September 8, 2024
Guru Pournima Special dr shrikant patil article
Home » तस्मै श्रीगुरवे नमः |
विशेष संपादकीय

तस्मै श्रीगुरवे नमः |

कोरोना काळात शाळा बंद असूनही शिक्षण मात्र सुरू होते. ही सारी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कमाल आहे. त्या वाईट काळात मोबाईलच गुरू होऊन गुगल मीट, झूम ॲपद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानदान पोहोचवण्याचं काम करीत होता. प्रत्येकानेच काळाची पाऊले ओळखून आपली वाटचाल केली तरच आपण आज या गतीच्या युगात टिकणार आहोत.

डॉ श्रीकांत श्री. पाटील

तस्मै श्रीगुरवे नमः |

भारतीय संस्कृतीत आई, वडील आणि गुरूंजनांना फार महत्त्वाचे स्थान आहे. आई – वडील जन्म देतात, मुलांचे पालनपोषण करतात, त्याला शिकवतात आणि लहानाचे मोठे करून त्याला स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी अहोरात्र मेहनत करतात. तर गुरू त्याला ज्ञानदान करून त्याची बौधिक उंची वाढवितात, त्याला अध्ययनात मदत करून देशाचा एक सक्षम आणि जबाबदार नागरिक म्हणून घडविण्यासाठी आपले महत्त्वपूर्ण असे योगदान देतात.

आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असे म्हणतात. ज्यांनी महाभारतामध्ये पुराणे लिहिती त्या व्यास ऋषींचा हा जन्मदिवस ,त्यांना वंदन करण्याचा हा दिवस संपूर्ण भारत वर्षामध्ये गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो.

“गुरुब्रम्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः । गुरु साक्षात् परब्रम्ह तस्मै श्री गुरूवे नमः ।”

साक्षात परब्रम्ह असलेल्या गुरूंना या दिवशी वंदन केले जाते. कारण मुलांच्या जीवनाला ज्ञान, माहिती, तपशील आणि संस्कार देवून आकार देण्याचे काम गुरू करीत असतात. त्याला प्रकाशाची वाट दाखवून इच्छित ध्येयपूर्तीसाठी मार्गदर्शनाबरोबर प्रेरणा, स्फूर्ती आणि शाबासकी देत असतात.

महर्षि वेद व्यासांची आठवण आपल्या मनात कायम रहावी म्हणून गुरूंच्या पायांना व्यासांचा अंश मानून यादिवशी पूजा केली जाते. त्यांचे चरणस्पर्श करून दर्शन घेतले जाते. व्यास ऋषींचा हा जन्मदिवस वेद पोर्णिमा म्हणूनही ओळखला जातो.

आपल्या जीवनामध्ये गुरूंची अनेकविध रूपे पहावयास मिळतात. आई ही आपली प्रथम गुरू असते. गर्भात असल्यापासून ती त्याला वाढविते. लहानाचा मोठा होईपर्यंत त्याच्यावर उत्तमोत्तम संस्कार करते. म्हणूनच महात्मा गांधीनी म्हटले आहे. ‘One mother is better than hundred teachers.’
‘एक आई ही शंभर शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ आहे.’ निसर्गही आपल्याला खूप कांही शिकवितो. आपल्या अंग खांद्यावर खेळत होतो. आपल्याला धन धान्य फुले फळे देतो. तसेच परिस्थितीवर आपणास शिकवतो. ग्रंथ गुरूचे द्वार तर सदैव आपल्यासाठी सताड उघडे असते. म्हणूनच ग्रंथ हेच गुरु असे म्हटले जाते. थोरामोठ्यांबरोबरच मित्र-मैत्रिणींकडूनही आपणास अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर गुरूंची विविध रूपे आपणांस अनुभवावयास मिळतात. आपले गुरू हे आपली संस्कारकेंद्रेच आहेत. गुरूंना वयाचे बंधन नसते. दहा वर्षाची मुक्ताई हिला हटयोगी चांगदेवाने गुरू मानले होते. तर वडीलबंधू निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना मार्ग दाखविला होता. गुरू शिष्याची फार मोठी परंपरा आपल्या देशात आहे. त्यामुळेच आपली संस्कृती, संस्कार आणि गौरवशाली इतिहास आजही आपले प्रेरणास्थान म्हणून आपल्यासमोर उभे आहेत.
आज काळ बदलला आहे. किंबहुना बदल हा काळाचा नियमच आहे. त्याला शिक्षणक्षेत्रही अपवाद नाही. पूर्वी गुरूकुले, देवळे, मठ ही शिक्षणाची केंद्रे होती. आज त्यांची जागा शाळा महाविद्यालयांनी घेतली आहे. वाचन, पठन या क्रियांबरोबरच आज समजपूर्वकआकलन आणि कृतीवर भर देणारी अध्यापन प्रक्रिया विद्यार्थ्यांना गतिमान करीत आहे. आजच्या गुरुजींची वाटचाल ही खडू-फळा या बरोबर ई- लर्निंगच्या दिशेने सुरू आहे. काळाची पाऊले ओळखून आज शिक्षकांनी संगणकीय ज्ञानाचा अवलंब करीत आपणही काळाबरोबर आहोत हेच दाखवून दिले आहे.

‘थांबला तो संपला,
काळ माग लागला
धावत्याला शक्ती येई
आणि रस्ता सापडे ।’

या न्यायाने आज विद्यार्थी ज्ञानग्रहण करीत आहे. कोरोना काळात शाळा बंद असूनही शिक्षण मात्र सुरू होते. ही सारी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कमाल आहे. त्या वाईट काळात मोबाईलच गुरू होऊन गुगल मीट, झूम ॲपद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानदान पोहोचवण्याचं काम करीत होता. प्रत्येकानेच काळाची पाऊले ओळखून आपली वाटचाल केली तरच आपण आज या गतीच्या युगात टिकणार आहोत. काळाबरोबर अध्ययन-अध्यापनाची साधने, तंत्रे व पदधती बदलल्या. पारंपरिक शिक्षणाची जागा माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने अमुलाग्र बदलली. पण या बदलाच्या प्रक्रीयेत फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड ही भूमिका पार पाडणाऱ्या गुरूचे महत्त्व मात्र अबाधित राहिले आहे. कारण गुरू फक्त ज्ञानच देत नाहीत तर विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करून एक जबाबदार नागरीक म्हणून आपल्या विद्यार्थ्याला घडविण्याचे काम इमान इतबारे करीत असतात. त्यामुळे मुलांच्या जीवनात त्यांचे स्थान हे खूपच मौलिक आहे. “

“अष्टादश पुराणेषु
व्यासस्य वचनद्वयम् ।
परोपकार पुण्याय
पापाय परपीडतम् ॥”

अठरा पुराणांच्या मध्ये व्यासांची दोन वचने खूपच प्रसिद्ध आहेत. दुसऱ्यावर उपकार करणे पुण्याला कारण ठरते. तर दुसऱ्याला त्रास देणे पापाला कारण ठरते. व्यास ऋषींच्या या वचनानुसार गुरू नेहमीच ज्ञानदानाचे महत्कार्य करून पुण्य कमावत असतात. अशा समस्त गुरूजनांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!

डॉ श्रीकांत श्री. पाटील



Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

बीज अंकुरण्यासाठी हवा गुरुकृपेचा वर्षाव

ऑनलाईन आर्थिक फसवणुक झाल्यास काय करावे अन् काय करू नये

एकल महिला नाही स्वतंत्र महिला

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading