September 7, 2024
Eknath Patil poem in Solapur University syllabus
Home » एकनाथ पाटील यांची कविता सोलापूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

एकनाथ पाटील यांची कविता सोलापूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात

इस्लामपूर – सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कला आणि वाणिज्य विद्याशाखांच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात येथील कवी एकनाथ पाटील यांच्या कवितेचा समावेश करण्यात आला आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार नव्याने तयार करण्यात आलेला हा पुनर्रचित अभ्यासक्रम आहे.

सोलापूर विद्यापीठाच्यावतीने मराठी विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘साहित्यलेणी’ या शीर्षकांतर्गत नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकात श्री.पाटील यांची ‘शहर : एक उदास पोकळी’ ही कविता समाविष्ट करण्यात आली आहे. ‘मराठी पद्य’ या शीर्षकाची ही विशेष अभ्यासपत्रिका आहे. यापूर्वी त्यांची हीच कविता शिवाजी विद्यापीठाच्या बी.ए. आणि बी.काॅम प्रथम वर्षाच्या आवश्यक अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली होती.

शिवाजी विद्यापीठाबरोबरच मुंबई विद्यापीठ आणि नांदेड विद्यापीठांच्या अभ्यासक्रमातही त्यांच्या इतर काही कविता अभ्यासक्रमात आहेत. श्री पाटील यांचे ‘सत्त्वशोधाच्या कविता’, ‘खुंट्यांवर टांगलेली दुःखं’, ‘आरपार झुंजार’ आणि ‘अरिष्टकाळाचे भयसूचन’ असे चार कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या या कवितासंग्रहांना महाराष्ट्र आणि कर्नाटकातील वाङ्मयीन संस्थांचे राज्यस्तरावरचे प्रतिष्ठेचे अनेक वाङ्मय पुरस्कार मिळालेले आहेत.

काही संपादित ग्रंथही त्यांच्या नावावर आहेत. सोलापूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेली सदरची कविता त्यांच्या ‘खुंट्यांवर टांगलेली दुःखं’ या कवितासंग्रहातून घेतली आहे. प्रस्तुत कवितासंग्रह मुंबईच्या पाॅप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. श्री. पाटील इस्लामपूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील काॅलेजमध्ये मराठी भाषा आणि वाङ्मयाचे प्राध्यापक म्हणून सेवा करतात.

एकनाथ पाटील यांच्या खुंट्यांवर टांगलेली दुःखं यावर ना. धों. महानोर यांनी केलेली टिपणी….

विशेषतः गेल्या पंचवीस-तीस वर्षांत मराठी साहित्यात आमूलाग्र नवेपण आलं ते खेडे विभागातल्या नव्यानं लिहिणाऱ्या दमदार लेखक कवींमुळे. भरताड लिखाण प्रत्येक काळात येतं ते त्याच्याच पायानं निघूनही जातं. ट्रीक किंवा तात्कालिक लोकप्रियता, आवाजी अभिनिवेष कधीच फार काळ टिकला नाही. खरं म्हणजे जगणं व जगण्यातला अनुभव सच्चा, खूप आतला, काळजातला असला व धीटपणानं सांगणारा शब्द असला तर तो रसिकांच्या, वाचकांच्या मनात खोलवर रुतून बसतो. अस्सल साहित्य ग्रामीण भागातून कथा, कविता, कादंबरी, समीक्षा या सगळ्या साहित्य प्रकारांमधून धगधगतं जिवंत असं आलं आणि मराठीला नवं रूप देऊन गेलं. ठळक पन्नासशंभर महत्त्वाची पुस्तकं या काळात इथल्या मातीची, त्या माणसांच्या जगण्यातल्या मोडतोडीची, नव्या उमेदीची सुद्धा आली. प्रत्येक काळात असं साहित्य थोडंच पण फार महत्त्वाचं येत असतं. या काळातला केंद्रबिंदू गाव- शिवार – शेती, तिथली माणसं, जगणं असा आहे.

एकनाथ पाटील यांच्या कविता मी वाचल्या. त्यांची माझी दोन वर्षापूर्वी भेटही झाली. थेट लहान वाडीवस्तीमधून शिक्षण घेऊन संपन्न नव्या विचारांनी भरगच्च असा हा तरुण खूप अस्वस्थ होता. व्यक्तिगत जीवनातला भिंगुळवाणा नशिबी आलेला भाग होता, त्याला डगमगणारा नव्हता, नाही. पण संबंध व्यवस्थाच, राजकारण-समाजकारण जे म्हणतात तेच विद्रूप व भ्रष्टाचारी झालं. नुसतं झालं नाही; त्याला संपूर्ण नीट करणं दुरापास्त आहे, अशी अवगुंठनाची जी मनोवस्था आहे ती त्यांच्या कवितेत मुख्यतः त्यांनी शब्दबद्ध केली. ‘कोठुन येते मला कळेना, उदासीनता ही ‘हृदयाला’ ही बालकवींची ओळ शेवटी काळ्या इंजिनाखाली त्यांना घेऊन जाते. त्याचंच एक वेगळं वलय या शब्दाशब्दांमध्ये पाहून खूपच अवस्थ होतो. स्वातंत्र्यानंतरचे आशाआकांक्षेचे, स्वप्नांचे पाश मोठ्या प्रमाणावर मोडून पडले. त्याचे बळी मुख्यतः खेडे, तिथला माणूस – विशेषतः शेतकरी. तुकोबानं लिहिल्याप्रमाणे ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ वर्षांनुवर्षे चाललाय. पाऊस येवो न येवो, कितीही कष्ट पडो, कर्जबाजारीपण येवो, अवघ्या जगतासाठी पिकविणारा कष्टकरी शेतकरी- विशेषत: कोरडीचा शेतकरी घरादारासह, पोराबाळांसह नागवा झालाय. अतीव काळोखाच्या मार्गानं निघालाय जो आपला नाही. हे दुःख आहे.

या कवितासंग्रहातल्या अर्ध्याअधिक कविता या दुःखितानं ग्रासलेल्या आहेत. निसर्ग, पाऊस, पाणी यांचा लहरीपणा त्यापेक्षाही पासष्ट टक्के शेतकरी देशात असूनही त्याला मुख्य ठिकाणी घेऊन शेतीवर आधारित खऱ्या अर्थानं नियोजन झालंच नाही. अशी ही आपली लोकशाही याचं व भरताड झालेल्या खेड्याचं, आईवडिलांच्या आसवांचं अतिशय पोटतिडकीनं चित्र अनेक कवितांमधून एकनाथनं मांडलं. माझ्यासारख्या तेच भोगलेल्या व भोगत असलेल्या खेड्यातल्या माणसाला ते खूप खूप आतून चटका लावतं. विषण्णपणानं बिलगून राहातं. आईचं जातं, तिचं पीठ होऊन जगणं आणि लेकरांना भरवणं, व्याकूळ डोळ्यांना फक्त खोटा आधार देत राहाणं अशा खूप काही कविता अस्वस्थ करून टाकतात.

त्यांच्या दुःखाच्या मातीला
कधी फुटतो अंकुर
सुख फुलण्याच्या आधी
माती खचते खालून
या शब्दांमधली अवस्थता संपूर्ण आपल्याला पिळवटून टाकते. पुढारी, गब्बर नोकरीवाले, भांडवलदार अशा अनेक क्षेत्रांतल्या मंडळींच्या मुलांनी पुढे काय व्हावे हे अगदी ठरलेलं आहे. शेतकऱ्यांच्या पोराने काय व्हावे अशी एक कविता व त्यासारख्या अनेक कविता आहेत. गावातला फाटका मित्र मुंबईत गब्बर झाला कुणाच्या खांद्यावर? सोबतीनं? – तसं व्हायचं? अशक्य. अनेक विद्रूप ठिकाणी पैसा मिळवता येतो मोठंही होता येतं ते या तुकोबा-ज्ञानोबा विठोबा वाचलेल्या बापानं त्या वाटेनं कधीच जायचं नाही हे शिकवलं. पक्वं. तिचंच नाव ‘कृषिजन संस्कृती’. ही कृषिजन संस्कृती भाकरीची असेल, नात्यागोत्यातल्या प्रेमळ जिव्हाळातली असेल. साने गुरुजी आणखी त्यासारख्या संस्कार देणाऱ्या गुरुजींची असेल तीच आपली संस्कृती. काट्याकुट्यांची असली तरी जपावी. एकनाथाची कविता चिंतनशील व सरळसरळ बेधडक आडपडदा न ठेवता सांगून जाणारी कविता आहे. अशी कविता नव्या एकूण कवितेत क्वचितच सापडते. ‘दत्तात्रय केरबा पाटील’ किंवा ‘शोधयात्रा’ यासारख्या कवितेमध्ये. इथं नसतं मोकळं आकाश, काळी माती, हिरवं रान. नसतात नद्या, झाडं, पशुपक्षी आणि गावाकडची माणसं असतात सत्त्व गमावून बसलेल्या निर्जीव माणसांची किडलेली मनं आणि भकास चेहऱ्यांवर त्रासलेले उदासीचे रंग.

मी शोधतो इथल्या प्रत्येक संदर्भात माझ्या गावाचं गावपण तेव्हा हे शहर हसतं मला उपहासानं
मी भ्रमिष्ट होत जातो अधिकच
अशा कविता वाचताना
या सिनेमातल्या
गुरुदत्तच्या
ओळी ओठांवर रुतून बसताना मला ‘प्यासा’ तोंडी असलेल्या ओळींची आठवण येते. गुरुदत्त पाठीवर कोट टाकून उदास निघालेला
जला दो इसे फूँक डालो ये दुनिया
मेरे सामने से हटावो ये दुनिया
ये दुनिया अगर जल भी जाये तो क्या है
ये दुनिया अगर मिट भी जाये तो क्या है?…

जगणं भाग आहे. रोजीरोटीसाठी, संसारासाठी. पळून तर जाता येत नाही. या शहरातल्या नोकरीत कुठेच थोडाही ओलावा दिसत नाही. अशा स्थितीत कवी छिन्नविच्छिन्न होऊन स्वतःलाच प्रश्न विचारीत अपंग फिरतो. ‘हे माझ्या प्रिय गावा’ सारख्या कवितेत मनातलं आख्खं सरळ सरळ लिहून मोकळा होतो. लिहिण्या शिवाय तर जगताच येत नाही, असं हे शब्दांचं कवितेचं रुतलेलं एकमेव आपलेपण घट्ट चिकटून असतं. अरे, कशासाठी एकमेकांच्या जिवावर माणसं उठतात. जिथं हातपाय दुमडून त्याच शहराच्या एका कोपऱ्यात राहतो. मी या इथं.
इथं माणूस माणसाला ओळखत नाही.
कोणाच्याच मनात भावनांसाठी जागा नाही
इथे माणुसकीशिवाय पैसा सारेच घेतो विकत
मग माझ्यासारखा राहतो शहरात नाइलाजाने झकत
मला पचवता येत नाही रे
शहराच्या सगळ्याच क्षेत्रांतलं हे प्रदूषण
लहानपणी चांगल्या गुरुजींनी खेड्यात छान शिकवलं. संस्कारांचं विचारांचं शिकवलं. आयुष्य कसं जगायचं शिकवलं. साने गुरुजींचं तत्त्वज्ञान व शहाणपण सहजसोपं शिकवलं. त्या गुरुजींना एक पत्र अशी कविता आहे. चिरफाड करणारी. गुरुजी, अशा या दुनियेत आज मला पांडुरंग सदाशिव साने नाही होता येणार – त्यांचे विचार नाही घेऊन चालता येणार हे सगळं तुम्हीच जरा बघा अन् सांगा.

कॉम्रेड कवी मित्राचं डावं तत्त्वज्ञान – समतेचा समाज तत्त्वज्ञान- भाषणं, चर्चासत्रं, सिगरेट व झोळी गळ्यात घालून छान चाललेलं – मी अजून ऐकतो. एकटक. पण घरी गेल्यावर त्याच्या संसाराची यातायात. बायको साधी चूल तरी पेटावी म्हणून मागणी घालते तेव्हा तो अस्वस्थ होतो. ध्येयवेड्या माणसांचं आयुष्य असं छिन्नभिन्न देशासाठी समाजासाठी माणसामाणसांमधली अंतरं नष्ट करण्यासाठी पछाडलेले तरुण संसाराकडे कधीच लक्ष नाही आणि संसार तर आहे असं संभ्रमित करणारं एक प्रतिकात्मक चित्र ‘कॉम्रेड कवी’ या कवितेत फारच छान आहे. तरीही कवी निराश न होता अथक झगडत आयुष्याला सामोरं जायचं म्हणतो. झगडा द्यायचं ठरवतो. हार आज वाटते उद्याचा दिवस, एक दिवस नक्कीच नवा सूर्योदय घेऊन येईल किंवा थोडा प्रकाश तरी. सत्वशोधाच्या वाटेवर नव्या उमेदीनं पुन्हा नवा शब्द व आशावाद हा कवी घेऊन आहे..

आजमितीला आम्हाला बाकीं काही होता आलं नाही तरी मान्य आहे शेवटी लढत राहाणे ही आपली निःसंशय गरज आहे.
त्या निर्णायक लढाईच्या आम्ही प्रतीक्षेत आहोत
ज्या आधाराने आम्हाला मिळवता येईल आमचं सत्व
आणि शेवटी आमच्या सोबत असेल
आम्ही माणूस असण्याची चिरंतन ताकद
जी देईल संघर्षाचे बळ
तेव्हा कुठे जगण्यालाही उरेल अर्थ
अशा सत्वाच्या आम्ही शोधात आहोत
मी खूप लिहून जे कळणार नाही ते मुख्यतः कविता वाचून, पुन्हा पुन्ह वाचून कळेल. एक खेड्यातला नवा कवी नवा शब्द नवा आशय नवा अनुभव भावनेच्या आहारी फक्त न जाता, खोल, आतून, प्राणातून काही सांगतो आहे. त्याच्या उद्याच्या आणखी भरभक्कम टवटवीत कवितेची आम्ही वाटत पाहतोय.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

नवरा तो नवराच असतो…

गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंचचे पुरस्कार जाहीर

डॉ. यशवंत थोरात त्यांच्या लेखनातून माणूसपणाचे अधोरेखन

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading