November 22, 2024
Bhartiya Bhasha v sahitya Dr Sunilkumar Lavte Book
Home » भाषा आणि साहित्याच्या समृद्धतेची ओळख करून देणारे पुस्तक
मुक्त संवाद

भाषा आणि साहित्याच्या समृद्धतेची ओळख करून देणारे पुस्तक

अभ्यासपूर्ण निरीक्षणातून आकाराला आलेले हे पुस्तक म्हणजे केवळ भाषा आणि साहित्याचा इतिहास, सद्य:स्थिती सांगणारा दस्तऐवज नाही; तर या पुस्तकातून भारताचा स्वभाव लक्षात येतो. प्रत्येक प्रदेशामध्ये इतिहासात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांची वैशिष्ट्यपूर्ण नोंद भाषिक अंगाने लेखकाने घेतली आहे. भारताचा हजारो वर्षांचा सामाजिक- सांस्कृतिक इतिहासच या भाषिक अभ्यासातून समोर आलेला आहे. भाषेवर प्रभाव टाकणाऱ्या घटनाप्रसंगांची नोंद आहे. माणसाची भाषिक अस्मिता किती प्रबळ असते, माणूस आपल्या भाषेबाबत किती संवेदनशील असतो याचे अनेक पुरावे या लेखनातून समोर येतात. प्रत्येक भाषेचे अंतरंग हे ज्ञानभांडार असते. या ज्ञानभांडारांचे स्वरूपच या पुस्तकातून आता उपलब्ध झाले आहे. साने गुरुजींच्या स्वप्नातील आंतरभारतीचे स्वप्न सत्यात येण्यासाठी आणि देशाच्या सांस्कृतिक ऐक्याची वीण सूचित करण्याऱ्या अशा पुस्तकांची गरज आजच्या वर्तमानात अधिक आहे.

नंदकुमार मोरे,
मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

भारतीय परंपरांचा शोध घेताना, येथील भाषा आणि साहित्याचे समृद्ध संचित कोणाच्याही नजरेत भरते. ही गोष्ट जगभरातील भाषाभ्यासकांचे लक्ष वेधणारी आहे. त्यामुळेच कदाचित आधुनिक भाषाभ्यासाचा प्रारंभ समजले जाणारे सर विल्यम जोन्स यांचे ऐतिहासिक व्याख्यान कोलकात्याच्या एशियाटिक सोसायटीत या भूमीवर झाले. जॉर्ज ग्रिअर्सनने केलेले सर्वेक्षणही हे संचित आणि येथील सांस्कृतिक विविधता अभ्यासण्यासाठी केले. हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या येथील शेकडो भाषांमुळे मौखिक परंपरेतील साहित्याची मोठी परंपरा या भूमीला लाभली आहे. भारतात प्रदेश वैशिष्ट्यांनुसार बदलणारी भाषा, खाद्यसंस्कृती, पेहरावसंस्कृती ही येथील सांस्कृतिक समृद्धता आहे. ही समृद्धता त्या-त्या भाषेतील साहित्यातून अनुभवता येते. हजारो वर्षांपासून येथील माणूस या सांस्कृतिक वैभवात जगतो आहे. ही विविधता येथील ऐक्यभावाच्या आड कधी आलेली नाही. देशात असंख्य प्रादेशिक भाषा असल्या तरी, अंत:स्थ सर्व भारतवर्षाचे हृदय एक असल्यानेच महात्मा गांधी सबंध राष्ट्राला एका भाषेने बांधू पाहत होते. साने गुरुजींनी या दृष्टीनेच ‘आंतरभारती’चे स्वप्न पाहिले. यापुढे जाऊन रवींद्रनाथ टागोर ‘विश्वभारती’चे स्वप्न पाहत होते. यांच्या स्वप्नपूर्तीसाठी अहोरात्र झटणारे अनेक लोक जसे आहेत, तसेच या स्वप्नांना खीळ घालणाऱ्या अनेक प्रवृत्तीही इतिहासात दिसतात. दक्षिणेत आजही हिंदीला होणारा विरोध, अनेक राज्यांमध्ये भाषांवरून तयार झालेला सीमावाद याची उदाहरणे आहेत. येथील भाषिक संघर्षाचे समाजशास्त्र हा अतिशय महत्त्वाचा अभ्यास विषय आहे. गोव्याचे ज्ञानपीठप्राप्त लेखक रवींद्र केळेकर यांनी तो अतिशय नेमकेपणाने मांडलाही आहे. अशा प्रयत्नातून येथील अभिमानास्पद सांस्कृतिक संचित समोर येताना दिसते. असाच एक महत्त्वाचा प्रयत्न ज्येष्ठ लेखक डॉ.सुनीलकुमार लवटे यांनी ‘भारतीय भाषा व साहित्य’ या पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे.

भारतातील भाषिक आणि सांस्कृतिक विविधता हा जगाच्या कौतुकाचा विषय आहे. येथे सुमारे दोन हजारांहून अधिक भाषा-बोली बोलल्या जात होत्या. परंतु, अलीकडच्या काही वर्षांमध्ये या भाषांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे. ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांच्या ‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण’मधून ही बाब समोर आली आहे. येथील भाषा नष्ट होण्याच्या प्रक्रियेला ब्रिटिशांच्या वसाहतीबरोबरच जागतिकीकरणानंतरचे बदलते समाजजीवन कारणीभूत ठरते आहे. त्यामुळे अशा काळात आपल्या भाषा आणि साहित्याच्या समृद्धतेची ओळख करून देणारे डॉ. लवटे यांचे पुस्तक औचित्यपूर्ण ठरते. अशा पुस्तकाने आपल्या वैभवशाली भाषा आणि साहित्याची ओळख होण्याबरोबरच परस्परां-विषयीचा सद्‌भाव वाढीला लागण्यास हातभारच लागणार आहे.

 कोणतीही भाषा समाजाच्या जीवनव्यवहाराचे साधन असते. समाजाला भाषा परंपरेने प्राप्त झालेली असते. त्यामुळे ती केवळ समाजव्यवहाराचे साधन एवढ्यापुरती सीमित नसते, तर ती त्या समाजाचे सारे पारंपरिक संचित पुढील पिढ्यांकडे वहन करणारी सांस्कृतिक नदी असते. समाजाच्या परंपरेतल्या अनेक गोष्टींची ती वाहक असते. म्हणूनच, कोणत्याही समाजाची ओळख करून घेण्यासाठी त्या समाजाची भाषा आणि साहित्य हा सर्वांत विश्वसनीय असा दस्तऐवज असतो.

भारत हा अनेक धर्म, पंथ, जाती-जमातींना एकत्र बांधून ठेवणारा देश आहे. येथे अनेक धर्म, पंथ हजारो वर्षे एकत्र नांदतात. त्याचबरोबर भौगोलिक दृष्ट्याही हा देश संपूर्ण आहे. मानवी जीवनात भूगोल अतिशय महत्त्वाची असते. भाषांची विविधता भौगोलिक विविधतेतूनच आकाराला आलेली आहे. त्यामुळे भूगोल माणसाचे अनुभवविश्व समृद्ध करतो. भिु-भिु भाषांतील साहित्यामध्ये अनुभवांची वैविध्यपूर्ण समृद्धता त्यामुळेच दिसून येते. ही विविधता अनुभवणे, समजून घेणे सहिष्णुवृत्तीच्या वृद्धीसाठी आवश्यक आहे. त्यातूनच भारतात ऐक्य नांदणार आहे. अशा ऐक्यभावनेच्या विकासासाठी साने गुरुजींनी ‘आंतरभारती’ची संकल्पना मांडली. यासाठी त्यांनी परस्परांच्या भाषा शिकण्याचा, साहित्य समजून घेण्याचा आग्रह धरला. भारतातील विविध भाषा-साहित्याच्या परिचयातूनच गुरुजींना भारताचे हृदय एक असल्याचे लक्षात आले होते. भारताचे अंत:करण असेच एक राहावे, ही त्याची आंतरभारती संकल्पनेमागील भूमिका होती. परंतु, साने गुरुजींचे हे स्वप्न अस्तित्वात येण्यासाठी व्हायला हवेत असे प्रत्यक्ष प्रयत्न झाले नाहीत. या दृष्टीने सुरू केलेल्या कामांना अनेक मर्यादा पडलेल्या आहे. मात्र अलीकडे साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट या शासकीय संस्थांबरोबरच आंतरभारतीसारख्या काही संस्था, विविध नियतकालिके, अनेक प्रकाशन संस्थांनी भारतीय भाषांमधील साहित्याचे अनुवाद मोठ्या प्रमाणात सुरू केले आहेत.

या आंतरभारतीय दृष्टीनेच डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी ‘दिव्य मराठी’ या दैनिकात लिहिलेली लेखमाला पुस्तकरूपाने प्रकाशित केली आहे. भारतीय राज्यघटनेने राजभाषा म्हणून मान्यता दिलेल्या बावीस भाषांमधील साहित्याची ओळख करून देणारा हा प्रकल्प भारतीय भाषा आणि साहित्याचा परिचय करून घेण्यासाठी महत्त्वाचा ठरला आहे. पुस्तकाच्या प्रारंभी अभ्यासपूर्ण प्रस्तावनेनंतर डॉ.लवटे यांनी भारतीय भाषा आणि साहित्याचे स्वरूप संक्षेपाने लिहिले आहे. यामध्ये त्यांनी, ‘आज भारतीय साहित्य अनेक भाषांमधून लिहिले जात असले तरी तिचे स्वरूप मात्र एकात्म आहे, त्या साहित्याचा पाया भारतीय संस्कृती आहे’ आणि ‘भारतातील आर्य व द्रविडी कुळातील भाषा भिु न मानता त्यांतील समान दुवे, चरित्र, विचार, मिथके सार्वत्रिक करण्यातून भारतीय साहित्याची सार्वत्रिक व समान ओळख निर्माण होऊ शकते’- यांसारखी विचारप्रवृत्त करणारी अनेक महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली आहेत.

भारतीय राज्यघटनेने राजभाषा म्हणून मान्यता दिलेल्या आणि साहित्याची प्रदीर्घ परंपरा असलेल्या आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कुड, काश्मिरी, कोकणी, मल्याळम्‌, मणिपुरी, मराठी, मैथिली नेपाळी, उडिया, पंजाबी, संथाली, संस्कृत, सिंधी, तमिळ, तेलुगू, उर्दू या सर्व भाषा आणि साहित्याची वैशिष्ट्यपूर्ण रीतीने ओळख प्रस्तुत पुस्तकात आहे. याबरोबरच भारतीय भाषांची समृद्धता लक्षात घेण्यासाठी बराच मजकूर या पुस्तकात आलेला आहे. आपल्या देशात राज्यांना आपली राजभाषा निश्चित करण्याचा अधिकार दिलेला असल्याने भारतीय संघराज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात एकूण एकतीस भाषा राजभाषा म्हणून मान्यता मिळालेल्या आहेत. भारतीय राजभाषांचा विचार करता, भारतात परकीय इंग्रजी भाषा आणि हिंदी या दोन भाषा सोळा राज्यांच्या राजभाषा आहेत. भारतात सर्वाधिक राजभाषा असलेले सिक्कीम हे छोटे राज्य आहे. या राज्यात भुटिया, लेपचा, लिंबू, नेवारी, गुरुंग, मगर, मुखिया, राई, शेरपा, तमंग या दहा राजभाषा आहेत. उर्दू आठ प्रांतांची राजभाषा आहे. छत्तीसगड, हरियाणा, मध्य प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांची हिंदी ही एकच राजभाषा आहे. तर अरुणाचल प्रदेश, नागालँड या दोन राज्यांची राजभाषा केवळ इंग्रजी आहे. अशा माहितीबरोबर राज्यांचे भाषिक धोरण, भाषाविषयक समजुती, भाषिक आग्रह याबाबतीत मौलिक तपशील या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.

प्रत्येक भाषेची आणि साहित्याची ओळख करून देताना त्या भाषेचा प्रदेश, तेथील नैसर्गिक साधनसंपत्ती, शेती, त्या प्रदेशाला लाभलेल्या सीमा, भाषासंपर्काचे स्वरूप, भाषिक प्रभावक्षेत्रे, स्थानिक नद्या, भौगोलिक वैशिष्ट्यता, तेथील माणूस, त्याचा इतिहास यासह भाषेचा घेतलेला आढावा वैशिष्ट्यपूर्ण वाटतो. कोणत्याही भाषेच्या-साहित्याच्या अभ्यासात या सर्व गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. प्रत्येक भाषा कशी व कोठे बोलली जाते, तिचे प्रादेशिक भेद किती, कोणते, ते कोठे व कसे आहेत, या भाषांचे निजभाषिक किती आहेत, या भाषांचे आदिम रूप कोठे, कोणत्या ग्रंथात सापडते, भाषेचे पुरावे कोणत्या शतकापासून उपलब्ध आहेत, कोणते महत्त्वाचे ग्रंथ-ग्रंथकार या भाषेत आहेत, त्यांचे योगदान काय- असे अनेकविध मुद्दे प्रत्येक भाषेच्या अभ्यासात विचारात घेतले आहेत. भारतातील जवळजवळ सर्वच भाषांमध्ये रामायण, महाभारतादी आर्ष महाकाव्ये उपलब्ध आहेत. या महाकाव्यांचे स्वरूप भाषेनुसार वेगळे आहे. एखाद्या भाषेमध्ये लेखनासाठी कोणते रचनाबंध वापरले जातात. उदाहरणार्थ- आसामी भाषेतही बखरी आहेत. त्यांना आसामीत बुरंजी म्हणतात. त्या-त्या भाषेत शब्दकोशादी साहित्य किती आहे. कोण लेखक सर्वांत महत्त्वाचा आहे, त्याचे योगदान काय, ज्ञानपीठसारखा सन्मान कोणाला मिळाला, त्यांच्या कोणत्या कलाकृतीसाठी मिळाला, त्या कलाकृतीचे स्वरूप काय- अशा अनेक गोष्टींची चर्चा या पुस्तकात करण्यात आली आहे. परंतु, माहितीची केवळ जंत्री देणे एवढाच हेतू या लेखनामागे नाही; तर प्रत्येक भाषेचे वेगळेपण, तिचे सामर्थ्य, त्या भाषेचा आणि साहित्याचा वैभवशाली इतिहास अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय भाषिक चर्चेसाठी लेखकाने आधुनिक भाषाविज्ञानातून विकसित झालेली भाषांकडे पाहण्याची दृष्टी अंगीकारली असल्याने हा अभ्यास शास्त्रीयही झाला आहे.

प्रस्तुत पुस्तकामध्ये प्रत्येक भाषेची आणि त्या भाषेतून निर्माण झालेल्या साहित्याची योग्य पद्धतीने दखल घेतलेली आहे. उदाहरणासाठी बंगाली भाषेचा त्यांनी घेतलेला वेध पाहता येईल. बंगाली ही इतर भारतीय भाषांवर प्रभाव टाकणारी महत्त्वाची भाषा आहे. भारताचे राष्ट्रगीत बंगाली भाषेतील आहे. भारताला लाभलेले एकमेव साहित्याचे नोबेल पारितोषिक बंगालीने मिळवून दिले आहे. दोन राष्ट्रांचे राष्ट्रगीत रचण्याचा सन्मान लाभलेली ही भाषा साहित्यनिर्मितीबाबत समृद्ध आहे. राजभाषांमधील सर्वाधिक पुस्तके बंगालीमध्ये विकली जातात. तेथील कोणत्याही पुस्तकाची सरासरी आवृत्ती पाच हजार प्रतींची असते. प्रत्येक बंगाली माणूस आपल्या मासिक उत्पन्नातील काही भाग पुस्तकांवर खर्च करतो, ही बंगालची एक ओळख आहे. अशा माहितीपूर्ण ऐवजामुळे हे पुस्तक संग्रही ठेवावे असे झाले आहे.

अभ्यासपूर्ण निरीक्षणातून आकाराला आलेले हे पुस्तक म्हणजे केवळ भाषा आणि साहित्याचा इतिहास, सद्य:स्थिती सांगणारा दस्तऐवज नाही; तर या पुस्तकातून भारताचा स्वभाव लक्षात येतो. प्रत्येक प्रदेशामध्ये इतिहासात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांची वैशिष्ट्यपूर्ण नोंद भाषिक अंगाने लेखकाने घेतली आहे. भारताचा हजारो वर्षांचा सामाजिक- सांस्कृतिक इतिहासच या भाषिक अभ्यासातून समोर आलेला आहे. भाषेवर प्रभाव टाकणाऱ्या घटना-प्रसंगांची नोंद आहे. माणसाची भाषिक अस्मिता किती प्रबळ असते, माणूस आपल्या भाषेबाबत किती संवेदनशील असतो याचे अनेक पुरावे या लेखनातून समोर येतात. प्रत्येक भाषेचे अंतरंग हे ज्ञानभांडार असते. या ज्ञानभांडारांचे स्वरूपच या पुस्तकातून आता उपलब्ध झाले आहे. साने गुरुजींच्या स्वप्नातील आंतरभारतीचे स्वप्न सत्यात येण्यासाठी आणि देशाच्या सांस्कृतिक ऐक्याची वीण सूचित करण्याऱ्या अशा पुस्तकांची गरज आजच्या वर्तमानात अधिक आहे.

भारतीय भाषांची समृद्धता सूचित करणारे मुखपृष्ठ, भाषेची नेमकी ओळख देणारे प्रत्येक लेखाचे लालित्यपूर्ण शीर्षक, त्या-त्या राजभाषेची पारंपरिक व सांस्कृतिक ओळख देणारे प्रत्येक लेखासाठी निवडलेले चित्र, प्रत्येक भाषेच्या मौखिक साहित्याचे केलेले सूचन अशा अनेक दृष्टीने हे पुस्तक ‘घडवले’ आहे. शिवाय पुस्तकाच्या शेवटी ‘जागतिकीरणानंतरचे भारतीय साहित्य’ हा लेख आणि जोडलेली तीन परिशिष्टेही अतिशय महत्त्वाची आहेत. त्यात पुस्तक लेखनाचा हेतू अधारेखित करणारी गटेची विेशसाहित्याची संकल्पना, रवींद्रनाथ टागोरांची विश्वभारती संकल्पना आणि साने गुरुजींची आंतरभारती संकल्पना समजावून दिल्या आहेत.

पुस्तकाचे नाव – भारतीय भाषा व साहित्य 
लेखक : डॉ. सुनीलकुमार लवटे 
प्रकाशक – साधना प्रकाशन, पुणे 
पृष्ठे : 186 / मूल्य रु. : 200/-  


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading