September 16, 2024
Organically produced wild vegetables are good for health Agriculture Officer Umesh Patil
Home » सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या रानभाज्या आरोग्यासाठी उपयुक्त : कृषी अधिकारी उमेश पाटील
काय चाललयं अवतीभवती

सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या रानभाज्या आरोग्यासाठी उपयुक्त : कृषी अधिकारी उमेश पाटील

  • रानभाज्या प्रदर्शन
  • Organically produced wild vegetables are good for health Agriculture Officer Umesh Patil

कोल्हापूर : दुर्मिळ रानभाज्यांचा उत्सव दरवर्षी भरवणे हा अतिशय स्तुत्य उपक्रम असून पुढील पिढीला रानभाज्यांची ओळख होणे आवश्यक आहे. देशात रासायनिक खते वापरात महाराष्ट्राचा क्रमांक पहिला आहे. त्यानंतर पंजाब आणि हरियाणा हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या अन्नधान्यांमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढलेला आहे. त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. पण अशा प्रकारच्या रानभाज्याच्या प्रदर्शनामुळे पुढील पिढीला या भाज्यांची ओळख होऊन सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेल्या या रानभाज्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतील असे प्रतिपादन कृषी अधिकारी उमेश पाटील यांनी केले. रानभाज्या उत्सव या प्रदर्शनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते.

सह्याद्री डोंगररांगा, कोकण आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत दुर्गम भागात, जंगलात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या आणि सहजगत्या उपलब्ध होणाऱ्या आरोग्यदायी, पौष्टिक व औषधी अशा रानभाज्यांची ओळख सर्वांना होऊन, निसर्गप्रेमींनी या रानभाज्या आपल्या परसबागेत लावाव्यात, तसेच शेतकऱ्यांनी महत्वाच्या दुर्मिळ रानभाज्यांची शेतात लागवड करुन त्यांचे फायदे मिळवावेत ह्यादृष्टीने एनजीओ कंपॅशन २४, कोल्हापूर वुई केअर आणि निसर्ग अंकुर ह्यांच्यावतीने श्रावण मासाचे औचित्य साधून जवळपास १६० हुन अधिक रानभाज्यांचे माहितीपूर्ण प्रदर्शन आयोजित केले आहे.

दरवर्षी या प्रदर्शनाला मी भेट देतो. येतील रानभाज्यांची चव मी चाखली आहे. या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शाळकरी मुलांना या रानभाज्यांची चव नक्कीच आवडेल. या भाज्या पचनास हलक्या आणि आरोग्यास उपयुक्त असतात. त्यामुळे अशा प्रकारचे प्रदर्शन हे समाजाला दुर्मिळ रानभाज्यांची ओळख करून देणारे आणि उपयुक्त आहे.

मिलिंद धोंड यांनी प्रास्ताविक केले. निसर्गात अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या गारंबीची ४ फुटी शेंग ,टेटूची तलवारीसारखी २ फुटी शेंग, खाजकुहीलीचे वेल, शेरणी , चन्नीचे वेल, सोनार वेल, कांड्याचित्रक, गाजरीची भाजी, खरशिंग शेंगा, कडवी, अमरकंद, नळीची भाजी, समुद्रशोक, दगडावर वाढणारा जैताळू, खडक अंबाडी, गिरजाला, सागरी किनाऱ्यावर वाढणारी समुद्रीय घोळ अशा कधीही सहज न बघायला मिळणाऱ्या रानभाज्या या प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. रुकाळू ( वृक्षांवर उगवणारा अळू ), तीनतोंडी , मांजरी, बाफेली, सफेद मुसळी, कडवी, कोळ्याचो माड अशा अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या रानभाज्या तसेच करटोली, दिंडा, कुडा, आंबुशी, पाथरी, कुरडू, बांबू कोंब ,रानगवर, केना, पानांचा ओवा, कपाळफोडी, चिवळ, आघाडा, काटेमाठ, घोळभाजी, अंबाडा, सुरण , टाकळा, मटारू, भुई आवळी, भारंगी ह्या औषधी गुणांनीयुक्त आरोग्यवर्धक असलेल्या अनेक रानभाज्याही या प्रदर्शनात मांडल्या आहेत. हे प्रदर्शन दसरा चौकातील जैन बोर्डिंग येथे भरले असून २५ ऑगस्टपर्यंत हे खुले राहाणार आहे.

लोकांना ह्या रानभाज्यांची ओळख आणि चांगली माहिती मिळावी मोहन माने यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नांनी अनेक रानभाज्यांची बियाणे व तरु वापरून त्यांची रोपे कुंड्यांत तयार करण्यात आली. वनस्पती तज्ज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर ह्यांच्या “निसर्ग अंकुर “ ह्या संस्थेनेही छायाचित्रांसह माहितीपूर्ण मांडणी करण्यात विशेष हातभार लावला आहे.

ह्या अनोख्या रानभाज्यांची चव चाखता यावी म्हणून, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स ठेवले असून, ह्या रानभाज्या आणि त्यांची रोपे प्रदर्शनस्थळी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२:३० वाजता प्रदर्शनस्थळी खास महिलांसाठी रानभाज्यांची पाककृती स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेत सहभागासाठी मंजिरी कपडेकर – 9373319495 व ऐश्वर्या कपडेकर – 7620619495 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

उद्घाटन प्रसंगी निसर्ग अंकुरचे अध्यक्ष डॉ. मधुकर बाचुळकर, डॉ. अशोक वाली, पल्लवी कुलकर्णी, मंजिरी कपडेकर , अभिजित पाटील, सुशिल रायगांधी,किशोर शिंदे, प्रदर्शनाचे प्रोजेक्ट चेअरमन सुशांत टक्कळकी, को -चेअरमन अमृता वासुदेवन उपस्थित होते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

शेवंतीची लागवड करताना…

सागरी खाद्यान्य उत्पादनांच्या निर्यातीत गेल्या चार वर्षांत 30 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ

परीक्षांच्या विश्वासार्हतेला तडा

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading