September 8, 2024
Importance of Agriculture in Future Pratap Chiplunkar article
Home » आजही शेती उत्तमच !
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

आजही शेती उत्तमच !

वास्तविक हरितक्रांती ही शेतीच्या उन्नतीसाठीच आणली गेली होती. मग असे का व्हावे ? या परिस्थितीचा अभ्यास वेगवेगळ्या दृष्टिकोनातून करावा लागेल. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळच्या राज्यकर्त्यांना भारताचा विकास करण्याची इच्छा होती. यासाठी त्यांनी औद्योगिकीकरणावर भर दिला. या तुलनेत शेतीच्या विकासाकडे फारसे लक्ष दिले नाही. त्या काळात भारताची लोकसंख्या ३०- ३५ कोटी होती. तत्पूर्वी भारतावर ७०० वर्षे मोगलांचे व १५० वर्षे इंग्रजांचे राज्य होते. इंग्रजानी भारतात जी काही विकास कामे केली त्यामागे त्यांना राज्य करणे जास्तीत जास्त सोपे कसे होईल हा मध्य धरून त्यांनी धोरणं आखली. त्यातून त्यांनी भारताला दुबळे करून ठेवले. इंग्लंडमधील उद्योग चांगले चालावेत, यासाठी गरजेचे पदार्थ भारतातील शेतकऱ्यांकडून करून घेतले.ही उत्पादने इंग्लंडला पाठवून तेथील उद्योगाकडून इंग्लंडला होईल ती अंकित देशात चढ्या भावात विकला जावा. तेथील उद्योगाचा विकास व्हावा तर पारतंत्र्यातील देश दुबळेच राहिले पाहिजेत, अशी धोरणे होती.

या काळात भारतातील बहुसंख्य लोकसंख्या शेतीत गुंतली होती. परिस्थिती अशी होती की शेतीतून जे उत्पादन मिळत होते, त्यात भारतात लोकसंख्येचे पोटही नीट भरत नव्हते. आपल्याला पोटपुजा करण्यासाठी अमेरिकेतून धान्य भरून येणाऱ्या जहाजाची वाट पहात बसावे लागे. अमेरिका भारतातील लोकांचे पोटापाण्यासाठी अत्यंत निकृष्ठ दर्जाचे पाठवित असे. पिवळा मिलो ज्वारी व हलक्या दर्जाचा गहू भारतातील स्वस्त धान्य दुकानातून जनतेला मिळत असे. जनताही तो गोड मानुन खात असे.

भारतातील कृषि उत्पादनाची परिस्थिती काय होती यासाठी एक उदाहरण वाचकांपुढे ठेवावेसे वाटते. १९७० साली कृषी पदवीधर होऊन मी शेती करण्यास सुरवात केली. त्या काळात मीही अमेरिकेतून मिळणाऱ्या गहू, ज्वारीचा आस्वाद घेतला. आमच्याकडे ऊस हे मुख्य पीक तर भात दुय्यम होते. माझी शेती घरापासून आठ किलो मीटरवर तर निवास आजही कोल्हापूरातच आहे. सरकारने शेतात पिकविलेला तांदूळ कोल्हापूर शहरात घरी खाण्यासाठी आणण्यावर निर्बंध घातलेले होते. तांदूळ बाकी मालात लपवून कोल्हापूर शहरातील घरी आणावा लागत असे. आमच्या भागातून सातबारावर जितकी भात पिकाची नोंद आहे, त्यावर लेव्ही म्हणून सरकारला अतिशय स्वस्त दरात ठराविक पोती भात द्यावे लागत होते. त्याचा दर उत्पादन खर्चही न निघणारा असे. तरीही असे भात शेतकरी देत असे.

१९३६ साली सरकारने महाराष्ट्रात निरा, प्रवरा गोदावरी नद्यांवर धरणे बाधून कालवे काढून पाटबंधाऱ्याची सोय करून दिली. यामुळे पुणे, नगर, सोलापुर व नाशिक जिल्ह्यातील काही भाग बागायती झाला. आज जमिनी बागायती होण्यासाठी शेतकरी नाना उपद्याप करतो आहे. त्या काळी उपलब्ध झालेले पाणी कसे वापरावे हे शेतकऱ्यांना माहिती नव्हते. लाभ क्षेत्रातील शेतकरी जमीन खराब होईल या भितीने उपलब्ध पाण्याचा वापर करण्यास तयार नव्हते. या काळात माळी समाजाने मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करून जमिनी कसायला घेऊन उपलब्ध पाण्याचा वापर करून स्वतःची भरभराट करून घेतली. इतर शेतकऱ्यांपुढे बागायतीचा एक आदर्श पाठ ठेवला.

कोल्हापूर हे छत्रपती शिवाजी महाराजानंतर छत्रपती ताराराणी यांनी स्थापन केलेले संस्थान. छत्रपती शाहूराजे व छत्रपती राजाराम महाराजांच्या दुरदृष्टितून राधानगरी येथे भोगावती नदीवर धरण बांधल्याने भोगावती व पंचगंगा नदी बारमाही वाहू लागली. कोल्हापूरचा शेतकरी विकसनशील असून त्यांनी उपलब्ध पाण्याचा उपयोग करून या खोऱ्यात उसाच्या शेतीतून विकास करून घेतला. त्या काळात शेतकरी जेमतेम खाऊन पिऊन सुखी होता. नदीतील पाणी जमिनीपर्यंत नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूकीची गरज होती. या काळात बँका शेतीला कर्ज देत नसत. पीककर्ज व मध्यम मुदतीचे विकास कर्जासाठी शेतकऱ्यांना खासगी सावकारावर अवलंबून रहावे लागे. त्या काळात परदेशातून आयात केलेल्या ऑईल इंजिन व पंपाच्या उभारणीसाठी शेतकऱ्यांना गुळ बाजारात दलालांनी मोठ्या प्रमाणावर वित्त पुरवठा केला. यातून शेतकऱ्यांनी शक्य तो विकास करून घेतला. १९६० नंतर गावोगावी विविध कार्यकारी संस्था स्थापन होऊन गावातच पीक कर्जाची सोय उपलब्ध झाली. पुढे सिमेंटची पाईप बाजारात आली १९६८ च्या दरम्यान वीज उपलब्ध झाली व पुढे पी.व्ही.सी. पाईपाचे बाजारात आगमन झाले. या शोधांनी शेतीची भरभराट होत गेली.

सन १९६५-७० च्या दरम्यान हरितक्रांतीला सुरुवात झाली. नवे सुधारित बी-बियाणे, रासायनिक खते, किड व रोगावरील निविष्ठा यांचे आगमन सुरू झाले. याच काळात उसाच्या सुधारित जातीही शोधल्या जाऊ लागल्या. बागायतीचे जे थोडेफार क्षेत्र होते, त्याची भरभराटी झाली. त्या काळात कोल्हापूर जिल्ह्यात फक्त भोगावती व पंचगंगा या वर्षभर हमखास पाणी उपलब्ध असणाऱ्या नद्या होत्या. हरितक्रांतीनंतर सरकारला बागायती शेतीचे महत्त्व लक्षात आले. पुढे भारतभर शक्य तेथे हळूहळू धरणे बांधली जाऊन मोठ्या प्रमाणावर पाटबंधाऱ्याच्या सोयी केल्या गेल्या. हा काळ शेतीचा सुवर्ण काळ म्हणावा लागेल. त्या काळात शेतीला मोठे महत्त्व होते. म्हणून उत्तमशेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी ही म्हण रूढ झाली.

१९७०-७५ दरम्यान बहुतेक ग्रामीण समाज हा निरीक्षण अंगठे बहादूर होता. पुढे प्रत्येक गावात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची सोय झाली. शिक्षणाचे महत्त्व लोकांच्या लक्षात येऊ लागले. त्यासाठी गुंतवणूक करणेची आर्थिक ताकद आली. तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी महाविद्यालयात पदवी व पदव्युत्त्र शिक्षणाच्या सोयी उपलब्ध झाल्या. आता निरीक्षण राहणे कमीपणाचे मानले जाऊ लागले. शिकले सवरलेले शेती करण्याऐवजी शहरात जाऊन नोकरी करू लागले. कमी शिकलेले शेतीत राहीले. वेगवेगळे उद्योग शहराबरोबर ग्रामीण भागातही उभे राहिल्याने नोकऱ्या बऱ्याच प्रमाणात उपलब्ध होत गेल्या.

मोठ्या प्रमाणावर शक्य तितकी बारमाही बागायत शेतीचे प्रमाण वाढत गेल्याने बाजारात सर्व प्रकारचा शेतीमाल सतत भरपूर उपलब्ध होत गेल्याने मागणी पुरवठा या अर्थशास्त्राचे नियमाप्रमाणे शेतीमालाचे दर बाजारातील इतर वस्तूंच्या समांतर वाढू शकले नाहीत. शेतीला लागणाऱ्या घटकांचे दर मात्र वाढत गेले. १९७० च्या हरितक्रांतीनंतर १५-२० वर्षांनी जमिनीची उत्पादकता शास्त्रीय नियमानुसार कमी होऊ लागली. यावर मात करण्यात उत्पादन खर्च वाढत गेला. त्यामानाने उत्पन्न वाढले नाही. यामुळे शेतीत पडतर मर्यादित राहत गेली. काही अस्मानी व सुलतानी संकटांची शेतीत मालिका चालूच राहिली. याच काळात तिकडे नोकरदारांचे उत्पन्न शाश्वत दिसू लागले. सरकारने आपल्या नोकरांचे पगार वाढविले व शिक्षक व प्राध्यापकांचे पगार गगनाला भिडले. उद्योगात कामगार संघटनाच्या दडपणामुळे नोकरांचे पगार बऱ्यापैकी राहिले. चार भावात नोकरी करणारा बंगले बांधू लागला. दोन व चार चाकी गाड्यातून फिरू लागला. वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करू लागला. या तुलनेत शेतकरी चुकून तेजी, बराच काळ मंदी अगर जेमतेम खर्च व उत्पन्नाचा कसातरी मेळ घालत राहिला. त्याला शिक्षण, इतर संसाधने अगर ठेवी यात फारशी गुंतवणूक करणे शक्य झाले नाही. शेतकऱ्याला शती विकास गुंतवणूक सतत करावी लागते. हा कधीही न संपणारा घटक आहे. यामुळे थोडाफार पैसा उपलब्ध झाली की शेती विकास कामात गुंतवणूक केली जाते. माझी ५० वर्षे शेती आयुष्यात सतत पहिले कर्ज फेडणे व नवीन विकास कर्ज काढणे यात गेली. या व्यतिरिक्त गुंतवणूक शून्य. आवश्यक खर्च करावयाचे, परंतु पर्यटन, गृहनिर्माण अगर इतर सुखसोयीच्या खर्चाला सतत बांध घालावा लागतो.

परिणामी नोकरी करीत असलेला भाऊ व शेती करीत असलेला भाऊ यांच्या आर्थिकस्तरामध्ये भरपूर उच्व-निच्चता कायमची राहते. यामुळे समाजाचा शेतकऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. शेतकरी म्हणजे अपवाद वगळता सतत आर्थिक टंचाईत असणारा समाज अशी व्याख्या तयार झाली. आता उत्तम शेती जाऊन उत्तम नोकरी व कनिष्ठ शेती करीत उभे आहे, असे म्हटले जाऊ लागले. आज मुलगा शेती करीत आहे म्हटले की उपवर वधू व तिचे आईवडील स्थळ नाकारतात, बायको मिळविण्यासाठी तरी काहीकाळ नोकरी गरजेची बनलेली आहे. लग्न न जमलेले, वय वाढत गेलेले अनेक तरुण शेतकरी आज भेटतील. मग ती शेती कितीही चांगली असूदे, बंगला, गाडी, घोडे वगैरे ऐश्वर्य शेतीमुळे मातीमोल होत आहे.

वास्तविक जीवनाश्यक अन्न, वस्त्र, निवारा पैकी पहिल्या दोन गोष्टी शेतीतूनच येतात. माणसाला पैसे खाऊन जगता येत नाही, प्रत्येकाने नोकरी करावयाची ठरविल्यास इतक्या नोकऱ्या उपलब्ध नाहीत. अन्नधान्य निर्मिती जीवनावश्यक आहे. याला पर्याय नाही. शेती ही चालू राहिली पाहिजे. याचबरोबर त्याला प्रतिष्ठाही मिळाली पाहिजे.

१९९० च्या दरम्यान माझे शेतीतील उत्पादन घटू लागले व शेती कशी चालू ठेवायची हा माझ्यापुढे प्रमुख प्रश्न निर्माण झाला. वास्तविक ही परिस्थिती सार्वत्रिक होती. हे एक आव्हान समजून शेती संबंधित शास्त्रीय ग्रंथाचा अभ्यास करून शेती करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल केले. कमीत कमी खर्च व जास्तीत जास्त उत्पादन हे सूत्र शेतीत आणले. बाजारभाव आपल्या हातात नसतात. मात्र उत्पादन खर्च कमीत कमी ठेवणे ही संपूर्णपणे आपल्या हातातील गोष्ट आहे. २००५ सालचे महापूराने शेतीचे प्रचंड नुकसान केले. यातून बाहेर पडण्यासाठी हे परिवर्तन शोधणे भाग झाले. या सुधारणेतून गळ्याबरोबर गाळात रुतलेल्या मला पूर्णपणे बाहरे काढून सर्व संकटातून मुक्त केले. पुढील १५ वर्षे या तंत्राच्या प्रसाराला वाहून घेतले आहे. आज अनेक शेतकरी या तंत्राचा सुखा-समाधानाने वापर करत आहेत. असे काही परिवर्तन करून शेतीला जुने वैभव प्राप्त करून दिल्यास परत एकदा शेतील गतवैभव प्राप्त होईल. उत्तम शेती, मध्यम व्यापा- व कनिष्ठ नोकरी परत आली पाहिजे तरच अनेक सामाजिक व आर्थिक प्रश्न सुटतील. आता मी म्हणतो शेतीसारखा उत्तम व्यवसाय दुसरा नाही. यात राब मिळणारा आनंद व आरोग्य इतर कोठेच भेटणार ना उत्तम शेती आणि फक्त उत्तम शेतीच!!

प्रताप चिपळूणकर


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

रोहयो फळबागप्रमाणे वनौषधी लागवडीची हवी योजना

नैसर्गिक क्रियेतूनच आत्मज्ञानाचा प्रकाश

video : अनुभवा सिनेमॅटिक राधानगरी…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading