September 8, 2024
Maharashtra Chankya Devendra Fadnvis special article
Home » महाराष्ट्रातील चाणक्य
सत्ता संघर्ष

महाराष्ट्रातील चाणक्य

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त…

देवेंद्र फडणवीस आपल्या चाणक्यनीतीने कशी कुणावर मात करतील, याचा अंदाज व्यक्त करणे खूप कठीण आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत उबाठा सेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे निवडणुकीतील टार्गेट हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असतील, हे सर्वांना कळून चुकले आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीपेक्षा जास्त मिळालेल्या यशामुळे महाआघाडीचे नेते हुरळून गेले आहेत. दोन महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाआघाडीची सत्ता येणार, अशी ते स्वप्ने रंगवू लागले आहेत; पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे काही कच्च्या गुरूंचे चेले नाहीत, याचेही भान महाआघाडीच्या काही नेत्यांना आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे किंवा नाना पटोले या आघाडीच्या नेत्यांना सर्वात जास्त धसका हा देवेंद्र फडणवीसांचा आहे. देवेंद्र आपल्या चाणक्यनीतीने कशी कुणावर मात करतील, याचा अंदाज व्यक्त करणे खूप कठीण आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत उबाठा सेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे निवडणुकीतील टार्गेट हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असतील, हे सर्वांना कळून चुकले आहे.

देवेंद्र यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. एक नागपूरचा तरूण आमदार विधानसभेत येतो आणि नंतर कधीच मागे वळून बघत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेले देवेंद्र हे भाजपचे हाडाचे कार्यकर्ते आहेत. सामाजिक व आर्थिक परिवर्तनासाठी राजकारणाचा माध्यम म्हणून उपयोग केला पाहिजे, हे त्यांच्या सार्वजनिक जीवनाचे सू्त्र आहे. शिक्षणाने एल. एल. बी, नंतर बिझनेस मॅनेजमेंटमधे पदवी, असे उच्च शिक्षण प्राप्त केलेल्या देवेंद्र यांची महाराष्ट्राच्या राजकारणात एक सुसंस्कृत चेहरा म्हणून ओळख आहे. ‘केंद्रात नरेंद्र व महाराष्ट्रात देवेंद्र’ अशी घोषणा सन २०१४ मध्ये पक्षात ऐकायला मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आशीर्वाद लाभलेल्या देवेंद्र यांनी सत्तेच्या राजकारणात वावरताना अनेक चढ-उतार अनुभवले.

२०१४ ते २०१९ या काळात पाच वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या देवेंद्र यांना २०१९ मध्ये उद्धव ठाकरे महाआघाडीचे मुख्यमंत्री झाल्यावर विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची पाळी आली. अडीच वर्षांनंतर घडलेल्या सत्तांतराच्या राजकारणात नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडाचा झेंडा फडकवल्यावर ठाकरे सरकार कोसळले; पण पक्ष श्रेष्ठींच्या निर्णयामुळे मुख्यमंत्रीपदाचा मुगूट एकनाथ शिंदे यांच्या मस्तकावर चढवला गेला. देवेंद्र मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारमधे एकनाथ शिंदे हे कॅबिनेट मंत्री होते, त्याच शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये देवेंद्र गेली अडीच वर्षे उपमुख्यमंत्री म्हणून काम करीत आहेत. सरकारमध्ये नंबर २ पदावर काम करताना, त्यांनी मुख्यमंत्र्यांचा सन्मान व आदर कायम राखला. पक्ष नेतृत्वावर निष्ठा व मनाचा मोठेपणा हे फडणवीसांमधील दोन्ही गुणांचे दर्शन या निमित्ताने महाराष्ट्रातील जनतेला घडले. शरद पवारांच्या नंतर दुसरा युवा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची नोंद होते.

ऑक्टोंबर २०१४ मध्ये देवेंद्र मुख्यमंत्री झाले, तेव्हा ते ४४ वर्षांचे होते. पाच वेळा आमदार झाले. वयाच्या २२व्या वर्षी नागपूर महापालिकचे महापौर झाले. २०१४ ते २०१९ या पाच वर्षांच्या काळात देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री अशी त्यांची प्रतिमा तयार झाली. देवेंद्र हे बुद्धिमान व अभ्यासू नेतृत्व आहे. उत्तम प्रशासक, कुशल संघटक व मुत्सद्दी राजकारणी आहेत. विकास प्रकल्पांना गती देण्याचे धाडस व कौशल्य त्यांच्याकडे आहे. मुंबईतील भूमिगत मेट्रो व नागपूर- मुंबई समृद्धी मार्ग हे त्यांचे ड्रीम प्रोजेक्ट. हे दोन्ही प्रकल्प वेगाने कार्यान्वित होण्यासाठी, ते सतर्क होते.

देवेंद्र आज सरकारमध्ये नंबर २ असले, तरी महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र यांच्यावर हल्लाबोल केल्याशिवाय विरोधकांचे पान हलत नाही. एकनाथ शिंदे व अजित पवार यांना सरकारमध्ये जो सन्मान व अधिकार मिळाला आहे, तो भाजपमुळे आहे. महाराष्ट्रात आजच्या घडीला विधानसभेत भाजप हा सर्वात शक्तिमान पक्ष आहे आणि गेली दहा वर्षे भाजपचा महाराष्ट्रातील चेहरा देवेंद्र फडणवीस हेच आहेत. भाजपाच्या श्रेष्ठींना महाराष्ट्रात जे करायचे आहे, ते देवेंद्र यांच्या मार्फत करून घेतात. श्रेष्ठींची भूमिका व मानसिकता काय आहे, हे देवेंद्र इतरांपेक्षा जास्त ओळखतात. गेल्या दहा वर्षांत राज्यात अन्य राजकीय पक्षांच्या तुलनेने भाजपाचा आलेख सतत उंचावत होता; पण २०२४च्या लोकसभा निवडणुकीने त्याला ब्रेक लागला. लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपची घसरण झाली.

२०१४ मध्ये एनडीएचे ४२ खासदार निवडून आले होते, २०१४ मधे ही संख्या १७ वर घसरली. २०१४ मध्ये भाजपने २५ जागा लढवल्या होत्या व २२ खासदार निवडून आले होते. २०२४ मध्ये भाजपने २८ जागा लढवल्या व केवळ ९ जागांवर विजय मिळाला. मतांमध्येही एक टक्का घट झाली. राज्यात ट्रीपल इंजिन सरकार असूनही व शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी पडूनही महायुतीला व भाजपला अपयश आले. लोकसभा निकालानंतर फडणवीस आणि महायुतीचे अन्य नेते सावध झाले आहेत.

लोकसभा निवडणुकीतील अपयशाची जबाबदारी आपण स्वत: स्वीकारत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे सांगितले व आपल्याला सरकारमधून मुक्त करावे, अशी त्यांनी विनंती श्रेष्ठींना केली. खरे तर पक्षाची कोअर कमिटी शक्तिमान असते. प्रदेशाध्यक्षपद हे निवडणुकीत मौल्यवान असते; पण पक्षातील अन्य कोणीही अपयशाची जबाबदारी स्वीकारत असल्याची हिंमत दाखवली नाही. पक्षाच्या पराभवाला केवळ देवेंद्र फडणवीस ही एकच व्यक्ती जबाबदार कशी, असा कोणीही प्रश्न उपस्थित केला नाही म्हणूनच अन्य नेत्यांपेक्षा देवेंद्र यांचे नेतृत्व वेगळे आहे, असे म्हणावे लागते.

नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे पाच उमेदवार निवडून आले. खरं तर भाजपकडे एवढे संख्याबळ नसतानाही, सर्व पाच उमेदवार निवडून आणण्याचे, कसब देवेंद्र यांच्या चाणक्यनीतीने दाखवले. महायुतीचे एकूण नऊ जण निवडून आणताना शिंदे, फडणवीस-अजित पवार यांची एकजूट दिसली; पण त्याच वेळी शेका पक्षाचे जयंत पाटील यांचा पराभव झाल्याने, महाआघाडीतील विसंवाद उघड्यावर आला. विधान परिषदेतील यशाने फडणवीस हुरळून गेले नाहीत आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालाने ते निराशही झाले नाहीत. लोकसभेतील पराभवाची जखम अजूनही ओलीच आहे. मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर त्यांनी आपले सारे लक्ष्य केंद्रित केले आहे.

वाटेल ते करून राज्यात महायुतीची सत्ता पुन्हा आणण्याचा त्यांनी चंग बांधला आहे. महायुती सरकारकडे स्पष्ट बहुमत आहे. विधानसभेत १८० पेक्षा जास्त आमदार आहेत, तरीही लोकसभेत भाजपाची घसरण का झाली ? यावर पक्षात आत्मचिंतन झाले. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर लोक शांत होते. महाराष्ट्रात झालेले सत्तांतर जनतेने स्वीकारले होते; पण अजित पवारांनी त्यांच्या काकांच्या विरोधात केलेल्या बंडानंतर त्यांना बरोबर घेण्याची भाजपाची गरज होती का, अशी चर्चा सुरू झाली.

२०१९च्या निवडणूक प्रचारात देवेंद्र फडणवीस हे मी पुन्हा येईल, असे वारंवार सांगत होते, मी पुन्हा येईन हा एक टिंगल टवाळीचा विषय बनला होता. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तोड- फोड झाल्यावर, मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलो आहे, असे जेव्हा फडणवीस सांगू लागले, ते लोकांना फारसे रुचले नाही. अगोदरचे सरकार पाडणे, पक्ष फोडणे, मूळ पक्षाचे नाव व निवडणूक चिन्ह फुटीरांना मिळणे हे कदाचित शिंदे- अजित पवारांच्या मनासारखे झाले असेल; पण लोकांवर त्याचा काहीच परिणाम झालेला नाही, असे कसे म्हणता येईल ? लोकसभा निवडणूक काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यात १८ सभा झाल्या, तरीही भाजपचे केवळ नऊच खासदार का निवडून आले, हा प्रश्न मती गुंग करणारा आहे. विधानसभा निवडणुकीची चाहुल लागली आहे.महायुतीतील सर्वांना विश्वासात घेऊन, देवेंद्र यांना रणनीती आखावी लागणार आहे. भाजपा हा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आणणे, हे त्यांच्यापुढे मोठे आव्हान आहे.

मुख्यमंत्र्यांची माझी लाडकी बहीण, लाडका भाऊ, वारकऱ्यांना पेन्शन, दिंडीला अनुदान, ज्येष्ठांना तीर्थयात्रा, सुशिक्षित तरुणांना स्टायपेंड असे महिला, तरुण व ज्येष्ठांना आकर्षित करणारे अनेक धाडसी निर्णय महायुती सरकारने घेतले असले, तरी त्याची अंमलबजावणी सोपी नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात गढूळ वातावरण निर्माण झाले आहे. एकमेकांचे वैरी आहेत, अशी भावना दोन समाजात रूजणे, हे अत्यंत घातक आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून कोणी वातावरण प्रक्षुब्ध करीत असतील, तर त्यांना शांत करणे, हा लाख मोलाचा मुद्दा आहे. पुरोगामी महाराष्ट्रात जातीवरून देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले जाणार असेल, तर ते मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

पारायण का करावे ?

मृत्यूसमयी जिजाऊंनी शिवाजी महाराजांसाठी २५ हजार पागोडे बाजूला ठेवले होते – जयसिंगराव पवार

शब्दगंधचे साहित्य पुरस्कार जाहीर

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading