॥ शेतकऱ्यांचा कवी : तुकोबाकालीन शेती ॥
एकनाथ महाराजानंतर तुकोबांचा कालखंड शंभर वर्षाच्या अंतराने येत असला तरी अजून परकीय सत्ता होतीच. त्यामुळे एकनाथकाळात जी समाजीक आणि राजकीय परीस्थिती होती तीच तुकोबांच्या काळातही होती. शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य तुकोबांना पाहता आलेलं नव्हतं. त्यामुळे त्यांच्या अभंगात शिवकालीन शेतीचे संदर्भ पाहायला मिळणार नाहीत. ते आपण स्वतंत्रपणे पुढच्या प्रकरणात पाहणार आहोत.
इंद्रजीत भालेराव
शिवाजी महाराज जसे शेतकऱ्यांचे राजे होते तसेच तुकाराम हे शेतकऱ्यांचे कवी होते हे पहिल्यांदा अधोरेखित केलं ते महात्मा फुले यांनी, असं सदानंद मोरे यांनी नोंदवून ठेवलेलं आहे. नंतर तुकारामांचं कुणबीपण अनेकांनी ठळक केलं. डॉ. आ. ह. साळुंखे यांनी ‘तुकारामाचा शेतकरी’ नावाचा स्वतंत्र ग्रंथच लिहिला. पुढं अनेक संशोधकांनी तुकारामांच्या अभंगातला शेतकरी शोधला. मीही याआधी या विषयावर थोडंफार लिहिलेलं आहे. त्यामुळे तुकारामांच्या अभंगातले शेतीचे संदर्भ हा आता नवीन विषय राहिला नाही. त्यामुळे तुकारामांच्या ज्या अभंगातल्या ओळी त्रोटकपणे नेहमीच उधृत केल्या जातात त्यातले काही महत्त्वाचे अभंग पूर्ण रूपात देऊन त्यावर त्रोटक भाष्य करण्याचं आणि वाचकांना अधिक विचार करू देण्याचं मी ठरवलेलं आहे. संतांच्या अभंगात जी शेती आणि जो शेतकरी येतो तो केवळ उदाहरणे किंवा दृष्टांत म्हणून. कोणत्याही संताला शेतकरी हा आपल्या कवितेचा मुख्य विषय करायचा नव्हता. कारण त्या काळात कवितेचा विषय ईश्वराशिवाय अन्य असणं हे कुणालाच मान्य नव्हतं. त्यामुळे सर्वांनी ते मान्य करूनच लिहिलेलं आहे. पण त्यांचा श्रोता शेतकरीच असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उदाहरणाने त्याला अध्यात्म लवकर समजेल असे वाटल्यामुळे त्यांनी तसे केले. तुकाराम हे स्वतः शेतकरी असल्यामुळे त्यांच्या अभंगात हे प्रमाण जास्त आहे. त्यांचे कुणबीकीचे निरीक्षण सूक्ष्म आहे. तुकारामांचे पूर्वज कवी नामदेव यांनी ‘शेती बीज नेता थोडे । मोटे आणिताती गाडे’ असे म्हटलेलेच होते. संत तुकारामांनीही शेतीचं रूपक आपल्या अभंगात खेळवून शेतकऱ्यांना अध्यात्म सोपं करून सांगितले होतं.
तुकोबांआधीच्या संत एकनाथ यांनी देखील आपल्या एका अभंगात लिहिलं होतं,
पिक पिकले प्रेमाचे । साठविले गगनटाचे
भूमी शोधूनी पेरले बीज । सद्गुरू कृपे उगवले सहज
काम क्रोधाच्या उपटून पेंडी । कल्पनेच्या काशा काढी
एका जनार्दनी निजभाव । विश्वंभरी पिकला देव
तुकारामांचा एक अत्यंत गाजलेला आणि बहुतेक सर्वांना माहीत असलेला अभंग आहे. आपण कुणबी आहोत याचा अभिमान तुकोबांनी त्यातून व्यक्त केला आहे. का बरं तुकारामांना आपल्या कुणबीपणाचा अभिमान वाटला असावा ? त्यांच्या कुणबीपणाला कुणी हिणवलं होतं का ? नक्कीच तसं झाले असणार ! अजूनही कुणबट हा शब्द हलकट या अर्थाने हिणवण्यासाठीच वापरला जातो. चिडलेल्या तुकोबांनी आमचं कुणबीपण हीच आमची शक्ती आहे, हे सांगण्यासाठी हा अभंग लिहिला. तुमची जी विद्वत्ता आहे ही अहंकाराने तुमच्या आयुष्याचा नाश करणारी आहे, बरे झाले ती माझ्याजवळ नाही. माझे निर्मळ, साधे कुणबीपणच मला देवाजवळ घेऊन जाणारे आहे, हे तुकाराम इथं ठासून सांगतात. आणि मराठी भाषेत पहिल्यांदाच कुणब्यांची अस्मिता जागी करतात. तो अभंग असा आहे,
बरा कुणबी केलो । नाहीतरी दंभेची असतो मेलो
भले केले देवराया । नाचे तुका लागे पाया
विद्या असती काही । तरी पडतो अपायी
सेवा चुकतो संतांची । नागवन हे फुकाची
गर्व होता ताठा । जातो यमपंथे वाटा
तुका म्हणे थोरपणे । नरक होती अभिमाने
तुकोबांचे हे शब्द आम्हा खेडूत कवींची भक्कम पाठराखण करणारे आहेत. प्रत्येक नव्या कवीने आपल्या काळजावर कोरून ठेवावेत असेच आहेत. नारायण सुर्वे यांच्या ‘ऐसा गा मी ब्रह्म’ या कवितेची पूर्वजकविता वाटावी असा एक सुंदर अभंग तुकारामांनी लिहिलेला आहे. सुर्व्यांनी तो नक्कीच वाचला असला पाहिजे. सुर्वे आणि तुकाराम यांच्या या दोन कवितांची तुलना एका स्वतंत्र लेखाचा विषय होईल. तुकोबांचा हा सुंदर अभंग असा आहे,
रिद्धी सिद्धी दासी । कामधेनू घरी
परि नाही भाकरी । भक्षावया
लोडे वालीस्ते । पलंग सुपती
परी नाही लंगोटी । नेसावया
पुसाल तरी आम्हा । वैकुंठीचा वास
परी नाही राह्यास । ठाव कोठे
तुका म्हणे आम्ही । राजे त्रैलोक्याचे
परी नाही कोणाचे । ऊणे पुरे
नारायण सुर्वेंच्या कवितेत कामगार येतो तर तुकोबांच्या कवितेतला कुणबी वारकरी आहे. परिस्थिती दोघांचीही सारखीच आहे. सुर्वेंचा कामगार म्हणतो ‘ऐसा गा मी ब्रह्म, विश्वाचा आधार, खोलीस लाचार, हक्काचिया’ दोन युगातले आणि दोन जगातले दोन कवी बोलतात तेव्हा काळजाची भाषा एकच असते हेच खरे. हा कुणबी वारकरी कसा दुर्बळ आहे, आर्थिक दृष्ट्या कसा असमर्थ आहे, याचा प्रत्यय देणारा तुकोबांचा आणखी एक अभंग आहे. कुणाही शेतकऱ्याला तो आपलाच अनुभव वाटावा इतका काळजाला भिडणारा आहे. तो असा,
पाहुणे घराशी । आजी आले ऋषिकेशी
काय करू उपचार । खोप मोडकी जर्जर
दरदरीत पाण्या । माजी रांधियेल्या कण्या
घरी मोडकिया बाजा । वरी वाकळांच्या शेजा
मुखशुद्धी तुळशीदळ ।तुका म्हणे मी दुर्बळ
यातली जुनी भाषा वगळली तर कुठल्याही आजच्या चांगल्या ग्रामीण कवीला ही कविता आपलीच वाटावी इतके त्यातले दृश्य आजच्या ग्रामीण कवितेला परिचित आहे. इतक्या साध्या सोप्या शब्दात इतकी श्रेष्ठ दर्जाची कविता लिहिता येते, याचा आदर्श देखील तुकोबांचा हा अभंग आहे.
पिकल्या शेताचा । मज देतो वाटा
चौधरी गोमटा । पांडुरंग
सत्तर टक्के बाकी । उरली मागे तोहा
मागे झडले दहा । आजिवरी
हंडा भांडी गुरे । दाखवी ऐवज
माजघरी बाजे । बैसालासे
मज यासी भांडता । जाब नेदी बळे
म्हणे एका वेळे । घ्याल वाटा
तुका म्हणे स्त्रीये । काय वो करावे
नेदिता लपावे । काय कोठे
हा अभंग सुटा स्वतंत्र कुठे वाचला तर त्याचे सगळे संदर्भ लक्षात येत नाहीत. मूळ गाथेतून हा अभंग वाचला की बरेच संदर्भ उलगडत जातात. हा अभंग एकटा नाही. यापुढे आणखी दहा अभंग आहेत. या सगळ्या अकरा अभंगांचा मिळून एक विषय आहे. त्यात चौधरी म्हणजे शेताचा मालक असं रूपक खेळवलं आहे. हे सगळे अभंग तुकाराम आपल्या आवलीला उद्देशून बोलत आहेत. ही आवली बहुदा देवधर्म सोडा आणि पूर्ण वेळ संसारात लक्ष घाला, शेताशिवारात लक्ष घाला असं तुकोबांना म्हणते आहे. तेव्हा तुकोबा, मी वेगळ्याच शेतात गुंतलो आहे आणि अशा चौधरीच्या हातात सापडलो आहे की, मला आता पळून जायचीही संधी नाही. तो हलूच देत नाही. त्याने मला भिकेला लावले आहे. त्याने मला पानावर खायची आणि घाडग्याने पाणी प्यायची वेळ आणली आहे. पण आता त्याच्यावर विश्वास ठेवल्याशिवाय मला इलाज नाही. तुही आता भांडत कुंडत बसण्यापेक्षा माझ्यासोबत त्याच्यावर विश्वास ठेव. मनाची तयारी कर. तो आपले भले करील. आपल्याही नकळत अपरिहार्यपणे आपण त्याचे अंकित झालो आहोत आणि आता त्यापासून आपली सुटका नाही, असं तुकोबा म्हणतात. एका अर्थानं तेव्हा समाजात प्रचलित असलेल्या वेठबिगारीचेच हे रूपक आहे. त्यातून वेठबिगाराची अगतिकता आपल्या मनावर बिंबते. अध्यात्मासाठी रूपक म्हणून जरी तुकारामांनी हे तपशील वापरले असले तरी त्यातून तेव्हाचा एका जुलमी प्रथेचे प्रतिबिंब पडलेले दिसते. पुढचा आणखी एक असाच प्रसिद्ध अभंग. या अभंगात रूपक म्हणून जरी सिंचन आलेलं असलं तरी इथं तुकोबांचा लाडका विठोबा कुठं प्रतिमा, प्रतीकाच्या रूपात आडवा येताना दिसत नाही. शेवटच्या ओळीत स्वतःला पटवून देताना, हे रूपक आहे, असं आपल्या लक्षात येतं.
बळ बुद्धी वेचूनिया शक्ती । उदक चालवावे युक्ती
नाही चलन तया अंगी । धावे लवणामागे वेगी
पाट मोट कळा । भरीत पखाला सागळा
बीज ज्यासी घ्यावे । तुका म्हणे तैसे व्हावे
अलीकडच्या काळात पाणी प्रश्नाचा आणि सिंचनाचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांचा हा लाडका अभंग आहे. त्यात पाण्याचा स्वभाव आणि माणसाने त्याला आपलासा करून घेण्याच्या युक्ती सांगितलेल्या आहेत. जणू काही कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रेरणा देण्यासाठीच तुकारामांनी हा अभंग लिहिला आहे. एकनाथांनी आपल्या भागवतात काहीशा याच अर्थाच्या ओव्या लिहिलेल्या आपण संत एकनाथांवरील याआधीच्या लेखात पाहिलेल्या आहेत.
मढे झाकूनिया । करिती पेरणी
कुणबीयाचे वाणी । लवलाहे
तयापरी करी । स्वहित आपुले
जयासी फावले । नरदेह
ओटीच्या परीस । मुठीचे ते वाढे
यापरी कैवाडे । स्वहिताचे
नाही काळसत्ता । आपुलिये हाती
जाणते हे गुंती । उगवती
तुका म्हणे पाहे । आपुली सूचना
करि तो शहाणा । मृत्युलोकी
कुणब्याच्या घरात कोणी मेलेलं जरी असलं तरी त्याला मढं झाकून पेरणी करावी लागते, हा इथला संदर्भ कुणब्याच्या जीवनाचं सारच आहे.
पिकवावे धन । ज्याची आस करी जन
पुढे उरे खाता देता । नव्हे खंडन मविता
खोली पडे ओली बीज । तरीच हाती लागे निज
तुका म्हणे धनी । विठ्ठल अक्षरे ही तिन्ही
या अभंगावर डॉक्टर सदानंद मोरे यांनी केलेले भाष्य सविस्तर आणि महत्त्वाचे आहे. ते त्यांच्या शब्दात इथं देतो,
” शिवाजी राजांनी पाठवलेला नजराणा तुकोबांनी परत केला असला तरी त्याचा अर्थ असा नाही की, तुकोबांनी शिवरायांचा अपेक्षाभंग केला. तुकोबांनी केलेला उपदेश ऐकायला शिवाजीराजे उत्सुक आणि आतुर होते. कोणीही मार्गदर्शन मागितले की ते करायचे. त्याला निराश करायचे नाही, विण्मुख करायचे नाही, असा तुकोबांचा बाणाच होता. त्यांचा निस्पृहपणा सामाजिक कर्तव्याच्या विरोधी नव्हता. त्यामुळे केवळ आध्यात्मिक क्षेत्रातीलच नव्हे तर सर्व प्रकारच्या समस्यांचे समाधान करून घेण्यासाठी लोक त्यांच्याकडे येत असत. त्यामुळेच गाथेतील उपदेशात वैविध्य आढळते. मावळ प्रांतातल्या पाईकांना म्हणजेच शिवाजी राजांच्या सैनिकांना त्यांनी केलेला युद्धनीतीचा उपदेश ‘पाईकाचे अभंग’ या शीर्षकाने गाथेत संपादित करण्यात आलेला आहे. प्रस्तुत अभंगातून तुकोबा शिवाजी राजांनी राज्य चालवताना राज्यात कोणत्या प्रकारचे उत्पन्न घ्यावे याचा उपदेश करत आहेत. राज्य करताना राजाने प्रजेचे हित समोर ठेवून कारभार करावा, प्रजेच्या सुखातच आपले सुख मानावे, विशेषतः प्रजेच्या गरजा लक्षात घेऊन त्या पुरवण्याच्या दृष्टीने उत्पादन करावे, तेच राज्यातील प्रमुख धन होय. तुकोबांच्या काळात या देशाची उत्पादन व्यवस्था शेतीप्रधान होती, हे वेगळे सांगायची गरज नाही. धान्य हेच देशाचे धन होते. म्हणूनच तर धनधान्य हा शब्दप्रयोग नेहमी होताना आढळून येतो. तुकोबा सांगतात प्रजेला ज्याची इच्छा आहे तेच धन तेच धान्य पिकवावे. म्हणजे राजाने त्या प्रकारच्या उत्पादनास प्रोत्साहन व चालना द्यावी, मदत करावी. शिवकाळात शेतकऱ्यांना सरकारकडून बियाणे व औतकाठीचीही मदत होई, पाऊस कमी पडला तर सारा वसुलीत सूट दिली जाई, हे जाणकारांना माहीतच आहे. त्यामुळे बळीराजा सुखी होता धान्य किती पिकवावे याचेही सूत्र तुकोबा सांगतात. पीक अमुप यायला हवे. मोजता सुद्धा येऊ नये असे पीक आले म्हणजे सर्वांना पोटाला पुरेशे खाऊन, इतरांना देऊनसुद्धा शिल्लक रहायला हवे. न जाणो एखादे वर्षी अतिवृष्टी, अनावृष्टीमुळे पुरेसे पीक निघाले नाही तर, हा साठा कामाला येईल. “
तुकारामांचा दुष्काळासंदर्भातला आत्मानुभूतीपर प्रसिद्ध अभंग आहे. ‘बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे, पीडा गेली’ हा दुष्काळावरचा अभंग ‘शेतकऱ्यांचा राजा शिवाजी’ या पुढील लेखात आपण सविस्तर पाहणारच आहोत. इथं आणखी काही अभंग आपण पाहणार आहोत.
मऊ मेणाहून । आम्ही विष्णुदास
कठीण वज्रास । भेदू सये
मेले जीत असो । मरूनिया जागे
जो जो जे जे मागे । ते ते देऊ
भले तरी देऊ । गांडीची लंगोटी
नाठाळाचे काठी । देऊ माथा
मायबापाहून । बहु मायावंत
करु घातपात । शत्रुहुनी
अमृत ते काय । गोड आम्हापुढे
वीष ते बापुडे । कडू किती
तुका म्हणे आम्ही । अवघेची गोड
ज्याचे पुरे कोड । त्याचे परी
आता तुम्ही म्हणाल की या अभंगाचा आणि शेतकऱ्याचा काय संबंध आहे ? संबंध नक्की आहे. या अभंगाच्या पहिल्या ओळीतला विष्णुदास ऐवजी शेतकरी हा शब्द टाकावा आणि पुन्हा एकदा हा अभंग वाचावा, या अभंगात पूर्णपणे शेतकरी स्वभावाचे वर्णन आलेले आहे. मी लहानपणापासून पहात आलोय, शेतकरी माणूस हा असाच टोकाचे वागत आलाय. त्यामुळे जेव्हा जेव्हा मी हा अभंग वाचलाय तेव्हा तेव्हा विष्णुदासांऐवजी शेतकरीच माझ्यासमोर उभा ठाकला आहे.
घोंगडे नेले सांगू कोणा । दुबळे माझे नाणीत म्हणा
पुढे ते मज न मिळे आता । जवळी सत्ता दाम नाही
शेटे महाजन ऐका कोणी । घोंगडियाची करा शोधणी
घोंगडियाचा करा बोभाट । तुका म्हणे भरला हाट
तुकोबांचा हा एक घोंगड्याच्या रूपकातला अभंग. ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपर्यंत सर्वच संतांनी घोंगड्याचे रूपक घेऊन अभंग लिहिले आहेत. कबीर, मीराबाईसारख्या हिंदी पट्ट्यातल्या संतांनीही हे रूपक आपल्या काव्यातून खेळवले आहे. तिथं घोंगडी ऐवजी चुनरिया, चदरिया आलेली आहे. प्रदेशानुसार आणि भाषेनुसार वस्त्र आणि त्याचे नाव बदलले आहे. महाराष्ट्रातल्या संतांनी आपले महाराष्ट्रीयन घोंगडे घेतलेले आहे. ज्ञानेश्वरांचा घोंगडे नावाचा अभंग असाच शेतकऱ्याची दयनीय अवस्था मांडणारा आहे. त्यावर मी याआधी लिहिलेले आहेच. इथला वरच्या अभंगातला तुकारामांचा शेतकरीही आपले घोंगडे हरवल्यामुळे व्याकुळ झालेला आहे. कारण ते त्याला क्षणोक्षणी लागते आणि नेमके तेच त्याच्याजवळ नाही. त्याविन त्याचा खोळंबा होतो आहे. आपण ही तक्रार तरी कुणाकडं करावी ? आपलं म्हणणं ऐकून घ्यायला आणि आपली अडचण सोडवायला महाजनांकडं वेळ तरी आहे का ? भरल्या बाजारात कुणीतरी माझे घोंगडे चोरीला गेल्याची दवंडी पिटवा, म्हणजे लोकांना कळेल तरी की, माझे घोंगडे चोरीला गेलेले आहे. आणायासेच इथं बाजाराच्या निमित्तानं लोक जमा झालेले आहेत. त्यापैकी कुणाला माहित असेल तर माझे घोंगडे शोधायला तरी त्याची मदत होईल. व्याकुळ होऊन या अभंगातला शेतकरी आपल्या प्रश्नाकडं भरल्या बाजाराचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. पण त्याच्याकडं कुणाचंही लक्ष नाही. आजच्या शेतकऱ्याचीही अवस्था अशीच झालेली नाही काय ? तुकोबांची कविता किती समकालीन आहे, हेच यावरून सिद्ध होत नाही काय ? अरुण कोलटकर, भालचंद्र नेमाडे, दि. पु. चित्रे यांनी याआधीच तुकारामांचं कालातीत असणं सिद्ध केलेलं आहे. ते आणखीच पटत जातं.
आम्ही सदैव सुडके । जवळी येता चोर धाके
जाऊ पुढे भिके । कुत्री घर राखती
नांदणुक ऐसी सांगा । नाही तरी वाया भागा
थोरपण आंगा । तरी ऐसे आणावे
अक्षय साचार । केले सायासानी घर
एरंड सिंहार । दुजा भार न साहती
धन कण घरोघरी । पोटभरे भिकेवरी
जतन ती करी । कोण गुरे वासरे
जाली सकळ निश्चिंती । भांडवल शेण माती
जळजळीत भिंती । वृंदावणे तुळशीची
तुका म्हणे देवा । अवघा निरसविला हेवा
कुटुंबाची सेवा । तोची करी आमुच्या
आम्ही भुके कंगाल दरिद्री, आम्हाला चोरांची भीती मुळीच नाही. उलट चोरालाच आमची भीती वाटते. आम्ही भीक मागायला जातो तेव्हा कुत्री घर राखतात. अशी आमची नांदणूक आहे. हेच आमचे वैभव आहे. फार प्रयत्नपूर्वक आम्ही बांधलेलं घर एरंडाच्या लाकडांचं आहे. ते काय पिढ्यानपिढ्या टिकणार आहे काय ? त्याला कुठल्या वैभवाचे ओझे सहन होणार आहे ? आमच्याच पोटासाठी आम्ही भणभण फिरतो, तर मग आम्ही कशाला गुरं वासरं सांभाळावीत ? आता तरी तुमच्या लक्षात आलेलं असेल की सेणामातीशिवाय आमच्या जवळ दुसरं भांडवल नाही. शेणामातीनं सारवलेल्या जळजळीत भिंती आणि श्रद्धेनं लावलेलं दारातलं तुळशी वृंदावन हेच आमचं वैभव आहे. अशा अर्थाचा वरील अभंग शेतकऱ्याच्या जीवनाचं वर्णन करणारा नाही असं कोण म्हणेल ? तुकाराम हा शंभर टक्के शेतकरी कमी होता, हे सिद्ध करणारा आणखी कोणता पुरावा हवाय ?
देखोनी पुराणिकाची दाढी । रडे फुंदे नाक ओढी
प्रेम खरे दिसे जना । भिन्न अंतरी भावना
आवरीता नावरे । खूर आठवी नेवरे
बोलू नये मुखावाटा । म्हणे होता ब्यांचा तोटा
दोन्ही शिंगे चारी पाय । खुणा दावी म्हणे होय
मना आणिता बोकड । मेला त्याची चरफड
होता भाव पोटी । मुखा आले शेवटी
तुका म्हणे कुडे । कळो येते ते रोकडे
तुकोबांचा एक विनोदी अभंग म्हणून या अभंगाकडं पाहिलं जातं. कीर्तनकारांना कीर्तनात रंग भरण्यासाठी उपयुक्त असा हा अभंग. अभंगात एक प्रसंग आहे. एक शेतकरी माणूस पुराण ऐकायला बसलेला आहे. पुराणिकाची दाढी पाहून त्याला आपला नुकत्याच मेलेल्या बोकडाची आठवण येते आणि तो रडायला लागतो. लोकांना वाटतं पुराण ऐकून त्याला गहिवर येतो आहे. लोक आणि पुराणिक त्याला विचारतात तेव्हा भावनातिरेकानं त्याला नीट बोलताही येत नाही. त्याच्या अर्धवट बोलण्याचा आणि खानाखुणांचा पुराणिक बुवा आध्यात्मिक अन्वय लावून बोलत राहतात. शेवटी भावनेचा कड आवरून शेतकरी खरे काय ते स्पष्टपणे सांगून टाकतो. तुकोबांना यातूनही आध्यात्मिक अर्थ सांगायचा असेल. कीर्तनकारांना यातला विनोद खुलवून सांगून लोकांना हसवायचे असेल. पण मला मात्र हा अभंग विनोदी वाटत नाही. त्यात एक कारूण्य दडलेलं आहे. पुराणाला येऊन बसला तरी शेतकरी आपल्या गुराढोरांना, शेळ्यामेंढ्यांना विसरू शकत नाही. त्याचा जीव त्याच्या चित्राबात गुंतलेला आहे. तो त्यांना विसरू शकत नाही. पुराणिकाला जरी त्याचं असं वागणं विसंगत वाटत असलं तरी त्याच्या कुणबीपणाशी ते अत्यंत सुसंगत आहे. शेतातल्या जित्राबाला जीव लावणे हाच त्याचा खरा धर्म आहे. वरील अभंगातील शेतकऱ्याची कृती त्या धर्माला धरूनच आहे, असं मला वाटतं. या अभंगातले विनोदी पात्र जर कोणी असेल तर तो शेतकरी नव्हे तर बोकडासारखी दाढी वाढवून साधूचे सोंग आणणारा पुराणिक हाच या अभंगातल्या कथेचं विनोदी पात्र आहे. अंगावर केस वाढवले म्हणजे देव भेटत नसतो, तसे असते तर तो आधी अस्वलांना भेटला असता, अशा अर्थाचा एक दुसरा तुकोबांचा अभंग आहेच.
जातो वाराणसी । निरवी गाई घोडे म्हैशी
गेलो येतो नाही ऐसा । सत्य मानावा भरवसा
नका काढू माझी पेवे । तुम्ही वरळा भूस खावे
भिकारियाचे पाठी । तुम्ही घेऊन लागा काठी
सांगाल जेवाया ब्राह्मण । तरी कापाल माझी मान
ओकलिया ओका । म्या खर्चला नाही रुका
तुम्ही खावे ताक पाणी । जतन करा तूप लोणी
नाही माझे मनी । पोरे रांडा नागवणी
तुका म्हणे नष्ट । होते तैसे बोले स्पष्ट
वाराणशीला निघालेल्या एका शेतकऱ्यानं केलेली ही निरवानिरव आहे. अशाच स्वरूपाचा आणखी एक तुकोबांचा प्रसिद्ध अभंग आहे, ‘आवा चालली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा’. या अभंगात पंढरपूरला निघालेली सासू वेसीपासून सारखी सारखी परत येऊन सुनेला सूचना करते, दूध नीट तापव, लोणी नीट जपून ठेव. सून म्हणते, सासूबाई तुम्ही निश्चिंत जा, मी सगळं नीट करते. तेव्हा सासू म्हणते, ही तर जा जा म्हणते आहे ! मग तर मी जाणारच नाही !! आणि ती आपली पंढरपूर यात्रा रद्दच करते. वरील अभंगात स्त्रीच्या ऐवजी पुरुष आहे आणि तो पंढरपूरऐवजी वाराणशीला चालला आहे. तोही सासूसारखाच सूचना करतो आहे की, तुम्ही फार खर्च करू नका, मी जमविलेले धन आणि धान्य उधळू नका, असं तो सांगतो आहे. भालचंद्र नेमाडे म्हणतात तसं, शेतकऱ्याला एका एका दाण्याचं आणि एकेका कणसाचं फार महत्त्व असतं. त्याची कारणं दोन, एकतर त्यानं फार कष्टानं हे सगळं जमवलेलं असतं आणि दुसरं कारण असं की त्यानं अनेक सुकाळ, दुष्काळ पाहिलेले असतात. तेव्हासाठी आपण हे जपून ठेवलं पाहिजे, असं त्याला वाटत असतं. इतरांना त्याचा स्वभाव कृपण वाटत असला आणि त्यातून विनोद निर्माण होत असला तरी त्याच्या आयुष्यानं त्याला तसं वागायला शिकवलेलं असत.
मुळात तुकाराम कवी झाले ते वाट्याला आलेल्या भयंकर दुष्काळाच्या अनुभवावर. त्यासंदर्भातले काही उपहासात्मक अभंगही आपण पाहिलेले आहेत. दुष्काळ वाट्याला आला नसता तर मुळात तुकोबा कवी झाले असते की नाही ? असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. या संदर्भात डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी केलेलं विवेचन आपण पाहूयात,
” इसवीसन १६२९ आणि ३० या दोन वर्षात दख्खनमध्ये भयंकर दुष्काळ पडला. यातून तुकारामाचा पूर्ण कायापालट झाला. आधीच फारसा संसारात रस नसताना संसाराचा गाडा ओढणाऱ्या त्याच्या सारख्या मुळात निवृत्तीकडे कल असणाऱ्या तरुणाची मनस्थिती व मनःशांती या दुष्काळाने कायमची घालवली. अनेकांनी या दुष्काळाची वर्णने लिहून ठेवली आहेत. सतत दोन वर्षे पाऊस झाला नाही. नद्यानाले कोरडे झाले. धान्य दिसेनासे झाले. दळणवळणाच्या सोयी नसलेल्या त्या धामधुमीच्या काळात गरीब, मुक्या प्रजेसाठी पाणी किंवा धान्य दुसरीकडून आणणे कल्पनेतही शक्य नव्हते. त्यातून युद्धखोर राजे म्हटल्यावर शेतकऱ्यांचे हाल किती होत असावेत हे आजच्याही शेतकऱ्यांच्या तुलनेत कल्पना करून अनुभवता येतील. रस्तोवरस्ती माणसांच्या प्रेतांचे खच पडलेले पाहिल्याचे तत्कालीन परदेशी प्रवासी लिहितात. त्यानंतर रोगराई आली. कोल्हे लांडगे माणसांना खाऊ लागले.
अशा परिस्थितीतली तुकारामाच्या मनातली तडफड दुःस्वप्नांसारखी नंतरच्या काळात लिहिलेल्या काही अभंगामधून सतत उमटते. ही आजन्म अस्वस्थता त्याचा स्थायीभाव होऊन राहिली. दुष्काळात त्याची शेती संपुष्टात आली, गुरेढोरे तडफडून मेली, धंदाही बुडाला. दिवाळखोर झाल्याने कोणाकडे तोंड दाखवणे कठीण झाले. घरातली पंधरा-वीस माणसे जगवणे अशक्य झाले. त्यासाठी काढलेले कर्जही संपले. ते फेडता येईना. त्यामुळे नवीन कर्जही कोणी देईना. सासऱ्याकडून मदत घेण्याची नामुष्की एक दोनदा आली. कुटुंबातले अन्नाअभावी निस्तेज होत, मातीआड जाणारे लाडके चेहरे पाहून इहलोकीच्या अस्तित्वाची क्षणभंगुरता त्याच्या जाणिवेचा एक अविभाज्य भाग होऊन बसली. संसाराचे भ्रामक सुख लक्षात आले. एकूण जीवनाच्या भयंकर असुरक्षिततेची जाणीव होऊन त्याला आपण निराधार एकाकी असल्याची कायमची व्यथा लागली. त्याच वेळी भुकेने त्याची बायको रखमा ‘अन्न अन्न करता मेली’. लवकरच त्याचा मुलगा संतुही गेला. तुकारामाच्या मनावर असे एकामागून एक आघात होत गेले आणि त्याची झोप उडाली. सामाजिक, कौटुंबिक, वैयक्तिक अशा सगळ्या पातळ्यांवर लज्जित झालेला हा पराजित गृहस्थ आता सगळ्या मानवी अस्तित्वाचा विचार करू लागला. सुरक्षिततेची भावना नष्ट झाल्यावर चिरंतन असा काही आधार कुठे सापडतो का याचा तो जीव तोडून शोध घेऊ लागला “
यातूनच तुकारामाला कवितेची आणि अध्यात्माची वाट सापडली. या काळात त्यांच्या मनाची झालेली सगळी तडफड तुकारामाने शब्दात ओतली. यातूनच मराठीची शिखरकविता जन्माला आली.
काय करू मी दातारा । काही न पुरे या संसारा
जाली माकडाची परी । येतो तळा जातो वरी
घाली भलते ठाई हात । होती शिव्या बैसे लात
आदि अंती तुका । सांगे नकळे झाला चुका
दुष्काळात होरपळणाऱ्या कुठल्याही शेतकऱ्याची अवस्था अशीच होणार नाही का ? पुढं तर भलतीच बिकट परिस्थिती निर्माण झाली. तुकोबा लिहितात,
काय खावे आता । कोणीकडे जावे
गावात राहावे । कोण्या बळे
कोपला पाटील । गावचे हे लोक
आता घाली भीक । कोण मज
आता येणे चवी । सांडली म्हणती
निवाडा करीती । दिवानात
भल्या लोकी यास । सांगितली मात
केला माझा घात । दुर्बळाचा
तुका म्हणे याचा । संग नव्हे भला
शोधीत विठ्ठला । जाऊ चला
दाही दिशा ओस झालेले भिंगुळवाणे तुकाराम संसाराकडं पाठ फिरवून विठ्ठलाकडं निघाले आणि त्यांच्यासमोर वेगळाच संघर्ष निर्माण झाला. त्यांचा संसार, त्यांची बाईल, त्यांची लेकरं त्यांना ओढू लागली, भांडू लागली, शिव्या देऊ लागली. तुकारामांनी तेही आपल्या कवितेत लिहून मन मोकळं केलं. बायको म्हणायची आपल्या पूर्वजन्मीचा दावेदार या जन्मात नवरा होऊन सूड उगवतो आहे, याला भांडावं तरी किती आणि दुःख सोसावं तरी किती. शेवटी तुकारामांची बायको आकांत करून रडायची आणि तिला आसडे यायचे. तेही तुकारामांनी स्वतःच लिहून ठेवले आहे,
आता पोरा काय खाशी । गोहो झाला देवलसी
डोचके तिंबे घातल्या माळा । उदमाचा सांडी चाळा
आपुल्या पोटा केली थार । आमचा नाही येसपार
हाती टाळ तोंड वाशी । गाय देऊळी देवापाशी
आता आम्ही करू काय । न वसे घरी राना जाय
तुका म्हणे आता धीरी । अझुनी नाही जाले तरी
मला वाटते दुष्काळाने उध्वस्त झालेल्या नवरा बायकोचे हे भांडण जीवाला काचणी लावणारे आहे. अशा अभंगांची एक मालिकाच तुकोबांनी लिहिली आहे. या सर्व अभंगात शेवटचे कडवे वगळता जिजाबाई बोलते. आणि शेवटच्या कडव्यात तुकाराम बोलतात. त्याविषयी दि. पु. चित्रे यांनी लिहिलं आहे,
” या अभंगाच्या शैलीचा आणि तंत्राचा एक लक्षात घेण्यासारखा विशेष म्हणजे जवळजवळ संपूर्ण अभंग हा पत्नीचे उद्गार अवतरण चिन्हात (तेव्हा अर्थातच मराठीत अवतरणचिन्हे वापरली जात नव्हती) उधृत करणारा असून फक्त अखेरच्या दोन ओळी (तुका म्हणे) तुकोबांचे स्वतःचे म्हणणे मांडणाऱ्या आहेत. स्वतःच्या ओळी कधी तुकोबा पत्नीला उद्देशून म्हणतात तर कधी श्रोत्यांकडे (वाचकांकडे) वळून म्हणतात. पण त्यामुळे या अभंगांना एक प्रकारच्या कौटुंबिक लघुनाट्याचे स्वरूप आलेले आहे “
चित्रे यांनी उल्लेख केलेल्या या मालिकेतला आणखी एक महत्त्वाचा अभंग मी इथे मुद्दाम देत आहे,
न करवे धंदा । आईता तोंडी पडे लोंदा
उठते ते कुटीती टाळ । अवघा मांडीला कोल्हाळ
जिवंतची मेले । लाजा वाटूनिया प्याले
संसाराकडे । न पाहती ओस पडे
तळमळती यांच्या रांडा । घालीती जीवा नावे धोंडा
तुका म्हणे बरे झाले । घे गे बाईले लिहिले
आयुष्यात जे बरे वाईट घडले ते सांगण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी कुणीतरी जिवलग हवा असतो. तुकारामांना असा कुणी जिवलग शिल्लकच राहिला नव्हता. दुष्काळाने तुकोबांना माणसातून उठवलं होतं. अशा सैरभैर अवस्थेत त्यांना कविता भेटली. ती जीवाची जिवलग झाली. अगदी बायकोनं दिलेल्या शिव्यासुद्धा तुकोबा तिलाच सांगू लागले. बायकोच्या शिव्याही कवितेत लिहून ठेवू लागले. तू बोलतेस ते, हे घे कवितेत लिहून ठेवलं, असंही बायकोला सांगू लागले. या सैरभैर अवस्थेत तुकारामांना कविता भेटली नसती, तर त्यांनी नक्की आत्महत्या केली असती, आजच्या शेतकऱ्यांसारखी.
संदर्भ :
१. तुकारामबावांच्या अभंगाची गाथा – सं. पु. मं. लाड, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई (१९५९)
२. तुका म्हणे – प्रा. डाॅ. सदानंद मोरे, उत्कर्ष प्रकाशन, पुणे (२००१)
३. प्रसादाची वाणी – प्रा. डाॅ. सदानंद मोरे, सकाळ प्रकाशन, पुणे (२०१४)
४. पुन्हा तुकाराम – दि. पु. चित्रे, पाप्युलर प्रकाशन, मुंबई, (१९९०)
५. तुकाराम गाथा – सं. भालचंद्र नेमाडे, साहित्य अकादमी, दिल्ली (२००४)
६. श्री तुकारामांच्या अभंगांची चर्चा (खंड १,२) सं. वा. ब. पटवर्धन, ग. ह. केळकर, साहित्य अकादमी, दिल्ली (२००९)
७. तुकारामांचा शेतकरी – आ. ह. साळुंखे, चार्वाक प्रकाशन, सातारा
८. श्री तुकाराम बुवाच्या अभंगांचा गाथा – श्री संत तुकाराम संस्थान, देहू (२०१३)
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.