December 5, 2024
Parantu Diwali issue 2024 which captures the value of humanity
Home » मानवता मूल्याचा वेध घेणारा ‘परंतु ‘ दिवाळी अंक २०२४
मुक्त संवाद

मानवता मूल्याचा वेध घेणारा ‘परंतु ‘ दिवाळी अंक २०२४

काळासोबत बदललेला माणूस आणि त्याच्यातील आटत चाललेली माणुसकी हा अस्वस्थ करणारा विचार संपादकीयात सुशील धसकटे यांनी मांडला असून मुखपृष्ठावरील चित्रातून तोच आशय अगदी चपखलपणे रेखाटला आहे. आतील विषयाला न्याय देणारे हे चित्र समर्पक असून विषयाला बळकटी देणारे आहे.

डॉ. योगिता राजकर/९८९०८४५२१०

कादंबरीकार सुशील धसकटे हे मराठी साहित्य व्यवहारात अतिशय गंभीरपणे काम करणारे अभ्यासू संपादक म्हणून ओळखले जातात. आपली स्पष्ट मते आणि गुणात्मक दर्जा हा त्यांचा विशेष गुण आहे. यामुळेच ते संपादित करत असलेला परंतु दिवाळी अंक वाचताना त्यांची अशी खास दृष्टी लक्षात येते. २०२४ परंतु दिवाळी अंक वाचताना आपल्याला याचाच प्रत्यय येतो.

मराठी वाङमयसृष्टीत दिवाळी अंकांना एकशे पंधरा वर्षांची समृद्ध आणि संपन्न परंपरा आहे.या परंपरेत खास दिवाळीत प्रकाशित होणाऱ्या दिवाळी अंकांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.सकस दर्जेदार आणि नाविन्यपूर्ण साहित्य देणारे विविध आशय विषय असलेले दिवाळी अंक दरवर्षी प्रकाशित होत असतात. मराठीत अंदाजे तीनशे ते चारशे दिवाळी अंक प्रकाशित होतात.एक विषय घेऊनही काही दिवाळी प्रसिद्ध होत असतात. याच पार्श्वभूमीवर विशिष्ट विषय घेऊन एकाच विषयाचा घेतलेला सर्वांगीण वेध,मांडलेले चिंतन,विचार ‘परंतु ‘२०२४ या दिवाळी अंकात वाचायला मिळतात.

संपादक सुशील धसकटे यांनी हर्मिस प्रकाशनाकडून ‘परंतु ‘ हा दिवाळीअंक पुणे येथून प्रसिद्ध केला आहे.’माणूस माणुसकी आणि मानवता ‘असे विषयसूत्र निवडून त्या विषयाचा सर्वांगीण वेध घेणारे मान्यवरांचे कसदार लेखन साहित्य या अंकात समाविष्ट केले आहे.’परंतु ‘चा हा तिसरा दिवाळी अंक आहे .मुखपृष्ठ चित्रकार गिरीश सहस्त्रबुद्धे यांनी रेखाटले असून दिवाळी अंकाच्या विषयाला समर्पक असे हे चित्र आहे. ‘माणुसकीच्या शोधात असलेली माणसे’ या चित्रात दिसत आहेत. माणसाने माणुसकी शोधण्यासाठी टाकलेला पोहरा माणुसकी पर्यंत पोहचतच नाही. ही बाब खंतावणारी आहे. याचा अर्थ माणसातील माणुसकी लोप पावली आहे. माणसात हल्ली माणुसकी उरली नाही. काळासोबत बदललेला माणूस आणि त्याच्यातील आटत चाललेली माणुसकी हा अस्वस्थ करणारा विचार संपादकीयात सुशील धसकटे यांनी मांडला असून मुखपृष्ठावरील चित्रातून तोच आशय अगदी चपखलपणे रेखाटला आहे. आतील विषयाला न्याय देणारे हे चित्र समर्पक असून विषयाला बळकटी देणारे आहे.

काळाच्या पटलावरील महत्त्वाच्या विषयाच्या अनुषंगाने केलेली अंकाची मांडणी स्पृहणीय अशीच आहे. एकही जाहिरात या दिवाळी अंकात नसून वाचकांना सलग वाचनाचा आनंद घेता येतो. ही या अंकाची खासियत. उत्तम निर्मिती मूल्य असलेला हा एक वैशिष्ट्यपूर्ण अंक असून वाचनीय आहे. ‘ परंतु ‘ या दिवाळी अंकामध्ये तीन विभाग केलेले असून पहिल्या विभागात दोन वैचारिक लेख आहेत ॲड. जयदेव गायकवाड यांनी ‘गव्हर्नमेंट ऑफ द पीपल बाय द पीपल पाहिजे’या लेखात आदिवासींच्या विकासाचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.’महात्मा गांधी आणि स्त्री विचार ‘या लेखात डॉ. वैशाली पवार यांनी महात्मा गांधीजींच्या स्त्री विषयक विचारांचा सखोल वेध घेतला आहे.

‘माणूस ,माणुसकी मानवता ‘या दुसऱ्या विभागात चिंतन गर्भ लेख असून वाचकांना ते अंतर्मुख करतात. राघवेंद्र देशमुख यांनी आपल्या लेखात विविध क्षेत्रांचा विचार करता माणुसकीचा झालेला लोप, मानवतेच्या अधोगतीचे विश्लेषण करून मानवतेच्या मूल्या संदर्भाने केलेली वैचारिक मांडणी सजग समाजभान जागविणारी आहे. डॉ. अविनाश सावजी यांनी माणसांची शेती हा माणुसकी संदर्भात नवीन विचार मांडला आहे. माणसाची शेती ही कल्पनाच अफाट आहे. माणुसकी हरवलेल्या आजच्या काळात कोरडेपणा एवढा वाढला आहे की माणसाच्या मनाची मशागत केल्याशिवाय माणुसकीची शेती होत नाही. हे भान या लेखातून मिळते. हा लेख वाचकांनी जरूर वाचायला हवा. भारतभर फिरत असताना माणुसकी फुलवणारी माणसे विकास वाळके यांना भेटली.त्यांच्याविषयी आपुलकीने ‘माणूसपण पेरणारी माणसे’ या लेखात लिहिले आहे.

ॲड. देवदत्त परुळेकर यांनी माणसाचे माणूसपण कशात आहे याचा वेध घेतला आहे तर हेमंत देसाई यांनी माणुसकीचा जागर करणाऱ्या महान व्यक्तींविषयी लिहिले आहे. वंचित शोषित घटकातील माणुसकीने ओतप्रोत असलेल्या गिरिजाबाई यांची जीवघेणी गोष्ट सांगितली आहे समीर गायकवाड यांनी. तर एकनाथ पाटील यांनी सांस्कृतिक क्षेत्रातील माणुसकीचे निवडक अनुभवकथन केले आहे. अपर्णा चव्हाण यांनी माणुसकी आणि भावनिक बुद्धिमत्ता यांचा सहसंबंध उलगडला आहे.मानवता या जीवनमूल्याचे महत्त्व राजाभाऊ चोपदार यांनी विशद केले आहे. गजानन कोर्तलवार यांनी शिक्षण आणि माणूस या गोष्टींचा सखोल विचार करून हरवत चाललेली मूल्य व्यवस्था याबाबत पोटतिडकीने आपले विचार मांडले आहेत.एकूणच साहित्यिकांनी मानवता मूल्याचा वेध घेऊन केलेली वैचारिक मांडणी म्हणजे सजग वाचकांसाठी पर्वणीच होय.

तिसरा विभाग कवितांचा असून जेष्ठ कवी अजय कांडर यांनी तो संपादित केला आहे.’ कवितेच्या सच्च्या शब्दासाठीची प्रार्थना’ या शिर्षकाखाली अजय कांडर यांनी सोशल मीडियाच्या दिशेने वेगाने धावताना आपल्यासोबत कवितेचं झालेलं बाजारीकरण ,कविता निर्मितीचा ढासळत चाललेला दर्जा याबाबत दीर्घ चिंतन मांडले आहे.कविता जोखमीने लिहिणे आणि कवितापण टिकवणे ही गोष्ट अपवादात्मकच ठरते आहे. ही खंत व्यक्त केली आहे. हे कवितेच संपादकीय मुळातूनच वाचायला हवं. कांडर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांसंदर्भात चिंतनही व्हायला हवं. चांगली कविता लिहूनही प्रसिद्धीपासून दूर राहणाऱ्या प्रमिता तांबे, योगिता राजकर, सुजाता राऊत, मनीषा शिरटावले या आजच्या पिढीतील चार कवयित्रींच्या प्रत्येकी तीन कविता या विभागात आहेत. मानवी जगण्याला समग्रपणे भिडून समकाळाचे जगणे, त्यातील ताणेबाणे आणि त्यातून घेतलेला ‘स्व’अस्तित्वाचा शोध या कवितांच्या केंद्रस्थानी आहे. या कविता मुळातून वाचायला हव्यात. मानवता मूल्याचा जागर जागविणाऱ्या ‘परंतु ‘च्या संपादक मंडळास मनापासून धन्यवाद !

पुस्तकाचे नाव – परंतु दिवाळी अंक २०२४
संपादक – सुशील धसकटे
प्रकाशक – हर्मिस प्रकाशन,पुणे
मूल्य २५०₹


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading