वडणगे गावच्या वैभवात भर टाकणारा ऐतिहासिक, पौराणिक आणि प्राचीन पार्श्वभूमी असलेला शिवपार्वती तलाव हा वडणगेसाठी निसर्गाचा संपन्न ठेवा आहे. तलावाच्या पूर्वेकडील आणि पश्चिम काठावर शंकर आणि पार्वतीची स्वतंत्र मंदिरे आहेत. अशी स्वतंत्र मंदिरे असलेले वडणगे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव गाव आहे. वाराणसी (काशी), उज्जैन उत्तरप्रदेश), केदारनाथ (उत्तराखंड) येथे तसेच त्र्यबंकेश्वर (नाशिक) आणि औरंगाबाद जिल्ह्यात एका गावात शिवपार्वती मंदिरे आहेत. वडणगेतील शंकर आणि पार्वतीच्या स्वतंत्र मंदिरांमुळे वडणगेला धार्मिक महत्व आहे. कोल्हापूर जिल्ह्यात असे शंकर आणि पार्वती मंदिर कुठेच नाही.( फक्त शंकराचेच मंदिरे आहेत. शंकर आणि पार्वतीच्या वास्तव्यांबद्दल अनेक अख्यायिका सांगितल्या जातात.
वडणगेच्या ऐतिहासिक शिवपार्वती तलावाला पौराणिक काळापासून मोठे महत्व लाभलेले आहे. ग्रामदैवत शिवपार्वतीमुळे गावाचा उल्लेख प्राचीन करवीर महात्म ग्रंथात आढळतो.
प्राचीन काळात तलावाची खोदाई..
येथील शिवपार्वती तलाव सुमारे ३२ एकरात आहे. प्राचीन काळात संबकेश येथील राजा गौतमी याने वडणगेत वास्तव्य केले होते. राजा गौतमी हा शिवप्रेमी असल्यामुळे या राजाने त्याकाळात हा तलाव खोदल्याचे सांगिलते जाते. त्याकाळापासून या तलावाला मोठे धार्मिक महत्व लाभले. शंकर-पार्वतीचे तिर्थक्षेत्र म्हणून याकाळापासून वडणगेची ओळख निर्माण झाली.
संस्थान काळात तलावाचा जिर्णोद्धार..
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा २ एप्रिल १८९४ साली राज्याभिषेक झाल्यावर शाहू महाराजांनी करवीर संस्थानची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर पाऊस न पडल्यामुळे संस्थानात सलग दोन वर्षे मोठे दुष्काळ पडले. अन्नपाण्यावाचून लोकांचे, जनावरांचे खूप हाल झाले. काही लोक तसेच जनावरे दगावली होती. अशा दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी शाहू महारांजांनी संस्थानातील जुने तलाव, विहिरी यातील गाळ काढण्याचे तसेच काही गावात नव्याने तलाव खोदण्याचे काम हाती घेतले. यातूनच संस्थानी खर्चातून वडणगेच्या तलावातील गाळ काढला होता.
२३फेब्रुवारी १८९७ रोजी वडणगे तलावाच्या गाळ काढण्याच्या कामाला सुरूवात केली. या कामासाठी संस्थानी बजेट मंजूर केलेली ४१०६ रूपये एवढी रक्कम होती. पण वडणगे तलावातील गाळ आणि तीन ठिकाणी घाट बांधल्यामुळे ७८९२ रूपये इतका खर्च झाला होता. यासाठी सरासरी ६१९ इतकेकामगार लागले होते. तर ९१ दिवस म्हणजे सलग तीन महिने हे काम सुरू होते. यावेळी तलावातील गाळ तर काढला होताच पण. जांभ्या दगडातील तीन ठिकाणी घाट होते. पूर्वी हे जूने घाट शिवाजी गल्लीच्या तोंडाला, मरगुबाई मंदिराशेजारी आणि घुग्गूळतिकटी (सध्या जेथे लग्नाचा घुग्गूळ नेला जातो तेथे) अशा तीन ठिकाणी शाहूकाळातील हे दोन-तीन पिढ्यांनी या घाटांचा वापर केला. याच वर्षापासून पश्चिमेकडून नैसर्गिक उतारातून तलावात पावसाचे पाणी साठल्याने या तलावातील पाणी ग्रामस्थ पिण्यासाठी वापरू लागले. अर्थात त्याकाळी गावाला पाणी योजना आस्तित्वात नव्हती. काही खासगी विहीरी, आड होते. त्यामुळे त्याकाळी अनेकांच्या घरात तलावाचे पाणी स्वयंपाकासह खर्चासाठी वापरत असत. शाहू महारांजांच्या दूरदृष्टीतून आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा तलाव प्रत्येक वडणगेकरासाठी अभिमानाचा वारसा आहे.
(नंतरच्या काळात हे शाहूकालीन घाट १९८६-८७ च्या काळात नव्याने घाट बांधल्यानंतर मुजून गेले.)
छत्रपती राजाराम महाराज आणि आक्कासाहेब महाराज यांच्या मासेमारीचे आवडते तळे
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे थोरले चिंरजीव आणि कन्या राधाबाई उर्फ आक्कासाहेब महाराज या आपल्या शिकारीच्या आवडीतून वडणगेच्या तलावात बंदुकीने मासेमारी करण्यासाठी त्याकाळी येत होते. या तलावात मरळ जातीचा काळा मासा (जी गोड्या पाण्यातील सुरमई मानली जाते) याची पैदास मोठ्या प्रमाणात होती. याच मरळ माशांच्या शिकारीसाठी राजाराम महाराज आणि आक्कासाहेब महाराज वडणगे तलावाच्या काठावर येत असत.
त्यांना मासेमारी करण्यासाठी तलावाच्या पूर्वेकडे काठावर असलेल्या पिंपरणीच्या झाडावर मचाण बांधून दिले जात होते. त्यावर बसून राजाराम महाराज आणि आक्कासाहेब महाराज उन्हाच्या तिरिपीला आलेल्या माशांची बंदुकीने शिकार करत होते. आजही या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार म्हणून शेलारांच्या घरासमोर तलावाच्या काठावर ही दोन पिंपरणीची झाडे उभी आहेत.
तलावाची राखण..
दरम्यानच्या काळात संस्थानातील लोकांसाठी काही तलाव हे मासेमारीसाठी खास राखीव ठेवले होते. तलावात मरळ जातीच्या मासा मोठ्या प्रमाणात मिळत असल्यामुळे तलावात अन्य काणी मासेमारी करू नये म्हणून तसेच तलावात कचरा, घाण कोणी टाकू नये म्हणून तलावाच्या राखणीसाठी राजाराम महाराजांनी गावातीलच महादेव प्रभावळे- म्हादू खाटकी यांना रखवालदार म्हणून नेमले होते.
श्रमदानाचा इतिहास….
शिवपार्वती तलावाला संस्थानी इतिहासाचा वारसा तर आहेच पण श्रमदानाचा मोठा प्रेरणादायी इतिहास आणि वारसा आहे. स्वातंत्र चळवळीत स्थापन झालेल्या राष्ट्र सेवा दलाने वडणगे तलावात श्रमदान केल्याची नोंद मिळते. १९५४-५५ सालाच्या दरम्यान वडणगे तलावातील केंदाळ आणि गाळ राष्ट्र सेवा दलाच्या स्वयंसेवकांनी वडणगेत दोन महिने राहून श्रमदान केले होते. तलावाच्या पश्चिमेकडे सध्या क्रिडांगण आहे. त्या जागेवर तंबू बांधून यातील स्वयंसेवक तंबूत राहत होते तर महिला स्वयंसेवक शाळा, पार्वती मंदिरात राहत होते. या स्वयंसेवकांना त्यावेळी वडणगेकरांच्या घराघरातून झुणका-भाकरी दिली जात होती. दिवसभर हे स्वयंसेवक श्रमदान करायचे आणि संध्याकाळी पार्वती चौकात प्रबोधनपर नाटके, सांस्कृतिक कार्यक्रम करायचेत. राष्ट्रसेवा दलाच्या स्वयंसेवकांनी तलाव तर स्वच्छ केलाच पण सध्या जाधव मळ्याकडे जाणारा रस्ता आहे. तो त्याकाळी केवळ एक बांध होता, स्वयंसेवकांनी तलावातील गाळ काढून या बांधावर टाकला होता. त्यातून मग लिकेपर्यत या गाळाचा बांध वजा छोटा पायवाटेचा रस्ता त्याकाळी स्वयंसेवकांनी केला होता. नंतर हाच रस्ता पुढे विकसीत झाला.
तलावासाठी वडणगेकरांचा दिवस पाळक आणि श्रमदान…
नंतरच्या काळात गाव वाढू लागले. गावात गाव विहिरीवरून पाणी योजना आली. मग तलावातील पाण्याचा वापर केवळ खर्चासाठी केला जाऊ लागला. हळूहळू तलावाकडे दुर्लक्ष होऊ लागले. तलावात केंदाळ वाढू लागले. मग त्याकाळात प्रत्येक गल्लीच्या जेष्ठ जाणत्या लोकांनी तरूणांना सोबत घेऊन श्रमदान करून केंदाळ काढले जात होते. यात प्रत्येक गल्लीतील घरटी माणूस सहभागी व्हायचा आणि गावच्या तलावासाठी राबायचा. आणि तलाव स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केला जायचा. नंतरच्या काळात १९८९ पासून ग्रामपंचायतीने उत्पन्नाचे साधन म्हणून तलावात मासेमारीचा लिलावातून ठेका सुरू केला. ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळू लागले. मासेमारी करणारयांनीही तलावातील केंदाळ काढून तलाव स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला. दरम्यानच्या काळात काही कारणांनी मासेमारी लिलाव बंद पडला. (आता नव्याने परत मासेमारीचा लिलाव दिला आहे). त्यांनी काही प्रमाणात केंदाळ काढण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.
जैवविविधतेचा ठेवा असणारा तलाव..
वडणगेचा शिवपार्वती तलावाला पौराणिक, प्राचीन, ऐतिहासिक वारसा तर आहेच पण तलावात पर्यावरणाला पूरक असणारी जैवविविधताही मोठी आहे. माझे पर्यावरणतज्ञ, पर्यावरणप्रेमी, पक्षीप्रेमी मित्र जोतिबाला नेहमी येतात. त्यांनी काही निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यात वडणगेचा तलाव रंकाळ्या इतकाच जैवविविधता असलेला आहे असे सांगितले आहे. तलावात प्रवाळयुक्त शेवाळ जे मासांचे पूरक अन्न आहे. याचे प्रमाण चांगले आहे. अनेक दुर्मिळ पाणवनस्पती आहेत.यातून माशांची चांगली पैदास होते. पश्चिमेकडे काठावर शांतता असल्याने अनेक दुर्मिळ देशी पक्षी. तर थंडीच्या दिवसात परदेशातील स्थलांतरीत पक्षी तलावात येतात. तीन वर्षापूर्वी पक्षी निरीक्षणाचा कार्यक्रम आम्ही घेतला होता. त्यावेळी शेकडो विविध प्रजातीच्या वावर तलावात असल्याची नोंद झाली आहे. तलावातील पाण्यातील आक्सिजन मोजण्याची त्यांनी सूचना पर्यावरण प्रेमींनी केली होती.
मिनी रंकाळ्याचा प्रयत्न
दरम्यान १७-१८ वर्षापूर्वी तलावाचे मिनी रंकाळा अशा नावाखाली सुशोभिकरणाचा प्रयत्न सुरू झाला. यासाठी गावचे सुपूत्र इंजिनियर आदित्य पाटील यांनी मिनी रंकाळ्याचे खूप सुंदर असे डिझाईन केले होते.( आजही हे डिझाईन ग्रामपंचायतीत पाहायला मिळते). चार – पाच वर्षापूर्वी तलावाच्या सुशोभिकरणासाठी पावणे चार कोटी शासनाकडून मंजूर झाले. त्यातून सुशोभिकरणाचे काम सुरू झाले. पण ते अद्याप अपुरे आहे. आता गाव दुप्पट- तिप्पट वाढला तलावाच्या पश्चिमेकडे वस्ती वाढली. वाढत्या नागरीकरणात ती वाढायलाही हवी याबाबत दुमत नाही. पण वस्ती वाढत असताना सांडपाण्याची निर्गत, कचऱ्याची निर्गत या पायाभूत सुविधां योग्य व्हायला हव्यात. तलावाच्या पाणलोट क्षेत्रातून येणारे सांडपाणी योग्य उपाययोजना करून रोखायला हवे. कुठलीही राजकीय सत्ता येवो पण वडणगेच्या तलावाचा हा संपन्न वारसा टिकविण्यासाठी त्याच्या जतनासाठी शाश्वत प्रयत्न व्हायला हवेत. प्रत्येक वडणगेकरासाठी अभिमानास्पद असलेला हा निसर्गाचा संपन्न ठेवा आहे. गावच्या तलावाचे निसर्ग वैभव जपायलाच हवे.
(साभार- वडणगेच्या प्रथा आणि परंपरा)
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.