आपण स्वतः वारीत चालत असून , वारीतले सुखद क्षण अनुभवत आहोत , असा अनुभव येतो . मन-रंजन प्रकाशन , पुणे , यांनी `वारीच्या वाटेवर’ ही कादंबरी प्रकाशित केलेली आहे .लेखकाने ती श्री विठ्ठल-रुक्मिणी समान असणारे त्यांचे आई-वडिल आणि शेकडो वर्षे वारीची चळवळ जिवंत ठेवणारे भोळेभाबडे वारकरी यांच्या चरणी अर्पण केलेली आहे . `वारीच्या वाटेवर’ या महा कादंबरीचे समर्पक परीक्षण ठाणे (मुंबई) येथील प्रसिद्ध लेखिका नूतन बांदेकर यांनी केले आहे.
महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य घटक असलेली ‘ पंढरपूरची वारी ‘! वर्षानुवर्षे जपली जाणारी ही परंपरा म्हणजे भक्तीचा अथांग सागर ! सगळी सुखदुःख विसरून पांडुरंगाचरणी लीन होणारा जनसमुदाय ! महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रांतातील सर्वसामान्यां चे श्रद्धास्थान म्हणजे विठू माऊली !
विठू माऊली तू , माऊली जगाची…माऊलीत मूर्ती विठ्ठलाची….अशा ह्या शेकडो वर्षांची परंपरा असलेली वारी अनेक प्रतिभावंतांचे प्रेरणास्थान आहे . सन १९९६ सालापासून किमान १५ वेळा आळंदी-देहूपासून पंढरपूरपर्यंत ज्यांनी पायी वारी केली , पत्रकार म्हणून वारीतले भक्तिमय क्षण ज्यांनी बातम्यांच्या स्वरूपात लाखो लोकांपर्यंत पोहोचवले , ते पत्रकार , लेखक, कवी आणि अभ्यासू वक्ते दशरथ यादव यांच्या लेखणीतून उतरलेली वारीच्या वाटेवर ही कादंबरी अतिशय लोकप्रिय आहे. ती वाचताना आपसूकच भारावून जायला होते.
वारकऱ्यांना समर्पित कादंबरी
आपण स्वतः वारीत चालत असून , वारीतले सुखद क्षण अनुभवत आहोत , असा अनुभव येतो . मन-रंजन प्रकाशन , पुणे , यांनी ही कादंबरी प्रकाशित केलेली आहे .लेखकाने ती श्री विठ्ठल-रुक्मिणी समान असणारे त्यांचे आई-वडिल आणि शेकडो वर्षे वारीची चळवळ जिवंत ठेवणारे भोळेभाबडे वारकरी यांच्या चरणी अर्पण केलेली आहे .
मानवता धर्माचे पालन करणारा वारकरी संप्रदाय
वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि ऐतिहासिक जडणघडणी मधील महत्त्वाचा टप्पा आहे . तसेच समाजाला समतेचा संदेश देत मानवता धर्माचे पालन करायला लावणारा , जाती धर्मापासून समाजाला समतेच्या मार्गावर नेणारा एक परिवर्तनशील संप्रदाय आहे . समाजातील जातिव्यवस्था संपवण्यासाठी संतांनी जे अथक प्रयत्न केले , त्यातूनच भागवत धर्माची स्थापना झाली आणि त्याच संतांचा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय होय. वारकरी संप्रदायाचा एकच देव , तो म्हणजे लोकदेव ‘ विठोबा ‘
पालखी सोहळ्याचा प्रत्यक्ष अनुभव
पत्रकार , लेखक दशरथ यादव यांची वारीच्या वाटेवर ही कादंबरी शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या वारीचे , दिंडीचे आणि वारकऱ्यांचे वास्तववादी प्रतिनिधित्व करते . या कादंबरीमध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्याची पायी वाटचाल शब्दबद्ध केलेली असून दोन्ही पालखी सोहळ्याची वाटचाल वाचकांना वाचायला आणि अनुभवायला मिळते . कादंबरी वाचताना पालखी प्रस्थान , मुक्काम , उभे गोल रिंगण सोहळा , निरास्नान , देहू , आळंदी , इंद्रायणी , चंद्रभागा सोहळा , दिंड्या , संतांची माहिती सगळे काही प्रत्यक्ष अनुभवत असल्याचा भास होतो.
इये मराठीचे नगरी वरील अपडेटसाठी जॉईन व्हा टेलिग्रामवर त्यासाठी क्लिक करा लिंकवर https://t.me/MarathiliteratureAgriResearch
वारी म्हंजी काय
कादंबरीची सुरुवात गावाकडच्या अति रम्य पहाटेच्या प्रसन्न वातावरणात होते. शेतकरी कुटुंबाचे प्रतिनिधित्व करणारे रखमाचे कुटुंब आणि जात्यावर दळण दळताना विठ्ठल नामाच्या ओव्यानी दिवसाची सुरुवात करणारी रखमा आपल्याला भेटते. भोळा भाबडा सर्वसामान्य वारकरी आपला भक्तिभाव विठ्ठलाच्या चरणी अर्पण करत स्वतः जगाच्या सगळ्या व्याप तापातून मोकळा होत असतो, हेच अधोरेखित करत कादंबरी पुढे सरकते .
दारूच्या व्यसनाधीन असलेल्या धोंडीला दाजी नेमक्या शब्दांत वारीचा अर्थ समजावून देताना म्हणतात , ” वारी म्हंजी काय तमाशाची बारी न्हवं . पूर्वजांच्या पुण्याईनं सुरू झालेली ही एक मोठी देणगी हाय . गळ्यात माळ घालायची , दारू घ्यायची नाय अन फक्त पांडुरंगाचा ध्यास घ्यायचा .” अश्याप्रकारे दाजींच्या तोंडून लेखकाने समस्त व्यसनी मंडळींना वारी समजावून दिली आहे .
विठ्ठलाच्या भक्तीने भारलेले वारकरी
मग वारीचा प्रवास, पालखी प्रस्थान सोहळा, गावागावातुन निघालेल्या दिंड्या, वारीचा मुक्काम, वाखरीचं रिंगण, चंद्रभागेच्या तिरावर वैष्णवांचा मेळा , अखंड सुरू असलेला गजर , वाघ्या मुरळी चा जागर, कीर्तन, भजन यांनी अखंड गजबजून गेलेली पंढरी, सर्वांचीच लगबग, घाई गडबड, विठुरायाच्या दर्शनाची आस, आषाढी एकादशी विठ्ठल महापूजा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा मान आणि एका वारकऱ्याचा दैवदुर्लभ योग या सगळ्या गोष्टी यथावकाश समर्थपणे चित्रित केलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन सगळे भेदभाव दूर ठेवून आलेली भक्तमंडळी इथे फक्त वारकरी असते. हिंदू – मुस्लिम , गरीब – श्रीमंत , जात -पात यापलीकडे जाऊन ते फक्त विठ्ठलाच्या भक्तीने भारलेले वारकरी असतात. लेखकाने ठिकठिकाणी अतिशय नेमकेपणाने हे निदर्शनास आणून दिलेले आहे .
समाजप्रबोधन अन् समुपदेशन
दरवर्षी नित्य नियमाने वारीला येणाऱ्या मंडळीमध्ये मैत्रीचे संबंध निर्माण होतात. एकमेकांची सुखदुःखे सांगितली जातात, ऐकली जातात. एक म्हणजे समाजप्रबोधन आणि दुसरे म्हणजे समुपदेशन या दोन्ही गोष्टी येथे साध्य होतात. संतांनी भक्तिमार्गातून प्रबोधन करून समाजात वैचारिक परिवर्तन घडवून आणले. तीच परंपरा वारीच्या रूपाने आजही तशीच सुरू आहे. आणि मानवी जीवनाला आजही दिशा देण्याचे काम करीत आहे. वारीच्या वाटेवर वाचताना आपणही या सगळ्याचा एक भाग बनून जातो .
वारीच्या वाटेवरील गावांचे वर्णन
वारीच्या वाटेवर लागणाऱ्या गावांची वर्णने, बारामतीचे वर्णन करताना माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि पवार कुटुंबियांमुळे बारामतीचे बदललेले रूप आणि बारामतीमध्ये होणारे पालखीचे आगत स्वागत अगदी बारकाईने मांडले गेले आहे. शासकीय पूजेचा विधी देखील प्रत्यक्ष अनुभवत असल्याचा वाचकाला भास होतो . लेखकाने रेखाटलेली व्यक्तिचित्रे देखील तितकीच प्रभावी आहेत . बोलीभाषेतून व्यक्त होणारी वारकरी मंडळी जणूकाही आपल्या अवती भवती वावरत आहेत असाच भास होत राहतो.
अगदी मुळापासून वारीचा इतिहास
या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अगदी सुरुवातीला लेखकाच्या मनोगतात वारीचा इतिहास अगदी मुळापासून म्हणजे सूतसंस्कृती पासून भागवत धर्मापर्यंत सविस्तरपणे मांडला आहे. वारीचे कथानक संपल्यावर पुढे वारकरी संप्रदायातील प्रमुख संतकवींची माहिती, त्यांचे अभंग, प्रमुख सत्तर दिंड्यांची माहिती , वारीचे खंडकाव्य , वारीचे अभंग , संत ज्ञानेश्वर महाराज तसेच संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील प्रमुख दिंड्या, संपूर्ण महाराष्ट्रातील पालखी सोहळे अशी महत्वाची माहिती दिलेली आहे . त्यामुळे वाचकांना वारीची संपूर्ण माहिती अगदी सहजपणे येथे मिळते .
पंढरपूर वारी विषयीचा एक दस्तऐवज
अगदी शेवटी संदर्भसूची दिलेली आहे . ४२६ पानांचा हा ग्रंथ म्हणजे केवळ कादंबरी नसून तो पंढरपूर वारी विषयीचा एक दस्तऐवज आहे असे म्हणावेसे वाटते . पुस्तक वाचताना लेखकाची अभ्यासू वृत्ती , सूक्ष्म निरीक्षण शक्ती , भाषेवरील प्रभुत्व , शब्दांतून नेमकं चित्र रेखाटण्याची ताकद हे गुण कौतुकास्पद असल्याचे जाणवत राहते . वारीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तसेच वारीविषयी कुतूहल वाटणाऱ्या प्रत्येकाने ही कादंबरी आवर्जून वाचावी अशीच आहे . स्वतः पायी वारी न केलेल्या प्रत्येकाने या पुस्तकाच्या मदतीने वारी नक्की अनुभवावी असे मनापासून वाटते . तसेच वारकरी मंडळींनी देखील या कादंबरीद्वारे वारीच्या पुनःप्रत्ययाचा आनंद घ्यावा.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.