कोल्हापूर टाईप बंधाऱ्यात साचलेला कचरा वाढत्या प्रदुषणाचे संकेत देत आहे. हे केवळ पाण्याचे प्रदुषण नाही तर विषयुक्त अन्न निमिर्तीही होत असल्याचा पुरावा आहे. याकडे आता गांभिर्याने पाहाण्याची गरज आहे. या संदर्भात एखादे रोल मॉडेल विकसित करून एकात्मिक उपाययोजना करण्याची गरज आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
वाढत्या नागरिकरणामुळे शहरे मोठे होऊ लागली आहेत. तसे शहरातील सांडपाणी कोठे सोडायचे याकडे प्रशासनाचे, नियोजन समित्यांचे दुर्लक्ष झाले आहे. शहरातील पूर्वीचे नाले आता सांडपाण्याची गटारे झाली आहेत. हे नाले थेट नदीत मिसळत असल्याने नदीतील शुद्ध पाणी प्रदुषित होत आहे. हा प्रश्न भारतातील सर्वच नद्यामध्ये पाहायला मिळतो. सांडपाण्याची व्यवस्था न केल्याने नद्या प्रदुषित झाल्या आहेत. औद्योगिक वसाहतीचेही पाणी कोणत्याही प्रक्रियेविना नदीत सोडले जात असल्याने नदीतील जैवविविधता धोक्यात आली आहे. याबाबत जागरूकता निर्माण करून वाढते नदी प्रदुषण थांबवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
आत्तापर्यंत नदीत सांडपाणीच होते पण आता वाढलेला प्लास्टिक कचराही पुराच्या पाण्यासोबत नदीत वाहून येत आहे. हे प्रदुषण गांभिर्याने घेण्याची गरज आहे. नदी पात्रात बांधण्यात आलेल्या कोल्हापूर टाईप बंधाऱ्यात हा कचरा सर्वत्र पाहायला मिळतो. आत्तापर्यंत पुराने मोडलेल्या झाडांचे अवशेष या बंधाऱ्यात पाहायला मिळायचे पण आता प्लास्टिक पिशव्यांचा कचरा अन् अन्य वस्तूही या बंधाऱ्यात पाहायला मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच बंधाऱ्यात हे चित्र पाहायला मिळते. अशाने आपणास रोज नदीतून मिळणारे पाणी किती शुद्ध आहे याची कल्पना येऊ शकेल. शेतीला हेच पाणी दिले जाते अशाने घातक रसायनेयुक्त पाणी पिकातील धान्यात येते. हेच धान्य आपण खातो. विषमुक्त उत्पादनाची गरज ही यासाठी भासत आहे. या प्रश्नाकडे गांभिर्याने लक्ष देऊन एकात्मिक उपाययोजना करण्याची गरज आहे. या संदर्भात एखादे रोल मॉडेल विकसित करून देशातील सर्वच नद्यावर याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.
हा कचरा केवळ प्रदुषणच करत नाही तर बंधाऱ्याचे आयुष्यही कमी करतो. कचऱ्याचा फटका बंधाऱ्याला बसतो आहे. हेही तितकेच लक्षात घेणे गरजेचे आहे. बंधाऱ्यात अडकलेल्या ओंडक्यामुळे बंधाऱ्यास धोका निर्माण होतो. पाण्याचा दाब त्यावर पडल्याने ओंडक्यामुळे बंधाऱ्याचे नुकसान होते. केवळ बंधारे बांधले म्हणजे काम झाले असे न होता त्याची देखभाल दुरूस्तीचाही, योग्य निगा राखण्याचाही विचार नियोजनात व्हायला हवा.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.