November 21, 2024
Ashok Koli Comment on Pada Novel
Home » भोवतालच्या अस्वस्थेतून ‘पाडा’ ची निर्मिती
गप्पा-टप्पा

भोवतालच्या अस्वस्थेतून ‘पाडा’ ची निर्मिती

सुनसगाव बु ता.जामनेर येथील सुप्रसिद्ध साहित्यिक व शिक्षक डॉ. अशोक कौतिक कोळी यांच्या पाडा या बहुचर्चित ग्रामीण कादंबरीचा सामावेश 2023 -24 या शैक्षणिक वर्षापासून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या एम.ए. मराठी अभ्यासक्रमात झाला आहे. एम.ए. प्रथम वर्ष ग्रामीण साहित्य या अभ्यासक्रमात पाडा ही कादंबरी विशेष कलाकृती म्हणून अभ्यासली जाणार आहे. ‘पाडा’ ही कादंबरी खानदेशी केळी उत्पादक शेतक-यांची व्यथा व वेदना मांडणारी कलाकृती आहे. मराठी ग्रामीण साहित्यातील पाडाचे स्थान निर्विवाद आहे. या निमित्ताने लेखक अशोक कोळी यांनी पाडा कादंबरी संदर्भात व्यक्त केलेले मनोगत…

२००१ साली माझी पहिली कथा प्रसिद्ध झाली. दैनिक लोकमतच्या त्यावेळच्या दिवाळी अंकात ती प्रसिद्ध झाली होती. लोकमत ( जळगाव ) ने दिवाळी अंकासाठी कथास्पर्धा आयोजित केलेली होती. त्या स्पर्धेसाठी मी माझी ‘कूड’ ही कथा पाठवली होती. ती त्या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ कथा ठरली. तेव्हापासून माझा लेखनाचा हुरूप वाढून गेला आणि मी लिहिता झालो.

प्रत्यक्ष कथा लिहून – छापून येण्याआधीच्या प्रक्रियेतून मी तेव्हा जात होतो. वय माझे अवघे सव्वीस वर्षे होते. पंचविशी नुकतीच ओलांडलेली होती. लग्न होऊन दोन- तीन वर्षे लोटलेले होते. तरूण वयातील झपाटलेल्या अवस्थेत मी होतो. वाचन बऱ्यापैकी झालेले होते. काही साहित्यिक कार्यक्रमांनाही हजेरी लावलेली होती. रेडिओ, वृत्तपत्रांच्या रविवारच्या पुरवण्या झपाटल्यागत ऐकत- वाचत आलो होतो.

कथा लेखनासाठी कुठले विषय निवडावेत ? या विचारात तेव्हा मी होतो. तेव्हा स्वतः पासूनच सुरूवात करावी असे ठरविले ! कूड साठी स्वतःचा, स्वतः च्या पिढीचा अनुभव मी निवडला. माझे नुकतेच लग्न झालेले होते. लग्न होऊन माझी बायको खेड्यातील त्या माझ्या ‘कूडा’च्या घरात नांदायला आली. तिला त्या शेणामातीच्या घरात राहावसं वाटत नव्हतं. थोड्याच दिवसात तिथे तिचा जीव गुदमरू लागला होता. घरात कुरबुरी सुरू झाल्या होत्या.

हा अनुभव इतरांच्याही बाबतीत होता. त्यावरच कथा का लिहू नये, असे मला वाटले आणि मी ‘कूड’ कथा लिहिली. एक गोष्ट मी मनोमन ठरवून टाकलेली होती. जे काही लिहायचे ते आपले स्वतःचे असले पाहिजे. आपल्या लेखनावर आपलीच नाममुद्रा असायला हवी. म्हणून मग मी कुणाचेही अनुकरण न करता लेखनासाठी स्वतःची स्वतंत्र वाट चोखाळायचे ठरविले.

इतरांचे आपण काही वाचलेले आहे ते क्षणभर बाजूला ठेवले. आपला स्वतंत्र, नवाकोरा अनुभव साहित्यातून मांडायचे ठरविले. कूड कथा त्याअर्थाने यशस्वी झाली होती. कूडचा अनुभव माझा स्वतःचा होता. तसेच सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जे सांगायाचं आहे ते आपल्या शब्दात, आपल्या भाषेत मांडायचे हेही मी ठरविलेले होते. त्यासाठी माझी स्वतःची बोलीभाषा निवडली होती.

हे एक बरे झाले, मला परंपरेने माझी बोली मिळालेली होती. ती यापूर्वी कधी साहित्यात अवतरलेली नव्हती. जशी माझी बोली साहित्यसृष्टीपासून कोसो मैल दूर होती तशी माझी माणसं, माझा परीसर, माझा अनुभव साहित्यात आलेला नव्हता. मी वाचन केलेल्या साहित्यातून मला पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व कोकण या प्रांतातील माणसे, तेथील प्रदेश भुगोल व बोलीभाषा वाचायला मिळालेली होती. मात्र माझा खानदेश व तेथील भुप्रदेशीय परिवेश मला साहित्यात दिसून आलेला नव्हता. अर्थातच माझे वाचान गद्यात्मक स्वरूपाचे जास्त होते. कवितेच्या प्रांतात तशी आघाडी घेतलीही असेल खानदेशाने; मात्र कथा- कादंबऱ्यांमधून असे चित्रण दिसून आले नव्हते. ही एक खंत माझ्या मनात होती.

त्या पार्श्वभूमीवर मी लेखनाला सुरूवात केली होती. अर्थातच कथा लेखन माझे सुरू होते. कूड नंतर इतरही कथा मी लिहिल्या होत्या.ज्या सगळ्या माझ्या वैयक्तिक आणि घरच्या अनुभवांवर बेतलेल्या होत्या.त्यातून आमच्या घरची गरीबी आणि जगण्याचा संघर्ष मी मांडण्याचा प्रयत्न केलेला होता.’कूड’ कथासंग्रहात त्या कथा समाविष्ट आहेत. कूड, पाझर, भूक, वगारू, सुतक अशा वैयक्तिक अनुभवांना शब्दरूप देणाऱ्या कथा अर्थातच मी सुरवातीला लिहिल्या. त्यानंतर मात्र काही सामाजिक, आजुबाजुच्या घटनांवर, व्यंगांवर बोट ठेवणाऱ्या मी कथा लिहिल्या.

त्यातून भ्रष्टाचार, व्यसनाधिनतेचे दुष्परिणाम, राजकीय-सामाजिक स्थित्यंतरे टिपण्याचा प्रयत्न केला. कसाई, धडा, धंदा, शाळाखोली, फिट सारख्या कथांचा सामावेश त्यात होता. थोडक्यात काय तर कथा लेखनाच्या सुरवातीला माझा प्रवास वैयक्तिकतेकडून सामाजिकतेकडे झुकणारा होता. वैयक्तिक अनुभव, गरीबी सोबतच समाजातील वैषम्यतेकडे माझे लक्ष वेधले गेले होते. आपलं कुटुंब जसं गरीबीत खितपत पडलेलं आहे, तसे इतरही कुटुंब समाजात आहेत. समाजातील गरीबी, विषमता, त्याआडून होणारे शोषण यामुळे मी अस्वस्थ होतो. विषमतेची ही दरी कोणामुळे, कशी निर्माण झाली ? हा विचार मी करू लागलो. त्याचेच प्रतिबिंब माझ्या लेखनातून पडू लागले.

सुरवातीचे लेखन केवळ वास्तवावर आधारलेले होते. समोर जे दिसत होते ते लिहायचो. गरीबी लिहायची, भूकेचे वर्णन करायचे. त्यानंतर मात्र माझी विचारांची दिशा प्रभल्भ आणि तिक्ष्ण होत गेली. आपल्याला समोर जे दिसते तेवढेच केवळ वास्तव आहे, असे नाही. तर ह्या वास्तवाच्या मागेही अजून काहीतरी आहे. ज्या घटना घडामोडी घडतात त्या तशा साध्यासरळ असतातच, असे नाही. माणसे दिसतात तशी ती आतुन असतातच असे नाही. म्हणजे प्रत्येक घटनाघडामोडीमागील वास्वव वेगळे असू शकते. माणसे दिसातात तेवढी साधी असू शकतात, असे नाही. हे मला कळू लागले.

साक्षात माझ्या आजुबाजूला तशी माणसे मला दिसू लागली. अशा अनेक घटना घडत होत्या ज्या मनाला विषन्य करत होत्या. चक्रावून टाकत होत्या. मती गुंग करत होत्या. विशेष करून सामान्य मानसाच्या बाबतीत हे घडून येत होते. ज्याच्या खांद्यावर विश्वासाने मान टाकावी त्याच्याकडूनच त्याचे शोषण होत होते. विश्वासघात होत होता. राज्यकर्त्यांकडून, गावकी- भावकीतल्या आपल्याच माणसांकडून हे सारे सुरू होते. सामान्यांचे शोषण सुरू होते. आपले शोषण कोणी करीत आहे याची त्यांना जाणीव होत नव्हती. समोरचा माणूस आपला आहे, तो आपल्या भल्याचाच विचार करणार ह्याची त्यांना खात्री वाटत होती. वरवर तरी तसे वातावरण, आपुलकीचा देखावा तयार केला जात होता. प्रत्यक्षातील परस्थिती मात्र वेगळी होती.कोण आपला कोण परका हे ओळखणे कठीण होते.

बदललेल्या ह्या परस्थितीने माझ्या मनाचा ताबा घेतला होता. मी ही हबकून जात होतो. हतबल होत होतो. चक्रावून जात होतो. विचार करत होतो. कुठं गेली साधी माणसं ? कुठं गेला त्यांच्यातील भोळा भाव ? शोधू पाहात होतो. न्यारंच समोर येत होतं. स्वार्थाने बरबटलेली खोटारडी माणसं दिसत होती. जी बुरेखे घालून अथवा मुखवटे घालून वावरत होती. आपल्याच माणसांकडून आपल्याच माणसाची बिनबोभाट फसवणूक सुरू होती. शोषण सुरू होते. नात्या फाट्यांना तिलांजली दिली जात होती. स्वार्थ, मतलब आप्पलपोटेपणा साधल्या जात होता. हावरटपणाणे कळस गाठला होता.अशा या बदललेल्या समाजवास्तवाचे चित्रण आपण आपल्या लेखनातून करावे,असे मला वाटू लागले.

तशा काही कथा मी लिहिल्या सुद्धा ! मात्र हा माझा प्रयत्न मला तोकडा वाटू लागला. बदललेले समाजवास्तव एवढेच आहे का ? का याही पलिकडे अजून काही आहे ? ह्यादृष्टीने मी विचार करू लागलो. तेव्हा अजून काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या. हे जे आपल्या आजूबाजूचे चक्रावून टाकणारे वास्तव आहे ते कुठुन – कसे आले ? त्यासाठी कोणती परस्थिती कारणीभूत ठरली ? ह्या सगळ्या बदलामागे काय आहे ? कोणते घटक कारणीभूत आहेत ? याही मागे काही घटनाघडामोडी आहेत का ? असा विचार मी करू लागलो. तेव्हा कळले, की असा हा माझा भवताल बदलवण्यास काही घाटना निश्चितच जबाबदार होत्या. कोणत्या होत्या त्या घटना ?

माझा जन्म १९७५ चा ! साधारण पाच सहा वर्षानंतर मला थोडेफार कळू लागले असावे. म्हणजे मला कळू लागले ते ८० चे दशक होते. याच दशकात माझे बालपण गेले. तेव्हाचा तो काळ इतका गुंतागुंतीचा मुळीच नव्हता. वातावरण तसे निरामय होते. स्वार्थ, मतलब तेवढा बोकाळलेला नव्हता. त्यानंतरच्या ९० च्या दशकात काही बदल जरूर झालेत. विशेषतः १९९१ साली गॕट करार आला. उदार आर्थिक धोरणाचा स्विकार झाला. परिणामस्वरूप जागतिकीकरणाणे वेगवेगळ्या खिडक्यांतून देशात प्रवेश सुरू केला. त्याचे परिणाम नंतरच्या काळात दिसू लागले.

ह्या खुल्या आर्थिक धोरणांसोबतच राजकारणाने खेड्यापाड्यात शिरकाव केला. राज्य- राष्ट्रीय पातळीवरील राजकीय पक्षांच्या शाखा गावागावात आल्या. तालुका – जिल्हा पातळीवरील नेतृत्वाकडून गावखेड्यातील टकू-यांचा आपल्या स्वार्थी राजकारणासाठी उपयोग सुरू झाला. गावखेड्यातील घराघरावर राजकीय पक्षांचे ध्वज फडकू लागले. त्यातून गावकी भावकी नासावली जाऊ लागली. भांडणे तटे बखेडे यांचे पेव फुटले. एकसंघ असलेला गावगाडा उभा दुभंगला. सोबतच सहकारी चळवळीने जोम धरला. विविध शैक्षणिक,आर्थिक, सहकारी संस्था गावागावात उभ्या राहिल्या. या सहकारी संस्था आपल्या उत्थानासाठी आहेत, असे सामान्यांना वाटू लागले. प्रत्यक्षात मात्र तसे घडले नाही. सहकारातील नेतृत्वाकडून स्वाहाकार सुरू झाला. ज्यांचे कल्याण अपेक्षित होते त्यांचे शोषण सुरू झाले. ह्या सगळ्यात सामान्य माणूस उपेक्षितच राहिला.

अनेक अशा सरकारी धोरणांचा उरफाटा परिणाम दिसू लागला. भ्रष्टाचार बोकाळला. नोकरशहा मुजोर बनला. राज्यकर्यांकडून सामान्याऐवजी विशिष्ट गटाची भलावन सुरू झाली. त्यातून आर्थिक आणि इतर हितसंबंधांची जपणूक सुरू झाली. शेटजी भटजींचा वरचष्मा वाढला. व्यापारी, अडते, दलाल, नोकरशहा हातात हात घालून काम करू लागले. यातून येथील कास्तकाराचे शोषण सुरू झाले. शेतीमालाचे भाव पाडले जाऊ लागले. खत मटरेलाचे भाव वाढले.परिणामी शेतकरी आर्थिक गर्तेत सापडू लागला. अशाप्रकारे सामान्य माणसाचे, शेतकऱ्यांचे शोषण सुरू झाले. चहुबाजुने त्याची कोंडी होऊ लागली. सामान्यांचे जगणे असह्य होईल, असे वातावरण तयार केल्या जाऊ लागले.

ह्या सगळ्या प्रकाराने मी अस्वस्थ होतो. काय केले पाहिजे ? पण प्रत्यक्षात मी काहीही करू शकत नव्हतो. माझे हात बांधलेले होते. मी शिक्षक म्हणून सरकारी शाळेत नोकरीला होतो.अशामध्ये कानावर काही गोष्टी येऊ लागल्या.अन्याय वाढला की त्याला वाचा फुटते म्हणतात तसे झाले. ज्या धोरणांमुळे कास्तकार मेटाकुटीस आलेला होता त्या धोरणांच्या विरोधात शेतकरी उभा ठाकला होता. खास करून शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तो एक होऊन रस्त्यावर उतरला होता. आपल्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात शेतकरी दाद मागू लागला होता. कष्टाने पिकवलेल्या शेतमालाला भाव मागू लागला होता. सुरळीत वीज पुरवठ्याची मागणी करू लागला होता.

मला ही गोष्ट स्वागतार्य वाटली. अन्यायाविरूद्ध शेतकरी आवाज ऊठवताहेत याचे कौतुक वाटले. माझ्यासाठी मन सुखावणारी ही गोष्ट होती. कारण ह्या सगळ्या घटनाघडामोडींनी मलाही अस्वस्थ केलेलं होतं. व्यवस्थेच्या विरूध्दची चीड माझ्याही मनात होती. दरम्यानचा शेतकऱ्यांचा लढा पाहून मी सुखावलो.ह्या सगळ्या वातावरणात माझ्या खानदेशातील शेतकरीही भरडला जात होता. कधीकाळी डौलात उभ्या असलेल्या त्याच्या केळीच्या बागा उन्मळून पडत होत्या.पाण्याअभावी जळू लागल्या होत्या. भाव कोसळत होता. व्यापरी, दलाल संगनमताने भाव पाडत होते. वीज पूरवठा खंडीत होत होता. वाढलेल्या महागाईने, खतमटरेल्याच्या चढलेल्या भावाने येथला शेतकरी मेटाकुटीला आलेला होता.

कोणीही त्याच्या मदतीला धावून येत नव्हतं. ज्या राजकीय नेतृत्वाकडे आशेने पहावे त्या नेतृत्वानेही त्याला वाऱ्यावर सोडून दिलेले होते. अशा गलीतगात्र, मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्याची अवस्था भयावह होती. प्रगती होण्याऐवजी अधोगतीकडे त्याचा प्रवास सुरू होता. कर्जबाजारी होऊन नैराश्येच्या गर्तेत तो ढकलला जात होता. यातूनच आत्महत्येकडे,आत्मनाशाकडे त्याचा प्रवास सुरू झाला होता. कुटुंबासह स्वतः चाही घात करून घेण्याकडे त्याचा कल वाढला होता. अशा भेदरलेल्या, भयावह परस्थितीतून खानदेशातला शेतकरी जात होता. त्याचवेळी इतरत्र सुरू असलेले शेतकरी आंदोलनाचे लोण खानदेशात पोहचले. २००४ व २००५ ह्या दोन वर्षात खानदेशातील शेतकरी आंदोलनाने जोर धरला होता. एवढा की व्यवस्थेच्या त्यांनी नाकी नऊ आणले होते.

विशेष करून येथील केळी उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरला होता. त्याने अक्षरशः आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते. रस्ता रोको, धरणे आंदोलन कमी म्हणून की काय केळी फेको आंदोलन केले. रावेर परिसरातील शेतकऱ्यांनी अक्षरशः केळी रस्त्यावर आणून फेकली. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची वर्तमानपत्रे व इतरही प्रसारमाध्यमांनी मोठ्या प्रमाणात दखल घेतली. त्याची थेट दिल्ली पर्यंत चर्चा झाली. या आंदोलनात सुरेश पाटील , रमेश पाटील व त्यांचे सहकारी आघाडीवर होते. शेतकऱ्यांच्या ह्या केळी फेको आंदोलनाने मी फारच अस्वस्थ झालो. आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे वाढवलेले पीक शेतकरी रस्त्यावर आणून फेकतो. केवढा हा उद्वेग! केवढा हा आत्मक्लेश! शेतकरी असे कसे काय करू शकतात ? पण तसे घडले होते… शेतकऱ्यांनी मेहनतीने पिकवलेले केळीचे घड रस्त्यावर आणून फेकले होते.

ह्या घटनेचा माझ्या मनावर मोठाच परिणाम झाला. दरम्यान मी लेखनासाठी मोठी पोज घेण्याच्या मानसिकतेत होतोच. या केळी फेको आंदोलनाच्या घटनेने माझ्या समोर मोठीच संधी चालून आली. ह्या सगळ्या प्रकारावर मी पाडा ही कादंबरी लिहिली. पाडा कादंबरीतील घटना घडामोडी पात्रांसह अक्षरशः माझ्या अंगावर चालून आल्या. केळी फेको आंदोलनातील शेतकरी नेता सुरेश पाटील याला चांगदेव तापीकर बनवून मी कादंबरीचा नायक बनवून टाकले. ह्या कादंबरीतील सर्वच घटना प्रत्यक्षात घडलेल्या आहेत.माझ्या आजुबाजूलाच त्या घडत होत्या. पात्र तर माझ्या परिचयातीलच होती. त्या सगळ्यांना कोंबून मला फक्त बंदिस्त करावे लागले. त्यासाठी मला विशेष काही मेहनत घ्यावी लागली नाही. २००५ च्या उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये एका बैठकीत मी ही कादंबरी लिहून काढली.

केळी फेको आंदोलन ऑक्टोंबर-नोव्हेंबरमध्ये घडले. दरम्यानच्या काळातील घटनांनी माझ्या मनाचा ताबा घेतला. मे महिन्यात कादंबरी लिहून पूर्ण झाली.कादंबरी लिहितांना जराशी काळजी फक्त मी घेतली. ती म्हणजे कादंबरी फापट पसारा व्हायाला नको. जे सांगायचंय ते नेमकेपणाने यायला हवं. दुसरं म्हणजे ज्या माणसांची गोष्ट आपण सांगत आहोत ती त्यांच्याच भाषेत यायला हवी. तिथला प्रदेश कादंबरीत यायला हवा.त्यासाठी स्थानिक पात्रांची, स्थानिक स्थळांची योजना केली. घटनांची मालिका समोर होतीच. त्यातूनच कथानक उभे राहिले.

अजून एक गोष्ट आवर्जून कादंबरीत मी घुसवली. ती म्हणजे प्रदेश, माणसांसोबतच शेतकऱ्यांचे पशुधन आणि शेतशिवारही कादंबरीत घेतले. बैलजोडी, गाय, म्हैस, एवढेच नाही तर त्याच्या घरातील कुत्री, मांजरी, पोपट यांनाही स्थान मिळाले. तसे तर ते असतेच. या जित्राबांशिवाय शेतक-याच्या जीवनाला पुर्णत्व येतच नसते. प्रादेशिकतेच्या अंगाने खानदेशातील ‘पारपट्टी’, ‘आरपट्टी’ आणि ‘तावडीपट्टी’ या भूभागांचे व तेथील वैशिष्ट्यपूर्ण समाजजीवनाचे यथार्थ दर्शन घडविण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे खानदेशातील केळी उत्पादक शेतकऱ्यांची संघर्षमय कहाणी, व्यवस्थेकडून होणारी त्याची फरपट प्रामाणिकपणे चितारण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी खास शेतक-यांची भाषा ‘तावडी बोली’ वापरली.

सौभाग्याची गोष्ट म्हणजे या कादंबरीला लगोलग प्रकाशकही मिळाला. नाही तर अनेक हस्तलिखित वर्षानुवर्षे प्रकाशकांच्या प्रतिक्षेत खितपत पडलेली असतात.गुणवत्ता असूनही प्रकाशक मिळतातच असे नाही. पाडाच्या बाबतीत तसे मात्र घडले नाही. श्रीरामपूर येथील शब्दालय प्रकाशनाने ही कादंबरी स्विकारली व ताबडतोब प्रकाशित सुद्धा केली. माझ्या सारख्या नवोदित लेखकाला अशी संधी मिळणे दुर्मिळ असतांना ती मिळाली.याकामी जेष्ठ लेखक प्रा.रंगनाथ पठारे व प्रा. गो.तु. पाटील यांचे मार्गदर्शन मला लाभले.आदरणीय पठारे सरांच्या शुभहस्तेच २१, मे २००६ रोजी पाडाचा प्रकाशन समारंभ पार पडला.

या कामी माझे मार्गदर्शक प्राचार्य डॉ. किसन पाटील , जळगाव यांचे सहकार्य मला लाभले. ज्या केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या ‘केळी फेको आंदोलनावर’ ही कादंबरी बेतलेली होती त्या आंदोलकांच्या सक्रिय सहभागातून ‘पाडा’ चा प्रकाशन समारंभ जळगाव येथील प्रसिद्ध व.वा. वाचनालय येथे त्यांनी घडवून आणला. महाराष्ट्र साहित्य परिषद जळगाव जिल्हा शाखा व जळगाव जिल्हा बोली साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. या समारंभास कुलगुरू डॉ. आर. एस. माळी, समाजसेवक पी. ई.तात्या, शिक्षक नेते हणमंतराव पवार, प्रकाशिका सुमती लांडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रा. रंगनाथ पठारे यांनी केलेली भलावन व मार्गदर्शन मला पुढील काळात उपयुक्त ठरले.

कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर तिचे सर्वत्र स्वागत होऊ लागले. अनेक वाचकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या.मान्यवरांकडून कौतुक होऊ लागले. जाणकारांकडून लिहिलेली परीक्षणे प्रकाशित होऊ लागली. मान्यवर समीक्षकांकडून स्वागत होऊ लागले. हळूहळू प्रचार आणि प्रसिद्धी मिळू लागली. पण खरी प्रसिद्धी मिळाली ती जळगाव आकाशवाणी केंद्रामुळे! त्याचे झाले असे की मी सहजच म्हणून तेथे पाडा पाठविली होती. एखादी कार्यक्रमात उल्लेख वैगेरे झाला तर तेवढेच बरे ! पण तसे न करता जळगाव आकाशवाणीने साक्षात पाडा कादंबरीचे अभिवाचन घडवून आणले. हा माझ्यासाठी अनपेक्षित सुखद धक्का होता.

या कामी अर्थातच पुढाकार घेतला होता त्यावेळचे जळगाव आकाशवाणी केंद्राचे कार्यक्रम अधिकारी विजय सपकाळे यांनी. सपकाळे यांनी इतक्या वैशिष्टयपूर्ण व अभिनव पद्धतीने पाडाचे अभिवाचन सादर केले की त्याला तोड नाही. या अगोदरचे क्रमशः अभिवाचन हे रटाळ असायचे. त्यात फक्त वाचन तेवढे व्हायचे. सपकाळे यांनी मात्र अथक परिश्रम घेऊन, तंत्रज्ञानाचा वापर करून पाडाचे अभिवाचन रंजक, श्राव्य व उठावदार केले. एवढे की श्रोते दर रविवारची त्याची वाट पाहू लागले. आवडीने पाडाचे अभावाचन ऐकू लागले.

लोक गटागटाने बसून पाडा ऐकायचे. दूरदर्शनवरील रामायण मालिकेची आठवण व्हावी एवढ्या तन्मयतेने श्रोते पाडाचे अभिवाचन ऐकायचे. त्यासाठी खास वेळ काढायचे. शेतकरी शेताच्या बांधावर बसून ऐकत. गुराखी, कामगार एकत्र येत. गावचौकातही काही लोक जमत. घराघरातून गृहीणी आवर्जून ही मालिका ऐकत व आपला अभिप्राय कळवत. प्रत्येकाला ही गोष्ट आपली वाटायची. त्यातील कथानक व भाषाशैली काळजाचा ठाव घ्यायची.अक्षरशः पाडाच्या अभिवाचनाने श्रोत्यांना वेड लावले होते. लोक मला भेटण्यासाठी आतुर व्हायचे. कोण हा लेखक… काय याने मांडून ठेवले… आपल्या आयुष्यातील व्यथा वेदना ससेहोलपट अशा पद्धतीने मांडल्याबद्दल… अन्याय अत्याचार व घुसमटीला वाचा फोडल्याबद्दल माझे त्यांना कौतुक करावेसे वाटायचे… उत्सुकतेनेपोटी अनेकजण आकाशवाणीवर धडकायचे. सपकाळे यांना भेटून भावना व्यक्त करायचे. फोन करून, पत्र लिहून आपल्या भावना कळवायचे.

पाडाच्या अभिवाचनाच्या अनेक आठवणी आहेत. त्यावर स्वतंत्र लेख लिहिता येऊ शकतो. एक मात्र खरे आहे, की पाडाचे अभिवाचन हा माझ्या आयुष्यातील प्रसिद्धीचा सर्वोच्च काळ होता. पाडा पुस्तक रूपाने जेथे जाऊ शकली नाही तिथे ती गेली. ज्या शेतकऱ्यांचं दुःख त्यातून मांडले होते त्या शेतकऱ्यांच्या प्रत्येक्ष बांदावर व घराघरात- मनामनात ती पोहचली. आपला आवाज अशापद्धतीने पोहचल्याबद्दल माझ्या एवढ्याच शेताक-यांनाही आनंद व्हायचा.ते आकाशवाणीचे भरभराटीचे दिवस होते. जळगाव आकाशवाणीचा श्रोतूवर्ग सर्वत्र पसरलेला होता. केवळ जळगाव जिल्हाच नाही तर जळगाव -धुळे-नंदूरबार- बुलढाणा-जालना-औरंगाबाद पर्यत जळगाव आकाशवाणी ऐकली जात होती व अशा सर्व स्तरातून पाडा ऐकली जात होती.

पाडाला अनेक मानसन्मान,पुरस्कार मिळाले- अनेक अभ्यासकांनी तिच्यावर एम.फिल. केले. पीएच.डी.साठी तिचा अभ्यास केला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि इतरत्रही ती अभ्यासक्रमात लागली. पण जळगाव आकाशवाणीने तिचा जो सन्मान केला तो कायमच स्मरणात राहिला. अभिवाचनाच्या माध्यमातून आकाशवाणीने मला घराघरात पोहचवले व लेखक म्हणून सुद्धा मान्यता मिळवून दिली !

अशोक कौतिक कोळी,
कूड, गणपतीनगर सेक्टर-३, जळगावरोड, जामनेर
जि. जळगाव – ४२४२०६
मो. ९४२१५६८४२७
ashokkautikkoli@gmail.com


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading