श्रद्धेय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी सोमवारी (ता.१५) पहाटे अखेरचा श्वास घेतला. गेली 70 वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धडाडणारी शिववाणीची तोफ अखेर थंडावली. डिसेंबर 2020 मध्ये एका सायंकाळी पुण्यात त्यांची भेट झाली : रामशास्त्री पुस्तकाच कौतुक करुन त्यांनी भरभरुन शुभेच्छा दिल्या. त्यांचा उत्साह जबरदस्त होता. त्यांनी माझीच आस्थेवाईकपणे चौकशी केल्याने संकोचल्यासारखे झाले. परंतु मीच निरोप घेतला.
अॅड विलास पाटणे
बाबासाहेब भाषेवर जबरदस्त हुकमत ठेवत शिवचरित्राचा पट श्रोत्यांसमोर अलगद ठेवायचे. विषय, वातावरण व भाषा यांची विलक्षण एकरुपता त्यांच्या भाषणात प्रत्यक्षात येते. इतिहासातील बारीक सारीक सारे तपशिल, गावे, तारखा, शके, सनावली, तिथ्या अचुकपणे आपल्या समोर ठेवतात. नजरेतील धाक, चेहऱ्यावरील तेजस्वीपणा, शब्दांची अचुक फेक आणि आवाजातील गांभीर्य सर्वांमुळे सारे प्रसंग दांडग्या स्मरणशक्तीमुळे बाबासाहेब डोळ्यांसमोर साक्षांत जिवंत करायचे.
सन 73 च्या दरम्याने शिवचरित्र व्याख्यानमालेच्या निमित्ताने बाबासाहेबांची पहिली भेट झाली. लाघवी स्वभाव आणि वागण्यात कौटुंबिक जिव्हाळा प्रत्ययास आला. व्याख्यानमालेबरोबर अनेक गड बाबासाहेबांच्या बरोबर पहाण्याचा योग आला. साधासरळ माणूस, वागण्यात व शिष्टाचारात संस्थानी रितीरिवाज. समोरच्या माणसाशी भेट संवाद साधणारी प्रेमळ भाषा. व्यक्तिमत्वात भारदस्तपणा आणि त्यामागे लपलेला निरागसपणा भावून गेला.
बाबासाहेबांचे चुलते कृष्णाजी वासुदेव हे इतिहास संशोधक, चांगले जाणकार, वडील बळवंतराव चांगले चित्रकार तर आई कथाकथनात पारंगत. संस्काराचा असा वारसा लाभल्यानंतर बाबासाहेब इतिहासात न रमले तरच नवल होत. 1941 मध्ये बाबासाहेब पहिल्यांदा इतिहास संशोधक मंडळात आले. तेव्हापासून गेली आठ दशके संशोधनाचे कार्य अव्याहतपणे चालू होतेे.
छत्रपती शिवरायांच्या व्यक्तीमत्वाने बाबासाहेब पुरते झपाटून गेले होते. गेली सात दशके व्रतस्थाच्या निष्ठेने हजारो व्याख्यानाद्वारे बाबासाहेबांनी शिवचरीत्र खेडपासून दिल्लीपर्यंत साया मराठी समाजात मोठ्या भक्तिभावाने पोहचविले. बाबासाहेबांनी मराठी माणसाच्या धमन्यात शिवाजी ओतला आणि राष्ट्रधर्माचा वन्ही चेतवित ठेवला. बाबासाहेबांच सार जीवन शिवाजी या तीन अक्षरात सामावलेले आहे. त्यांच्या इतका शिवकालात रमलेला आणि वर्तमानात इतिहास जगणारा माणूस शोधूनही सापडणार नाही.
बाबासाहेबांचे व्याख्यान ऐकण ही एक रोमांचकारी व अविस्मरणीय अनुभव असे. बाबासाहेबांनी आयुष्यभर प्रवास करुन दिलेल्या व्याख्यानातून मिळालेला पैसा स्वतःकरीता घेतला नाही. व्याख्यानातून मिळालेला सारा पैसा बाबासाहेबांनी शिवप्रतिष्ठानकडे सुपुर्द केला. आंबेगाव – पुणे येथे 21 एकर जमिनीवर भव्य शिवसृष्टी निर्माण व्हावी हे बाबासाहेबांनी आयुष्यभर उराशी बाळगलेले एक स्वप्न आहे, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.
छत्रपतींच्या महापराक्रमाची, अजोड स्वामिनिष्ठेची, निष्कलंक चारित्र्याची, कल्याणकारी अनुशासनाची, धीरोदत्त नेतृत्वाची आणि समाजपुरुष जागा करण्याचे असामान्य कौशल्य व धैर्य यांची बाबासाहेबांना अतिशय ओढ आहे. ही ओढ आज वयाच्या शंभराव्या वर्षी देखील जीवंत आहे. स्वराज्य संस्थापकांच्या अलौकिक आणि अद्भूत व्यक्तिमत्वाने बाबासाहेबांच अवघ आयुष्य व्यापून गेलं आहे.
बाबासाहेबांच्या भाषणाचा विषय सूक्ष्म तपशिलांनी भरलेला असतो. बखर आणि तत्सम ऐतिहासिक कागदपत्रांच्या अभ्यासामुळे विषयाला वि·ासनीयता व चिंतनाची डूब देखील असते. भाषेवर संताच्या आणि शाहिरी भाषेचा आगळा वेगळा प्रभाव आहे. मुंबई आकाशवाणीसाठी मी घेतलेल्या मुलाखतीमध्ये बाबासाहेब म्हणाले होते, “‘मी विद्वान नाही, मी इतिहासकार नाही, मी नट, गोंधळी, शाहीर, किर्तनकार आहे. मी शिवकालीन इतिहासाचा बखरकार आहे. सोप्या भाषेत इतिहास लोकांना सांगणारा मी एक लोककलाकार आहे. मी इतिहासाचा शिक्षक आहे”” याच शिक्षकाच्या भूमिकेत बाबासाहेबांनी निष्ठेने आणि श्रद्धेने काम केले.
बाबासाहेबांनी आतापर्यंत सुमारे चौदा हजार व्याख्याने दिली. व्याख्यानाच्या मिळालेल्या मानधनातून सामाजिक संस्था, शाळा, ग्रंथालये, हॉस्पिटल चॅरिटेबल ट्रस्ट यांना किमान पंचवीस लाख रुपये मिळवून दिलेत. शिवछत्रपती या पुस्तकाबरोबर पुरंदयाची दौलत, शिलंगणाचे सोने यासारखी अनेक पुस्तके लिहिली. यातूनच जाणता राजाचे बाबासाहेबांना स्वप्न पडले आणि मोठ्या दिमाखात सत्यात आले. भूलोकीवरचा हा महानाट्याचा देखणा प्रयोग पाहत आपण हरखून जातो. 250 कलाकार, हत्ती, घोडे, मेणे, पालख्या उत्कृष्ट निवेदन या सर्वांतून उभे राहते. शिवचरित्राचे दर्शन देणारे महानाट्य जाणता राजा, समुहनाट्यातून शाहीराच्या डफावरील थापेतून आणि मंतरलेल्या वातावरणात शिवचरित्राचा पट बाबासाहेब अत्यंत पोटतिडकीने सादर करतात त्याला तुलना नाही.
पु.ल. देशपांडे म्हणतात, “”बाबासाहेब डोळस भक्त आहेत. पण त्या भक्तीमार्गावर ज्ञानदीपाचा प्रकाश आहे””. बाबासाहेब म्हणाले होते जर मला 125 वर्षे आयुष्य मिळाले तर शिवचरित्र ब्राहृांडाच्या पलिकडे घेवून जाईन अलिकडेच शतकोत्सवी वर्षात प्रवेश केलेल्या बाबासाहेबांचा कृतज्ञता सोहळा संपन्न झाला होता.
स्व. बाबासाहेबांचा मंतरलेला आवाज आता यापुढे ऐकायला मिळणार नाही याची खंत वाटते. अशा ऐतिहासिक सांस्कृतिक संचितामधून समाजाला उंची प्राप्त होते. बाबासाहेबांनी ऐतिहासिक कागदपत्राचा धांडोला घेवून, गडकिल्ले पायी घालून सार आयुष्य झुगारुन देवून शिवचरित्राचा मोठा पट मांडला.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.