ज्याला आरंभच नाही त्याला शेवटही कसा असणार ? यामुळे संसार हा संपणारा नाही, फक्त त्याची अनित्यता जाणून घेऊन त्या गुंत्यातून बाहेर पडायचे आहे. मुक्त जीवन जगायचे आहे. मुक्त जीवन हाच खरा मोक्ष आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
व्योम कुसुमाच्या पांडवा । कवणे देठ तोडावा ।
म्हणोनि नाहीं ऐसिया भवा । आदि कैची ।। 234 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 15 वा
ओवीचा अर्थ – अर्जुना, आकाशाच्या फुलाला देठ कोणी कोणी तोडावा ? म्हणून स्वरुपें करून जो नाहीं, अशा संसाराला आंरभ कसला ?
संसार हा क्षणभंगुर आहे. यासाठी त्यात गुंतायचे नसते. संसारात राहून आपण आपले स्वधर्माचे ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करायचा असतो. संसारात गुंतूण पडल्यास आपणास पुढे जाताच येणार नाही. संसारात न गुंतता आहे त्या परिस्थितीचा सामना करत आपण आपले स्वधर्माचे ध्येय सुरु ठेवायचे असते. ध्येयावर लक्ष्य केंद्रीत होण्यासाठीच संसारातील अनित्यता जाणून घ्यायची आहे. त्याचे ज्ञान झाल्यानंतर आपोआपच आपण आपल्या ध्येयाकडे सहज वळू शकतो.
माझा गाव, माझी भूमी, माझी आपली माणसं म्हणून गावातच पडून राहीलो तर आपला विकास होऊ शकणार नाही. गाव सोडल्यानंतर अनेकांना स्वतःचा विकास केल्याचे दिसून येते. म्हणजे काय तर ते गावाच्या मायेत गुंतले नाहीत. पाण्यात पडल्यानंतर हातपाय कसे मारायचे हे आपोआपच समजते. वाचायचे असेल तर हातपाय मारायला शिकले पाहीजे. याचे ज्ञान आपोआपच होते. तसे गाव सोडल्यानंतर जगायचे आहे. स्वतः विकसित व्हायचे आहे. अपेक्षित ध्येय गाठायचे आहे हे लक्षात असेल तरच आपोआप आपला विकास होतो. अन्यथा आपण गावाच्या मायेतच रुतून बसतो. बाहेर पडल्यानंतर गावाच्या आठवणीत गुंतला तर विकास होणार नाही. त्या मायेची चादर दूर करून प्राप्त परिस्थितीत योग्य कर्म करून स्वतःचा विकास केला तरच आपण आपले अस्तित्व टिकवू शकतो.
संसारातही असेच आहे. माझा संसार, माझा मुले, माझी नातवंडे म्हणत या मायेत आयुष्य कसे निघून जाते हे लक्षातही येणार नाही. मग स्वःचा विकास होऊच शकणार नाही. अध्यात्माची ओळखही होणार नाही. कारण अध्यात्म हे अनुभव शास्त्र आहे. अनुभवातून ते शिकायचे आहे. अनुभवातून, अनुभुतीतूनच स्वतःचा विकास होतो. अशा अध्यात्माची ओळख करून ती संसारातील व्यवहारासोबत सुरु ठेवायची आहे. मुख्यध्येय हे संसार नसून अध्यात्मिक विकास आहे हे लक्षात ठेवल्यास संसाराच्या मायेत आपण गुंतणार नाही. ज्याला आरंभच नाही त्याला शेवटही कसा असणार ? यामुळे संसार हा संपणारा नाही, फक्त त्याची अनित्यता जाणून घेऊन त्या गुंत्यातून बाहेर पडायचे आहे. मुक्त जीवन जगायचे आहे. मुक्त जीवन हाच खरा मोक्ष आहे.
आपण पृथ्वीवर आहोत. त्यामुळे क्षितीज, पण आकाशात गेल्यावर ? अनंत, विस्तृत आकाशाला आरंभ कोठे आहे का ? आता आकाशात हजारो सॅटेलाईट सोडण्यात आली आहेत. हे सॅटेलाईट पृथ्वीच्या कक्षेत फिरत आहेत. प्रत्येक सॅटेलाईटचे काही ना काही उद्दिष्ट आहे. त्यानुसार ते काम करत आहे. त्याच्या कार्यामुळे आपण बलवान, शक्तीमान झाल्याची स्वप्ने पाहात आहोत. त्याच्यामुळेच महासत्तेचे भुत आपल्या विचारात शिरले आहे. पण या विचाराचे भूत हे विनाशकारी आहे हे अहंकारामुळे आपण विसरलो आहोत. विश्वाच्या संसारात यामुळेच आपण हरत आहोत. कारण कोणत्याही युद्धाचा शेवट हा विनाशकारी असतो. जिंकत कोणीच नसते. हे आपल्या लक्षात येत नाही. पण आपणालाही आपले अस्तित्व टिकवण्यासाठी लढावे लागते. अन्यथा आपण गुलामगिरीत जाऊ याचीही भीती आपणास असते. त्यामुळे आपण हिसेंचा मार्ग अवलंबतो. पण अहिंसेने हे युद्ध जिंकता येते अन् हा विश्वाचा संसार फुलवता येतो. हे विचारात घ्यायला हवे. यासाठी स्वः ची ओळख करून घेऊन आत्मज्ञानाने अहिंसेचा लढा सुरु ठेवायला हवा. प्रत्येकाला त्याची ओळख करून देऊन ज्ञानाने हा संसारवृक्ष नष्ट करायला हवा. तरच विश्वात शांती नांदेल. अन्यथा प्रदुषणच…प्रदुषण होईल.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.