संकरित भात तंत्रज्ञान हे एक काडी भात लागवडीचे तंत्रज्ञान म्हणून प्रसिद्ध आहे, एककाडी भात लागवड करून देखील संकरित जातीस भरपूर फुटवे येतात, भरघोस उत्पादन मिळते.
डॉ. बी. डी. वाघमोडे मोबाईल – ९४०४५८०४१६
प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत, जि. रायगड
संकरित भात लागवड एक काडी असल्याने हेक्टरी १५ ते २० किलो बियाणे लागते. प्रत्येक वर्षी संकरित जातीचे नवीन बियाणे वापरावे. कालावधीनुसार हळव्या जातीची लागवड १५ बाय १५ सेंमी, निमगरव्या व गरव्या जातीची २० बाय १५ सेंमी अंतरावर लागवड करावी, संकरित भात तंत्रज्ञान हे एक काडी भात लागवडीचे तंत्रज्ञान म्हणून प्रसिद्ध आहे, एककाडी भात लागवड करून देखील संकरित जातीस भरपूर फुटवे येतात, भरघोस उत्पादन मिळते.
संकरित भाताच्या जाती अन् त्याची वैशिष्ट्ये :
(१ ) जात : सह्याद्री
◆कालावधी (दिवस ) : १२५ ते १३०
◆दाण्याचा प्रकार : लांबट बारीक
◆उत्पादन (क्विं /हे.) : ६० ते ६५
◆प्रसारित विभाग : खार जमिनीसाठी, महाराष्ट्र राज्य
(२ ) जात : सह्याद्री -२
◆कालावधी (दिवस ) : ११५ ते १२०
◆दाण्याचा प्रकार : लांबट बारीक
◆उत्पादन (क्विं /हे.) : ५५ ते ६५
◆प्रसारित विभाग : महाराष्ट्र राज्य
(३ ) जात : सह्याद्री -३
◆कालावधी (दिवस ) : १२५ ते १३०
◆दाण्याचा प्रकार : लांबट बारीक
◆उत्पादन (क्विं /हे.) : ६५ ते ७५
◆प्रसारित विभाग : महाराष्ट्र राज्य
(४ ) जात : सह्याद्री -४
◆कालावधी (दिवस ) : ११५ ते १२०
◆दाण्याचा प्रकार : लांबट बारीक
◆उत्पादन (क्विं /हे.) : ६० ते ६५
◆प्रसारित विभाग : महाराष्ट्र, प. बंगाल, पंजाब, हरियाना, उ. प्रदेश
(५ ) जात : सह्याद्री -५
◆कालावधी (दिवस ) : १४० ते १४५
◆दाण्याचा प्रकार : लांबट बारीक
◆उत्पादन (क्विं /हे.) : ६० ते ६५
◆प्रसारित विभाग : कोकण विभाग, पाणथळ क्षेत्र
अशी करा भाताची रोपवाटिका :
(१) पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीची उभी आडवी नांगरट करावी. प्रति गुंठा क्षेत्रास अर्धा टन शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळून घ्यावे.
(२) एक हेक्टर क्षेत्रावर लावणीसाठी १० गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका तयार करावी. रोपवाटिका गादीवाफे, सपाट वाफे, ओटे करून, रहू पद्धत, दापोग पद्धत तसेच सेंद्रिय पद्धतीने तयार करता येते.
(३) संकरित भात लागवड एक काडी असल्याने हेक्टरी १५ ते २० किलो बियाणे लागते. प्रत्येक वर्षी संकरित जातीचे नवीन बियाणे वापरावे.
(४) संकरित बियाणे प्रत्येक वर्षी नव्याने खरेदी करावे लागते. बीज प्रक्रिया केलेली आहे याची खात्री करूनच विकत घ्यावे प्रक्रिया केलेली नसल्यास २ ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्यास प्रक्रिया करावी.
(५) रोपवाटिकेसाठी तयार केलेल्या क्षेत्रामध्ये १ ते १.२ मीटर रुंद, ८ ते १० सेंमी उंच आणि जमिनीच्या उतारानुसार आवश्यक लांबीचे गादीवाफे तयार करावेत. वाफ्यात प्रति गुंठा क्षेत्रास १ किलो युरिया किंवा २ किलो अमोनिअम सल्फेट, ३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट, ८०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश ही खते मातीत मिसळावीत. नंतर वाफ्यावर रुंदी समांतर ७ ते ८ सेंमी अंतरावर ओळी काढून २ २.५ सेंमी खोलीवर बी पेरून मातीने झाकून घ्यावे.
(६) रोपांच्या जोमदार वाढीसाठी पेरणीनंतर १५ दिवसांनी प्रती गुंठा क्षेत्रास १ किलो युरिया खत द्यावे. गादीवाफ्यावर पेरणी केल्यामुळे मुळाजवळील जमीन भुसभुशीत राहते, त्यामुळे रोपे पुनर्लागवडीसाठी काढण्यास सोपी पडतात. ओळीत पेरणी केल्याने तण काढण्यासाठी सोपे होते. अशा तऱ्हेने रोपवाटिका केल्यास राब भाजण्याची आवश्यकता नाही.
भात लागवडीचे तंत्र :
(१) जमिनीची २ ते ३ वेळा उभी आडवी नांगरट करून जमीन भुसभुशीत करावी. लावणीपूर्वी साधारण दोन आठवडे १० टन प्रति हेक्टर सेंद्रिय खत शेतात पसरावे किंवा १० टन प्रति हेक्टर गिरिपुष्पाचा पाला चिखलणीच्यावेळी जमिनीत गाडावा. चिखलणी करण्यासाठी कृषी विद्यापीठाने विकसित केलेले पंकज हे अवजार वापरावे.
(२) पेरणीनंतर २१ ते २५ दिवसांनी रोपे पुनर्लागवडीस तयार होतात. यावेळी रोपांना ५ ते ६ पाने आलेली असतात. गादी वाफ्यातून रोपे काढण्यापूर्वी दोन दिवस अगोदर भरपूर पाणी द्यावे. रोपे लावताना ती खोल जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. रोपे उभी लावावीत.
(३) एका आव्यात १ ते २ रोपे लावावीत. कालावधीनुसार हळव्या जातीची लागवड १५ बाय १५ सेंमी, निमगरव्या व गरव्या जातीची लागवड २० बाय १५ सेंमी अंतरावर करावी.
खत व्यवस्थापन :
प्रति हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद, ५० किलो पालाश द्यावे. यापैकी ४० किलो नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश चिखलणीच्या वेळी द्यावे किंवा मिश्र खत १५:१५:१५ प्रति गुंठा क्षेत्रास ३. ३५ किलो या प्रमाणात द्यावे. नंतर ४० किलो नत्र खताची दुसरी मात्रा फुटवे येण्याच्यावेळी आणि २० किलो नत्र खताची तिसरी मात्रा पीक फुलोऱ्यावर आल्यावर द्यावी.
पीक व्यवस्थापन :
(१) लावणीनंतर सुमारे एक आठवडा रोपे चांगली मुळे धरेपर्यंत पाण्याची पातळी २ ते ५ सेंमी ठेवावी. यानंतर दाणे पक्व होईपर्यंत पाण्याची पातळी ५ सेंमी ठेवावी. लोंब्या येण्याच्या १० दिवस पूर्वी व नंतर खाचरात १० सेंमी पाण्याची पातळी ठेवावी.
(२) आंतरमशागत (कोळपणी) करताना पाणी कमी ठेवावे. तसेच वरखते देण्याच्या वेळेस व अधूनमधून पाण्याचा निचरा करावा वरखते दिल्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा ५ सेंमी इतके पाणी भरावे.
(३) वरखताचा पहिला हप्ता देण्यापूर्वी बेणणी करावी आणि खत दिल्यानंतर कोळपणी करावी. कोळपणी करण्यासाठी जपानी भात कोळपे किंवा कोनो विडरचा वापर करावा.
डॉ. बी. डी. वाघमोडे, मोबाईल – ९४०४५८०४१६
प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत, जि. रायगड
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
