December 5, 2024
The Promise of Agriculture Sharans Agricultural Thought Indrajeet Bhalerao article
Home » शेतीचे वचन : शरणांचे कृषीचिंतन
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतीचे वचन : शरणांचे कृषीचिंतन

शरणांनी कधीही भिक्षेचे कौतुक केले नाही. त्यांनी नेहमी कायकाला म्हणजे स्वतः मेहनत करून जगण्याला महत्त्व दिले. कायक हे त्यांच्या धर्माचरणाचे अभिन्न अंग होते. त्यामुळे लहान सहान कुठलाही उद्योग करणारा असो, वचनकार त्याला प्रतिष्ठा देतात. शेती हा तेव्हा सर्वाधिक लोकांचा उद्योग होता. त्यामुळे या व्यवसायालाही त्यांनी प्रतिष्ठा दिली. वचनकार सर्व जाती, स्तरातून आलेले असल्यामुळे त्यात शेतीचे अनुभव आपोआपच विपुल प्रमाणात आलेले आहेत.

इंद्रजीत भालेराव

॥ शेतीचे वचन : शरणांचे कृषीचिंतन ॥

मागच्या लेखात आपण दक्षिण भारतातल्या तमिळ भाषेतल्या ग्रंथाच्या आधारे दोन हजार वर्षांपूर्वीच्या शेतीविषयक धारणा समजून घेतल्या. आता आपण दक्षिण भारतातल्याच तमिळनंतर महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कन्नड भाषेतील लेखनाच्या आधारे तिथली शेतीसंस्कृती पाहणार आहोत. काळ पुष्कळ पुढचा आहे. तमिळ ग्रंथ दोन हजार वर्षांपूर्वीचा होता. तर हे कन्नड साहित्य एक हजार वर्षांपूर्वीचे आहे. त्या आधारे दक्षिण भारतातल्या हजार वर्षांपूर्वीची शेतीसंस्कृती आपण समजून घेणार आहोत. तशी कन्नड वाङ्मयाची सुरुवात राष्ट्रकूट सम्राट अमोघवर्ष (ई. स. ८१४ ते ८७७) याने केलेली असली तरी कन्नड साहित्य बहराला आले ते त्यानंतर दोनेकशे वर्षांनी निर्माण झालेल्या वचन साहित्याच्या रुपाने. त्या वचन साहित्यतून आलेली शेतीसंस्कृती आता आपण पाहणार आहोत. सुरुवातीला वचन साहित्याचे उद्गाते महात्मा बसवेश्वर यांचा परिचय करून घेऊयात आणि नंतर वचनसाहित्यातून आलेली शेती आपण पाहूयात.

महात्मा बसवेश्वर हे बाराव्या शतकाच्या सुरुवातीला (इ. स. ११०५) कर्नाटकात होऊन गेलेले एक युगप्रवर्तक क्रांतिकारी महात्मा होते. क्रांती हा त्यांच्या आयुष्याचा एक भागच होता. एका कट्टर धार्मिक कुटुंबात जन्माला येऊनही त्यांनी मुंजीपासूनच आपले ब्राम्हणत्व नाकारायला सुरुवात केली. लहानपणापासूनच त्यांचा अर्थहीन पाठांतराला विरोध होता. या चिकित्सक वृत्तीमुळेच वयाच्या आठव्या वर्षीच मुंजीला नकार देण्याचे धैर्य त्यांच्यात आले. विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी या गावात मादरस आणि मादंलबिका या कुटुंबाच्या पोटी त्यांचा जन्म झाला होता. वयाच्या सोळाव्या वर्षी ते सोलापूर जिल्ह्यातील कुडलसंगम येथे जातवेद मुनींच्या आश्रमात राहायला गेले. जातवेद मुनी हे वेदविरोधी होते. तिथेच त्यांच्यात सर्वसमावेशकता आणि समतेचा विचार दृढ झाला. प्रखर तेजाचे एक वलयही त्यांना तिथेच प्राप्त झाले. तिथून पुढचे सगळे आयुष्य त्यांनी समतेच्या विचारासाठी प्रखरपणे घालविले. स्वतः लावून दिलेल्या एका आंतर्जातीय विवाहाच्या समर्थनार्थ त्यांनी राजा असलेल्या आपल्या सासऱ्याशी, जो त्यांचा मामाही होता, युद्ध केले. इतक्या प्रखरपणे ते समतेच्या बाजूने उभे राहिले.

महात्मा बसवेश्वरांच्या विचारातूनच पुढे वीरशैव लिंगायत संप्रदायाची निर्मिती झालेली दिसते. या संप्रदायाचा मुख्य आधार शरणांनी रचलेली वचनेच आहेत. स्वतः बसवेश्वरांनी पाचशेच्या आसपास वचनांची निर्मिती केली. पण ही सगळी वचने कुणाही एकाची निर्मिती नाही. पुढच्या अनेक अनुयायांनी अशा वचनांची निर्मिती केली. अशा वचनांच्या धर्मग्रंथातील समावेशासाठी कल्याणमंडपमची निर्मिती झाली. तिथं प्रत्येक वचनाची चिकित्सा करूनच ते स्वीकारण्यात येत असे. हे वचनकार सर्व जातीतले, सर्व थरातले होते. त्यात पुरुषांबरोबरच स्त्रियाही होत्या. कुठल्याही प्रकारचे भेदभाव शरणांना मान्य नव्हते. तिथे सर्व समान मानले जात होते. म्हणूनच अशा वचनांची निर्मिती शूद्र आणि शेतकरीही करू शकत होते. त्यामुळेच शरणांच्या या वचनांमध्ये शेतीतील तपशील विपुल प्रमाणात पाहायला मिळतात. हे वचनसाहित्य म्हणजे लोकांनी निर्माण केलेले लोकसाहित्यच होते.

शरणांनी कधीही भिक्षेचे कौतुक केले नाही. त्यांनी नेहमी कायकाला म्हणजे स्वतः मेहनत करून जगण्याला महत्त्व दिले. कायक हे त्यांच्या धर्माचरणाचे अभिन्न अंग होते. त्यामुळे लहान सहान कुठलाही उद्योग करणारा असो, वचनकार त्याला प्रतिष्ठा देतात. शेती हा तेव्हा सर्वाधिक लोकांचा उद्योग होता. त्यामुळे या व्यवसायालाही त्यांनी प्रतिष्ठा दिली. वचनकार सर्व जाती, स्तरातून आलेले असल्यामुळे त्यात शेतीचे अनुभव आपोआपच विपुल प्रमाणात आलेले आहेत.

अशा जवळजवळ ३०,००० वचनांचा संग्रह डॉ. फ. गु. हळकट्टी यांनी मोठ्या कष्टाने १९२३ साली संपादित केला. कारण ही सगळी वचने वेगवेगळ्या हस्तलिखितातली असून ती खेड्यापाड्यातल्या मठातून विखुरलेली होती. जवळजवळ शंभर वर्षांपूर्वीचा तो काळ, प्रवासाची साधने नाहीत, मदत करायची लोकांची मानसिकता नाही, शिवाय हा सगळा व्यवहार पदरचे पैसे खर्च करून करायचा, त्यामुळे हळकट्टी यांना अपार मेहनत करावी लागली. ती त्यांनी केली. म्हणून हे वचनसाहित्य आपणाला आज सहज उपलब्ध झालेले आहे.

अशा या महत्त्वाच्या ग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्तीचे पुनर्संपादन डॉ. एम. एम. कलबुर्गी यांनी १९८० साली केले. त्या मूळ कन्नड ग्रंथाचा मराठी अनुवाद प्रा. आर. एम. करडीगुद्दी यांनी २०१४ साली केला. तो अनुवाद भालकीच्या हिरेमठ संस्थानाने २०१६ साली प्रकाशित केला. वचनसाहित्याच्या मराठी अभ्यासकांसाठी हे घबाड अनायासेच उपलब्ध झालेले आहे. माझ्या या लेखात मी वचनांचे जे संदर्भ क्रमांक दिलेले आहेत ते सर्व याच ग्रंथातले आहेत.

या वचन साहित्यावर भाष्य करताना एम. चिदानंद मूर्ती म्हणतात, “वचन याचा शब्दशः अर्थ गद्य असाच होतो. वचनपूर्व कानडी चंपूकाव्यात वापरलेल्या गद्याला वास्तविक वचन असेच म्हणतात. परंतु वीरशैव लेखकांनी वापरलेली भाषा गद्यही नव्हती व पद्यही नव्हती. ते एक प्रकारचे गद्यकाव्य होते. म्हणजे साधारणपणे विटमनच्या ‘लिव्हज् ऑफ ग्रास’ किंवा टागोरांच्या ‘गीतांजली’ यांच्याशी वचनांची तुलना करता येईल. वचनांचा सर्वात मोठा फायदा हा होता की, त्याची रचना करणे सहज शक्य होते. भाषा सोपी, सरळ असे, छंदांची बंधने नसत, यती अनुप्रास यांचेही जोखड नसे. म्हणून विद्वान आणि सर्वसामान्य माणूस अगदी प्रभावीपणे स्वतःचे विचार व भावना या वचनातून व्यक्त करू शकत असत. वचन पद्यात नसले तरी, वेगवेगळ्या लांबीच्या ओळीत वचनाची मांडणी शक्य असते. एक वचन साधारणपणे तीन ओळी पासून तीस ते पस्तीस ओळीपर्यंत असू शके. प्रत्येक वचन अंकिताने म्हणजे स्वतःच्या केलेल्या नावाच्या सूचनाने संपत असे. जसे मराठी संत अभंगाच्या शेवटी स्वतःच्या नावाची मुद्रा उठवत तसे हे वचनकार वचनाच्या शेवटी आपल्या नामाची मुद्रा उठवत. उदरनिर्वाहासाठी निवडलेल्या व्यवसायाची कल्पनाही आपणाला काही अंकितातून येते. अनेक वाद्यांच्या साथीने ही वचने गायली जात. दंडगे या वाद्यावर आपली वचने गात अल्लमप्रभू गावोगाव भटकत असत. पंधराव्या शतकातील अल्लम प्रभूदेव या पंडिताने वचनावर टीका लिहिली असून, त्याने वचनाची व्याख्या अशी केलेली आहे, “वचन म्हणजे गुढ आनंदाच्या अनुभवाचा उत्स्फूर्त प्रवाह.”

वीरशैव संप्रदायाने सर्वसामान्य माणसांमध्ये, आपणही व्यक्त होऊ शकतो, असा विश्वास निर्माण केला. त्यामुळे या सामान्य माणसांमधूनच ५०० वचनकार निर्माण झाले. हा जनसाहित्याचा प्रवाह धर्मसाहित्याचा निर्माता ठरला. त्यातूनच अनुभवाला प्राधान्य देणारी अनेक वचने निर्माण झाली. बारा बलुतेदार आणि अठरा आलुतेदार अशीच तेव्हा ग्रामाची रचना होती. या प्रत्येकाचा व्यवसाय आणि या व्यवसायाला अनुसरून त्यांचे एक भाषाविश्व आणि प्रतिमाविश्व असते. या अठरापगड जातीचे लोक वचनांची निर्मिती करू लागल्यामुळे हे सगळे भाषावैभव आणि प्रतिमावैभव या वचनांना प्राप्त झाले. आपल्या व्यवसायातल्या शब्दांचे आणि प्रतिमांचे उपयोजन करून जसे मराठी वारकरी संतांनी मराठी वाङ्मय समृद्ध केले. अगदी तसेच या वचनकारांनी कानडी वाङ्मय समृद्ध केले होते. त्यांना जरी वाङ्मयाची निर्मिती करायची नव्हती, वचने म्हणजे त्यांच्या दृष्टीने धर्मसाधनेचा एक भाग होता, तरी या वचनसाहित्याने फार मोठे वाङ्मयीन कार्यही केलेले आहे. काही वचनातून आपणाला वाङ्मयीन गुणवत्ता दिसत नसली तरी समाजक्रांतीच्या दृष्टीकोणातून हे वचनसाहित्य फार मोलाची भूमिका पार पाडते.

आपणाला शरणांच्या या वचनातून शोधायचे आहेत ते प्रामुख्याने शेतीचे संदर्भ. त्या दृष्टीने पाहायला गेले तर बसवेश्वरांच्या जन्मापासूनच आपणाला हे संदर्भ सापडायला सुरुवात होते. बसवेश्वरांचा जन्मच मुळात आई मादलंबीकेने केलेल्या वृषभव्रतातून झालेला आहे. मूल होत नाही म्हणून मोठ्या श्रद्धेने तिने हे व्रत केले आणि महादेवाचा नंदी प्रसन्न करून घेतला. त्याच्याच आशीर्वादातून बसवेश्वरांचा जन्म झाला, असे सांगितले जाते. म्हणून त्याचेच नाव तिने आपल्या मुलाला ठेवले. वृषभ या शब्दाचा अपभ्रंश बसव असा होतो. शेतीचे सर्वात महत्त्वाचे साधन हा बसवच असतो, हे आपणाला माहीत आहेच. त्यामुळे बसवेश्वरांच्या नावापासूनच या शेतीसंदर्भाला सुरुवात होते. पुढे वचनांतून विखुरलेले हे संदर्भ विपुल प्रमाणात आपणाला पाहायला मिळतात.

परमेश्वराचे अस्तित्व चराचरसृष्टीत कसे भरलेले आहे आणि परमेश्वर चराचरसृष्टी व्यापून कसा उरलेला आहे, हे सांगणारी ही काही वचने,

ही जमीन तुमचे दान
शेतातील पीक तुमचे दान
मंद वाहणारा वारा तुमचे दान (व. क्र. ५२)

बैल तुमचे दान
शेतातील पेरणी तुमचे दान (व. क्र ५४)

पर्वतराजींच्या गुहांमध्ये तू जसा आहेस
तसाच शेतीमातीमध्येही तूच आहेस
जेथे पाहावे तेथे तूच आहेस देवा
मनाला अगम्य अगोचर होऊन
जिकडेतिकडे तूच आहेस गुह्येस्वरा
तुमच्या विस्ताराचे असे
विस्तृत रूप पाहिले आहे मी (व. क्र. ५०)

जळी-स्थळी-काष्टी-पाषाणी असे सर्वत्र त्या ईश्वराचे रूप पाहणाऱ्या शरणांना शेतातल्या पिकातही ईश्वरच दिसू लागतो. जसा सावता माळायला आपल्या मळ्यातल्या प्रत्येक वस्तूत विठ्ठल दिसत होता, तसा या शरणांना सृष्टीच्या प्रत्येक रूपात शिव दिसत होता. हे बैल, ही जमीन, या जमिनीतून येणारे हे पीक ही सर्व तुझीच कृपा आहे, असेच या शरणांना श्रद्धापूर्वक वाटत होते. कारण कायक म्हणजे आपले नित्य कर्म करणे हे ईश्वराचेच काम आहे, ईश्वराचीच पूजा आहे, असा श्रद्धा भाव त्यांच्यात होता. म्हणून ईतर संन्याशांना तुच्छ वाटणारे गृहस्थांचे कृषीकर्म शरणांना तुच्छ वाटत नव्हते. उलट त्यांना तो पूजेचाच पवित्र भाग वाटत होता. म्हणूनच खालील वचनात एक शरण म्हणतो,

वृषभारुढ कर्ता एकच साऱ्या जगास
बैलाने पिकविलेले धान्य उपभोगणारे
देव तुमच्या घरचे चाकर, रामनाथा (व. क्र. ८०)

सारे जग गाईच्या मिंध्यात
नर, सुर वगैरे सर्वजण गायीच्या मिंध्यात
समस्त जीवनाचा आधार गोमय
गोकुळाचा मालक, गोपतीधर, गोप्राणस्वरूप गोविंदाचा मालक नारायण प्रिय,
रामनाथा (व. क्र. ८१)

मेंढ्या आपल्या मालक असलेल्या
धनगरास ओळखतातच (व. क्र. ८८५)

रानावनात चुकलेल्या वासरागत
हम्मा हम्मा करतोय मी
कुडलसंगम देव इकडे ये म्हणेपर्यंत (व. क्र. ११०९)

गाई, वासरं, बैलं यांचे येणारे हे सर्व संदर्भ पाहिले की हे सगळे वचनकार शेतकरीच असले पाहिजे याची खात्री पटते. अर्थातच ते काही आजच्या ग्रामीण कवींसारखे शेतीमातीचे वर्णन करणारी ग्रामीण कविता लिहायला बसलेले नाहीत. पण ईश्वराच्या भक्तीचा प्रत्यय अनुभवताना त्यांच्यासमोर स्वाभाविकपणेच शेतीमातीतल्या प्रतिमा आल्याशिवाय राहात नाहीत. म्हणून शरणांच्या वरील वचनातून आलेले जित्राबाचे संदर्भ वर्ण्यविषय म्हणून आलेले नाहीत, तर ते प्रतिमा प्रतीकाच्या रूपातच आलेले आहेत, हे आपण ध्यानात घ्यायला हवे.

शरणांच्या संदर्भातल्या काही आख्यायिकाही शरणांचे कृषीजीवनाशी असलेले सख्य दाखवणाऱ्या आहेत. एकदा बसवेश्वरांच्या घरी चोरी झाली. चोर शरणांचेच रूप घेऊन आले. गुराखी गाई चोरीला गेल्याचे सांगत आला. तेव्हा बसवेश्वर म्हणाले की, ‘गाई चोरीला गेलेल्या नाहीत. त्या योग्य ठिकाणी गेलेल्या आहेत. त्याची चिंता करू नका. आता चिंता याची आहे की वासरं गाईपासून दूर झाल्यामुळे ती केविलवाणी दिसत आहेत. तर त्यांना गाईजवळ नेऊन पोहोचवा’ या अख्यायिकेवरून असं लक्षात येतं की, बसवेश्वर गाईगुरं सांभाळत होते आणि शेवटपर्यंत त्यांचा कृषीजीवनाशी संबंध होता.

ऐदक्की मारय्या नावाचा बसवेश्वरांचा एक सहकारी होता. ऐदक्की या शब्दाचा अर्थ होतो तांदूळ गोळा करणारा. त्याच्या कामाचे स्वरूप पाहिले की लक्षात येतं तो सर्वा आणि मातरं गोळा करणारा मातंग असावा. शरणांची श्रद्धा होती की आपल्या वाट्याला आलेले काम प्रामाणिकपणे करणे म्हणजे कायक करणे हीच ईश्वरसेवा होय. एकदा चर्चेत कायकाविषयी कोणी असा श्रद्धाभाव व्यक्त केला म्हणून मारय्याने धान्य गोळा केले नाही. तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला आपले कर्तव्य करून प्राप्त वाट्यातला काही भाग दासोह म्हणून दान करणे कसे आवश्यक आहे, हे पटवून दिले.

किन्नरी भोमय्या हा बसवेश्वरांचा आणखी एक भक्त होता. किन्नरी या त्याच्या उपपदावरूनच तो संगीत क्षेत्राशी संबंधित होता हे आपल्या लक्षात येते. तो बासरीवादक होता. खाद्यपदार्थांमध्ये कांदा हा त्याच्या अत्यंत आवडीचा होता. एकदा त्याने भरपूर कांदे आणले आणि तो चिरू लागला. कांद्याच्या उग्र वासाने बसवेश्वरांचे डोके उठले. त्यांनी ओरडून कांदे फेकायला सांगितले. त्यामुळे भोमय्या नाराज झाला आणि बसवेश्वरांना सोडून निघून गेला. बसवेश्वरांना त्याचे फार वाईट वाटले. भोमय्याला प्रसन्न करण्यासाठी आणि त्याची नाराजी दूर करण्यासाठी बसवेस्वरांनी कांदा हाच उतारा शोधला आणि कांद्याचा मोठा उत्सव केला. कांद्याची हत्तीवरून मिरवणूक काढली. कांद्याच्या माळा करून त्या पताकांसारख्या गावभर लावल्या. कांद्याच्या माळा करून सर्वांनी गळ्यात घातल्या. हे सर्व दृश्य पाहून भोमय्या अगदी खुश झाला. त्याचा रुसवा कुठल्या कुठे पळून गेला.

अशा काही आख्यायिकांवरून आपणाला शरणांच्या जीवनातले आठशे वर्षांपूर्वीचे कृषी जीवनातले काही तपशील लक्षात येतात. त्यावरूनच आपणाला तेव्हाच्या कृषी जीवनाविषयी काही अंदाज बांधता येतात. म्हणून या आख्यायिका मला त्या दृष्टीने महत्त्वाच्या वाटतात. कृषीजीवनाचे आणखी काही तपशील आपणाला पुढील काही वचनातून पाहता येतील,

राहाटाच्या टोकास बांधलेल्या मडक्यात
शहाणे लोक विहिरीतून पाणी उपसून
वाफ्यामध्ये ओततात
म्हणून वाफ्यातील रोपांची वाढ होते (व. क्र. ३११)

दगड पेरून अंकुरेल का ?
कितीही पाणी घालून
खऱ्या बीच्या अंकुरासारखा (व. क्र. ३४२)

तलाव फुटल्यास
पाण्याचा लोट थांबवता येतो का (व. क्र. ८६९)

पेरलेली बी मातीत मिसळून
पाण्याच्या द्रवाने कणीस येई ;
पण तेच अग्नीत भाजले
तर कणीस येईल का ? (व. क्र. ८७९)

मशागत चांगली केल्याशिवाय
पीक चांगले येईल काय ? (व. क्र. ८८८)

वारा सुटताच उधळून घ्याहो
वारा तुमच्या हातात नाही
उद्या उधळू म्हणाल तर
हात धरून बसावं लागेल (व. क्र. ११७५)

या काही वचनांमधून कृषीजीवनाचे बरेच तपशील आपणाला पाहायला मिळतात. ते इतके साधे, सरळ आणि सोपे आहेत की, त्याविषयी काही वेगळे भाष्य करण्याची मला गरज वाटत नाही.

तनु शेत अन् मनाची बनवली कुदळ
उकरून उपटून टाकिले भ्रांतीचे मूळ
फोडूनी संसाररूपी ढेकूळ
टोकरून पेरीले ब्रम्हबीज
अखंड मंडल हीच विहीर
तया पवनची होय राहाट
सुषुम्ना नाडीच्या पाटातून नेले जल
पाच बैलांनी पिकाचा फडशा पाडू नये म्हणून (व. क्र. २४७)

साधक भक्ताचे शरीर
केळीच्या खुंटासारखे असावे
हळूहळू पापुद्रा काढून पाहिले तर
आत गाभाच नसावा
वरचे फळ आमच्या शरणांनी
बिजासहित गिळंकृत केले
कुडलसंगम देवा
मला आता कसलेही भय नाही (व. क्र. ३२६)

टिकाऊ भूमीत तन प्रलयाचे वाढे
नच समजे, नच जाणवे
माझ्या अवगुणांचे तन निपटून टाकावे
संगोपन करावे कुडलसंगम देवा
म्हणजे मी अंकुरून येईल जोमाने (व. क्र. २८८)

भगवतगीतेच्या तेराव्या अध्यायात श्रीकृष्णाने क्षेत्रक्षेत्रज्ञ योगोनाम या विषयात संपूर्ण शेतीचे रूपक खेळविले आहे. तसेच वरील वचनातूनही शरणांनी शेतीचे रूपक खेळविलेले आहे. दुष्काळ हे शेतीवरचं अरिष्ट. ते काही आपणाला नवं नाही. तेव्हाही दुष्काळ पडतच असावेत. त्यामुळे माणसं घरदार सोडून परागंदा होत असावीत. माणसं घरादाराला कुलूप लावून घर सोडून गेल्यानंतर होणारी त्या घराची अवस्था शरणांच्या नजरेतून सुटलेली नाही. एका वचनात रूपक म्हणून म्हणा किंवा प्रतिमा म्हणून म्हणा शरणांनी त्याचा उपयोग केलेला आहे,

मालक घराबाहेर गेलाय
का घरात आहे ?
उंबरठ्यावर गवत उगवलेय
घर म्हणजे
मातीची कुंडीच जणू :

मालक घराबाहेर गेलाय
का घरात आहे ?
जेव्हा खोटेपणाची बाधा होते
तुमच्या देहाला
आणि हृदय होते वासनांचा गुंता
तेव्हा घराचा मालक
आत नसणारच
नसणारच आत
हे कुडलसंगम देवा (व. क्र. ७५)

भाताचे एक शीत पाहताच
कावळा हाक मारत नाही का
आपल्या परिवारास ?
एक घोट द्रव दिसताच
कोंबडा हाक मारत नाही का
आपल्या कुल बांधवास ? (व. क्र. ५७३)

विंचू मादीने गर्भधारणा केल्यास
तोच तिचा शेवट
केळीस फळधारणा झाल्यास
तोच तिचा शेवट (व. क्र. ७३५)

पायऱ्या नसलेल्या विहिरीचे पाणी
दोराशिवाय उपसता येईल काय ?
खिळ नसलेली गाडी
कोलमडून पडल्याशिवाय राहील काय ? (१५४९)

पशुपक्षी, प्राणी, वनस्पतीविषयक काही निरीक्षणे या वचनातून पाहायला मिळतात. गर्भधारणा केलेल्या विंचवीची पिलं तिचं पोट फाडूनच बाहेर येतात. त्यानंतर तिचं अस्तित्वच शिल्लक राहत नाही. म्हणजे गर्भधारणा हे तिचं मरणच असतं. हे जैविक निरीक्षण इथं दिसतं. केळीचंही तसंच आहे. कावळा, कोंबडी यांचा स्वभावधर्म ही इथं पाहायला मिळतो. धान्याचा एक कण दिसला तरी आरडाओरडा करून सगळ्या गावाला ते निमंत्रण देतात. तसंच विहीर आणि बैलगाडीचंही निरीक्षण सूक्ष्म आहे. शेतीत काम करणारा सामान्य माणूस कसा सतत वेगवेगळ्या चिंतांनी वेढलेला असतो, ते एका वचनात पाहायला मिळतं. तो माणूस नक्कीच शेतकरी असला पाहिजे. कारण शेतकऱ्याचं जीवन म्हणजे चिंतांचं जणू मोहोळच. ते वचन असं,

गरिबास खाण्यापिण्याची चिंता
खाणे पिणे झाल्यावर कपड्यांची चिंता
कपडे घेतल्यावर घराची चिंता
घर झाल्यावर बायको मिळण्याची चिंता
बायको मिळाल्यावर आपत्य होण्याची चिंता
आपत्य झाल्यावर त्याला जगवण्याची चिंता
अपत्य जगवल्यावर संकटांची चिंता
संकटं निवारल्यावर मरणाची चिंता (व. क्र. ९७२)

अन्न-वस्त्र-निवाऱ्याच्या चिंतेने माणूस कसा मेटाकुटीला आलेला असतो याचे प्रत्येयकारी आणि उत्कंठावर्धक चित्रण इथं येतं. हाच सामान्य शेतकरी माणूस आपल्या उद्धारासाठी व्याकुळ होतो. आपले जीवन आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत कसे होईल याची चिंता त्याला वाटते. आपले सगळे आयुष्य जर भौतिक गरजा पूर्ण करण्यातच जाणार असेल तर आपली आत्मिक उन्नती कधी आणि कशी होणार याची चिंता त्याला ग्रासते. म्हणून व्याकुळ होऊन तो देवालाच विनवतो,

वेदशास्त्रे वाचणारा ब्राह्मण नव्हे मी
मुंडके उडवून मिरवणारा क्षत्रियही नव्हे मी
व्यापार उदीम करणारा वैश्य नव्हे मी
शेतकऱ्याचा साधा पोर आहे मी
माझी चूक पोटात घ्या देवा (व. क्र.११३४)

एक शरण आपल्या वचनात असेही म्हणतो की,

अंगच जमीन होऊन
लिंगच पीक होऊन
विश्वासाचे पीक पक्व होऊन
खाऊन पिऊन सुखी व्हावे म्हणे (१९०७)

या वचनातला शेवटच्या ओळीतला एक शब्द मला फार फार महत्त्वाचा वाटतो. ‘खाऊन पिऊन सुखी’ ही शेतकऱ्यांची मानसिकता असते. शेतीतून खूप काही मिळवावं अशी त्याची अपेक्षा नसते. पोटभर खायला, प्यायला मिळालं, उपाशी राहायची वेळ नाही आली की, तो स्वतःला सुखी समजत असतो. असा तो अल्पसंतुष्ट असतो.

आपल्या आयुष्याचं सार्थक झालेला एक शरण आपली ही सार्थकता शेतीच्या रूपकातूनच एका वचनात मांडतो. या लेखाचं जणू हे पसायदानच आहे. म्हणून मी तो इथे शेवटी देत आहे. कारण त्यात आयुष्याच्या संपूर्ण सार्थकतेची कृतार्थता व्यक्त झालेली आहे.

भक्त बीजरुपी, महेश्वर अंकुररुपी
प्रसादी रोपरूपी, प्राण लिंगफलरूपी
शरण ते पीक कापण्यारुपी
ऐक्य भात मिळून वाऱ्यावर पाखडताना
कोंडा जाऊन, भात मिळून
कोंडा बाहेर घालवून
मळलेला खांब उखडून
गवताची गंजी होऊन
कोंड्याची रास झाली
उरलेला भात पुन्हा बीज होण्याआधीच
निक्कळंक मल्लिकार्जुन नावाच्या पेवात शिरला (व. क्र. २५३३)

संदर्भ :
१. वचन सिद्धांतसार – मूळ कन्नड संपादक – डॉ. फ. गु. हळकट्टी, मराठी अनुवाद – प्रा. आर. एम. करडीगुद्दी, महाराष्ट्र बसव परिषद, हिरेमठ संस्थान भालकी, जि. बिदर (२०१६)
२. श्री. बसवेश्वर – एम. चिदानंद मूर्ती, मराठी अनुवाद – रवींद्र किंबहुने, नॅशनल बुक ट्रस्ट इंडिया, दिल्ली (१९९१)
३. महात्मा बसवेश्वर – सुभाष देशपांडे, जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद (२०१५)
४. क्रांतिकारी युगप्रवर्तक महात्मा बसवेश्वर – डॉ. अशोक गं. मेनकुदळे, महाराष्ट्र बसव परिषद, हिरेमठ संस्थान भालकी, जि. बिदर (२०१४)
५. प्राचीन भारत : इतिहास आणि संस्कृती – डॉ. गो. बं. देगलूरकर, अपरांत प्रकाशन, पुणे (२०२२)


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading