November 21, 2024
Encouragement is needed to get into the world of women power industry
Home » उद्योग जगतात महिलांनी उतरावे यासाठी प्रोत्साहन गरजेचे
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

उद्योग जगतात महिलांनी उतरावे यासाठी प्रोत्साहन गरजेचे

महिलांना प्रोत्साहन देणे गरजेचे

केंद्र सरकारने या तरूणाईला विविध उद्योग निर्मिती करून रोजगार प्राप्त करुण दिला पाहिजेत त्याचप्रमाणे लोकसंख्येच्या जवळ जवळ अर्धा हिस्सा असलेल्या नारी शक्तीला उद्योग जगतामध्ये आरक्षण व सवलती त्याप्रमाणे शिक्षण व प्रशिक्षण उपलब्ध करुन दिले पाहिजेत अन्यथा भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर सुद्धा नारी शक्ती परावलंबी आणि अबलाच राहील.

महादेव पंडित
लेखक मुंबईमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात व्यावसायिक आहेत

पृथ्वीतलावर मानव हा जन्म सर्वश्रेष्ठ मानला जातो. मानवामध्ये स्त्री व पुरूष ह्या दोन जिवांचा समावेश आहे. पारंपारिक जीवन पद्धतीमध्ये स्रियांसाठी चुल-मूल हिच पद्धत आजपर्यंत प्रचलित आहे. खरेतर आजच्या प्रगतशील युगामध्ये स्री व पुरूषाला सम समान वाटा मिळाला पाहीजे. पण आजसुद्धा स्रियांना पुरूषांइतके महत्व दिले जात नाही याचे कारण पुरूष या व्यक्तीने स्रीकडे बघण्याचा दृष्टीकोण नेहमीच निमुळता व मर्यादित ठेवला आहे. तिला हे जमणार नाही, ती एकटी जाऊ शकत नाही, तिच्यावर कोणीतरी हल्ला करेल, तिला कोणीतरी पळवतील इत्यादी नानाविध प्रश्न तो स्वत:ला विचारतो आणि त्यांची लॅाजिकल उत्तरे सुध्दा स्वत:ला देण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतो. आज रोजी सुद्धा समाजात मुलींना व स्रियांना दुय्यम स्थान देऊन संसाराचा गाडा हाकला जातो.

आज मुलीचे लग्न झाल्यानंतर मुलीच्या सासरच्या मंडळीचे मानपान माहेरच्या मंडळींना अगदी थाटामाटात व उत्साहाने करावे लागते. आज मुली मुलांच्या सोबत अनेक क्षेत्रात खांद्याला खांदा लाऊन अगदी हिरीहिरीने काम करत आहेत आणि म्हणूनच सरकारने तसेच समाजाने पारंपारिक चुल-मुल पॅटर्न बंद करून स्रियांना उद्योग जगतात मोठाला प्रवेश दिला पाहिजेत आणि देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात स्रियांना स्वावलंबी करण्याचे धोरण अवलंबिले पाहिजेत. आज स्रियांना अनेक व्यवसायामध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत पण त्यासाठी घरातील वडीलधाऱ्या पुरूषांनी त्यांना भक्कम सपोर्ट दिला पाहिजेत त्याचप्रमाणे त्यांचे मानसिक मनोधैर्य वाढविले पाहिजेत.

सन १९८०-९० च्या दशकात एका वर्गात ५० मुले तर ५ मुली असायच्या पण आता त्या ५० मध्ये कमीत कमी २० ते २५ मुली एका वर्गात असतात आणि हा ५० टक्क्याचा अंक समाजात नैसर्गिक समतोल राखण्यासाठी उपयुक्त आहे. मुलींना मोफत शिक्षण ह्या सरकारच्या पंचवार्षिक शैक्षणिक धोरणामुळे आज मुली शिक्षण क्षेत्रात बाजी मारत आहेत पण नंतरच्या चुल-मुल ह्या पारंपारिक रुढीमुळे त्यांचा व्यावसायिक क्षेत्रात म्हणावा तसा ठसा उमटलेला दिसत नाही. सरकारने मोफत शैक्षणिक धोरणाच्या धर्तीवर मुलीसाठी औद्योगिक जगतामध्ये काही सवलती देऊन स्रियांना व मुलींना उद्योजक बनविले तर खरोखरच समाजामध्ये क्रांती घडेल.

आज गावखेड्यामध्ये तसेच काहीअंशी शहरी भागामध्ये सुद्धा स्रियांना परावलंबी जीवन जगावे लागते. आज आपल्या देशाची लोकसंख्या अंदाजे १४० कोटीच्या घरात आहे. आपल्या देशात आजच्या घड़ीला उत्पादित लोकसंख्या (Productive Population)फारच कमी आहे. बहूतांशी पु्र्ण भारतामध्ये (Dependent Population ) आजमितीला आधारित लोकसंख्या खुपच जास्त आहे.

उत्पादित लोकसंख्या वाढवायची असेल तर चुल-मुल या पारंपरिक ढाच्याला तिलांजली देऊन मुलींना व स्रियांना उद्योजक होण्यासाठी घरच्या मंडळीनी तसेच मायबाप सरकारने सहकार्य केले पाहिजेत तसेच त्यांच्या उद्योगाविषयीच्या कला गुणांच्या वाढीसाठी प्रोत्साहन दिले पाहिजेत. स्रियांच्या नैसर्गिक वाट्यानुसार निरिक्षण केले तर सुमारे ५० टक्के लोकसंख्येचा हिस्सा असलेल्या नारीशक्ती विभागातील फक्त आणि फक्त हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच नारी उद्योग जगातात घट्ट पाय रोऊन उभ्या आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने इंद्रा नुयी, किरण मुजुमदार,वंदना लुथरा, जयंती कटाळे, फाल्गुनी नायर आणि उपासना टाकू इतक्या मोजक्याच महिला उद्योजिका नावारुपाला आल्या आहेत.आजच्या घडीला नारी शक्तीला उद्योजिका बनवण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने मनापासून प्रयत्न केले तर नक्कीच भारताची उत्पादित लोकसंख्या झपाट्याने वाढेल आणि त्याचा समाजातील प्रत्येक कुटुंबाला नक्कीच फायदा मिळेल.

आज समाजामध्ये प्रसिद्ध आणि यशस्वी उद्योजकाच्या पाठीमागे स्रिचा मोठाला हातभार असतो असे नेहमीच सत्य सांगितले जाते. जर प्रसिद्ध उद्योजक एका नारीशक्तीमुळे बनतो तर तीच नारी उद्योजक का बनू शकत नाही? मुळातच स्रियांमध्ये प्रामाणिकपणा, काटकसरी वृत्ती, व्यवहारीकपणा, कुशल व्यवस्थापन आणि सचोटी इत्यादी उद्योगाशी निगडीत तत्वे तिच्या जन्नापासुनच रूजवली आहेत. आज मुलींचे प्रयोगशाळेतील प्रमाण खुपच जास्त असते त्यामध्ये प्रामुख्याने आरोग्यविषयक प्रयोगशाळाचा समावेश आहे. मेडिकल लॅब मध्ये काम करणाऱ्या स्रिया व मुली अत्यंत सचोटीने व प्रामाणिकपणे काम करतात आणि त्यांच्या ह्या उपजत मुल्यांमुळे रूग्नाचे खूपच अचुक व योग्य मेडीकल रिपोर्ट रोग तज्ञाना रुग्नाचे अचूक निदान करण्यास व योग्य सल्ला देण्यास उपयुक्त ठरतात आणि त्याचा समाजाला खूपच फायदा होतो.

उद्योजक बनण्यासाठी लागणारी बांधिलकी, चिकाटी, विनयशिलता, एकाग्रता, समजून घेण्याची वृत्ती, विचार पटवून देण्याची क्षमता, व्यवसायावरील निष्ठा, प्रामाणिकपणा, नियमितपणा व कुशल व्यवस्थापन इत्यादी गुण व मुल्ले निसर्गाने नारीशक्ती मध्ये उपजतच रूजविलेली आहेत आणि म्हणूनच केन्द्र व राज्य सरकारने भारताची उत्पादक लोकसंख्या वाढविण्यासाठी नारीशक्तीला उद्योगांचे शिक्षण व प्रशिक्षण माफक दरात उपलब्ध करून देणे आज अत्यंत गरजेचे आहे.

मुलींना आज जसे शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण आहे अगदी याच धर्तीवर उद्योगामध्ये सुद्धा काही प्रमाणात आरक्षण व सवलती देऊन त्यांचे मनोधैर्य वाढविले पाहीजे तसेच त्यांना व्यवसायात प्रोत्साहन दिले तरच आपल्या उत्पादित लोकसंख्येच्या वाढीला चालना मिळेल. चुल-मुल ह्या पारंपारीक ढाच्यामध्ये अपत्ये १५ वर्षांची झाल्यानंतर क्वचितच त्यांना मातेची गरज भासते. घरातील कर्ती पुरूषमंडळी आपआपल्या कार्यस्थळावर गेल्यानंतर घरातील स्रियांचा फक्त आणि फक्त मनोरंजनाशिवाय कोणताच पर्याय शिल्लक रहात नाही.

मनोरंजनसाठी सुद्धा किती काळ वेळ खर्च करणार हा मोठा यक्ष प्रश्न आहे. भविष्यात तसेच आज रोजी सुद्धा बऱ्याच उच्च शिक्षण प्राप्त मुलीसुद्धा सासरच्या पारंपारिक चुल-मुल रुढिमध्ये अडकून पडलेल्या आढळतात त्याचप्रमाणे काही अतीहुशार व उच्च गुणवत्ता प्राप्त विद्यार्थिनी सुध्दा प्रचलित चुल मुल या पारंपारिक रूढीला कंटाळून नैराश्याकडे वळलेल्या पहायला मिळतील आणि याचे गंभीर परिणाम कुटुंबाला कायमचे सोसावे लागतात.

बालपणी मुलीचे पालक पै पै गोळा करून तसेच पोटाला चिमटा लाऊन काही अंशी समाजातून कर्ज व्यवहार करून आपल्या कन्येला योग्य ते शिक्षण देऊन भविष्यात तिला स्वावलंबी व कर्तबगार बनविण्यासाठी अहोरात्र मेहनत करत असतात पण सामाजिक व पारंपारिक रुढिच्या ढाच्यामुळे त्या उच्चशिक्षित कन्या चुल-मुल ह्या चक्रव्यहात अलगत अडकतात आणि पर्यायाने त्यांना भविष्यात किरकोळ वैयक्तिक खर्चासाठी नवरोबाकडे हात पसरावे लागतात आणि सततच्या हात पसरनीमुळे त्या कायमच्या परावलंबी बनतात व पुढे सततच्या हाताकडे बघण्याच्या वृत्तीमुळे काहीठिकाणी वादाला ठिणगी पडते आणि या वादाचे रूपांतर काही वेळा घटस्पोटामध्ये झालेले दिसते. काही हुषार व एक कल्ली मुली अतिमहत्वाकांक्षी व ध्येयवेड्या असतात पण सामाजिक बंधनामुळे त्या चुल मुल ह्या पारंपारिक रूढीमध्ये कायमच्या हरवल्या जातात, त्यांची पूर्वीची महत्वाकांक्षा पार धुळीला मिळते. सामाजिक बंधनामुळे व पारंपारिक चुल मुल ह्या रूढीमुळे आज भारत देशात आधारीत लोकसंख्या खुपच झपाट्याने वाढत आहे.

आजच्या घडीला केंद्र व राज्य ह्या दोन्ही माय बाप सरकारांनी नोकरभरती जवळ जवळ बंदच केलेली आहे त्यामुळे नवीन पदवीधर तरूणींना नोकरी मिळणे फारच दुरापास्त झालेले आहे. काही पदवीधर तरूणी शासनाच्या अनेक स्पर्धा परीक्षा देतात पण शासनाच्या वेळखाऊ धोरणामुळे परिक्षांचे निकाल तसेच शासनाचे पोस्टींग लवकर मिळत नाही आणि ह्या दिरंगाईमुळे तरूणीचे वय वाढत जाते आणि घरची मंडळी मुलीचे लग्न जमवून एकदाचे जबाबदारीतून मोकळे होण्याच्या मागे लागतात. मुलगी असल्यामुळे व्यवसाय करण्यासाठी तसेच एखादा नवीन स्टार्टअप सुरू करण्यासाठी घरची मंडळी अजिबात राजी नसतात आणि लग्नानंतर सासरच्या मंडळींचा तर प्रोत्साहन किंवा आर्थिक मदतीचा प्रश्नच उद्भवत नाही आणि अश्या प्रकारे पुन्हा मुली चुल-मूल ह्या पारंपारिक न संपणाऱ्या रुढीमध्ये अडकून पडतात आणि अश्या प्रकारे पुन्हा एकदा आधारीत लोकसंख्या वाढीमध्ये भर पडते.

जपान देश तीन वेळा बेचिराख झाला तरीसुद्धा फिनीक्स पक्षाप्रमाणे राखेतून उठला आणि जगामध्ये नावारूपाला आला याचे मुख्य कारण तेथील उत्पादित लोकसंख्या हे आहे. जपान सरकारने उत्पादित लोकसंख्या वाढीसाठी अनेक नवनवीन उद्योगधंदे निर्माण केले आणि प्रत्येक हाताला रोजगार तसेच उद्योग दिला. आज चीनची लोकसंख्यासुद्धा आपल्यापेक्षा खुपच जास्त आहे, तरीसुद्धा जगात आर्थिक महासत्ता म्हणून चिन या देशाने नाव कमविले याला कारणीभूत तेथील विविध उद्योगधंदे आणि तेथील मोठाली उत्पादित लोकसंख्या. प्रचंड लोकसंख्या कधीही विकासाच्या आड येत नाही हे जगाला चीनने दाखवून दिले आणि सिद्ध पण केले.

चीनमधील कार्यक्षम तसेच कार्यतत्पर सरकारने प्रत्येक नागरिकाला रोजगार तसेच अनेक प्रकारचे उद्योगधंदे निर्माण व विकसित करूण उत्पादित लोकसंख्या वाढीवर आधिकाअधिक भर दिला. जपानचे सरासरी वय ८० वर्षाच्या आसपास आहे तसेच चीनचे सरासरी वय ५० वर्षे आहे याऊलट भारतातील सरासरी वय फक्त २५ वर्षे आहे,यावरून भारत देश हा तरूणाईचा देश आहे हे सिध्द होते. मग या तरूणाईला भारत सरकारने उद्योग व रोजगार निर्माण करुन दिला तर येणाऱ्या जागतिक पंचवार्षिक आढाव्यामध्ये भारत जागतिक अर्थव्यवस्थेचे महाकेंद्र व महासत्ता नक्कीच बनेल.

केंद्र सरकारने या तरूणाईला विविध उद्योग निर्मिती करून रोजगार प्राप्त करुण दिला पाहिजेत त्याचप्रमाणे लोकसंख्येच्या जवळ जवळ अर्धा हिस्सा असलेल्या नारी शक्तीला उद्योग जगतामध्ये आरक्षण व सवलती त्याप्रमाणे शिक्षण व प्रशिक्षण उपलब्ध करुन दिले पाहिजेत अन्यथा भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर सुद्धा नारी शक्ती परावलंबी आणि अबलाच राहील. आज विविध शैक्षणिक क्षेत्रात मुलींनी बाजी मारलेली पहायला मिळते त्यामध्ये प्रामुख्याने वैद्यकिय क्षेत्र, अभियांत्रिकी क्षेत्र, संगीत व कला क्षेत्र, फॅशन डिझाईन, पाककला, अंतर्गत सजावट, ब्युटी पार्लर, कोचिंग क्लासेस, क्रिडा क्षेत्र तसेच अभिनय इत्यादीचा समावेश आहे मुलीचे पालक चुल मूल ह्या पॅटर्नमध्ये गुंतल्यामुळे बहुतांशी पालक मुलींना व्यवसायामध्ये गुंतवणूक व खेळते भांडवल देण्यास असमर्थता दर्शवितात कारण आज समाजामध्ये मुलगी म्हणजे परधन असेच समजले जाते. अगदी आजच्या घडीला सुद्धा खेडोपाडी मुलींना उच्च शिक्षण देण्यास पालक राजी नसतात.

मुलीचे जन्मदाते आपल्या कन्येचे २१ वर्षे संपले रे संपले की लवकरात लवकर चार हात करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. मुलीने लग्नानंतर सासरच्या मंडळींसमोर मला व्यवसाय करायचा आहे किंवा अमुक उद्योग करण्यात मला आवड आहे असे सांगितल्यावर नंतर तिला पहिला प्रश्न विचारला जातो कि तु भाग भांडवल कोठून आणणार आहेस? आणि संसारामधून तुला व्यवसाय करण्यास वेळ मिळेल का ? बहुतांश सासर मंडळी अनेक नानाविध प्रश्नांचा भडिमार करूण तिला सळो कि पळो करूण सोडतात, आणि उच्च शिक्षीत मुलीला उद्योगापासून कायमचे परावृत्त करतात. भारतातील प्रत्येक नारीला व्यवसाय व रोजगारासाठी प्रोत्साहन दिले तर आपल्या वंशाची वेल वाढण्यास अनेक अडथळे येतील याची प्रत्येकाला अतिशय भंयकर अशी भिती वाटते आणि अश्या या कपोलकल्पित भितीमुळे मुलींना आजसुद्धा चुल-मुल या पारंपारिक चक्रव्यूहात अगदी अभिमन्यूसारख्या अडकवलेल्या पहायला मिळेल.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर साधारणतः १ जानेवारी १९४८ साली अगदी अथक परिश्रम करून महात्मा ज्योतीराव फुले आणि सवित्रीबाई फ़ुले यांनी प्रथम मुलींना शिक्षणाची दारे उघडी करूण देण्याचे अत्यंत कठीण काम चोख पार पाडले अगदी त्याप्रमाणे आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर तरी केंद्र व राज्य सरकारने नारी शक्तीला उद्योजक बनविण्यासाठी कंबर कसून प्रयत्न केले पाहिजेत. उपजतच अनेक कला गुणाचा व कौशल्याचा महासागर असलेली नारी शक्ती उद्योग जगतात खरोखरच क्रांती घडवेल आणि भारतातील उत्पादित लोकसंख्या वाढीला नक्कीच मोठा हातभार लावेल आणि नजीकच्या काळात भारताला जागतिक क्रमवारीत अगदी उच्च तम स्थान प्राप्त करूण देतील यात तिळमात्र देखील शंका नाही आणि यासाठी केंद्र सरकारने मुलींना व स्रियांना उद्योगजगतामध्ये मोठा प्रवेश देण्यासाठी पाच कलमांची त्वरीत अंमलबजावणी केली पाहिजेत.

१) उद्योगाची आवड असणाऱ्या स्रियांना सरकारने, सरकार मान्य बॅंकाकडून अगदी नाममात्र व्याजदराने भाग भांडवल उपलब्ध करून देऊन त्यांचे मनोधैर्य वाढविले पाहिजेत.

२) सरकारी गाळे व सरकारी जागा नाममात्र भाडे आकारून नव उद्योजक स्रियांना/मुलींना उपलब्ध करून त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजेत.

३) उद्योजक स्रियांना वार्षिक उत्पन्नावर प्रचलित करामध्ये कमीत कमी ५० टक्के सवलत दिली पाहिजेत.

४) सुशिक्षित बेरोजगार स्रियांना तसेच नव उद्योजक मुलींना दरवर्षी सरकारी कोट्यातून ठराविक कामे विना निविदा अदा केली पाहिजेत.

५) केंद्र सरकारने राज्य निहाय सर्वे करून नारी शक्तीला उपयुक्त अशा नवनवीन उद्योग व रोजगाराची निर्मिती केली पाहिजेत तसेच नवीन उद्योगाचे व रोजगाराचे शिक्षण व प्रशिक्षण विविध शिबिरे आयोजित करुन मोफत देण्याची व्यवस्था केली पाहिजेत.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading