अस्सल वैदर्भीय बोलीभाषेचा साज लेवून ही कादंबरी आलेली आहे. यामध्ये गावगाड्यातील घटना व प्रसंगाच्या बरोबरच कादंबरीकाराने प्रचलीत म्हणी आणि वाक्प्रचारांचा चपखल वापर केलेला आहे. मुख्य, सहाय्यक आणि अनुषंगिक पात्र व प्रसंगाची योजना करून कादंबरीकाराने मुख्य विषयाला गतिमान केलेले आहे.
डॉ. श्रीकांत श्री. पाटील
मु. पो – घुणकी ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर
मो. नं. – ९८३४३४२१२४
२१ व्या शतकातील मराठी साहित्यामध्ये बदलत्या सामाजिक जीवनाचे, स्थिती गतीचे प्रतिबिंब पडलेले पहावयास मिळते. गावगाडा आणि शेतशिवारातील घटना प्रसंगाचे, पात्रांचे सूक्ष्मातिसूक्ष्म पैलूवर केंद्रित होऊन कादंबरीकार काल्पनिक प्रतिसृष्टी निर्माण करून अभिव्यक्त होत असतो. काल्पनिकतेला वास्तवाचा आधार देत ही प्रतिसृष्टी जिवंत करीत असतो. २१ व्या शतकात गावखेड्यांनी आपली कुस बदललेली आहे. शेतीचे आधुनिकीकरण, यांत्रिकीकरण झालेले आहे. आपल्या कुटुंबाचा डोलारा सावरण्यासाठी शेतकरी आपले श्रम, वेळ आणि पैसा खर्च करीत आहे. तरीही वाढत्या महागाईने तो पुरता सैरभैर झाला असून, निराशेच्या गर्तेत गळ्याबरोबर बुडाला आहे. त्याने पाहिलेली सुखी जीवनाची स्वप्ने धूसर होत असून निराशेच्या आणि खिन्नमस्कतेच्या जाळीत तो पुरता अडकला आहे.
बदलत्या ग्रामसंस्कृतीचा वेध –
“चारीमेरा” ही डॉ सदानंद देशमुख यांची कादंबरी. ही बदलत्या ग्रामसंस्कृतीचा आणि कृषीसंस्कृतीचा वेध घेणारी आहे. ज्ञानेश्वरीतील ‘ना तरी रणी शव सांडीजे…’ या ओवीने कादंबरीची सुरुवात होते. यातून कादंबरीतील संघर्षाचे सूचनच कादांबरीकार करतो. कादंबरीतील नायकाला आयुष्यभर संघर्षच करावा लागतो. संसारातील कटकटींना सामोरे जावे लागते. चारीमेरामध्ये उदेभान आणि भावनाताई या मुख्य पात्रांच्या अनुषंगाने लेखकाने ग्रामीण वास्तवाचा वेध घेतलेला आहे. गाव, गावाच्या परीघातील माणसे, त्यांच्या वृत्ती, प्रवृत्ती, ग्रामसंस्कृतीतील रिती, पद्धती, दुराचार, अनाचार, व्याभिचार किंबहुना भ्रष्टाचार अशा सगळ्याच गोष्टींचा उभा – आडवा छेद यामध्ये ताकदीने घेतलेला दिसतो.
चारीमेरा म्हणजे शेतीचे बांध. शेतीच्या चार बंधिस्त बाजू. आपल्या शेतीच्या रक्षणासाठी प्रतिवर्षी शेतकऱ्याला बांधबंधिस्ती करावी लागते. शेतीच्या चारही बाजू अर्थात बांध मजबूत ठेवावे लागतात. अन्यथा शेतीचा खंगाळा होतो आणि शेतकरी कंगाल होतो. शेतकऱ्याला शेताच्या बांधबंधिस्तीबरोबर पीकपाण्याकडे, गुराढोरांकडे, गड्यामाणसांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे लागते. अन्यथा त्याची लुबाडणूक होते. त्याची अवनती होऊन त्याला लुबाडले जाते, घेरले जाते. त्याच्या शेतीकडे डोळा ठेवला जातो. ग्राम भागातील सावकारी वृत्ती, फुकटखाऊ वृत्ती, व भ्रष्टाचारी प्रवृत्तीचा पर्दाफाश लेखक या कादंबरीतून करतो.
कादंबरीचे अंतरंग – कथानक –
गावगाड्यात आणि शेतशिवारात उदेभान या नायकाने पाहिलेल्या, साहिलेल्या आणि अनुभवलेल्या जीवनप्रवासाचे चलचित्रणच कथानकाच्या रूपाने कादंबरीत प्रतिबिंबित होते. उदेभान आणि भावनाताई यांच्या चिकणी नावाच्या शेतीच्या पर्यावरणात या कादंबरीचे कथानक लेखकाने बेतलेले आहे. आपली शेती ओलीताखाली यावी असे प्रत्येक शेतकऱ्याला वाटत असते. पण आर्थिक ओढाताण, हरवलेली पत यामुळे उदेभानला बोअर मारताना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. बोअर फसल्यामुळे विहीर काढण्याचा सल्ला लोक त्याला देतात. पण परिस्थितीने तो हतबल आहे. त्याची दयनीयता खूपच अस्वस्थ करणारी आहे.
ईमानेईतबारे काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांना चोहोबाजूंनी घेरले जाते. त्याच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन लचके तोडले जातात. उदेभानच्या सालगड्याला फितुर करणे. त्यासाठी त्याला दुप्पट पगाराचे अमिष दाखविले जाते. पण रतिराम त्याला दाद देत नाही. उदेभान कर्जबाजारी आहे. भूविकास बँकेच्या वसुली अधिकाऱ्याचा त्याच्या मागे तगादा आहे. यात भर म्हणून शेतात राहिलेला उंट त्याला वेळोवेळी अडचणीत आणतो. राजस्थानच्या गाईगुरे राखणाऱ्या लोकांचा तो उंट. ते लोक जाताना तो आजारी पडला. पुढे तो चिकणीतच राहिला. पंचायतीने त्याचा ताबा उदेभानला दिला. पण बऱ्याचदा त्या उंटामुळे तो अडचणीत आला. आपली काहीच चूक नसताना तो अडचणीच्या घेऱ्यात अडकत गेला. उदेभानच्या शेतात राहणारा रतिरामबुवा त्याला मदत करतो . त्याच्या सोबत रहणाऱ्या रोशनबाई रतिरामाला पर्यायाने उदेभानच्या कुटुंबाला साथ देतात. शेतमालकाबरोबर कोंबड्या, शेळ्या पाळून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
आज पारंपारिक शेतीची जागा यांत्रिकीकरणाने घेतली आहे. आधुनिकीकरणाच्या नावाखाली पारंपारिक औजारे अडगळीत गेली असून, ट्रॅक्टरने शेतीचा ताबा घेतला आहे. बादशहासारख्या जमीनदार बापाच्या सावलीत वाढलेला उदेभान या नव्या बदलाला सामोरा जातो. संकटाचा बाऊ न करता सामोरा तो सामोरा जातो. ट्रॅक्टर खरेदी करून शेती करतो. पण धरणाच्या कामावरचे त्याचे पैसे त्याला मिळत नाहीत. ड्रायव्हर त्याला फसवतो. ट्रॅक्टरच्या व्याजाचे पैसेही तो भागवू शकत नाही. वसुली अधिकाऱ्यांना चुकविण्यासाठी त्याला लपून बसावे लागते. बँक अधिकाऱ्यांचे कोंबड्या, मटणाचे, दारूचे चोचले पुरवावे लागतात.
शेतकरी शेतात राबराब राबतो. पण त्याला त्याच्या कामाचे दाम मिळू शकत नाहीत. ऐन हंगामात दलालाकडून होणारी फसवणूक त्याला उद्ध्वस्त करते. याचे चित्रण वास्तवतेने यामध्ये लेखकाने मांडलेले आहे. सभ्यतेचा बुरखा पांघरणारे राजकारणी, स्त्रीयांच्या वाट्याला आलेली पराधिनता, अगतिकता, राज्यकर्त्यांचे दोन नंबरचे धंदे, अनैतिकता, फसवणूक, शेतक-याच्या जीवनात झालेले बदल असे अनेक प्रसंग ग्रामजीवनातील वास्तव चित्रित करतात. माणसाच्या वृत्ती प्रवृत्तीवर प्रकाश टाकतात. न्याय-अन्याय, निती-अनिती, योग्य-अयोग्य, बरे-वाईट याची पारख वाचकाला करायला लावतात.
ग्रामीण भागातील आणखी एका बाबीवर या कादंबरीत प्रकाशझोत टाकला गेलेला आहे. एक प्रकारे अभेद्य अशा जातिव्यवस्थेवर लेखकाने प्रहार केलेला आहे. मातीतला संकर शेतकऱ्यांनी मान्य केला पण जातीतील संकर होण्याला तीव्र विरोध केला. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या. शेतावर काम करणाऱ्या प्रविणाशी उदेभान तीव्र इच्छा असूनही लग्न करू शकत नाही. तर बादशारावच्या पराकोटीच्या जाती अहंकारामुळे प्रविणा आणि उदयभान यांची जीवघेणी शोकांतिका होते. “मातीतील क्रॉसिंग लोकांनी मान्य केले पण जातीतलेही मान्य केले पाहिजे.” या उदेभानच्या विचारसरणीला बापाच्या हेकेखोरपणामुळे यश येत नाही. पण जेव्हा तो प्रगतीचा बाप होतो तेव्हा या विचाराला साथ देण्याची संधी तो घेतो. पुण्याला राहून आलेली व एम.पी.एस.सी परीक्षा पास झालेली त्याची मुलगी सपकाळ नावाच्या हलक्या जातीतील प्रियकराशी लग्न करण्याचा निर्णय त्याला बोलून दाखवते. तेव्हा तो या गोष्टीला विरोध करत नाही. इथे आंतरजातीय विवाहाला उदेभानने दिलेली मान्यता ही लेखकाची जातीभेदाविषयीची नैतिक भूमिका सूचित करून जाते.
त्याचप्रमाणे आधी शेतकामाला तुच्छ समजणारी उदेभानची बायको भावनाताई असते. पण ती जेव्हा आपल्या नवऱ्याची पूर्व आयुष्यातील प्रविणा आणि उदेभानच्या शेतावरच्या प्रेमप्रकरणाशी निगडित डायरी वाचते. तेव्हा घरची लक्ष्मी आणि शेतातली लक्ष्मी एक झाल्याशिवाय शेतीला, पर्यायाने शेतकऱ्याला बरकत येणार नाही. तो सुखी होणार नाही असा श्रमप्रतिष्ठेशी निगडित साक्षात्कार तिला होतो. आणि उत्तरार्धात ती शेतकाम करण्यासाठी बायकांसोबत चिकणी नावाच्या शेतात जाते. त्याचा उदेभानला मनस्वी आनंद होतो. या कादंबरीतील उदेभानची डायरी हा भाग चैतन्यकळेसी निगडित असून शेवटी भावनाताई सुद्धा या चैतन्यकळेशी जोडली जाते. एकूणच हा भाग कृषी संस्कृतीच्या भविष्यातील विकासासाठी प्रेरक आणि सकारात्मक ठरतो.
ट्रॅक्टर दुरूस्ती लांबविणारा मिस्त्री, बेरकी वृत्तीचा कलानाथ गोंजारी, उन्मत्त आणि मस्तवाल के.डी. साहेब, शेतकऱ्यांकडून कर्जाच्या वसुलीपायी पार्ट्या झोडणारे अधिकारी, अशी दुष्ट पात्रे या कादंबरीत आढळतात. तर रोशनबाई, तोंडाळबुढ्ढी, लोपाबाई अशा अगतिक आणि परिस्थितीशरण स्त्रिया, तर व्यवस्थेच्या चरकात सापडलेले उदेभानचे कुटुंब अशी सरळमार्गी पात्रेही आढळतात.
भावनाताई आणि उदेभानची दोन्ही मुले हुशार आहेत. मुलगी प्रगतीने तर खूप शैक्षणिक प्रगती केली. पुढे ती स्पर्धा परीक्षेला पुण्याला गेली व पक्की पुणेरी झाली. कितीही पडझड झाली तरी माणसाला ताठ मानेने उभे राहता आले पाहीजे. असा सल्लाही कादंबरीकार वाचकांना देतो. कादंबरीत पत्रकार किरण माने, शिक्षिका केतकी चव्हाण, केतकी बाबतचे उदेभानचे संशयी वागणे, लोपाबाईचे अनैतिक वागणे, लग्न ठरत नाही म्हणून बंड्याने केलेली आत्महत्या, अशा अनेक प्रसंगाची वीण या कादंबरीत मुख्य कथानकाच्या जोडीने आलेली आहे. शादेबाबाचे कादंबरीतील वर्णन ग्राम जीवनातील अंधश्रद्धा अधोरेखित करते. द्वारका आत्त्याचा उदेभान व भावनाताई वरील खडा पहारा, पिंट्या आणि सुन्या सारख्या पोरांवरील कुसंस्कार, छोट्या छोट्या कामासाठी त्यांचे पैसे मागणे, प्रविणा, आशा, वहिदा, मथुरा अशा एक ना अनेक पात्रांतून आणि त्या अनुषंगाने घडलेल्या प्रसंगातून चारीमेराचे कथानक आखीव, रेखीव व बांधेसूदपणे साकारण्यात आपले कौशल्य पणास लावले असून ते यशस्वी झालेले आहे.
अशा प्रकारे युद्धमान संघर्ष करणारा नायक उदेभानच्या रूपाने या कादंबरीत भेटतो. बाराव्या शतकातील साहित्य निर्मितीच्या कंदाशी ही कादंबरी सुरुवातीला जोडून घेते. तर लीळाचरित्राच्या लीळेचा आधार घेऊन संपते.
“चारीमेरा” ही २०१६ मध्ये लिहिलेली कादंबरी. गावशिवाराबरोबर कृषीसंस्कृतीतील समस्यांचा, अडचणींचा, अडथळ्यांचा वेध घेते. शेतकऱ्याच्या नशिबी आलेले गरीबीचे, लाचारीचे, दीनवाणीपणाचे दर्शन चारीमेरात आलेले आहे. के.डी साहेबांच्या माध्यमातून राजकारणाच्या उन्मत्तपणावर, आचारभ्रष्टतेबरोबर सत्ता आणि संपत्तीच्या वाढीसाठी कराव्या लागण्या-या लोचटपणावर लेखक यामध्ये प्रकाश टाकतो. रोशनबाईचे विवाहाशिवाय रतिरामबुवाबरोबर राहणे, लोपाबाईचा अनैतिक व्यवहार हा व्याभिचारीपणाची दखल घेतो. तर व्यापारी वर्गाकडून होणारी फसवणूक ही शेतकऱ्यांची होणारी लुबाडणूक दाखविते. अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धा, अनाचार, दुराचार अशा अनेक सामाजिक समस्यांचा आविष्कार चारीमेरा कादंबरीतून झालेला आहे. तसेच शेतीमध्ये आधुनिकीकरणामुळे, यांत्रिकीकरणामुळे झालेल्या बदलाबरोबर शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणावरही लेखक येथे दृष्टीक्षेप टाकतो.
चारीमेराची वैशिष्ट्ये व वेगळेपणा –
‘उदेभान’ या कादंबरीच्या नायकाने अनुभवलेल्या, पाहिलेल्या आणि सहन केलेल्या घटना प्रसंगांची मालिकाच एखाद्या चलचित्रपटासारखी या कादंबरीत पुढे सरकत राहते. ती वाचताना वाचक मन हरपून जातो. शेतकऱ्याची ससेहोलपट, गावकीतील वृत्ती – प्रवृत्ती, कुटुंब सदस्यांमधील कधी विश्वासाचे तर कधी अविश्वासाचे वातावरण, राज्यकर्त्यांची ऐषोरामी वृत्ती, उंची जीवन पद्धती, त्यांच्या अनुयायांचा अर्थात चेल्यांचा खोटारडेपणा, बँक आधिकाऱ्यांची मुजोरगिरी, व्यसनाधीनता, शेतशिवारातील अनाचाराचे, व्याभिचाराचे बिभत्स व ओंगळवाणे रूप, हातावर पोट असलेल्या शेतमजुरांची स्वतःच्या जीभेचे चोचले पुरवण्यासाठीची कोंबड्यांची चोरी, यंत्रदुरूस्ती करणाऱ्या कामगारांच्या स्वभावातील बेफिकीरी, शेतकऱ्यांच्या भूखंडावर लक्षप्रतिष्ठीतांचा असलेला डोळा, अशा अनेक घटना व प्रसंगातून चारीमेराचे कथानक दमदार असे साकारलेले आहे.
उदेभान आणि भावनाताई हे जोडपे या कादंबरीच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. तर रतिरामबुवा, रोशनबाई या सहाय्यक व्यक्तीरेखा आहेत. तोंडाळबुढ्ढी, गालफाडे मास्तर, सुधाकर धस्कटे, पिंट्या आणि सुन्या, जयराम उमाळे, नवऱ्याने टाकलेली लोपाबाई, तिचा भाऊ बंडया, भावनाची मैत्रीण मथुरा, पत्रकार किरण, इंगळे ड्रायव्हर, कलानाथ गोंजारी, के.डी. साहेब, द्वारका आत्या या पात्रांची निर्मिती, त्यांची गुंतावळ, त्यांचा वेगळेपणा अबाधित ठेवून कथानकाला गती देण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येतात.
या कादंबरीत राजस्थानी लोकांनी आजारी आहे म्हणून सोडलेला उंट हे एक प्रतिक आहे. व्यवस्था माणसाला परिस्थितीशरण बनवते व माणसाला कजगडीच्या बाहुलीसारखे नाचविते. उंटामुळे झालेले शेतीचे नुकसान, म्हातारीचा झालेला मृत्यू, त्याचा उदेभानला झालेला नाहक त्रास, उंटाचे गाळात रूतणे, मृत्यू पावणे, दुर्गंधी सुटणे अशा घटनांची प्रतिके घेऊन लेखकाने नायकाची, एकूणच शेतकऱ्याची हतबलता वाचकांसमोर आणली आहे.
या कादंबरीतील उंट हा जातीयतेचे प्रतिक आहे. प्रत्येक जातीतही काही लोक आपण हलके – भारी आहोत असे समजतात. उंटाच्या रूपात बादशारावाचा जातीचा उच्च भाव चिखलात फसून नष्ट झाला आहे, असे उंटाच्या माध्यमातून लेखकाने दाखवले आहे. अस्सल वैदर्भीय बोलीभाषेचा साज लेवून ही कादंबरी आलेली आहे. यामध्ये गावगाड्यातील घटना व प्रसंगाच्या बरोबरच कादंबरीकाराने प्रचलीत म्हणी आणि वाक्प्रचारांचा चपखल वापर केलेला आहे. मुख्य, सहाय्यक आणि अनुषंगिक पात्र व प्रसंगाची योजना करून कादंबरीकाराने मुख्य विषयाला गतिमान केलेले आहे.
प्रयोगात्मकता हे या कादंबरीचे खास वैशिष्ट्य आहे. आपण जे पाहीले, साहिले, अनुभवले ते एक स्वप्नच होते. तो एक भास होता. हे झोपेतून जागा झालेल्या उदेभानला कळते. आणि खिन्न झालेला तो स्वतःशीच हसू लागतो. इथे कादंबरी संंपते. चक्रधरकृत लीळेचा चपखल वापर करून ही प्रयोगात्मकता चारीमेरात साधली आहे. या कादंबरीच्या माध्यमातून लेखकाने आपले अनुभव विश्व आणि चिंतन मुक्तपणे उधळून दिलेले दिसून येते. त्यामुळे शेती संस्कृतीचा समग्र आणि कालोचित असा वेध घेणारी ही कादंबरी लेखकाच्या ‘बारोमास ‘ कादंबरी प्रमाणेच केवळ एका प्रदेशाची कथा न होता ती भारतीय शेती संस्कृतीचा समग्र आणि सर्वसमावेशक वेध घेणारी प्रातिनिधिक कादंबरी ठरते. हे या कादंबरीचे महत्त्वाचे आणि मौलिक वैशिष्ट्य जाणवते.
कादंबरीतील म्हणी, वाक्प्रचार, प्राणी विश्वाच्या हालचाली, निसर्गवर्णने, नाट्यमय आणि प्रसंगनिष्ठ संवाद, वर्णनात्मकतेला लाभलेली सखोल चिंतनाची डुब आणि ती व्यक्त करणारी समर्पक भाषा यामुळे या कादंबरीची लक्षवेधी शैली ठळकपणे वाचकांच्या नजरेत येते. अस्सल अनुभवांची गुंतावळ, निरगाठ आणि शेवटी उकल म्हणजेच कादंबरीचे सूत्र यात तंतोतंत पाळले गेले आहे. आकलनसुलभ भाषा, ओघवती शैली, कथानकाला गतिमान ठेवणारी निवेदने, नाट्यात्मक व वास्तव चित्रणे ही या कादंबरीची बलस्थाने आहेत. प्राधान्याने चार बांधाच्या आत फिरत राहणारे कथानक शीर्षकाची समर्पकता व यथार्थता सिद्ध करते. कृषीकेंद्रित, एकरेषीय अनुभवांची मांडणी करणारी ही आगळीवेगळी अलौकिक अशी प्रयोगात्मक कलाकृती आहे…
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.