वृत्तपत्रातून येणारे लिखाण समाज घडवू शकते, परिवर्तन आणू शकते. अध्यात्मातील शब्दांनी गाढव सुद्धा सात्विक होऊ शकते. शब्दाचे हे सामर्थ्य ओळखून तसा विचार वृत्तपत्रात आणला तर सात्विक समाज निर्मिती सुद्धा ही वृत्तपत्रे करू शकतात.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
खेचराचियाही मना । आणि सात्विकाचा पान्हा ।
श्रवणासवें सुमना । समाधि जोडे ।। 1058 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 13 वा
ओवीचा अर्थ – पिशाश्चादि अज्ञानी योनी आहेत. पण त्यांसहि माझे शब्द सत्वगुणाचा पान्हा फोडतील आणि शुद्ध अंतःकरणाच्या लोकांना तर, माझे शब्द ऐकल्याबरोबर समाधि लागेल.
अध्यात्म हे असे शास्त्र आहे जे आपले मानसिक आरोग्य ठिक करते. मनाचा विकास करते. मनाच्या अंतरमनात प्रवेश करून शुद्धी करते. यासाठी सद्गुरुंच्या शब्दांचे सामर्थ्य ओळखून त्यांनी दिलेल्या शब्दाची साधना करायला हवी. शब्दातूनच शिष्याची प्रगती होते. यासाठी शब्दाच्या सामर्थ्याची अनुभुती घ्यायला हवी. शब्दाची जादू कशी होते ते अनुभवायला हवे. यासाठी साधना करायला हवी. साधनेशिवाय अनुभव येणार नाही.
साधनेला जेव्हा आपण बसतो. तेव्हा आपणास दुरचे आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागतात. आसपासचे आवाजही स्पष्ट समजतात. म्हणजेच साधनेने आपली श्रवणशक्ती सुधारते. इतकेच काय आसपास काही जळत असेल तर त्याचा वासही पटकण समजतो. म्हणजेच हवेत मिसळलेले कणही पटकण आपणास समजतात. असे सर्वच इंद्रियांच्या बाबतीत घडते. याचाच अर्थ आपली सर्व इंद्रिये अधिक कार्यक्षम होतात.
पण आपण साधनेमध्ये गुरुंनी दिलेल्या शब्दाचा आवाज ऐकायचा असतो. तो स्वर आत्मसात करायचा असतो. सोहमचे स्वर, शब्द अनुभवायचे असतात. पण तसे होत नाही. कारण आपले लक्ष, मन या आसपासच्या आवाजांनी, वातावरणातील कणांनी विचलित होते. यासाठी याकडे लक्ष न देता साधनेत सोहमच्या स्वरावर, श्वासावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. सोहमचा स्वर स्पष्ट ऐकायला हवा. तसे केल्यास इतरत्र भटकणारी आपली सर्व इंद्रिये आपल्या नियंत्रणात येतात. यातून मग आत्मज्ञानाची अनुभुती येते. या अनुभुतीतूनच समाधी अवस्था प्राप्त होते.
शब्दांची जादू वृत्तपत्राच्या संपादकांना अधिक परिचयाची असते. या शब्दावरच त्यांचे प्रभुत्व असते. त्यावरच त्यांचा सर्व व्यवसाय उभा असतो. शब्दाचे सामर्थ्य त्यांच्या शिवाय कोणाला अधिक समजणार ? यासाठी शब्द वापरताना ते अधिक काळजी घेतात. कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही स्वतःपासून करायला हवी. संपादकांनी शब्दांची अनुभुती घेऊन त्यातून लेखांची निर्मिती केल्यास निश्चितच त्यांच्या लिखाणात तर फरक पडेल. तसेच ते समाजासाठीही उपयुक्त ठरेल. परिवर्तन ही पटकण होणारी प्रक्रिया नाही. पण सातत्य असेल तर या प्रक्रियेचा वेग वाढतो. वृत्तपत्रातून येणारे लिखाण समाज घडवू शकते, परिवर्तन आणू शकते. अध्यात्मातील शब्दांनी गाढव सुद्धा सात्विक होऊ शकते. शब्दाचे हे सामर्थ्य ओळखून तसा विचार वृत्तपत्रात आणला तर सात्विक समाज निर्मिती सुद्धा ही वृत्तपत्रे करू शकतात.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.