September 12, 2024
Book review of Sanjad by Trupti Kulkarni
Home » अस्सल ग्रामीण बाजेचा कथासंग्रह… ‘सांजड’
मुक्त संवाद

अस्सल ग्रामीण बाजेचा कथासंग्रह… ‘सांजड’

कधी एखादी अशी संध्याकाळ पसरते… की जी विलक्षण अस्वस्थता, हुरहुर लावते आणि हे कमी म्हणूनच की काय त्यानंतर येते ती या हुरहुरीला सहज सामावून घेणारी काळीकुट्ट रात्र ! जणू चांदण्याचा शाप असलेली. आणि त्यामुळेच मन एका अभद्र शंकेने भरून जातं‌, आता तरी उजाडेल का? कुणाच्याही वाट्याला येऊ नये अशी ही संध्याकाळ… सुचिता घोरपडे यांचा ‘सांजड’ हा अस्सल ग्रामीण बाजेचा कथासंग्रह वाचताक्षणी मनात उमटलेली एक प्रतिक्रिया.

आपल्याकडे ग्रामीण साहित्याची परंपरा ही मोठी आहे शंकर पाटील, द. मा. मिरासदार, शंकरराव खरात अशा अनेकांनी ग्रामीण जीवनाचे सच्चे अंतरंग आपल्याला उलगडून दाखवले आहे. ‘सांजड’ हा कथा संग्रहही असाच… ग्रामीण भाषेत ‘सांजड’ म्हणजे संध्याकाळ. हे आगळंवेगळं शीर्षकच अस्सलपणा दाखवणारं. एकूण ११ दीर्घकथा असलेल्या या संग्रहाचं अजून वैशिष्ट्य म्हणजे यातल्या कथा स्त्रीप्रधान असल्या तरी त्यात स्त्रीच्या जगण्याला जरासुद्धा प्राधान्य नाही. त्यामुळे त्या वाचताना ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी’ ही कविता, जणू प्रत्येक कथानकाचं पार्श्वसंगीत असल्याप्रमाणे मनात रेंगाळत होती. पिढ्यानुपिढ्या दुःखाची एक वीणच यात गुंफली गेली आहे. आई-मुलगी-नात या तिन्ही पिढ्यात आणि तिन्ही टप्प्यांवर स्त्रीला भोगावं लागणारं खडतर आयुष्य यातून सामोरं येतं. आडयेळ, सौंदा, आक्रीत या अपवादात्मक कथा सोडता प्रत्येक कथेचा शेवट ‘सत्य हे नेहमी कठोर असतं’ याचा प्रत्यय देणारा.

शेतात राबणाऱ्या, घरकाम करणाऱ्या, कारखान्यात रोजंदारीवर मजुरी करणाऱ्या, गाई, म्हशी इ. जनावरं पाळून चरितार्थ चालवणाऱ्या या कष्टकरी बायका… वर्षानुवर्षांच्या पुरुष प्रधानतेत इतक्या दबल्या गेल्या आहेत की मान वर करून मोकळा श्वास घेणं हासुद्धा त्यांना गुन्हाच वाटतो, तर तिथे प्रश्न विचारणं ही तर दूरचीच बाब ! आजच्या काळात विशेषतः शहरी भागातल्या ९०च्या दशकातल्या आणि त्यापुढच्या मुलींना तर या कथा अविश्वसनीय वाटतील. शहरी भागातलं पांढरपेशा स्त्रियांचं भावविश्व आणि ग्रामीण भागातल्या मागास समजल्या जाणाऱ्या स्त्रियांचं भावविश्व यात किती टोकाचा फरक आहे हे यातून दिसतं.

आपल्याच देशातल्या काही विशिष्ट भागात राहणाऱ्या स्त्रिया इतकं कष्टप्रद, अपमानकारक, दुःखद जगणं जगत आल्या आहेत… आजही असं घडतं…घडू शकतं ? म्हणजे आपण नक्की कुठल्या अर्थाने स्वतःला प्रगतशील म्हणवतो असा प्रश्न पडतो. केवळ तंत्रज्ञानाची सोय, उपलब्धता या गोष्टी जगण्याचा स्तर उच्च पातळीवर नेऊ शकत नाहीत. त्यासाठी परिवर्तन हवं ते विचारांचं, मानसिकतेचं, संस्कृतीचं हे या कथा ठळकपणे अधोरेखित करतात.

गरीबी, शिक्षणाचा अभाव, अकाली लग्न आणि मुलं होणं, दारुड्या नवऱ्याची दंडेलशाही, पोरांची होरपळ, सासरचा त्रास हे या कथांमधले समान धागे आहेत. कथा शुद्ध ग्रामीण बोलीतल्या असून काही कथांमध्ये कन्नड भाषेचा प्रभाव दिसून येतो. यातली शीर्षकंदेखील त्या त्या कथेचा अचूक सूर पकडणारी… सांजड, धुंदरूक, ख्योळ, झटाझोंब्या, हुरडं, भागदेय, आकुस, काचणी… अशी. कथेमधली भाषा ही अगदी संवादी आहे. प्रसंगांचं आणि स्थळांचं तपशीलवार वर्णन हे ग्रामीण जीवनाचं प्रत्ययकारी चित्र उभं करतं. उदा.- पश्चिमेच्या घाटातनं उगवून आल्याली कृष्णामाई उगवतीच्या अंगानं उधळत येत, आपल्या भनींची गाठ-भेट घेत बारवाडला लकार्णी मारत पुढं जाती. अन् बागायती पट्ट्याच्या जरा खायल्या अंगालाच चिमगावची येस लागती. येस वलांडली की इठ्ठल-रुकमाईच्या देवळातला टाळ-चिपळ्याचा साद कानावर पडलाच म्हणून समजा.

साल-दरसाल वारीला जायचा नियम न मोडणाऱ्या गावात सांजंचा टोला पडला म्हंजी कुटकुटणाऱ्या हाडात जीव यायचा. वठत चाललेल्या खोडाला मृदुंगाच्या तालानं पालवी फुटायची. हिकडंच देवळाच्या सभामंडपातल्या एका खांबाला जानुदाबी टेकून बसलेला असायचा… असं सांगत हे चित्रमय वर्णन अगदी सहजतेनं कथेतल्या पात्रांशी, त्याच्या भावावस्थेशी आपल्याला जोडून देतं. या कथांचा पैस हा मोठा आहे. स्त्री केन्द्री असल्या तरी यातून सामाजिक परिस्थितीचंही दर्शन घडतं. एकोपा, भाऊबंदकी, विवाह संस्था, शेतकी जीवनातल्या समस्या, शेतकऱ्याची निसर्गाप्रतीची, जनावराप्रतीची संवेदनशीलता… जगण्याला सहजतेनं सामोरं जाण्याची वृत्ती, श्रद्धा-अंधश्रद्धा यांचं द्वंद्व अशा अनेक गोष्टी कथेच्या भवतालातून खुणावत राहतात.

या कथासंग्रहाचं चंद्रमोहन कुलकर्णींनी केलेलं मुखपृष्ठदेखील वैशिष्ट्यपूर्ण आणि समर्पक आहे. मातकट रंगाच्या पार्श्वभूमीवर कसलाही सुबकपणा, रेखीवपणा नसलेली संध्याप्रकाशाचा रंग ल्यायलेली सांजड ही अक्षरं जणू एखाद्या खेडूतानंच भिंतीवर लिहावीत तशी दिसतात. या जगण्याला कुठलाच भक्कम आधार नाही म्हणून की काय अक्षरांवरही रेषा नाहीत. शीर्षकाच्या खाली लेखिकेचे नावही पांढऱ्या नाजूक अक्षरांत लिहिलेले. त्याच्याखाली मावळतीच्या वेळी हातात काठी घेऊन गुरं हाकणारा गुराखी… गुरांसह सगळ्यांचे अंग मातीने, धुळीने माखलेले. आखून दिलेल्या मार्गावर एकाच सरळ रेषेत मान खाली घालून चालणारी ती जनावरे आणि आपल्याकडे पाठ करून मागून येणाऱ्या जनावरांच्याकडे एक पाय मागे एक पाय पुढे असं उभं राहून पाहणारा शिडशिडीत अंगकाठी असलेला गुराखी… त्याच्या डाव्या अंगाला आपल्या पर्णहीन फांद्या घेऊन कसंबसं तगलेलं एकुलत एक झाड आणि त्यामागे अस्ताला जाणारा केशरी रंगाचा सूर्य… हे कथांच्या पार्श्वभूमीला अगदीच चपखल असं चित्र . त्याच्या खाली काही बायाबापड्यांचे चेहरे पात्रांची मनोवस्था सांगणारे… सगळेच गंभीर… सगळेच मूक, जणू आता काही बोलण्यासारखं राहिलंच नाही असं दर्शविणारे.

मुखपृष्ठावरचे रंग जगण्यातली औदासिन्यता दर्शवतात यावरूनच आशयाची गंभीरता जाणवते.
कथा वाचताना विचार आला की या जर प्रमाणभाषेत असत्या तर त्या इतक्या परिणामकारक झाल्या असत्या का? तर याचं उत्तर आहे ‘नाही’. आपण जगत असलेल्या जीवनशैलीला पोसणारी भाषाच त्यातल्या भावना आपल्यापर्यंत सशक्तपणे पोहोचवू शकते. हे व्यवस्थित ओळखून प्रथा-परंपरेची बीजं रोवल्या गेलेल्या या ग्रामीण भाषेला पुन्हा एकदा सर्वांसमोर तिच्या वैशिष्ट्यांसह पुढे आणणाऱ्या सुचिता घोरपडे यांचं विशेष कौतुक वाटतं. अलीकडच्या काळात शिक्षणाच्या प्रभावामुळे बोलीभाषा जवळजवळ लोप पावत चालल्या आहेत अशी खंत वारंवार व्यक्त केली जाते. परंतु शुचिता घोरपडे यांचे लेखन पाहता एक आशेचा किरण दिसत आहे असं मानायला हरकत नाही.

पुस्तकाचे नाव – सांजड । कथासंग्रह
लेखक : सुचिता घोरपडे
प्रकाशक: सॅम पब्लिकेशन्स
मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी
पृष्ठे : १३६ | किंमत : १८० ₹


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

आजूबाजूच्या घटनांवरची तिरकस शैलीतील कादंबरी

Saloni Art : ट्रान्सफॉर्मर कार तयार करायची आहे ? मग पाहा हा व्हिडिओ…

Photos : सुरात गाणारा टकाचोर…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading