November 21, 2024
The sweetness of kokum J D Paradkar article
Home » कोकमचा गोडवा !
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कोकमचा गोडवा !

कोकमच्या सालींमध्ये साखर टाकून त्याचे अमृततुल्य असे कोकम सरबत तयार केले जाते. त्याच्या बियांपासून उत्कृष्ट चवीचं पन्ह बनवलं जातं. या फळाचा प्रत्येक भाग उपयोगात आणला जातो. कोकणात स्वयंपाकामध्ये चिंच वापरण्याची फारशी पद्धत नाही. येथे प्रत्येक घरात विविध पदार्थांमध्ये दर्जेदार असे आमसूल म्हणजेच कोकम वापरले जाते. कोकम पासून तयार केले जाणारे आगळ सोलकढी तयार करण्यासाठी वापरतात.

जे. डी. पराडकर 9890086086

कोकम म्हटलं की डोळ्यासमोर येतो, तो त्याच्यातील आंबटपणा ! कोकम जर चवीला आंबट असेल, तर लेखाचं शीर्षक मी ” कोकमचा गोडवा ” असं कसं दिलं? असे आपल्याला वाटणे साहजिकच आहे. मात्र कोकमच्या आंबटपणाचा गोडवा थेट आमच्या बालपणाशी जोडला गेला आहे. आमच्या बालपणी आटकं , अळू , पेरु , पपनस, साखर जांभ, विलायती जांभ , करवंद , तोरणं , जांभळं आणि कोकम म्हणजेच रातंबा अशा प्रकारच्या फळांची चव आम्हाला चाखायला मिळायची. बाजारात मिळणाऱ्या महागड्या फळांचा आणि आमचा फारसा कधी संबंध आला नाही. त्या काळात रानमेवा म्हणजेच फळं, असं समीकरण ठरलेलं होतं. एखाद्या रातंब्याची चव आम्ही तासंतास घेतल्याचं मला आजही चांगलं आठवतंय. यातील बरीचशी फळ ही स्वतः झाडावर चढून काढण्याचा आनंद देखील आम्ही लुटला आहे. झाडावर चढून स्वतःच्या हातानं एखादं फळ काढणं, हे धाडसाचं आणि कौतुकाचं मानलं जायचं. रातंब्याच्या एखाद्या फळाकडे तासंतास बघत त्याचा गोडवा लुटण्याचा आनंद अक्षरशा अवर्णनीय असाच होता.

आमच्या आंबेड खुर्दच्या घरी असणाऱ्या बागेत रातंब्याची असंख्य झाड आहेत. बालपणी या रातंब्यावर प्रक्रिया करुन विविध प्रकारचे उद्योग केल्याचे आम्ही पाहिले आहे. यासाठी आमच्याकडे चिनी मातीच्या मोठ्या भरण्या होत्या. याबरोबरच लाकडी होडी सारखा एक आकार तयार करून घेण्यात आला होता. रातांबे काढून झाल्यानंतर ते आमच्या पाणछपरात अक्षरशः ढिगाने लावले जायचे. यामधून हिरवे आणि पिके रातंबे वेगळे केले जात. हिरवे रातंबे कापून त्याची फोडं तयार करत, ती उन्हात वाळवण्यासाठी टाकली जात. पिकलेल्या रातांब्यांपासून आमसूल, कोकम सरबत, आगळ असे विविध प्रकार तयार करत. कोकमच्या बिया देखील उन्हात वाळत घालून त्या सुकवून ठेवल्या जात असत. या बियांच्या तेलाचा आयुर्वेदिक औषध म्हणून उपयोग होत असतो. आमसुले तयार करताना त्याची पद्धत लांबलचक अशी आहे. ती अधिक टिकाऊ आणि आंबटसर होण्यासाठी त्याला मीठ घातलेल्या कोकमच्याच पाण्याची पुटं दिली जातात. पाच, सहा आणि सात वेळा आमसुलांना पुटं देण्याची पद्धत आहे. आता मात्र या पूर्वीच्या पद्धतीने आमसुले तयार केली जात असतील की नाही ? याबाबत शंका वाटते.

बालपणी एक कोकम हातात घेतल्यानंतर, त्याच्या वरील भागाचे देठ काढून त्यामध्ये मीठ आणि किंचित तिखट झाडूच्या हिरकुटाने भरत, हा हिरकुट तासनतास रातंब्यात बुडवत चाटत बसण्याचा उद्योग आम्ही केला आहे. कोकम चवीला आंबट असतो. मात्र बालपणी त्यामध्ये तिखट मीठ मिसळून, तासंनतास त्याच्यातील रस चाखण्याचा आनंद आम्ही लुटला असल्याने, निदान मला तरी कोकमच्या या गोडव्याचा गुणधर्म चिरंतर लक्षात राहिला आहे. माझ्याप्रमाणे ज्यांनी ज्यांनी हा आनंद लुटला आहे, त्यांना हा प्रसंग नक्की आठवेल आणि काही काळ का होईना, परत एकदा आपलं बालपण आणि ते सोनेरी दिवस नक्कीच आठवतील. ज्या कोकमने आपल्या चवीच्या आंबटपणाचा गुणधर्म आम्हाला आनंद देऊन गोडव्यात बदलला, त्या कोकमची आठवण माझ्या मनात कायम राहिली आहे. एखादं कोकमचे झाड पाहिलं आणि त्यावर पिकलेले रातंबे दिसले, तर मला आजही बालपण आठवतं. त्या काळात कोकमने कदाचित जिभेला काहीसा आंबटपणा अनुभवायला दिला असेलही मात्र मनात आनंदाचा गोडवा कायम भरून ठेवला.

कोकमच्या सालींमध्ये साखर टाकून त्याचे अमृततुल्य असे कोकम सरबत तयार केले जाते. त्याच्या बियांपासून उत्कृष्ट चवीचं पन्ह बनवलं जातं. या फळाचा प्रत्येक भाग उपयोगात आणला जातो. कोकणात स्वयंपाकामध्ये चिंच वापरण्याची फारशी पद्धत नाही. येथे प्रत्येक घरात विविध पदार्थांमध्ये दर्जेदार असे आमसूल म्हणजेच कोकम वापरले जाते. कोकम पासून तयार केले जाणारे आगळ सोलकढी तयार करण्यासाठी वापरतात. सोलकढीची चव अवीट अशीच असते. कोकमच्या झाडाला कमालीचा लाग असतो. झाडावरून कोकम काढणे, तसे कौशल्याचे काम मानले जाते. मोठ्या प्रमाणावर आणि विक्रीसाठी कोकम सरबत बनवणारे सध्या ३५ रुपये किलोने पिकलेले रातंबे खरेदी करत आहेत. कोकणच्या ग्रामीण अर्थकारणात ‘ कोकम ‘ महत्त्वाची भूमिका बजावत असतो. हे अर्थकारण बऱ्याचदा घरातील महिलेच्या हातामध्ये असते. उत्तम दर्जा असलेली आमसुले ३०० ते ३५० रुपये किलो या दराने विकली जातात. कोकम हे फळ आकाराने छोटे असले, तरी त्याचे फायदे मात्र खूप मोठे आहेत. हा लेख लिहीत असतानाच आमचा मामी भाऊ रवींद्र उर्फ नाना हळबे याने मला पिशवी भर कोकम आणून दिले. हा जर योगायोग म्हटले तर उद्या हापूस आंब्यावर लेख लिहायला काहीच हरकत नाही.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading