October 6, 2024
Engineering Note Paper Mahadev Pandit article
Home » Privacy Policy » अभियांत्रिकी टीपकागद
मुक्त संवाद

अभियांत्रिकी टीपकागद

अभियांत्रिकी टीपकागद
मुंबई महानगर माझे कार्य क्षेत्र. मुंबईची गतिमान जीवनशैली आत्मसात केली. मुंबईतील स्थापत्य कला व धावत्या संस्कृतीशी समरस झालो. सह कुटुंब परदेश वारीला गेल्या नंतर तेथील स्थापत्य शैलीची आपल्या मुंबईतील विविध स्थापत्य व नैसर्गिक शैलीशी तुलना करतो. मुंबई या मोठ्या अंतर राष्ट्रीय शहराच्या तीन दशकाच्या सहवासाने अविस्मरणीय स्थापत्य ज्ञान व दैनंदिन व्यावहारिक ज्ञान टिपता आले.

महादेव पंडित, स्थापत्य अभियंता
मुंबई

दगड- विटा, लाइन – लेव्हल, गवंडी -बिगारी, लाफा- मुंडा, खोदाई- भरणी, बांधकाम यश-अपयश अशा अनेक जोड स्थापत्य शब्दांचा अनुभव प्रत्येक स्थापत्य अभियंत्याच्या जीवनात येतच असतो. स्थापत्य अभियांत्रिकी बांधकाम विभागात कॅाक्रिटला खुप महत्त्वाचे स्थान आहे. दही, दूध, तूप, साखर व मध या मिश्रणाला अमृत हे नाव अगदी तसेच खडी, वाळू, सीमेंट, पॅालिमर आणि पाणी या मिश्रणाला कॅाक्रीट ऐसे नाव !. अमृताची गोडी व कॅाक्रीटची शक्ती हा यथार्थ अनोखा संबंध स्थापत्य अभियंत्याचे जीवन किती मौल्यवान आहे हे सांगून जातो आणि म्हणूनच स्थापत्य अभियंत्याने आपले जीवन उपभोगताना लहानसहान गोष्टी वा प्रसंगांतून तसेच आजूबाजूला चालू असलेल्या विविध स्थापत्य बांधकाम प्रकल्पातून योग्य व अमृत तुल्य ज्ञान शोधले पाहिजे आणि ते नेहमी टिपले पाहिजेत. सद्या दाही दिशांत बांधकामाचे विविध प्रकल्प प्रगती पथावर असतात, त्यामध्ये विविध प्रकारचे ज्ञान उपलब्ध असते, ते अनमोल ज्ञान अभियंत्यानी टीपकागदा प्रमाणे सतत टिपले पाहिजेत. दाही दिशांत उपलब्ध असलेले अमृत तुल्य ज्ञान संपादन केल्यामुळे स्थापत्य अभियंता आपल्या क्षेत्रात निपुण होऊ शकतो आणि योग्य निर्णय घेऊन यशस्वी होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करू शकतो. किंबहुना स्थापत्य ज्ञान मिळवता येणे व स्थापत्य प्रकल्पातून स्थापत्य ज्ञानाचा आनंद लुटणे सोपे आहे, पण स्थापत्य अभियंत्याने तशी ज्ञान शोषक संधी आपल्या सभोवतालच्या विविध बांधकाम प्रकल्पात शोधली पाहिजे आणि तशी निरीक्षणात्मक सूक्ष्म दूरदृष्टी, जिद्द व मेहनत करण्याची क्षमता प्रत्येक स्थापत्य अभियंत्यास असायला हवी. मी सुद्धा हाच दृष्टीकोन ठेवून निकोप व निर्मळ मनाने जीवनातील लहानसहान गोष्टींतून, प्रसंगातून टीपकागदाप्रमाणे स्थापत्य ज्ञान टिपत आहे आणि यापुढेही टिपत राहणार.

बहुतेक स्थापत्य अभियंत्यांना पैसा-अडका, दाग-दागिने, धन- दौलत, जमीन-जूमला, चैन-विलास, मौज-मजा, सोने-नाणे, गाडी- बंगला, छानछोकीची जीवनशैली यातच जीवनानंद दडला आहे, असे वाटते. काही अंशी सुख त्यात असेलही, मात्र त्यात निर्मळ व निकोप ज्ञान मात्र नक्की नाही. खऱ्या निकोप ज्ञानात व व्यक्तीत ज्ञान रुजविण्याच्या वृत्तीची भावना वट वृक्षाच्या मुळांप्रमाणे खुप खोल अंत:करणात रूजलेली असते. अत्यंत साधेपणाने राहून व वागून लहानसहान प्रसंगातून, गोष्टींतून उत्स्फूर्तपणे ते स्थापत्य ज्ञान टिपतात. त्यांच्या स्वभावातच ज्ञान बुद्धीने कायमचा वास केलेला असतो.

मुंबई महानगर माझे कार्य क्षेत्र. मुंबईची गतिमान जीवनशैली आत्मसात केली. मुंबईतील स्थापत्य कला व धावत्या संस्कृतीशी समरस झालो. सह कुटुंब परदेश वारीला गेल्या नंतर तेथील स्थापत्य शैलीची आपल्या मुंबईतील विविध स्थापत्य व नैसर्गिक शैलीशी तुलना करतो. मुंबई या मोठ्या अंतर राष्ट्रीय शहराच्या तीन दशकाच्या सहवासाने अविस्मरणीय स्थापत्य ज्ञान व दैनंदिन व्यावहारिक ज्ञान टिपता आले. मुंबईतील अनेक सुप्रसिद्ध वास्तु विशारद, स्ट्रक्चरल इंजिनियर्स, बांधकाम व्यावसायिक व बांधकाम कौशल्य प्राप्त कुशल कारागीर यांच्या सोबत काम करताना त्यांच्या देह बोलीतून तसेच त्यांच्या बांधकाम प्रकल्पातून बरेच व्यावहारिक व स्थापत्य ज्ञान टिपत राहतो त्यातून खुपच बाबी आनंद व समाधान देऊन जातात.

जगात भारी कोल्हापूरी अशी विनोदी नामावळी परिधान केलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील हिरण्यकेशी नदीच्या काठावर वसलेल हाजगोळी बुद्रूक हे माझ छोटं खेडेगाव, त्यामुळे मुंबई व पुण्यात पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या स्थापत्य अभियंता मित्रांचा ग्रुप बनवला. काही कारणांनी किंवा जमेल तसे एकमेकाकडे न चुकता जमत असतो. आप आपल्या बहरलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी संसारावर चर्चा करत ज्ञान देतो व घेतो. गप्पा टप्पा, हास्य विनोद, महाविद्यालयातील आठवणी, प्रकल्पावरील घाई गडबड तसेच प्रकल्पावरील आव्हाने व त्याला आवश्यक असणारे अभियांत्रिकी जुगाड यात रममाण होत मन हलके फुलके करतो आणि त्यातून उपयुक्त ज्ञानाचे बिंदू टिपत राहतो.

हिरण्यकेशीच्या काठावरील हाजगोळी बुद्रूक या माझ्या मुळ खेडेगावांशी माझी नाळ पक्की जुळलेली आहे, त्यामुळे जेंव्हा जेंव्हा गावी जातो तेंव्हा तेंव्हा हिरण्यकेशीच्या काठावर तसेच भादवण येथील कोल्हापूर टाईप बंधार्‍यावर जाऊन ज्ञानाचे व आनंदाचे क्षण टिपता टिपता शालेय जीवनाचे दिवस कसे व केव्हा संपले ? याचे स्मरण करत तेथेच घटका भर निवांत रमत राहतो. माझ्या आई-वडीलांचे तसेच आजी आजोबांचे निवास स्थान म्हणजे आमचे जुन्या पद्धतीचे गाईच्या शेनाने सारवलेल्या लगी सोप्याचे व समोरच गाई बैलांचे विश्रांती गृह म्हणजे गोठा असलेले मातीच्या भिंतीचे व खापराच्या छप्पराचे घर !. ऐसपैस घर, घरा पुढील गजबजलेली गल्ली, काका-काकू, बहीण-भाऊ, आत्या- मामा, दादा – वहिनी व गल्लीतील घरोब्याची कुटुंबं, त्यांच्याशी भेटी गाठी, गप्पा गोष्टी करताना मन रमून जाते.

१९७५ च्या सुमारास म्हणजेच माझ्या बालपणात पावसाळ्यात घरासमोर पावसाच्या सरी पडून गेल्यानंतर गल्लीतून वहात असलेल्या पाण्याला आम्ही सर्व बालक मित्र मंडळी हाताने व पायाने तिथल्याच मातीचा बांध घालून पाणी गल्लीत अडवत होतो व नंतर त्या छोट्या साठवण तलावात कागदाच्या बोटी तयार करूण पाण्यात सोडत होतो पण त्या वेळी आम्हाला या बालपणाच्या खेळामध्ये मातीच्या धरणांचे व आजच्या बोटींगचे रहस्य दडलेले होतं याची कल्पना येत नव्हती. गावातील प्रतिष्ठित व्यक्तींशी राजकारण व शैक्षणिक विषयांवर चर्चा, जुन्या जाणत्या कार्यरत स्थापत्य शाखा अभियंत्याच्या निवास स्थानी स्थापत्य अभियांत्रिकी तंत्रज्ञानावर सविस्तर चर्चा, तसेच माझे शालेय जीवन सुख समृद्ध केलेल्या माझ्या गुरूजना सोबत नव नवीन चालू घडामोडीवर गप्पा गोष्टी करण्यात मी नेहमीच रमून जातो. माझे परमपूज्य गुरु व वडील (आन्ना) , शेतीत मुरलेले जेष्ठ चुलत बंधु (दादा) व माझे काका म्हणजे (बाबा) ह्या त्रिमूर्तिने मला सेंद्रिय शेती कशी करायची तसेच भूमि पूजन, पायाभरणी, गणेश पट्टी, भिंतींना चिखल व मातीचा गिलावा, ऊसाचा घाणा, बैलगाडी, नदीवरची पाण्याची मोट, साडेतीन मुहूर्त, शेतीचे खळे, रोप लावणी, पारंपारिक देव-देवसकी, गावाच्या रूढी परंपरा , शेत नांगरणी, पेरणी तसेच भाताच्या रोप लावणीला शेतातील वाफ्यात बनवलेला शेत मातीचा एकसंध चिखल या विषयी खुप ज्ञान देत असत त्यामुळे माझे तनमन हलके फुलके व आनंदी व्हायचे, त्याच बरोबर त्यामधून खुप मौल्यवान व अमृत रुपी तार्किक स्थापत्य ज्ञान सुध्दा मिळायचे आणि हे सगळे आनंदाचे क्षण व ज्ञानाचे अनेक ज्ञान बिंदू माझ्या मनाच्या टीपकागदावर टिपलेले असायचे.

आई भात सडताना, शेणाच्या गोवर्‍या करताना व रवीने ताक घुसळताना मी बालपणी खुप कुतूहलाने निरीक्षण करत होतो पण तेव्हा यामध्ये चिझलिंग एनर्जी तसेच फायबर मिश्रीत सीमेंट मॅार्तर (Mortar) सारखे बरेच अभियांत्रिकी ज्ञान लपलेले होते ते कळत नव्हत पण आज त्याची प्रचिती येते. आजही ते क्षण मला कायम जीवन आनंद व ज्ञान देत असतात.

खरे व्यावसायिक जीवन, माती पृथ:करणाचे ज्ञान, धरणे व इमारती मजबुतीकरणाचे ज्ञान, नॅान डिस्ट्रक्टीव्ह अल्ट्रासोनिक कॅाक्रिट परिक्षणाचे ज्ञान व आनंदाचे क्षण अनुभवले ते मुंबईत आल्यावरच. मुंबई व उपनगरात पावलो पावली उड्डाण पुल, मेट्रो रेल ब्रिज, रस्ते , सरकारी इमारती तसेच खाजगी विकासकांचे अनेक गगन चुंबी इमारतीचे प्रकल्प सहज आपल्या नजरेस पडतील त्यामधून प्रत्येक वेळी जाता येता सहज नजरेस पडणारी बारीक सारीक उपयुक्त तांत्रिक माहिती व ज्ञान स्थापत्य अभियंत्यानी टिपले पाहिजेत.

मुंबईतील ब्रिटीश राजवटीत बांधलेल्या अनेक सुंदर वास्तु तसेच सध्याच्या नव्या गगन चुंबी डौलदार मनमोहक इमारती नजरेत आणल्यानंतर अभियंत्याच्या व कारागीरांच्या कल्पक तांत्रिक बुद्धीला, ज्ञानाला व कौशल्याला दाद दिल्या शिवाय मन थांबतच नाही तसेच त्यामधून अनमोल ज्ञान टिपल्या शिवाय नजरेचे समाधान होत नाही. जुन्या जाणत्या बुजुर्ग तज्ञ स्थापत्य अभियंत्या सोबत प्रकल्प स्थळावर तांत्रिक भेटी साठी तसेच प्रगती पथाचा अहवाल घेण्यासाठी गेल्यानंतर तेथील स्थापत्य बांधकामाची सुरक्षितता, बांधकामाची तांत्रिक पध्दत, तंत्रज्ञानाची माहिती, गुण नियंत्रण, बांधकाम साहित्याची तांत्रिक माहिती व उपयुक्तता इत्यादी विषयी निरीक्षण करता करता माझ्या सूक्ष्म नजरेने स्थापत्य अभियांत्रिकीचं विस्तृत ज्ञान टिपले आणि त्या सर्व टिपलेल्या ज्ञानाचा वापर मी दैनंदिन व्यावसायिक जीवनात सतत करत असतो.

वरळी बांद्गा सागरी सेतु, कळंबोली उड्डाण पुल, समृद्धी महामार्गावरील पॅकेज १४ मधील एकंदरीत ८ किलोमीटर लांबीचा व १७ मीटर रुंदीचा दुहेरी बोगदा व दरी पूल ,दक्षिण मुंबईतील महापालिका भवन, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, अटल सेतु, मुंबईला पाणी पुरवठा करणारे भातसा धरण, मोडक सागर, कोस्टल रोड व समुद्राच्या तळाखालून नरीमन पॅाईटला उघडणारा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वाहतुकीचा बोगदा या आवडत्या प्रकल्प ठिकाणी माझे स्थापत्य मन खुपच रमते. या नव्या बदलाच्या निरीक्षणामध्ये मला १९९० दशकातील काळातील सुंदर मुंबई डोळ्यापुढे उभी राहते. तेव्हाची माझी मुंबई व ठाणे आता किती बदलले आहे ? याचा तुलनात्मक अभ्यास करतो आणि त्याचा मस्त अनुभव घेतो.

काल चक्रानुसार तंत्रज्ञान परिवर्तन अटळ असले तरी जुन्या बांधकाम पद्धतीच्या आठवणी मन सैरभैर करून जातात. नव्या- जुन्या तंत्रज्ञानातील व बांधकाम पद्धती मधील बदल मन अस्वस्थ करून जाते, जुन्या बांधकाम पद्धती मनात आनंदाने जपत व नव्या तंत्रज्ञानाचे व स्थायी परिवर्तनाचे प्रेमाने आनंदाने स्वागत करत मुंबईत नेहमीच स्थापत्य ज्ञान टिपत राहतो. ज्ञान आणि आनंद ह्या एकाच नाण्याचा दोन बाजू आहेत असे मनात गोड समीकरण बांधून प्रत्येकाने आपल्या सभोवतालच्या दैनंदिन कामकाजातून व स्थापत्य प्रकल्पातून ज्ञान व आनंद टिपत राहणे या क्रियेतून सुख म्हणजे नक्की काय असते ? या प्रश्नाचे उत्तर अभियंत्यांना नक्कीच मिळेल.

स्थापत्य अभियांत्रिकी तंत्रज्ञान मानवी शारीरिक रचनेशी तसेच दैनंदिन जीवनातील अनेक व्यावहारिक बाबींशी बहूतांशी मिळते जुळते व सुसंगत आहे. मानवी शरीरात जसे बलवान स्नायू व मजबूत हड्डी असतात अगदी त्याच धर्तीवर इमारतीच्या व उड्डाण पुलाच्या खांबात व तुळईत मजबूत लोखंडी सळया व शक्तिमान कॅाक्रिट असते. मानवाच्या शारीरिक वजनात प्रमाणापेक्षा जास्त वाढ झाली तर त्याला बरेच शारीरिक व मानसिक त्रास सुरू होतात अगदी त्याच प्रमाणे इमारतीवर सुध्दा बे कायदेशीर मजल्यांची वाढ केली तर भविष्यात इमारत कोसळण्याचा धोका उद्भवतो. स्थापत्य तंत्रज्ञान मानवाशी बर्‍याच अंशी सुसंगत आहे म्हणूनच प्रत्येकाने अगदी लहानपणापासून आई वडीलांच्या मार्गदर्शना मध्ये अभियांत्रिकी नजरेने व बारकाईने स्थापत्य शास्राचे तार्किक ज्ञान तसेच मानवी जीवनाची स्थापत्य अभियांत्रिकी शास्रीय समानता टिपली तर अभियंत्या बरोबरच अनेकांचे जीवन सुख समृद्ध व आनंदी तर नक्कीच होईल आणि त्या सोबत स्थापत्य अभियंत्याचा तांत्रिक ज्ञानकोष खुपच श्रीमंत होईल.

आचार्य चाणक्य म्हणतात ज्ञान हे खुप मोठे धन आहे म्हणूनच स्थापत्य अभियंत्यांनी आपल्या सोबत अभियांत्रिकी टीपकागद ठेवून सतत आपल्या दैनंदिन अभियांत्रिकी कामातून, अभियांत्रिकी मित्रांकडून, व्यावसायिक ऋणानुबंधातून, अभियांत्रिकी महाविद्यालयातील निष्णात प्राध्यापकाकडून, विविध तांत्रिक अहवालातून तसेच दाही दिशांना प्रगती पथावर असलेल्या विविध स्थापत्य प्रकल्पातून अनमोल ज्ञान टिपत राहिल्यास, त्यांना स्थापत्य अभियांत्रिकी विश्वातील श्रीमंताच्या यादीत नक्कीच उच्च स्थान प्राप्त करता येईल. आपल्या सर्वाच्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची कोणतीही पदविका तसेच पदवी प्राप्त न करता सुध्दा जवळजवळ साडे तीनशे किल्ले बांधले, त्यातील अनेक गड किल्ले आज पण सुस्थितीत आणि भक्कम आहेत आणि म्हणूनच श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज हे उच्च कोटीचे आदर्श स्थापत्य अभियंता होते हे शत प्रतिशत सिद्ध होते. श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज व भारत रत्न विश्वेश्वरय्या या दोन्ही आदर्श स्थापत्य अभियंत्याच्या मार्गदर्शनाखाली बांधलेल्या अनेक गड किल्ल्यांचे, पुलांचे, विविध वास्तुचे, धरणांचे पर्यटन करत असताना त्यांच्या स्थापत्य बांधकाम व्यवस्थापनाचे , नियोजनाचे, सुरक्षिततेचे ,कौशल्याचे, हुशारीचे, कल्पकतेचे व संरचनात्मक स्थिरतेचे सूक्ष्म नजरेने निकोप निरीक्षण करूण त्यामधून टीपकागदाप्रमाणे योग्य स्थापत्य तंत्रज्ञान व कौशल्य टिपून आज त्या कौशल्याचा व नियोजनाचा उपयोग व वापर महानगर विकासात केला तर भारत देश स्थापत्य क्षेत्रात व तंत्रज्ञानात नक्कीच अग्रेसर होईल.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading