November 30, 2022
Seven Dogs in Goa Film Festival
Home » मनुष्य अन् त्याचे पाळीव प्राणी यांच्यातील बंधांचा शोध घेणारा चित्रपट सीएते पेरोस (सेव्हन डॉग्स)
काय चाललयं अवतीभवती

मनुष्य अन् त्याचे पाळीव प्राणी यांच्यातील बंधांचा शोध घेणारा चित्रपट सीएते पेरोस (सेव्हन डॉग्स)

कधीकधी प्राणी माणसासारखे वागतात आणि माणसे पशुंसारखी वर्तणूक करतात :दिग्दर्शक रॉड्रीगो गुरेरो

गोवा/मुंबईः पाळीव कुत्र्यांबद्दल इमारतीमधील शेजाऱ्यांना असलेल्या तक्रारीमुळे संकटात सापडलेल्या एका माणसाबद्दल वर्तमानपत्रात छापून आलेल्या लेखावरून दिग्दर्शक रॉड्रीगो गुरेरो यांना सीएते पेरोस (सेव्हन डॉग्स) हा चित्रपट निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली. गोव्यात सुरु असलेल्या 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या ‘टेबल टॉक्स’ या चर्चात्मक कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना ते म्हणाले की “कधीकधी प्राणी माणसासारखे वागतात आणि माणसे पशुंसारखी वर्तणूक करतात.”

ते म्हणाले की, सध्याच्या शहरी वातावरणात एकटेपणा आणि परस्परांतील सौहार्द यांच्या बाबतीत असलेल्या समस्या यांच्याशी निगडित संकल्पनांचा शोध घेण्याचा प्रयत्न त्यांनी चित्रपटाद्वारे केला आहे. कुत्र्यांचे एक कुटुंब मानवी नात्यांसाठी उत्प्रेरकाचे काम करते असे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे.

प्राण्यांसोबत चित्रीकरण करताना उभ्या राहिलेल्या आव्हानांबाबत विचारल्यावर, दिग्दर्शक रॉड्रीगो गुरेरो म्हणाले की चित्रपटात काम करणारे प्राणी नियंत्रित संरचनेत रुळलेले असले की त्यांच्यासोबत काम करणे आश्चर्यकारक रित्या सोपे होते. ते पुढे म्हणाले की चित्रपटातील मुख्य कलाकार आणि हे प्राणी यांना एकमेकांची ओळख आणि सवय व्हावी यासाठी चित्रीकरणापूर्वी आठवडाभर त्यांना एकत्रितपणे वावरण्याचा सराव करू देण्यात आला होता.

2021 मध्ये निर्माण झालेल्या आणि 53 व्या इफ्फीमध्ये सादर झालेल्या  सीएते पेरोस (सेव्हन डॉग्स) या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात प्रतिष्ठित सुवर्ण मयूर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. अर्जेन्टिनाच्या रॉड्रीगो गुरेरो दिग्दर्शकाचा हा चौथा चित्रपट आहे. एकूण 80 मिनिटांहून थोड्या जास्त कालावधीचा हा चित्रपट मनुष्य आणि त्याचे पाळीव प्राणी यांच्यातील बंधांचा शोध घेतो.

53व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मानाच्या सुवर्णमयूर पुरस्कारासाठी 15 चित्रपट एकमेकांशी चुरशीची स्पर्धा करतील.

श्रेयनामावली:

दिग्दर्शक: रॉड्रीगो गुरेरो
निर्माता: रॉड्रीगो गुरेरो
पटकथा: पॉला लुस्सी
जाहिरात विभाग: गुस्तावो तेजेदा
संकलक: डेल्फिना कॅस्टानिनो, सौना लेउंडा
कलाकार: लुईस मचीन, मॅक्सीमिलीयानो बिनी, नतालिया डी सीएन्झो, पॉला लुस्सी, एव्हा बियांको, पॉला हर्ट्झहॉग

संक्षिप्त कथा:

अर्जेन्टिनाच्या कॉर्डोबा या शहरातील एका इमारतीत अर्नेस्टो नावाचा माणूस त्याच्या सात पाळीव कुत्र्यांसोबत राहत असतो. त्या एकट्या माणसाचे दैनंदिन जीवन त्याच्या कुत्र्यांच्या गरजा, त्याच्या तब्येतीच्या समस्या आणि त्याची आर्थिक ओढगस्त यांच्याभोवती फिरते. त्याचे शेजारी एक ध्यानधारणा प्रवचन आयोजित करतात आणि त्या कालावधीत कुत्र्यांना इमारती बाहेर न्यावे अशी विनंती या माणसाला करतात. अर्नेस्टोला त्याच्या कुत्र्यांशिवाय राहणे मंजूर नसते पण त्यांच्यासकट इतर ठिकाणी राहायला जाणे त्याला परवडणारे नसते. तो पुढे नेमकं काय करतो याचे उत्तर चित्रपटात मिळते.

Related posts

अतृप्त मृगजळी आयुष्याला पाणी दाखवणाऱ्या कविता

डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या ‘पिपिलिका मुक्तिधाम’ कादंबरीस राजे संभाजी पुरस्कार जाहीर

गावोगावी ज्ञान वाटत फिरणारा शिक्षणप्रेमी…

Leave a Comment