September 8, 2024
With peace of mind and body comes Brahma prosperity
Home » मन अन् शरीरातील शांतीनेच येते ब्रह्मसंपन्नता
विश्वाचे आर्त

मन अन् शरीरातील शांतीनेच येते ब्रह्मसंपन्नता

साधनेतील अनुभुतीने साधकाच्या वृत्तीत मोठे फेरबदल होतात. त्याच्या वागण्यात, बोलण्यात मृदुता जाणवते. इतरवेळी छोट्या छोट्या गोष्टीतून चिडणारा साधक, असमाधानी, अस्वस्थ असणारा साधक आता मात्र साधनेच्या तृप्तीने समाधानी अन् शांत झालेला पाहायला मिळतो.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६

तै शांति पैं गा सुभगा । संपूर्ण ये तयाचिया आंगा ।
तैं ब्रह्म होआवयाजोगा । होय तो पुरुष ।। १०८६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – हे भाग्यवंत अर्जुना, ती शांति जेंव्हा संपूर्ण त्याच्या अंगी येते, तेंव्हा तो पुरूष ब्रह्म होण्याला योग्य होतो.

पायी जाणारा वारकरी मंदिराचा कळस दिसताक्षणी धावत सुटतो. दर्शनाची ओढ त्याला ही कृती करण्यास भाग पाडते. इतका तो आतुर झालेला असतो. देवाच्या दर्शनानंतरच त्याच्या मनाला, शरीराला शांती मिळते. मन तृप्त झाल्यानंतरच शरीराला सुख, समाधान, शांती भेटते. ही भेटीची तृप्ती आहे. ब्रह्मसंपन्नतेने व्यक्ती ब्रह्मज्ञानी होण्यासाठी पात्र होतो तेव्हा अशीच शांती त्याच्या शरीरात संचारते.

ब्रह्मज्ञानासाठी सुरु असणारा साधकाचा अभ्यास पूर्णत्वाला जातो. त्यामुळे काही अभ्यासन्या सारखे, अनुभवण्यासारखे असे काहीच उरत नाही. साहजिकच अभ्यासाची गती मंदावते. जाणण्यासारखे काहीच शिल्लक राहीलेले नसल्याने अन् सर्वज्ञान झाले असल्याने मग अभ्यास हा कसला ? साधक त्या अवस्थेत केवळ अन् केवळ आत्मज्ञानाचाच विचार करत असतो. इतर बाह्यजगातील गोष्टींचा त्याच्यावर परिणाम होत नाही. कारण तो त्यात गुरफटलेला असतो. साधनेचा नाद त्याला बाह्यजगाची दाहकता जाणवूच देत नाही. यातूनच मग त्याच्या शरीरात, विचारात मोठे बदल घडतात. हा बदलच त्याला शांतीकडे नेत असतो.

साधनेतील अनुभुतीने साधकाच्या वृत्तीत मोठे फेरबदल होतात. त्याच्या वागण्यात, बोलण्यात मृदुता जाणवते. इतरवेळी छोट्या छोट्या गोष्टीतून चिडणारा साधक, असमाधानी, अस्वस्थ असणारा साधक आता मात्र साधनेच्या तृप्तीने समाधानी अन् शांत झालेला पाहायला मिळतो. धकाधकीच्या जीवनातील दगदग त्याच्या मनावर परिणामच करत नाही. या दगदगीच्या परिस्थितीला तोंड देण्याचे सामर्थ्य त्याच्यात उत्पन्न झालेले असते. हा बदलच त्याला मोठ्या प्रगतीकडे नेत असतो. कारण मनाची शांती, मनाची तृप्ती हीच सर्व दुषितावरील उपाय आहे.

साधनेच्या अवस्थेत पीत्त जळते. पीत्त खवळण्याची संभावना नसल्याने मनात राग, द्वेष उत्पन्नच होत नाहीत. पित्ताची दाहकता आध्यात्मिक तेजामध्ये रुपांतरीत होते. हे तेज शरीरात संचारल्यानंतर शरीराची कांती तेजोमय होते. नव्याने उजळते. मनाचा उत्साह वाढतो. मनाच्या अशा तृप्त अवस्थेमुळे साधकाच्या वागण्यात, बोलण्यात, चालण्यात फरक जाणवतो. उत्साह वाढल्याने साधकाच्या शरीरात एकप्रकारची तृप्ती येते. या तृप्तीनेच शरीरात शांती संचारते. हे बदल नित्य साधनेने होत असतात. साधनेतील अनुभुतीने मनामध्ये सदविचार उत्पन्न होतात. अशा या बदलातूनच साधकाची वाटचाल ही ब्रह्मसंपन्नतेकडे होत असते. सर्व विषय, वासनावर मात करून साधक समाधानी, शांत होतो. अशा या शांतीच्या वाढीतूनच मग त्याला हळूहळू ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

रेशीम उत्पादनातून तानाजी झाला लखपती

वेळीच ओळखा निसर्गाचा धोक्याचा इशारा

तंजावूरचे ‘ज्ञानपूजक’ सरफोजीराजे द्वितीय

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading