अन् हे उद्दगार खरेही करून दाखविले.
हुतात्मा पैलवान मल्लाप्पा चौगले
कागल तालुक्यातील चिखली गावच्या मल्लाप्पांनी दुसरीत असतानाच शिक्षणाला रामराम ठोकून कुस्तीच्या आखाड्यात रमू लागले. एकापाठोपाठ एक फड जिंकत असतानाच भोळ्या भाबड्या आई-वडिलांनी मल्लापांचे लग्न 10 वर्षे वयाच्या आक्काताईंशी लावून दिले. स्वातंत्र्यासाठी तन, मन, धन अर्पण करणारा हा हुतात्मा खजिन्यावर हल्ला करण्यावेळी कोसळला अन् शेवटच्या क्षणी त्यांनी हरी बेनाड्यांना आमचे स्वातंत्र्याचे अपुरे स्वप्न पुरे करा असा सल्ला दिला. लग्न होऊन पुरते वर्षही न झालेल्या आक्काताईंवर दुःखाची कुऱ्हाडच कोसळली. त्या वीर पत्नीने आपल्या अमर झालेल्या पतीच्या नावाने उभे आयुष्य काढले. धन्य ते वीर हुतात्मा मल्लय्या आणि धन्य त्या वीरपत्नी आक्काताई.
हुतात्मा बळवंत जबडे
गारगोटी क्रांती संग्रामातील 17-18 वर्षाचे बळवंतराव हे सर्वांत लहान क्रांतीकारक. स्वातंत्र्याचे वारे लहानपणीच प्यालेल्या बळवंतरावांचा जन्म निपाणीजवळील जत्राट या गावी झाला. निपाणीत हायस्कूलमध्ये शिकत असतानाच त्यांना स्वातंत्र्यलढ्याचे आकर्षण वाटू लागले. स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतल्याबद्दल चामडी काढण्याची धमकी देणाऱ्या गावच्या पाटलाला त्यांनी माझी चामडी काढणारा गब्रू अजून जन्माला यायचा आहे. असे खणखणीत उत्तर दिले होते. स्वातंत्र्य संग्रामात अनेक आंदोलनात भाग घेणाऱ्या या बालविरांची स्वातंत्र्याची पहाट पाहण्याची हौस नियतीने पुर्ण होऊ दिली नाही.
हुतात्मा परशुराम साळुंखे
चिक्कोडी तालुक्यातील खडकलाट गावचे रहिवाशी असलेल्या परशुरामांचा जन्म 1942 मध्ये झाला. 1942 च्या स्वातंत्र्य आंदोलनात वयाच्या 18 व्या वर्षीच त्यांनी स्वतः झोकून दिले. भारतीय इतिहासातील अनेक रत्ने, माणके यापैकीच एक असणारा हा ओजस्वी मणी खजिना लुटीच्यावेळी हुतात्मा झाला अन् भारतीय इतिहासात स्वतः बरोबर खडकलाट खेड्याचेही नाव सुवर्ण अक्षरात अमरपणे कोरून गेला.
या सात हुतात्मांच्या स्मरणार्थ गारगोटी येथील तहसिल कार्यालयासमोर ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कै. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सात पाकळ्यांचे भव्य स्मारक उभे करण्यात आले आहे. हे हुताम्यांचे स्मारक आजही येणाऱ्या पिढ्यांना स्फूर्ती देत उभे आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.